मला समजलेला कुरुन्दकर गुरुजींचा सेक्युलरिज़म

Submitted by अदित्य श्रीपद on 14 June, 2018 - 02:39

उमेदवाराने प्रचार करताना किंवा मते मागताना त्याच्या किंवा मतदारांच्या धर्म, जात, संप्रदाय किंवा भाषेच्या नावावर मते मागणे हे बेकायदेशीर आहे असा महत्वाचा निकाल २ जाने.२०१७ रोजी दिला आहे. खरेतर ह्यात आश्चर्यजनक किंवा अगदी विचारप्रवर्तक असे काही नाही. भारताच्या घटनेप्रमाणे इथे निवडून येणारा लोकप्रतिनिधी मग तो हिंदू मुस्लीम, ब्राह्मण, मराठा, महार, ओ बी सी कुणीही जरी असला तरी तो त्याच्या धर्माचे किंवा जातीचे प्रतिनिधित्व करीत नसतो तर तो अखिल भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करतो. इतका साधा अर्थ ह्या निकालाचा आहे. भारतीय संविधानाने अगदी सुरुवातीपासूनच धर्म निरपेक्ष असे रूप धारण केले आहे नव्हे तो त्याचा गाभा आहे. पण प्रत्यक्षात स्थिती अशी आहे कि जात, धर्म, वंश, प्रादेशिकता, भाषा अशा निरनिराळ्या गटात आपली लोकशाही विभागली गेलेली आहे. स्वातंत्र्य मिळताना ५६५ संस्थाने आपण मोडीत काढली पण भारतीय मन, ते सरंजामशाहीच राहिले. त्यामुळे निरनिराळ्या पक्षांच्या रूपाने नवी-जुनी घराणी पुन्हा आपली सरंजामशाही मनोवृत्ती जोपासत आहेत घराणेशाही वाढवत आहेत. तोंडाने लोकशाही, समाजवाद धर्म निरपेक्षता अन काय काय बोलतात पण वागताना?ह्या पक्षांचे आणि त्यांच्या मालकांचे वर्तन अगदी मध्ययुगीन राजे महाराजान्साराखेच आहे.त्यांच्या अनुयायांचे वर्तन हि तसेच.
वैयक्तिकबाबीत, खाजगीमध्ये माणसाला त्याच्या धार्मिक समजुती बाळगण्याचे, पाळण्याचे स्वातंत्र्य जरी घटनेने आपल्याला दिलेले असले तरी आरोग्य, सामाजिक व वैयक्तिक नीतिमत्ता, अन सुरक्षितता यांना विरोधी जाणारे धर्माचे आणि व्यक्तीचे आचरण अवैध ठरवून पर्यायी योग्य व वैध आचरण कोणते हे ठरवण्याचा अधिकार घटनेला आहे.ह्याचा सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतो. ह्या टप्प्यावर कुरुन्द्करांसारख्या साक्षेपी विचारवंताची आठवण येथे झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी समजावून सांगितलेला सेक्युलारीझाम ह्या निमित्ताने इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मला समजलेला कुरुन्दकर गुरुजींचा सेक्युलरिज़म

(खालील लेख नरहर कुरुंदकरांच्या ‘जागर’ ह्या पुस्तकातील लेखामधल्या विचारावर बेतलेला आहे.)

