पार्टीत कमी झालेला ग्लास

Submitted by हरिहर. on 16 June, 2018 - 03:08

ऊचलावा त्या दगडाखाली विंचू निघायचे दिवस होते आयुष्यातले. काहीच मनासारखं होत नव्हते. नुकतेच ईंजिनिअरींगचं शेवटचं वर्ष पुर्ण केलेले. तेही ऊत्तम मार्कांनी. पण “काहीही झाले तरी नोकरी करणार नाही” हा बाणा. आणि वडीलांचे म्हणने “अनुभव येईपर्यंत नोकरी कर वर्ष दोन वर्ष, मग पाहू आपण व्यवसायाचे काहीतरी.” खरंतर माझं आणि वडीलांचे फार छान जमायचं. आई कधी कधी वडीलांवर फार चिडायची. “अहो, तो मुलगा आहे तुमचा, मित्र नाही. जरा ओरडा त्याला” म्हणायची आणि काही फरक पडणार नाही हे माहित असल्यामुळे स्वतःच चिडचीड करायची. पण माझं आणि वडीलांचे कितीही जमत असले तरी माझ्या वयामुळे आलेला ‘गाढवपणा’ आणि वडीलांचा अनुभवामुळे आलेला ‘शहाणपणा’ यांचं काही जमायचं नाही. मग कधी कधी ठिणगी ऊडायची. कॉलेज पुर्ण होताच मी जाहीर केलं “मी वर्षभर काहीच करणार नाही” तेंव्हापासून या ठिणग्या जरा जास्तच ऊडयला लागल्या. काहीही निमित्त पुरायचे. ‘चप्पल’ हे कारण तर रोजचेच. “बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली की बापाने मुलाबरोबर मित्रासारखे रहावे” असं म्हणतात. खरं तर लहाणपणी मी चालण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं तेंव्हा आधारासाठी वडीलांचं बोट धरलं त्याच दिवशी वडीलांनी मला मित्र मानलं. पण त्यांची चप्पल माझ्या पायत यायला लागली तेंव्हा मात्र या मैत्रीत खऱ्या अर्थाने भांडणांनी प्रवेश केला. मी कधीही घरी आलो की चप्पल कधी जीन्याखाली सरकव, कधी मागच्या दाराने आलो तर चप्पल तिथेच काढ असला आळशीपणा करायचो. पण वडीलांची चप्पल नेहमीच्या ठिकाणी अगदी मांडून ठेवल्यासारखी असायची. मग बाहेर जाताना स्वतःची चप्पल सापडली नाही की सरळ वडीलांची घालून बाहेर पडायचे. मग त्यादिवशी वडील दिवसभर अनवानीच फिरत. त्या अर्थाने ‘माझ्यामुळे माझा बाप फार अनवानी फिरलाय.’ असो. पण त्यामुळे वडील फारसे कधी चिडले नाही. पण आजकाल तेही कारण पुरायचे ठिणगी ऊडायला. रोज हसत खेळत होणारी जेवणे आजकाल शांतपणे व्हायची. मग मी दिवसातला जमेल तेवढा वेळ गावतल्या मित्राच्या ऑफीसवर काढायला लागलो. दुपारचे जेवणही तिकडेच व्हायचे.

