आहेस बहुधा

Submitted by निशिकांत on 8 June, 2018 - 01:12

आहेस बहुधा---
( तरही गझल. सानी मिसरा आदरणीय गझलकार 'बेफिकीर' यांचा. )

मनाने लाघवी आहेस बहुधा
जगाला तू हवी आहेस बहुधा

नजर खिळता क्षणी अंदाज येतो
उभी तू ओणवी आहेस बहुधा

मला ग्रिष्मातुनी तू काढल्यावर
समजले पालवी आहेस बहुधा

मनाला ओलसर तू लागलेली
जुनेरी वाळवी आहेस बहुधा

तुझे बुजणे बघोनी वाटते की
घरी या तू नवी आहेस बहुधा

यमक नाही कुठे, ना वृत्त मात्रा
उद्याचा नवकवी आहेस बहुधा

मनाला वाटते तू गोड हसता
टपकती काकवी आहेस बहुधा

रियाजाने गळ्याला घडवताना
सजवली भैरवी आहेस बहुधा

कसा गंधाळतो 'निशिकांत' इतका?
कळी तू शैशवी आहेस बहुधा

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users