Secularism ह्या शब्दाचं नक्की मराठी भाषांतर कारण तसं अवघड काम आहे. अधर्मी, निधर्मी, धर्मातीत ह्या शब्दांनी secularism चा अर्थ नीटसा स्पष्ट होत नाहीच पण इहलोकवादी किंवा इहलौकिक या सारख्या शब्दांनी सुद्धा तो स्पष्ट न होता उलट गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त . त्यातून secularism ला दीर्घ असा इतिहास असून तिचा क्रम क्रमाने विकास होत गेला असल्याने , हि संकल्पना तिचा इतिहास, तिचा विकास समजून घेणे आणि ह्या शब्दाच्या भाषांतराच्या भानगडीत फारसं न पडणं हेच श्रेयस्कर. आता secularism ची व्याख्या न करता secularism धर्माची जी व्याख्या करते ती पाहणे इथे उद्बोधक ठरावे किंवा अशा प्रकारे धर्माची व्याख्या करणारी विचार प्रणाली म्हणजेच secularism असे म्हणणे इथे सयुक्तिक ठरावे . तर फार तपशीलात न जाता सांगायचे तर “धर्म महणजे माणसाच्या फक्त पारलौकिक जीवनाचा विचार करणारी संस्था किंवा संकल्पना” अस secularism मानतो. जगातल्या एकही धर्माला हि व्याख्या पटणार नाही आणि धर्माची हि सर्वात धर्मद्रोही व्याख्या आहे ह्या एका(च) बाबतीत जगातल्या सर्व धर्मांचे एकमत होईल . कोणताही धर्म स्वतःला फक्त इहलौकिक किंवा पारलौकिक मानीत नहि. किंबहुना सर्व धर्म इहलोक आणि परलोक हि फक्त संकल्पना म्हणून पृथक आहेत असा दावा करतात . इथे जे करायचे ते परलोकातील जीवन सुसह्य व्हावे म्हणूनच करायचे हा सर्व धर्मांचा अट्टाहास, त्याकरता प्रत्येक धर्माने त्याच्या अनुयायान्करिता काही श्रद्धा आणि चालीरीती तयार करून ठेवल्या आहेत. त्यांचा आधार जर तुटला तर सर्व धर्म हवेत तरंगू लागतील, ते निष्प्रभ होतिल. उदा . गाय हे इहलोकातील एक जनावर. तिला खाणारे प्राणो, अगदी मानव सुद्धा इहलोकातील . जर गाय खाणे हे पाप असेल आणि त्यामुळे परलोकात यातना भोगाव्या लागतील असे धर्माने सांगितले नाही तर धर्माचा इहलोकातील आधार म्हणजे अनुयायांना नियन्त्रीत करायचा अधिकार तुटेल. तेव्हा सर्व धर्म अशी परिस्थिती निर्माण होऊ न देण्याची काळजी घेताना दिसतात. जो परलोक कुणीही पहिला नाही तेथील इष्ट अनिष्ट परिणामासाठी इहलोकातील अचारावर बंधन टाकणे हा सर्व धर्मांच्या विचारांचा पाया आहे आणि सर्व धर्मांना फक्त पारलौकिक बाबी पुरते मर्यादित करून त्यांचा इहलौकिक प्रभाव नाममात्र करणे हा secularism चा गाभा आहे.
हा पारलौकिक अधिकाराचा मुद्दा दिसतो तितका साधा किंवा निरुपद्रवी नाहि. बोरातल्या आळीत तक्षक लपवा तसा धर्माचा सारा विखार ह्यात दडलेला असतो. माणूस मेल्यावर जरी त्याचा आत्मा परलोकात जातो आणि तेथे तो शरीरापासून वेगळा असतो तरी इहलोकातील पापपुण्यापासून तो मुक्त असत नहि. त्यामुळे धर्म इथे इहलोकात माणसाचे आयुष्य नियंत्रित करतो. जेव्हा secularism धर्म हि फक्त पारलौकिक बाबींवरचे नियमन करणारी संकल्पना मानतो तेव्हा तो धर्माचे इहलोकातील अस्तित्व नाममात्र करतो. त्या अर्थाने secularism हा धर्म द्रोह आहे. मग या पार्श्व भूमीवर भारतीय संविधान secular आहे म्हणजे काय?भारतीय राजकारणात secularism चा विचार हा अल्पसंख्यांकांच्या हित रक्षणा संदर्भात करण्याची घोडचूक नेहमीच केली जाते जी कि secularism च्या मूळ संकल्पनेला मारक आहे. Secular राज्यव्यवस्थेत अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण होत असेल तर ती एक अनुषंगिक बाब झाली, secularism फक्त अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणासाठी नसतो तर तो मुख्यत्वे बहुसंख्यांकांच्या हित रक्षणासाठी व हितसंवर्धनासाठी असतो हि बाब नजरे आड करून चालणार नाही. जर secularism समाजाला धर्माच्या गुलामगिरीतून मुक्त करून समतेकडे आणि विकासाकडे घेऊन जात असेल तर त्याला समाजातील बहुसंख्यान्कांच्या हिताला नजरेआड करून कसे चालेल? भारतात हिंदू हे बहुसंख्य(८५%) आहेत म्हणून secularism ह्या ८५% हिंदूंना