रामच्या वडीलांची गावात लाकडाची वखार होती. वखारीतच एका बाजूला सॉ मिल होती. दिवसभर तिथे फळ्या पाडायचे काम चाले. बाजुलाच १५ बाय १५ चे ऑफीस होते. रामही माझ्यासारखाच कॉलेज संपवून वडीलांचा व्यवसाय सांभाळायला लागला होता. सकाळी जेवून घराबाहेर पडलो की मी रामच्या वखारीत जावून बसे. सॉ मिलवर कापले जाणारे लाकूड तासन् तास पहायला मला आवडायचे. रामचे वडील सकाळी एक चक्कर टाकून जात ते दुसऱ्या दिवशीच येत. मग रामच्या ऑफीसवर आम्हा मित्रांचा मस्त अड्डा जमायचा. शाम यायचा, दत्ता यायचा, धोंडबा यायचा, दुपारी अकील चक्कर मारायचा. मग कधी कधी कॅरमवर पावडर पडायची. क्विनचा पाठलाग व्हायचा. कधी बाजारात नविन आलेली कॅसेट आणायची आणि मग दिवसभर गाणी ऐकत पडायचे. आठवड्यातून एकदा लाकडाची गाडी खाली होई. मग त्या लाकडांमधून शोधून शोधून बऱ्यापैकी विचित्र गाठ शोधून मिलवर घ्यायची. कामगाराकडून हवी तशी कापून घ्यायची. मग तिला आठ आठ दिवस पॉलिश पेपरने घासत बसायचं. अकीलच्या दुकानात नेवून मस्त पॉलीश करुन घ्यायची. मग ते काष्ठशिल्प महिनाभर ऑफीसमध्ये ठेवून त्याच्याकडे अभिमानाने पहात बसायचे. नाहीतर मग धोंडबाच्या मळ्यात त्याच्या आईच्या हातचा ‘कांद्याचा खळगोट’ खायला जायचे. (गावाकडे केला जाणारा कांद्याचा मसालेदार रस्सा म्हणजे खळगोट. भाकरीबरोबर छान लागतो.) असा सगळा दिनक्रम असायचा. धोंडबा आमच्यापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठा. दहावीपर्यंतच शिकलेला. तालीमबाज, सहा फुट ऊंच, भक्कम पण भोळा. मागच्याच वर्षी त्याचे लग्न झालेले. मग काही ऊद्योग नसला की त्याला चावट प्रश्न विचारुन हैराण करायचे. रामच्या ऑफीस समोरच गावचा आठवडी बाजार भरायचा. मग एखाद्या आज्जीची वांगी विकून दे, कुणाचा भाजीपाला विकायल बस, बळी हमालाला मदत कर असं चालायचं. एकून काय, तर दिवस कसातरी ढकलायचा.

त्या दिवशी आठवड्याचा बाजार होता. आम्ही ऑफीसमध्ये बसुन समोरची धावपळ बघत होतो. बैलगाड्यांमधुन केळी, धान्य, भाजीपाला येत होता. बळीची धावपळ चालली होती माल ऊतरावयाची. जो तो आपल्या ठरलेल्या जागेत दुकान मांडायच्या घाईत होता. ज्यांची परिस्थिती बरी होती त्यांची ‘पाल’ ठोकायची गडबड सुरु होती. मला आज काही विशेष काम नव्हते. सकाळी निघताना आईने बाजाराची यादी दिली होती. तेवढी खरेदी केली की मी मोकळा होणार होतो. पण त्याला अवकाश होता. मी बळीला हाक मारुन यादी त्याच्याकडे दिली. आता सगळा बाजार भरुन दुपारपर्यंत पिशव्या घरपोच होणार होत्या त्यामुळे तिही चिंता नव्हती. ईतक्यात धोंडबा येताना दिसला. त्याला येताना पाहून रामला एकदम ‘कांद्याचा खळगोट’ खावा वाटला. तोवर सायकल भिंतीला टेकवून धोंडबा आत आला. त्याला बसुही न देता रामने विचारले
“काय धोंडबा, आज काय?”
“काय विशेष नाय. थोडी गवार आहे आणि रात्रीच भेंडीचा तोडा केलाय त्यामुळे भेंडीही आणलीय” असं म्हणत धोंडबाने शेवग्याच्या शेंगाची एक मोठी जुडी रामकडे एक माझ्याकडे सरकवली.
रामने विचारले “कांदा घातला कारे मार्केटला? किती आहे?”
“नाही घातला. म्हातारी म्हणतेय थांब थोडे दिवस. तिचं काहीतरी वेगळच असतय नेहमी.”
रामने परत विचारलं “धोंडबा, अरे कांद्याच्या नव्या बराखीचं कधी काढतोय काम? मला अगोदर सांग बरं. नाहीतर ऐनवेळी बॅटन दे म्हणून मागे लागायचा.”
धोंडबा म्हणाला “च्यायला असं कसं करीन? तुला विचारुनच सुरु करीन म्हणून सांगीतलय तुला मी मागंच”
माझ्या लक्षात आलं, राम काही स्पष्टपणे विषय काढणार नाही आणि त्याने कितीही आडून आडून सुचवलं तरी धोंडबाच्या डोक्यात काही प्रकाश पडणार नाही.
शेवटी मिच म्हणालो “धोंडबा, बाळ रामचंद्राला कांद्याचा खळगोट खायची ईच्छा झाली आहे. तुमच्या मातुश्रींना सांगून आज काही व्यवस्था करता येईल का?”
हे ऐकलं आणि धोंडबा ईतका जोरात हसला की मला वाटले आता हा खालच्या लाकडाच्या भुश्यात लोळणार.
हसु आवरत तो म्हणाला “आयला राम्या, एखाद्या दिवशी ऊपाशी मरशील या स्वभावापायी. मी सांगतो म्हातारीला. या तुम्ही आज जेवायला. राम्या तुला आज खळगोटाने अंघोळच घालतो. परत काय म्हणशील ‘खळगोट खायचाय’ म्हणून!”
धोंडबा त्याचा माल ऊतरवायला गेला बळीला शोधत. मी रामकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात मला ‘चुलीवर ऊभ्या करुन ठेवलेल्या खरपुस भाकऱ्या’ दिसल्या चक्क. मला हसुच आले त्याचे.

