स्फुट - डिटॉक्स

Submitted by बेफ़िकीर on 12 June, 2018 - 03:09

स्फुट - डिटॉक्स

परवा संध्याकाळी
झाला की जागा माझ्यातील कवी अचानक
ढाब्यावर बसलो होतो
समोर एक अजस्त्र क्रेन आली
बांधकाम करायचे होते म्हणून....
क्रेनने एक झाडच उपटले मुळापासून
तटातट तुटत गेली मुळे
झाड हवेत....
एक कुत्रे उगीच घुटमळत होते
काही माणसे क्रेनला सूचना देत होते
राईट घे, वर घे, हां आता येऊदे
माझ्यातला कवी रडला बिडला
म्हणाला, असे झाड उपटता येते?
झाड हवेतून तरंगत दूर नेले कुठेतरी
दहा मिनिटांनी क्रेन पुन्हा हजर
एकापाठोपाठ एक चार झाडे उपटली
केवळ अर्ध्या पाऊण तासांत
तोवर माझ्यातल्या कवीला मी खूप झापले
म्हंटलं लगेच आव आणू नकोस
झाडाच्या वेदना कळल्याचा वगैरे
लाखो कविता झाल्या असतील झाडांवर आजवर
आता तर कीबोर्डवर थेट कविता लिहितात
कागदही लागत नाही
झाडावर फार जीव असल्याचे अ‍ॅक्टिंग बास कर
मग जरा बरे वाटले
आपल्यातला कवी असाच ठेचायला हवा
जगू देत नाही साला
असे म्हणणेसुद्धा पोझिंगच
एखादा क्रेनरुपी प्रसंग घडायला हवा
आपल्यातील काहीतरी मुळासकट उपटले जायला हवे आहे
नंतर काय राहते ते समजेल तरी!
========

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users