धर्माच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आवश्यक आहे. मुसलमान किंवा ख्रिश्चन या देशात असले काय किंवा नसले काय secularism ला त्याने काही फरक पडत नाही कारण secularism सामाजिक पातळीवर धर्माचे प्रभाव क्षेत्रच मानत नाहि. याचा अर्थ असा नव्हे कि मी सर्व मुस्लिमांना भारतातून हाकलून द्यायची गोष्ट करतो आहे. secularism हा सामाजिक जीवनात धर्माचे अस्तित्व मान्य करत नसल्याने ज्या कोणा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चनांना तो आपल्या धर्म स्वातंत्र्यावर घाला वाटतो त्यांनी पर्यायी देशांचा विचार करावा. जे कोणी हिंदू मुस्लिमांना भारतातून हाकलून द्यायची बात करतात किंवा स्वप्नं बघतात त्यांनी एक गोष्टं समजून घेतली पाहिजे कि २०-२५ कोटी लोकसंख्येला देशातून हाकलून देणे हि सोपी गोष्ट नाही आणि ती हिंसा आणि अत्याचाराविना घडणे शक्य हि नाही. हिंसा आणि विध्वंस ह्या गोष्टी मुल्यांचा ऱ्हास करतात हजारो वर्षांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा त्यामुळे मातीमोल होतो. राजा राम मोहन राय ते अगदी आजच्या नरेंद्र दाभोल्करांसारख्या समाज सुधारकांनी जे काही थोडफार या हिंदू समाजाला आधुनिक, समजूतदार, विज्ञाननिष्ठ, सहिष्णू बनवलं आहे ते सगळ समूळ नष्ट होण्याचा धोका यात आहे. एवढी मोठी किंमत देणे आपल्याला परवडणार नाही. Secularism ची गरज आपल्याला मुस्लिमांच्या हितरक्षणासाठी नाही तर गेल्या २०० - २५० वर्षातल्या पुरोगामी हिंदू चळवळीने जे काही या हिंदू धर्माला दिले आहे , जे काही थोडे फार प्रबोधन झाले आहे त्याच्या रक्षण व संवर्धनासाठी आहे.
मानवी मनाची धर्माच्या गुलामगिरीतून सुटका तीन प्रकारंनी होऊ शकते
१) पराभव- ह्या मुळे प्रस्थापित धर्मश्रद्धांना धक्का बसतो आणि त्यामुळे त्या धर्मातील विचारवंत वेगळा विचार करू लागतात आणि प्रबोधनाची एक सुरुवात होते पण मुळात त्या करता त्या धर्मात नव्या विचाराला कमीत कमी मांडण्याची तरी परंपरा असावी लागते अन्यथा उलट हि होऊ शकते. जसे कि १९ व्या शतकाच्या मध्यावर इस्लाम बाबत झाले. तोपर्यंत जगात अस्तित्वात असणारी २ महान मुस्लिम साम्राज्य, एक- भारतातील मोगल आणि दोन- तुर्कस्तानातील ओट्टोमान साम्राज्य क्रमाने निष्प्रभ आणि पराभूत होत गेली ह्याचा धक्का तत्कालीन मुस्लिम विचारवंतांना बसला पण त्यामुळे ते अधिक मुलतत्ववादी आणि कर्मठ बनत गेले. हा इतिहास बराच विस्तृत आहे आणि त्याबद्दल नंतर एखाद्या वेगळ्या लेखात लिहिता येईल पण इथे मुद्दा हाच कि प्रचलित धर्म श्रद्धांचा पराभव हा प्रबोधनाचा खात्रीलायक मार्ग मानता येत नाही
२)धर्मातील अंतर्गत विचार प्रवाह किंवा कलह - हा प्रकार हि सर्व धर्मांबाबत झालेला आढळतो आणि त्यामुळे नवा पंथ किंवा धर्माचे नवे रूप तात्कालिक प्रबोधनकारी , जास्त सहिष्णू वाटते पण प्रत्यक्षात फक्त जरासा जास्त सहिष्णू पण मूलतः स्थितिवादी आणि सर्वसमावेशक असे धर्माचे रूप अविच्छिन्न राहते .
३)तिसरे म्हणजे विज्ञान धर्माला मान्य नसणारी पण नाकारता न येण्याजोगी सत्ये प्रस्थापित करते आणि या सत्यांभोवती तत्कालीन समाजाचे हितसंबंध निर्माण होऊ लागतात त्यामुळे धर्म जो समाजाच्या व माणसाच्या आयुष्यातील सर्व लहान सहन बाबीचे नियंत्रण करू पाहतो त्याच्या आणि ह्या नव-प्रस्थापित हितसंबंधांमध्ये संघर्ष अटळ ठरतो.