दुपारी रामचा गडी जेवणाचा डबा आणायला घरी गेला. तसं रामचं घर मिलमधून दिसायचं. समोरच होतं. पण मी असलो की राम डबा आणायचा. गडी डबा न्यायला आला की मावशीलापण समजे ‘आज अप्पा असणार मिलवर’ त्यामुळे डबा व्यवस्थित भरुन येई. सोबत ताकाचा मोठा तांब्या. टेबलवर आम्ही डबा ऊघडत होतो. गड्यानेही त्याचे फडके सोडले. मला त्याच्या भाकरीत दडपलेले कोयीची बाठ असलेली लोणच्याची टपोरी फोड फार आवडे. आजही ती चव आठवली की तोंडाला पाणी सुटतं. आम्ही नुकताच डबा ऊघडला होता तेवढ्यात धोंडबा येताना दिसला. हा कसा काय ईकडे मध्येच असा विचार करतोय तोवर तो आत आलाही. खुश दिसत होता. मी प्लेट त्याच्याकडे सरकवत म्हणालो “काय रे धोंडबा? ईतक्यात माल ऊलगला की काय?”
प्लेटमधला एक घास खात धोंडबा म्हणाला “तुमचं होऊद्या. मी जेवन बळीच्या डब्यात. माल आहे थोडा अजुन. ते मरुदे. आज आबाला मासा घावलाय मस्त नदीला. त्याला म्हणालो ठेव सगळा बाजूला, ईकू नको. आज मासा खावू. खळगोट राहूद्या.”
मी रामकडे पाहीले. जरा नाराज दिसला.
धोंडबालाही कळले. मग तोच पुढे म्हणाला “हे बघ रामभाऊ, पुढच्या आठवड्यात पावूस धरल. मंग कसला मासा बिसा? आज मिळालाय चांगला तर करु बेत. तुझ्या वैणीच्या हातची आमटी तर खावून बघ आज. खळगोट काय पळून जात नाय आणि म्हातारीपण मस घट आहे. पण मासा मात्र पळून जाईन दोन तिन महिने. कसं? आणि बामणालापण आणा सोबत.”
शामला सोबत घ्यायचं म्हटल्यावर राम खुष झाला. ‘खळगोट आणि घट्टमुट्ट म्हातारी’पर्यंत गेलेला धोंडबा पाहून मला हसु आलं. आज धोंडबा ‘वाम’ खाल्याशिवाय आणि खावू घातल्याशिवाय रहाणार नाही हे लक्षात आलं. तोवर तांब्यातलं ताक तसंच वरुन पिवून धोंडबा बाजारात पळाला देखील.
मी जेवण ऊरकले आणि रामला म्हणालो “शाम्याकडे चक्कर मारतो. त्याला संध्याकाळी यायचं म्हणजे आतापासून काहीतरी थाप मारायची तयारी करायला लागेल. चिंतूकाका काही त्याला ऐनवेळी सोडायचे नाही.”