पुढे जाण्या अगोदर इथे मला एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे . सामान्यत्वे हिंदू धर्म हा परमत सहिष्णू , विचार स्वातंत्र्याचा आदर करणारा आणि उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. पण हि विशेषणे तकलादू आणि अर्धसत्य विशद करणारी आहेत. हि गोष्ट खरी कि हिंदू धर्मियांनी कधी बाह्य समाजांवर आक्रमण करून स्वतःचा धर्म व संस्कृती त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केल्याचा इतिहास नाही पण तस जर पाहू गेले तर बाह्य आक्रमण कारी जरी त्यांच्या विजेत्या धर्माच्या पताका घेऊन इथे आले असले तरी त्यांचा मूळ हेतू/ किंवा आक्रमणाचे मुख्य कारण हे संसाधनांची / अन्नाची/ जगण्या योग्य सुविधांची कमतरता हेच होते.नवविजित प्रांतातील आपली सत्ता दृढ मुल करण्यासाठी एतद्देशीयांची संस्कृती व त्यांचा धर्म समूळ नष्ट करून आपल्या बरोबर आणलेला - विजेत्यांचा धर्म व संस्कृती त्यांच्यावर लादणे हे आक्रमकांचे एक धोरण असे. भारतीय उपखंडात तशी परीस्थिती फारशी नसल्याने फक्त हिंदू च नाही तर इथले सर्व धर्म(जैन, बौद्ध, शीख) हे परिस्थितीवश अनाक्रमक व तुलनेने कमी क्रूर आहेत. हा एक मुद्दा सोडला तर एतद्देशिय हिंदू हे सुद्धा काही कमी कर्मठ नहित. स्वधर्मीय स्त्रिया, अस्पृश्य आणि मागासांशी त्यांची वर्तणूक काही माणुसकीची खचितच नव्हती आणि नाहि. तसं पाहू जाता हिंदू इतकी चिवट माणसं इतरत्र सापडण मुश्किल. चार्वाकापासून ते बसवेश्वरापर्यंत आणि राजा राम मोहन राया पासून ते अगदी महात्मा फुले, कर्व्यांपर्यंत असंख्य सुधारक होऊन गेले. त्यांच्या कार्याला म्हणावी तशी साद काही या समाजाने दिली नाही. हा समाज एखाद्या मोठ्या, प्रचंड, सुस्त अजगरासारखा आहे, तो हलतच नाही किंवा फारच थोडा हालचाल करतो. या सर्व महान लोकांना या हिंदू समाजाने पचवून टाकले आहे आणि वर अजून ढेकर ही दिला नाही. अहो जो समाज अंधश्रद्धे वर प्रहार करणाऱ्या गाडगे बाबांचा देव करून त्याला नवस बोलतो , म. फुल्यांच्या प्रतिमेच्या उद्घाटनाला सत्यनारायण घालतो आणि शिवाजी महाराजांच्या सारख्या राष्ट्र्पुरुषाला जाती च्या कुम्पणा मध्ये अडकवतो त्याला सहिष्णू तरी कसे म्हणावे. सर्व समाज सुधारकांचे व धर्म सुधारकांचे गेल्या १५० वर्षातील एकूण कार्य आणि त्यात आलेलं यश पाहू लागलो तर धक्का बसण्याइतकी निराशा निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. शहरातून वावरणारा १५-२०% समाज तोही मर्यादित प्रमाणात या सुधारणांनी प्रभावित झालेला आहे. बाकी सगळा तसा अंधारच आहे. उलट प्रौढ मतदानाने सुप्त जातीयवाद उसळून पुन्हा वर आलेला आहे. सर्व सुधारक महापुरुष, राष्ट्रपुरुष आज जाती-पातीच्या, भाषेच्या, प्रादेशिकतेच्या तुरुंगात खितपत पडलेले आहेत, ह्यांच्या बद्दल आम्ही जरा जास्तच संवेदनशील झालो आहोत. उदाहरणार्थ शिवाजी महाराजच घ्या . आजकाल शिवाजी महाराज हे आपले प्रेरणा स्थान कमी आणि मर्म स्थान जास्त झाले आहेत. कुणी "शिवाजी महाराज कि जय" म्हणून आमच्या ढून्गणावर लाथ घातली तर ते आम्हाला चालते पण कुणी काही नवे मुल्य मापन करायचे म्हटले कि आमच्या भावना भडकल्याच! . जी गोष्ट शिवाजीची तीच संभाजीची आणि तीच बाबासाहेबांची . हे सर्व फार भयावह आहे. हा कमालीचा स्थितीशील असणारा पण( आणि म्हणूनच ) टिकून राहण्याचा लोकविलक्षण चिवटपणा दाखवणारा हिंदू समाज मनाने आधुनिक व गतिमान कसा करावा हा भारतीय सेक्यूलारीजम समोरील मोठा प्रश्न आहे.
तसं म्हटलं तर युरोपातील सेक्युलरीजमच्या पोटात फक्त सामान्य जनतेच्या इहलौकिक जीवनावरील धर्माची पकड समाप्त करणे एवढाच कार्यक्रम येत होता पण भारतात हि गोष्ट सामाजिक सुधारणा, समता, आणि अंत्योदयापासून सुटी आणि एकटी साध्य करता येणे शक्य नव्हते. म्हणून भारतात सेक्युलरिजम ला स्वतः शेजारी व्यक्तिस्वातंत्र्य एक मूल्य म्हणून उभे करून जोपासावे लगते. नाहीतर जगातल्या धर्म न मानणाऱ्या हुकुमशाह्या/ राजकीय तत्वज्ञाने काही कमी क्रूर नहित. हा संबंध लक्षात घेतला म्हणजे लोकशाही, समाजवाद, राष्ट्रवाद, आणि सेक्युलरिजम या सहचारी संकल्पना म्हणून उभ्या कराव्या लागतात. स्वतः प. नेहरूंनी सांगितल्या प्रमाणे किमान ५००० वर्षांचे सातत्य असलेले आपले भारत राष्ट्र हे म्हणूनच नव्या मूल्यांच्या आधारे पुन्हा नव्याने स्थापित करावे लागते. भारतीय संविधानाने सुद्धा हीच भूमिका घेतेलेली आहे. भारतीय संविधानाने घेतेलेली समान नागरिकत्वाची भूमिका हि त्यामुळे लोकशाहीची आणि सेक्युलारीजमचीच भूमिका आहे.
आता समान नागरिकत्व म्हणजे काय तर या देशाच्या सर्व नागरिकांना धर्म, जात, भाषा, प्रांत, लिंग यांचा विचार न करता समान अधिकार/ स्वातंत्र्य असणे . यात धर्म स्वातंत्र्य हि आले. धर्म स्वतंत्र्या मध्ये नागरिकांना आपण कोणत्या धर्माचे अनुयायी आहोत , कि कोणताच धर्म मानीत नाही, धर्मांतर करणे, भिन्न धर्मियाशी लग्न करूनही स्वतःचा धर्म टिकवणे , आपल्या धर्मातल्या कुठल्या गोष्टी मानणे किंवा कुठल्या गोष्टी त्याज्य आहेत हे ठरवणे असे अधिकार दिलेले आहेत. जगातला कुठला हि धर्म असे अधिकार आपल्या अनुयायांना देत नाही, म्हणून आपले संविधान धर्म स्वातंत्र्य जरी नागरिकांना देत असले तरी धर्मांना कुठलेही स्वातंत्र्य देत नाही. इहालौकिक बाबतीत धर्माचे कोणतेच प्रभाव क्षेत्र न मानणारे आपले संविधान म्हणून मुळात सेक्युलारीजमचा उल्लेख करीत नव्हते. संविधानाने आपले भारतीय गणराज्य सेक्युलर म्हणून घोषित करावे असा प्रयत्न K.T. Shah यांनी करून पहिला पण त्याला प. नेहरूंनी विरोध केला. कारण सेक्युलारीजाम जरी फक्त पारलौकिक जीवनातील धर्माचे प्रभूत्वा मनात असले तरी तेव्हाधेही स्वातंत्र्य धर्माला द्यायला आपले संविधानकर्ते तयार नव्हते. भारतीय संविधानाने गरज पडल्यास आरोग्य, सामाजिक व वैयक्तिक नीतिमत्ता, अन सुरक्षितता यांना विरोधी जाणारे धर्माचे आणि व्यक्तीचे आचरण अवैध ठरवून पर्यायी योग्य व वैध आचरण कोणते हे ठरवण्याचा अधिकार स्वतः कडे ठेवला आहे. धर्माशी निगडीत अगर अ-निगडीत अशा सर्व सार्वजनिक बाबिंमध्ये आपली संसद सार्वभौम आहे. हेच ते कलम ४४ आहे कि ज्याच्या विरोधात सर्व मुस्लिम धर्मगुरू बोलत असतात. घटना समितीत हे कलम जेव्हा मांडले गेले होते तेव्हा मुस्लिम नागरी कायदा यातून वगळावा अशी एक उपसूचना मांडण्यात आली होती पण ती फेटाळून लावण्यात आली. ( ती उपसूचना कोणी मांडली होती हे वेगळे सांगणे नकोच)त्यामुळे हिंदू किंवा नुस्लीम किंवा इतर कुणी अन्य धर्मीय यांच्या धार्मिक कायद्यात हस्तक्षेप करण्याचा हक्कच फक्त संसदेला नाही तर तसे लवकरात लवकर करणे हे संसदेचे कर्तव्य आहे.
समान नागरी कायदा म्हटले कि मुसलमान आणि भारतीय राजकारणातला मुसलमानांचा प्रश्न हे दोन्ही ठळकपणे आपल्या समोर येतात. वरती हिंदू बद्दल काही लिहिल्यामुळे भारतातील लोकसंख्येने नंबर २ चा धर्म जो मुस्लीम धर्म त्याबद्दल थोडे लिहिणे क्रमप्राप्त आहे. आता आता पर्यंत म्हणजे १९ व्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत इस्लाम हा विजेत्यांचा आणि म्हणूनच राज्यकर्त्यांचा हि धर्म राहिलेला आहे. त्यामुळे बहुसंख्य मुस्लिमांचे ऐहिक हितसंबंध सुरक्षित आणि वर्धीष्णूच होते मुस्लीम असल्यामुळे, सरकारदरबारी चांगल्या नोकऱ्या मिळत, प्रतिष्ठा मिळे, आक्रमणाचा, राज्यकरण्याचा अधिकार प्राप्त होई शिवाय केवळ मुस्लिम असल्याने परलोकातील उत्तम गती हि सुनिश्चित होती.त्यामुळे सर्व साधारण पणे मुस्लीम समाज कर्मठ असेल तर त्यात आश्चर्य असे काही नाही . या सर्वसामान्य मुस्लिमांसाठी इस्लाम हा इहलोकातील इभ्रत व मान मरातब यांचा लाभ आणि परलोकातील सद्गती चा मुख्य आधार होता. जेव्हा असे असेल तेव्हा धर्म चिकित्सा, धर्म सुधारणा कशी संभवणार, त्या करता हे हितसंबंध धोक्यात आले पाहिजेत. तसे जवळ पास ७०० ते ७५० वर्ष भारतात झाले नाही . मोठा पराभव, सर्वस्व गमावण्याची वेळ, मुळापासून उखडून फेकले जाण्याची वेळ त्यांच्या वर कधी आली नाही. तिकडे अराबास्तानांत हि फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. प्रेषिताच्या मृत्युनंतर(इ.स.