शाम्याचा बामणआळीत जुना चौसोपी वाडा होता. चिंतूकाका म्हणजे शामचे वडील, फार कडक. रोज सोवळ्यात रामाची पुजा झाल्याशिवाय पाणीही पित नसत. तोंडातुन शब्दसुद्धा नाही. पुजेनंतर मौन सोडायचे. यांचा माझ्यावर फार राग असे. लहाणपणी मी त्यांना फार त्रास दिला होता. ते सकाळी पुजेचं तबक घेवून सोवळ्यात निघत राममंदिराकडे. मी हटकून त्यांना शिवायचो. मग चिंतूकाका परत अंगावर पाणी ओतुन घेत आणि परत येत. शाळेत गुरुजींनी आम्हाला ‘नाथांची गंगेवरच्या अंघोळीची’ गोष्ट सांगितली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी मी चिंतूकाकांचा ‘नाथ’ करायचाच असं ठरवलं. मी राममंदिरासमोरच ऊभा होतो. चिंतूकाका आले. मी त्यांच्या दंडाला हात लावला. काका परत अंघोळ करुन आले. मी परत सोवळ्याला हात लावला. काका परत अंघोळ करुन आले. त्यांनी अशी तब्बल सात वेळा अंघोळ केली. बरं, मौन असल्याने बोलायचे नाही. मी आठव्यांदा त्यांना शिवलो तेंव्हा चिंतूकाका तसेच ऊभे राहीले आणि आतल्या रामाकडे पाहून रडायलाच लागले. एवढा मोठा माणूस रडतोय म्हटल्यावर मी धुम ठोकली. हा प्रकार समोरच्या भिकातात्याने पाहीला आणि वडीलांना सांगितला. संध्याकाळी वडील खुप चिडले. पहिल्यांदाच मारायला हात ऊचलला त्यांनी पण मारले नाही. तसेच बसले. त्यांच्याही डोळ्यातून पाणी वहायला लागले. ते रात्री जेवलेही नाही. मग आईही जेवली नाही. मीही तसाच झोपलो. पण एक मात्र कळालं की आज आपल्याकडून काहीतरी मोठी चुक झाली. त्यानंतर मी कधीही चिंतूकाकांना त्रास दिला नाही आणि चिंतूकाकाही शेवटपर्यंत माझ्याशी बोलले नाही. “कसे आहात काका?” विचारले की हसुन आशिर्वादाचा हात वर करत. राग वगैरे नसायचा त्यांच्या मनात. आज हे आठवलं तरी स्वतःचाच राग येतो, पाणी येते डोळ्यात. तर असो.

मी वाड्याचे मोठे दार ढकलून आत आलो. बाजूलाच एक लाकडी, पितळी कड्या असलेला झोपाळा होता. त्याच्या शेजारी बसुन इन्नी आणि माई गव्हले करत बसल्या होत्या. मला पहाताच माईंनी डोळ्यानेच परसदाराकडे खुण केली. मी मागल्या दाराकडे जाताना इन्नीची वेणी ओढल्याचा आविर्भाव केला तशा माई हसल्या. म्हणाल्या “एकदाचे काय तिच्या वेण्या ओढायच्यात तेवढ्या ओढ अप्पा. सारखं सारखं काय त्रास देतो पोरीला!” ही इन्नी. शामची जुळी बहीण. ‘तू मोठा की मी मोठी’ म्हणून शामबरोबर सारखी भांडायची. “मीच दोन मिनिटांनी मोठी आहे म्हणून मला ताई म्हणायचं” असं म्हणत आम्हाला दटावायची. तिला मी वेण्या ओढून ओढून अगदी रडकुंडीला आणायचो मग. मोठी गोड पोरगी. लहाणपणी वडील एक रुपया द्यायचे भाऊबिजेला. मग पळत इन्नीकडे जायचे. शाम आणि माई थांबलेल्या असायच्या माझ्या साठी. मग इन्नी दोघांनाही ओवाळायची. मग ताटात आम्ही एक एक रुपया टाकायचो. ईतक्या वर्षांनीही ती एकच रुपया घेते भाऊबिजेला अजुन. मागच्या दिवाळीला बायकोने कल्पना सुचवली म्हणून लक्ष्मी असलेले सोन्याचे क्वाईन दिले तर तासभर पटवायला लागला तिला की “घे बयो आता” म्हणून. तर हेही असो. आठवणी निघाल्या की असेच वहायला होते.

परसदारी शाम कडुलिंबाला आळे करत होता. त्याला म्हणालो “संध्याकाळी धोंडबाकडे जायचय रे जेवायला. ते सांगायला आलो होतो.” शाम्या खुष. कारण त्याला परवा पुण्याला निघायचे होते. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षाला होता भारतीला. सुट्टीला आला होता. पण धोंडबाकडे काही पार्टी झाली नव्हती.
शाम्या म्हणाला “बरं झालं लवकर सांगितलं. माईला सांगतो काही तरी डब्यात द्यायला”
त्याला म्हणालो “ते राहूदे. आज हे आहे” असे म्हणत मी ऊजवा हात वरखाली हलवला.
शाम्या एकदम हरखून गेला, म्हणाला “काय्ये?”
हळू आवाजात म्हणालो “आबाला वाम मिळाली आज. त्याने ती सगळीच आपल्यासाठी बाजूला ठेवलीये.”
कोंबडी, मासे, कांद्याचा खळगोट, लसणाची चटणी या गोष्टी शामला फार प्रिय. त्याला आम्ही खुप चिडवायचो. “असा कसा रे ब्राम्हण तू? थू!”
तर हसुन म्हणायचा “कितीही झालो भ्रष्ट तरी, आम्ही तिन्ही लोकी श्रेष्ट” फार अवली होतं कार्टं. आजही तसाच आहे. मागच्या आठवड्यात त्याला भेटायला गेलो होतो बायको आणि मी. तर लेकीला म्हणत होता “काकांना रामरक्षा म्हणून दाखव बेटा सगळी. तुला संध्याकाळी पापलेट देईन करुन मम्मी” मी कपाळाला हात लावला. असो.