६३२) साधारण १० वर्षातच आक्रमणकारी मुस्लिम फौजांनी अक्खा अरबस्तान जिंकला आणि ७ वे शतक संपायच्या आत जवळ पास पूर्ण मध्य पूर्व हिंदुकुश पर्वत ते रोमन - बयाझन्टैन साम्राज्य, स्पेनच्या किनार पट्टी पासून ते उत्तर आफ्रिका, बलाढ्य पर्शिअन साम्राज्य यांना हादरे देत एक प्रचंड मोठी सत्ता दृढमूल केली जी कि तत्कालीन ज्ञात जगाच्या १/३ भूभागावर वसलेली होती.उम्माय्याद खिलाफत संपेपर्यंत म्हणजे इस्लाम च्या स्थापने पासून २०० वर्षाच्या आत या जिंकलेल्या भूभागातून मुऴचा धर्म आणि संस्कृती पूर्ण नष्ट करून तो भूभाग पूर्णतया इस्लाममय करण्यात त्यांना यश आले. केवळ २०० वर्षात मिळवलेले हे यश देदिप्यमान तर होतेच पण त्यामुळे मुस्लिमांचा प्रेषिताच्या शिकवणुकीवर दृढ विश्वास बसला. या काळातले इस्लाम आणि तो पाळणारे मुस्लिम हे सगळ्यात शुद्ध आणि म्हणून अल्लाला जास्त प्यारे आहेत असे प्रतिपादन त्यानंतर आजतागायत केले जाते.खरे पाहू जाता हा इतिहास इस्लाम मधील अंतर्घात संघर्ष , रक्तपात, कत्तली आणि सत्तास्पर्धा यांनी भरलेला आहे. अहो प्रेषितांनन्तरचे पहिले चार प्रेषित जे शिया सुन्नी व इतर सर्वांना सारखेच वंदनीय आहेत ते सुद्धा सत्तास्पर्धा आणि कत्तलीचे बळी ठरले आहेत.जसा विजय इस्लामच्या फौजांना मिळाला होता अगदी तसा किंवा त्यापेक्षा मोठ जय अलेक्झांडर किंवा चेंगीज खान ( हा मुस्लिम नव्हता त्याव्ह्या नातवाने नंतर इस्लाम स्वीकारला- खान हे मंगोलियन नाव आहे) यांनी मिळवला होता तेव्हा इस्लामला मिळालेल्या विजयात भव्यत असली तरी दिव्यता खचितच नव्हती. इतका प्रचंड मोठा विजय आणि त्यानंतर आलेले दीर्घ कालीन स्थैर्य हे इस्लाम मधील धर्म चिकित्सा आणि सामाजिक व धार्मिक सुधारणेला पोषक खचितच नव्हते. खरा पाहू जाता जसा विजय झंझावाती इस्लामी फौजांना इतरत्र मिळाला तसा भारतात मिळाला नाही. खरे पाहू जाता इस्लाम चा भारतावर पहिला हल्ला इ. स. ६३७ म्हणजे प्रेषिताच्या मृत्युनंतर फक्त ५ वर्षात सिंध प्रांतावर झालेला आहे पण त्यांना सिंध वर विजय मिळायला पुढे ७५ वर्ष(इ.स,७१२) संघर्ष करावा लागला. इ.स. ९७७ मध्ये सुबकत गिन याने काबुल कंदाहार म्हणजे तत्कालीन वायाव्व्य भारत जिंकला. तिथून पुढे दिल्ली गाठायला इस्लामला १९४ वर्षे संघर्ष करावा लागला आणि तिथून पुढे दक्षिण गाठायला अजून ११८ वर्षे लढावे लागले. म्हणजे संपूर्ण भारत पादाक्रांत करायला त्यांना एकूण ६७३ वर्षे लागली. झंझावाती इस्लामला हि काही भूषणावह गोष्ट नव्हतीच तसेच जसा दाखवला जातो तसा हा हिंदूंच्या लाजिरवाण्या पराभवाचा व गुलामीचा हि इतिहास नसून त्यांच्या संथ पण चिवट प्रतिकाराच्या आणि हळू हळू आक्रमण पचवून रिचवून टाकण्याच्या परमापारेला साजेल असा संघर्शेतिहास आहे फक्त या प्रक्रियेमध्ये ब्रिटीश आल्यामुळे थोडा घोळ झाला पण हि प्रक्रिया अजूनही चालूच आहे फक्त ती अत्यंत संथ असल्याने पटकन लक्षात येत नाही एव्हढेच. असो हा फक्त इस्लामच्या भारत पादाक्रांत करण्याचा इतिहास झाला. मुस्लिमांना त्यांचा विजय भारतात पूर्णत्वाला कधीच नेता आला नाही . अगदी ब्रिटीशांकडून निर्णायक पराभव होई पर्यंत राजपूत, शीख, मराठे, असम चे अहोम राजे, (दक्षिणेत होऊन गेलेल्या विजयनगर साम्राज्याचा उल्लेख इथे आवर्जून केला पाहिजे)असे मुस्लिमांशी संघर्ष करतच होते . नव्हे इस्लामला- मोगलांना राजपुतान्सारख्या पराधर्मियांशी मिळते जुळते घेऊनच दीर्घकाळ सत्ता उपभागता आली. अकबरासारख्या शहाण्या, मुत्सद्दी ( संत नव्हे ) राजामुळे मुस्लिम सत्ता इथे एव्हढा काळ नांदली. हा खरं तर इस्लामचा एक प्रकारे पराभवच होता. दिव्य, सर्वात शुद्ध परिपूर्ण विचारधारेला विजयासाठी मागास, अपरिपूर्ण मागास संस्कृतीच्या मदतीने विजय प्राप्त करावा लागतो हे एक प्रकारचे अपयश नाही काय! ह्याची जाणीव सय्यद नुरुद्दीन मुबारक, शाह वलीउल्ला, सय्यद अहमद( बरेलीवले) अशा अनेक तत्कालीन मुस्लिम विचारवंतांना झालेली होती. त्यांनी तसे प्रतिपादन हि केलेलं आहे. पुढे त्यांना ह्या काफर संस्कृतीकडूनच लाजिरवाणे पराभव स्वीकारावे लागले आहेत. १८५७ च्या युद्धात ब्रिटीशाकडून निर्णायक पराभव झाल्यावर इस्लाम मध्ये विचार मंथन सुरु झाले खरे पण निष्कर्ष त्यांना अधिक मुलतत्ववादी बनवणारे अधिक कर्मठ आणि सनातनी बनवणारे होते. मोगल काळात सत्तास्थापने साठी काफारांशी केलेल्या तडजोडीमुळे इस्लामचे अनुयायी अशुद्ध झाले त्यामुळे ते पराभूत झाले म्हणून परत वैभव व विजय मिळवायचा असेल तर मुळ, प्रेषित कालीन इस्लामकडे परत जायला हव हा असा काहीसा तो निष्कर्ष होता. हा असाच विचार आज बऱ्याच मुस्लिम विचारवंतांकडून व्यक्त होताना दिसून येतो. जे खरेच प्रगतीक विचार मांडतात त्यांना मुस्लिम समाज मान्यताच देत नाही उदा. मौलाना अबुल कलम आझाद, हमीद दलवाई, वगैरे . हे असे अनेक वर्षे धर्म चिकित्सेची परंपरा इस्लाम मध्ये नसल्या मुळे घडले आहे हे आपण नीट समजून घेतेले पाहिजे.
या पार्श्व भूमीवर आपण भारतीय मुस्लिमांचे भारतातल्या संविधानातले स्थान विचारात घेतले पाहिजे. आपले संविधान कुठल्याच धर्माला सार्वजनिक / सामाजिक पातळीवर ओळखत नाही, त्याचे अस्तित्व व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग म्हणून फक्त व्यक्तिगत पातळीवर मान्य करते. हा मुद्दा जसा हिंदूंना लागू आहे तसाच भारतीय मुस्लिमांना सुद्धा लागू आहे. संसदेतले निवडून आलेले हिंदू मुस्लिम ख्रिश्चन लोकप्रतिनिधी हे भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करतात, त्या त्या धर्माचे नाही. तसे जर ते वागत करत असतील तर ते घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे हिंदू किंवा मुस्लिमांना / त्यांच्या तथाकथित धर्मगुरूंची परवानगी घेऊन सुधारणा करणरे कायदे करण्यास संसद बांधील नाही नव्हे तसे करणे हाच संसदेचा अपमान आहे. संसद सार्वभौम आहे म्हणजे नाहीतर मग काय?
यावर एक युक्तिवाद म्हणून मुस्लिमांमधील सुधारणा ह्या हृदय परिवर्तनाने झाल्या पाहिजेत, स्वतः मुस्लिमांनी त्या केल्या पाहिजेत , इतर धर्मियांना तसे करण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी आधी स्वतःच्या धर्म पंथ सुधारणा पुऱ्या कराव्यात सरळ सरळ ,कायदे केले तर हिंसाचार होईल, कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल प्रकारची फालतू विधाने केली जातात. हा पायंडा सुद्धा पंडित नेहरूंनीच पाडला. इतर पक्षांनी आणि नेत्यांनी सत्तेसाठी आणि लोकानुनयासाठी साठी त्याला अजून हिडीस स्वरूप दिले,इतके कि आपण न्याय पालिकेला हि त्या करता डावलले, तिच्या सार्वभौमत्वावर गदा आणली.
हृदय परिवर्तनाने जर सुधारणा व्हायची वाट पाहू लागलो तर हा सुधारणेचा कार्यक्रम काही शतकांचा कार्यक्रम होईल. कमीत कमी इस्लाम बाबत तरी त्यांच्याच धर्मपंडितांकडून सुधारणा व्हायची शक्यता शुन्य आहे, त्याला इतिहासच साक्ष आहे.(याच प्रकारे हिंदू मधलीसुद्धा धर्म सुधारणा हृदय परिवर्तनाने होऊ शकत नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते) या अशा प्रकारे भारतातल्या संख्येने जवळपास २०-२५ कोटी असलेल्या मुस्लिम समाजाला मागास ठेवणे हे अमानुष तर आहेच पण ते भारताच्या स्थैर्याला घातकही आहे. आज कट्टर मुस्लिम आणि त्यांच्या आडमुठेपणामुळे मुस्लिमांचे नुकसान तर होतेच आहे पण बहुसंख्यांक असलेला हिंदू समाज ज्यात गेल्या २०० वर्षापासून थोडे थोडे सुधारणांचे वारे वाहू लागले आहेत ते सुद्धा वाहणे बंद होऊन हा समाज पुन्हा मागास , कट्टर , सनातनी , विषमतेला मान्यता देणारा होईल कि काय असे भीती दायक चित्र उभे राहू लागले आहे. असा भारत फार काळ एक तर राहू शकणार नाहीच, पण राहिला तरी तो भारतीय जनतेला सुराज्य हि देऊ शकणार नाही.
अधिक काय सांगणार , सेक्युलरिजम शिवाय भारतला पर्याय नाही पण सत्तालोलुप / अदूरदर्शी राज्यकर्त्यांना एव्हढे कळले तरी पुरे. जनतेला तर इतक्या साधू संतांनी , सुधारकांनी इतके वर्ष कानीकपाळी ओरडून सांगितले तरी कळले नाही, वळले तर अजिबातच नाही ….