“धोंडबाच्या खळ्यात जेवणार आहोत आम्ही आज” असं घरी सांगून शाम मिलवर आला. मी आणि राम तयारच होतो. दुपारी बळीकडे बाजारच्या पिशव्यांबरोबर निरोप पाठवला होता “जेवायला येणार नाही” म्हणून. मिल १२ पर्यंत सुरु असायची. त्यामुळे फक्त ऑफीस बंद केले आणि तिघेही निघालो. सात वाजून गेले होते. गावातून धोंडबाच्या मळ्यात पोहचायला पाऊन तास सहज लागे. काही घाई नसल्याने रमत गमत, गप्पा मारत निघालो. दत्ता मळ्यातच रहायचा. तिकडे पोहचलो की त्याला बोलावून घ्यायचे ठरले होते. बाजार साडेसहालाच मोडला होता. त्यामुळे सगळा बाजार ओटा ओस पडला होता. सगळीकडे टाकलेल्या भाज्यांचा, केळीच्या पानांचा, कागदांचा कचरा पसरला होता. एक दोन गाढवे अधे मधे चरत होती. बाजार ओटा ओलांडून, समोर असलेल्या मराठी शाळेला वळसा घालून आम्ही मळ्याकडे वळलो. चांगलच अंधारुन आले होते. अधून मधून मळ्यातल्याच कोनाची तरी राजदूत, एम80 रस्त्यावरुन जात होती. थोड्या वेळाने रस्त्याच्या मधोमध असलेले अंबाबाईचे छोटे देऊळ लागले. आत कोणीतरी लावलेला दिवा मंद तेवत होता. तिथे हात जोडून पुढे निघालो. शामच्या हातात छोटी काठी होती. गप्पा मारता मारता तो रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांवर वार करत चालला होता. ते पाहून राम एकदम चिडलाच त्याच्यावर
“अरे बामणा, का त्या अश्राप झुडपांना त्रास देतो ऊगाच? निट चाल ना रस्त्याने”
शामही चिडवायचे म्हणून म्हणाला “का रे बाबा? आता जो मासा खायला चाललो आहे त्याला पोरेबाळे नसतील का? त्यांचे शाप लागतील आता आपल्याला. आणि त्याची बायको तळपट करेल आपल्या नावाने”
मला जाम हसायला आले शाम्याचे. तळलेल्या माशाच्या बायकोचे तळतळाट. हा शाम्या म्हणजे अशक्य प्राणी आहे.
तेवढ्यात राम ओरडला “अरे कोणी तर पडलाय रस्त्याच्या कडेला”
आम्ही पाहीले. अंधारात कोणी तरी पालथे पडल्याचे दिसत होते. आम्ही धावलो. कारण मळ्यातल्या सगळ्यांनाच आम्ही ओळखत होतो. कोण असेल आणि काय झालं असेल याचा विचार करतच आम्ही त्या व्यक्तिच्या जवळ पोहचलो.
राम म्हणाला “ए हात नका लावू कोणी लगेच. काय झालय ते माहीत नाही आपल्याला.”
शाम्या ऊचकला “अरे मदतीची गरज असेल तर कसं कळणार आपल्याला? सरा बाजूला, मी पहातो.”
अर्धा का होईना पण डॉक्टर होता तो. त्याने त्या व्यक्तीच्या मानेला हात लावला नाडी पहायला तर त्या व्यक्तीने खांदा झटकला आणि काही तरी बरळला. आम्ही सुस्कारा सोडला. जो कोण होता तो जिवंत होता आणि पिऊन पडला होता फक्त. शाम्या वैतागलाच आता “च्यायला पिऊन पडतात आणि दुसऱ्यांना त्रास ऊगाच” असे म्हणत त्याने त्या व्यक्तीला खांद्याला धरुन सरळ केले. आम्ही निरखून पाहिलं आणि तिघेही एकदम ओरडलो “धोंडबा तू?”
धोंडबा फक्त “कोणे? कोणे?” म्हणत परत झोपला. जणू काही मस्त पोटभर जेवून बायकोने टाकलेल्या बाजेवरच झोपला होता खळ्यात. आमच्या लक्षात आले, आज आवडीचा मासा म्हणजे धोंडबाने फाट्यावर जावून एखादी बिअर घेतली असणार. अर्थात आम्हा कोणालाच बिअर वर्ज्य नाही पण त्यासाठी अगोदर प्लॅनिंग करुन खळ्यातच पार्टी करायची आणि तिकडेच झोपायचे असा प्लॅन असायचा. पण आज अचानक ठरल्याने त्याने आम्हाला पार्टीतुन वगळले असणार. बरं सहा फुट ऊंच, नव्वद किलो वजनाच्या या पहिलवानाचे विमान एका बिअरमध्येच अंतराळात जाते हे आम्हाला माहीत असल्याने आम्ही त्याला पार्टी असल्यावर अर्धा ग्लास बिअर मग एक ग्सास कोक मग परत अर्धा ग्लास बिअर असं सांभाळून घ्यायचो. पण आज त्याला कोणीतरी भेटलं असणार फाट्यावर आणि त्याने त्याच्या हिशोबाने धोंडबाला पाजली असणार. घरी जाता जाता धोंडबाला जास्त झाली असणार. त्याचे विमान आता ढगात नाही तर वातावरण पार करुन अंतरिक्षाच्या निर्वात पोकळीत निवांत तरंगत होते. आम्ही आजुबाजूला पाहीले. एकीकडे सायकल पडली होती. ईकडे तिकडे माशांचे काही तुकडे दिसत होते मातीत. बाकीचे अंधारामुळे दिसत तरी नव्हते किंवा कावळ्या कुत्र्यांनी नेले असावेत. सायकलची पिशवी अस्ताव्यस्त पडली होती. त्यातले बाजारचे सामान, म्हातारीसाठी घेतलेला खाऊ वगैरे विखूरला होता. मी त्याच्या खिशात हात घालून पाहिले. मालाचे आलेले पैसे सुरक्षित होते. काही हिशोबाचे कागद होते. मी ते माझ्या खिशात ठेवले. तिघेही सुन्न झालो होतो. कारण असा प्रकार आम्ही कधी अनुभवला नव्हता. निदान आमच्या आपल्या माणसाबरोबर असं कधी झालं नव्हते. शामने त्याची पिशवी परत भरली, सायकलला अडकवली. मी आणि रामने धोंडबाचे ते अवजड धुड कसंबसं सावरलं. सायकल घेवून शाम निघाला. मागून धोंडबाच्या एका बगलेत माझी मान तर दुसऱ्या बगलेत रामची मान असा तो डोलारा सांभाळत आम्ही निघालो. धोंडबा काही तरी बरळत होता अधनं मधनं. एखाद्या वांड वासराने कासरा धरलेल्या लहाण मुलाला शेतात वाटेल तसे फरफटत न्यावे तसे धोंडबा रामला आणि मला कधी रस्त्याच्या या टोकाला नेत होता तर कधी त्या टोकाला. आमच्या दोघांच्याही मानगुटा पार कामातुन गेल्या दहा मिनिटात. थोड्या वेळाने जनानानाचे घर लागले. त्याला हाक मारल्यावर तो बिचार गाय धुवायची सोडून धावला. मग त्याच्या मदतीने आम्ही अर्ध्या तासात धोंडबाच्या घरी पोहचलो. म्हातारी गोठ्याकडे होती. शामने सायकल समोरच्या शेळी बाधलेल्या खांबाला टेकून ठेवली. आत जाऊन वहिणीला बोलावले. तोवर आम्ही धोंडबाला ओट्यावरच्या बाजेवर झोपवला. एवढ्या नशेतही त्याने पायाशी असलेली गोधडी ओढून ऊशाला घेतली आणि साहेब घोरायलाही लागले. वहिणी बाहेर आली. तिचे तोंड अगदी एवढेसे झाले होते. दुपारी धोंडबाने निरोप पाठवल्यामुळे तिही मासे घरी यायची वाट पहात होती.
ती म्हणाली “भावजी, तुम्ही बसा. मी पटकन पिठलं गरगटते तव्यावर”
शाम म्हणाला “राहू दे वहिणी आता. आम्ही परत येऊ कधी तरी. फक्त याला सकाळी सांगू नका काही आताचं” मग वहिणीने दिलेले ग्लास ग्लासभर दुध पिलो आणि निघालो. आता आलोच आहोत तर जरा दत्ताकडे चक्कर टाकू म्हणून त्याच्या घराकडे वळालो. दत्ता अंगणातच भावाच्या मुलींना काहीतरी गोष्ट वगैरे सांगत होता. एक पोर तर पार पेंगुळली होती झोपेने. आम्हाला पाहून तर तो तिन ताड ऊडालाच.
त्याने काळजीने विचारले “आयला, तुम्ही काय करताय मळ्यात यावेळी? काय झालं रामभाउ?”
आम्ही त्याला सगळं सांगीतल्यावर गडी शांत झाला. त्याला वाटलं काय झालं आणि काय नाही.
दत्ता म्हणाला “आयला ते सरपंचाचं बेणं भेटलं असणार धोंड्याला. आजवर कधी असं केलं नाही धोंडबाने. ते राहूद्या. जेवायचं काय?”
आम्ही दुध पिलो होतो त्यामुळे त्याला म्हणालो “नको त्रास देऊ घरात आता. दुध झालय आमचं वहिणीकडे”
तरीही दत्ता ऊठला, घरात गेला. ताटात शेंगा आणि मोठा गुळाचा खडा घेऊन आला. मग चौघही गुळ शेंगा खात, धोंडबाला हसत, कधी शिव्या घालत गप्पा मारत बसलो. थोड्या वेळाने दत्ताच्या आईने ताटभर तळलेल्या कुरडया आणून दिल्या. आणि शामला दुध. (बामणाचं पोरगं ना, म्हणून) कुरडया तर मला जाम आवडतात. कधीही केंव्हाही आणि कितीही खाऊ शकतो मी. बारा वाजत आले तसे आम्ही ऊठलो. तासाभरात गावात पोहचलो. शाम घरी गेला. मी आणि राम मग मिलच्या ऑफीसमध्येच झोपलो. मिल अजुनही चालूच होती.