…आदित्य

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

(खालील लेख नरहर कुरुंदकरांच्या ‘जागर’ ह्या पुस्तकातील लेखामधल्या विचारावर बेतलेला आहे.)

---------
कुरुंदकर रशियन भाषेत लिहित होते का?

वाचतोय. लिहीन जमेल तसे.

पुढे जाण्या अगोदर इथे मला एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे >> याने सुरू होणारा पॅरा रिपीट झाला आहे.

जो समाज अंधश्रद्धे वर प्रहर करणाऱ्या गाडगे बाबांचा देव करून त्याला नवस बोलतो , म. फुल्यांच्या प्रतिमेच्या उद्घाटनाला सत्यनारायण घालतो आणि शिवाजी महाराजांच्या सारख्या राष्ट्र्पुरुषाला जाती च्या कुम्पणा मध्ये अडकवतो त्याला सहिष्णू तरी कसे म्हणावे.+१११

पुन्हा नीट वाचला. धन्यवाद या लेखाबद्दल. काही मुद्दे आवडले आणि काही पटले नाहीत.

जेव्हा secularism धर्म हि फक्त पारलौकिक बाबींवरचे नियमन करणारी संकल्पना मानतो तेव्हा तो धर्माचे इहलोकातील अस्तित्व नाममात्र करतो >>>
secularism समाजाला धर्माच्या गुलामगिरीतून मुक्त करून समतेकडे आणि विकासाकडे घेऊन जात असेल >>>
भारतात हिंदू हे बहुसंख्य(८५%) आहेत म्हणून secularism ह्या ८५% हिंदूंना धर्माच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आवश्यक आहे. >>>
secularism सामाजिक पातळीवर धर्माचे प्रभाव क्षेत्रच मानत नाहि >>>

यासारखी वाक्ये समजली नाहीत. सेक्युलॅरिजम समाजाला धर्माच्या कोणत्याही बाबीतून मुक्त वगैरे करत नाही. सामाजिक पातळीवर धर्माचे आस्तित्व वगैरे याबाबतही सेक्युलॅरिजम चा काही संबंध नाही. कारण सेक्युलॅरिजम ही संकल्पना मुळात कोणत्याच धर्माच्या बाबतीत लुडबूड करत नाही. एखाद्याने कसली अंधश्रद्धा मानली तर त्यात देशात सेक्युलॅरिजम असल्याने काही फरक पडत नाही.

भारताला सेक्युलॅरिजम ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पण आपल्या घटनेत ती अप्रत्यक्षरीत्या होती. सेक्युलर हा शब्द बर्‍याच नंतर आणला गेला. पण त्या आधी न्याय, समता, स्वातंत्र्य हे सर्वात मूळ हक्क जे आहेत ते देण्यातून सेक्युलॅरिजम आपोआप आला. किंबहुना घटनेत सेक्युलर शब्द नव्याने आणून काहीच फरक पडला नाही. तो काढला तरी काही फरक पडणार नाही. कारण मूळ न्याय, समता, स्वांतंत्र्य हे प्रीअ‍ॅम्बल मधले शब्द आणि त्याच्याशी संबंधित घटनेतील कलमे जोपर्यंत अबाधित आहेत तोपर्यंत देश सेक्युलरच राहणार आहे, आणि राहावाच.

प्रत्यक्षात पाहिले तर खूप अंतर्विरोध आहे. देशातील कायदे व सरकारी पदांवरील लोकांचे धार्मिक बाबतीतील 'टचपॉईण्ट्स' पाहिले, तर सेक्युलर शब्द घटनेत असूनही प्रत्यक्षात बरेच अपवाद केलेले आहेत असेच दिसते. मुस्लिम पर्सनल लॉ, देवळांच्या बाबतीत सरकारी हस्तक्षेप, विविध मंत्र्यांनी शासकीय इतमामात केलेल्या पूजा, इफ्तार पार्ट्या ई. - जर देश/सरकार सेक्युलर असेल तर हे कसे चालेल? हे चालते कारण भारतात सेक्युलॅरिजम म्हणजे निधर्मीपणा नव्हे, तर सर्वधर्मसमभाव या अर्थाने वापरला गेलेला आहे. म्हणजे सरकारे साधारण सारख्याच प्रमाणात विविध धर्माचे आस्तित्व स्वीकारतात.

घटना समितीच्या मसुद्यांवर ज्या चर्चा झाल्या त्यांच्या लिन्क्स मधे मिळाल्या होत्या. त्या व त्यासंबंधित खूप वाचले आहे. त्यावेळेस नेहरू व आंबेडकर दोघांचाही "सेक्युलर" शब्द प्रीअ‍ॅम्बल मधे घालायला विरोध होता. नेहरूंचा विरोध बहुधा वरच्याच कारणांमुळे असावा. पण आंबेडकरांचा विरोध जास्त बेसिक कारणामुळे होता. आपण जर प्रीअ‍ॅम्बल वाचले तर लक्षात येइल की त्यातली तत्त्वे ही खूप मूलभूत हक्कांबद्दल आहेत - न्याय, समता आणि स्वातंत्र्य. गेल्या २००-३०० वर्षांत विविध देशांत असा विचार प्रबळ झाला की हे तिन्ही "जन्मसिद्ध" अधिकार आहेत - जे कोणी देउ शकत नाही, आणि कोणी हिरावून घेउ शकत नाही. आंबेडकरांचा हेतू फक्त हे त्यात ठेवायचा होता. भारत सेक्युलर असावा का, भारतात समाजवाद असावा का वगैरे हे लोकशाही मधे लोकांनी ठरवावे, ते घटनेत स्पेसिफिकली असायची गरज नाही असे त्यांनी म्हंटलेले आहे.

त्यावेळेस स्वतंत्र भारताची घटना, लोकांचे अधिकार कसे असावेत वगैरे बद्दल नेहरू व आंबेडकरच नव्हे तर इतर ही अनेकांचा अभ्यास व मते वाचली तर हे काय लेव्हलचे लोक होते हे जाणवते.

मात्र नंतर १९७५ मधे तो सेक्युलर शब्द आणल्याने काय फरक पडला ते मला कधीच समजलेले नाही.