मी सकाळी ऊठून घरी जावून अंघोळ वगैरे ऊरकली. आईची एक दोन कामे होती ती केली आणि दुपारी जेवायला रामकडे गेलो. राम वाटच पहात होता. दत्ता आणि शामही तिथेच होते. मला पहाताच त्यांनी जे हसायला सुरवात केली की काही विचारू नका. मलाही हसु आवरत नव्हते. मिलमधले कामगारही पहायला लागले काय झालं म्हणून. ईतक्यात धोंडोपंत आले सायकलवरुन. त्याने रागातच सायकल लावली आणि आत येऊन ऑफीसच्या टेबलवर बसला. एक नाही की दोन नाही. आम्ही हसायचे थांबवले. दत्ता म्हणाला “काय रे धोंडबा, लईच शांत शांत बसलाय आज. काय झालं?”
बस्. याच प्रश्नाची वाट पहात असलेला धोंडबा जे काही आमच्यावर घसरला की विचारायची सोय नाही “ भडव्यांनो! तुमच्यासाठी काल मासा घेतला. बायकोला एवढा स्वयपाक करायला लावला. आणि नालायकासारखे गायब झाले तुम्ही आणि ईथं निलाजऱ्यासारखे दात काढत बसलात. ईतके बाराचे असशाल तुम्ही असं वाटलं नव्हतं. नव्हतं यायचं तर सांगायचं होतं तसं. तुमच्यासारखे मित्र असल्यावर वाटोळं करायला वैऱ्याची काय गरज?”
हे आणि ते, काय विचारु नका धोंडबा काय काय बोलला त्या दिवशी आम्हाला. त्याच्या बायकोने त्याला सांगितलं की तो रात्री पिऊन घरी आला. झोपला. स्वयपाक झाल्यावर बायकोने त्याला ऊठवले आणि हा जेवून परत झोपला. आम्ही आलो नाही म्हणून तिने कालवन दत्ताच्या वहिणीकडे पाठवून दिले. धोंडबाला यातले काहीच आठवत नाही पण बायको कशाला खोटं बोलेल म्हणून हा येवून आम्हाला शिव्या घालून गेला. मग कधीतरी महिन्याने त्याला दत्ताने काय घडले ते सगळं सांगितलं. त्या दिवसापासुन आम्ही धोंडबाला “काय चवदार झालती माशाची आमटी, परत एकदा जमव राव बेत” म्हणून चिडवतो.
या प्रसंगानंतर एक झालं.
धोंडबा आता फक्त चकण्याचा धनी झालाय. आमच्या पार्टीत आता एक ग्लास कमी लागतो. आजही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलीये.
सुरुवातीपासुन वाचताना मला उगीच्च काही वाईट होतंय की काय असं वाटत राहिलं. मग धोंडबा पालथा पडलेला वाचुन तर खात्रीच झाली.
पण शेवट आवडला Happy

आवडली गोष्ट.
कथेकरी बुवाच व्हायचात तुम्ही, हरदासाची कथा मूळ पदावर येईतोवर किती फिरुन आली. छान आख्यान लावलंत.

ऊचलावा त्या दगडाखाली विंचू निघायचे दिवस होते ......hya vakyala salaam.

सुरेख लिहिलीय.

मागच्या आठवड्यात त्याला भेटायला गेलो होतो बायको आणि मी. तर लेकीला म्हणत होता “काकांना रामरक्षा म्हणून दाखव बेटा सगळी. तुला संध्याकाळी पापलेट देईन करुन मम्मी” मी कपाळाला हात लावला. असो. ....आणि सोन्याचे कॉईन वगैरेमुळे जरासा रसभंग होतोय पण चालतंय की!

मस्त लिहिता तुम्ही, खूप इन्टरेस्टिंग किस्से आहेत तुमच्याकडे आणि लिहिण्याची हातोटी पण भारी आहे. फक्त तुम्ही मधे मधे जरा भरकटता असे एक निरीक्षण आहे. Happy या लेखात श्याम च्या घरची सर्व कहाणी जरा अस्थानी वाटतेय.

मस्त लिहिलय. एकदम गोष्टी वेल्हाळ आहात.
मै, मला वाटत तोच यूएसपी आहे त्यांचा. ते भरकटता पण ते इतकं फ्लो मध्ये असतं की वाचत रहातो मी. अन्यथा अटेंशनspan कमी असल्यासारखं सोडून दिलं असतं पण ही गोष्ट सोडवत नाही मला.
लिहीत रहा.

मला वाटत तोच यूएसपी आहे त्यांचा. ते भरकटता पण ते इतकं फ्लो मध्ये असतं की वाचत रहातो मी. अन्यथा अटेंशनspan कमी असल्यासारखं सोडून दिलं असतं पण ही गोष्ट सोडवत नाही मला.
लिहीत रहा. >>>>> मनातलं बोललात. मला पण वाचताना कुठेही वेगळ वळण जाण्वल नाही.
मस्त शैली आहे अगदी !

maitreyee तुम्ही म्हणता ते खरं आहे. मधे मधे जरा नाही चांगलाच भरकटतो मी. "वहावायला होतं" म्हणून तसा ऊल्लेखही केला आहे वर. मी एकटाकी लिहितो आणि पोस्ट करतो त्यामुळे असं होतं. लिहून, ते दोनदा वाचून, त्यात हव्या त्या सुधारणा करने काही होतं नाही माझ्याकडून. तुमच्या सुचनेचा विचार करुन लिखाणात नक्की बदल करेन यापुढे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अमितव, आसा, प्रतिसादासाठी खुप धन्यवाद!

थँक्यू सस्मित, पाथफाईंडर!

हर्पेन, खरं तर हे आख्यानच आहे. कथेचे काहीच मटेरिअल नाहीए त्यात. मला वाटले हे कंटाळवाणे होईल पण तुम्हाला आणि ईतरांनाही आवडले चक्क. प्रतिसादासाठी धन्यवाद.

देवकी, रसभंग होतोय खरा. मी तसा लेखातच ऊल्लेख केला आहे. यापुढे चुका टाळायचा प्रयत्न करेन नक्की. सुचनेबद्दल आभारी आहे.

पुस्तकाचा ऐवज आहे महाराजा तुमच्या लेखनात.....>>>नाही हो बाका, आहे तेच फार विस्कळीत झालय.

सगळ्यांचेच आभार!

@वावे
हे कुठे कोल्हापूर का?>>> नाही. जुन्नर Happy

जुन्नर>> अरे व्वा! मी नारायणगावला वर्षभर होते. त्यामुळे त्या परिसराबद्दल मला जिव्हाळा आहे. अजून किस्से वाचायला आवडतील.

व्वा! छानच लय पकडलीत राव. सायकलवर टांग सहज टाकावी आणि पटकन वेग धरावा, कुठलीही वळणं सहज घ्यावी, तशी गोष्ट सांगता ब्वा तुम्ही. सांगत रहा. आम्ही ऐकत राहू.

मस्त लिहिलय. एकदम गोष्टी वेल्हाळ आहात.
मै, मला वाटत तोच यूएसपी आहे त्यांचा. ते भरकटता पण ते इतकं फ्लो मध्ये असतं की वाचत रहातो मी. अन्यथा अटेंशनspan कमी असल्यासारखं सोडून दिलं असतं पण ही गोष्ट सोडवत नाही मला >>>>>> +९९९९९९९९९
आवडली. असेच लिहीत रहा.

Pages