स्फुट - जातीअंत

Submitted by बेफ़िकीर on 31 May, 2018 - 03:56

स्फुट - जातीअंत

मांगीरबाबासाठी केलेला शिरा मातंगांसोबत

आणि झबरनाथाला कापलेला बोकड 'दगड वडारांसोबत' खाऊनही

माझे ब्राह्मण्य जाता जात नाही आणि जातीयवादी असल्याचा शिक्काही पुसला जात नाही

मोलकरणीने घासलेली भांडी,
पाणी ओतून घरात घ्यायची माझी आजी!

मराठयांच्या मुलांसोबत तर खेळत नाहीस ना, विचारायची माझी आई

पण, शिंपी, सोनार, न्हावी मित्रांनी माझे बालपण शिवले, सोनेरी केले आणि सेटही केले

मुंजीचे वर्ष सोडले, तर कार्य आणि आईचे चौदा दिवस सोडून अंगात जानवे घातले नाही

पंचवीस वर्षे देश फिरलो, कोणाच्याही खांद्याला खांदा लावून, कुठेही, काहीही खात

पहिला बॉस ब्राह्मण, पहिला कस्टमर चांभार, पहिला असिस्टंट महार, पहिला महाविद्यालयीन मित्र धनगर!!

माळी बाईच्या हातचा रस्सा भुरकला, भारती जातीत बसून नाश्ता केला, गुरव विद्यार्थिनीकडे पोटभर जेवलो, कोळी मुलीची फी भरली

पण ब्राह्मण्य आणि जातीयवादी असण्याचा शिक्का, दोन्ही जात नाही

बारमध्ये पेग घेतो तेव्हा माझ्याकडे बघत कोणीतरी म्हणतो

'गोडसेची औलाद आहे ती'

बहुधा काही गोष्टी राहून गेल्या

त्या केल्या की सगळे सुरळीत होईल

भाषा बदलायला हवी

वाक्यागणिक चार शिव्या हव्यात
बायकोला थोबाडायला हवे
म्हातारा मरत नाही ही तक्रार करायला हवी
फक्त दोन वेळा जेवणासाठी घरात जाऊन बाकी वेळ गप्पा हाणायला हव्यात
जातीमुळे मागे पडलो असे म्हणत राहायला हवे

कदाचित,

तरीही जाणार नाही हा शिक्का

कारण, बहुधा जात हे जगण्याचे एक कारण बनलेले आहे

प्रत्येकाचा अंत म्हणजेच त्याच्या त्याच्यापुरता जाती अंत बहुधा
========

-'बेफिकीर'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. कित्येक जणांना तर हे दोघे कोण आहेत हे ही माहित नसते

>> हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हे सावरकर आणि गोडसेचा सदोदित उदो उदो करणारे यांनी लक्षात घेतले पाहिजे ना हर्पेन..?

मला एक कळत नाही, इतर सर्व समाज जाती मिरवतात नव्हे त्यांना गर्व नाहीतर माज आहे त्यांना त्यांच्या जातीचा.
ब्राह्मणांनी मात्र आंतरजातीय लग्न करावीत, जात सोडुन द्यावी, ब्राह्मण्य नाकारावे असे का?
सगळी जातियता फक्त आणि फक्त ब्राह्मणांमुळेच आहे असं काहीतरी एक समज झालेला आहे.
ब्राह्मणांपेक्षा इतरांनी ब्राह्मण्य जिवंत ठेवलय. असो...

ब्राह्मणांपेक्षा इतरांनी ब्राह्मण्य जिवंत ठेवलय. असो...
.अगदी अगदी. अगदी तसेच जसे हिंदू धर्मातल्या सर्व वाईट चालीरिती (स्त्रियांचे अधिकार संकोच आणि जातीभेद) हे मुस्लिम राजवट आणि इंग्रजी कावेबाजीचे परिणाम आहेत असे म्हटले जाते..

अ रे बा प रे... विषय तसा जुनाच आहे पण नव्याने स्फुटलाय त्यामूळे नव्या आयडींचे प्रतीसाद येत राहतील बहुतेक.
Happy
>>आपण जात न पाळता समाजात मिसळलो तरी समाज जात विसरू देत नाही ही दुर्दैवी अवस्था अभिव्यक्त करणे हे ह्या स्फुटाचे काम आहे.
हे पटले.

समाज जात विसरू देत नाही
>> मग काय करायचे म्हणता? इतरांच्या जाती काढत फिरायचे म्हणता? जनरलाइज विधाने करुन आपलीच जात कशी सर्वश्रेष्ठ आहे असे सांगत फिरायचे म्हणता... ? काय उपाय काय? की फक्त स्वजातअभिमानाचे कढ काढणे हेच स्फुटाचे काम आहे?

टीका अवश्य करा, उपदेश कृपया नको. जातीचे उल्लेख कोठेही होऊ शकतात हे सांगणे आहे.

एकंदरीत - मी तथाकथित ब्राह्मण्य सोडले तरी समाज तोच शिक्का मारतो / मारू शकतो व मायबोलीवर म्हणायचे तर मारण्यास आसुसलेला असतो इतकेच ह्या धाग्यातून म्हणायचे होते
<<
Lol

च्या अन मारी घ्या. भुर्का मस्तपैकी. अहो, मायबोलीवरच दीनानाथमधल्या डॉक्टरची जात पाहून त्याच्या प्रॅक्टीस व्हॉल्युमबद्दल बोलणारे तुम्ही.

केवढ्याला विकली हो बेफिकिर? की गहाण ठेवलीय? आकडा सांगा. सोडवून वा परत विकत आणून देतो. बाळगा जरा.

उपदेश नको म्हणे! हास्यास्पदाच्या पलिकडलं आहे हे.

अहो, मायबोलीवरच दीनानाथमधल्या डॉक्टरची जात पाहून त्याच्या प्रॅक्टीस व्हॉल्युमबद्दल बोलणारे तुम्ही.>>> लिंक द्या जमली तर.

केवढ्याला विकली हो बेफिकिर? की गहाण ठेवलीय? आकडा सांगा. सोडवून वा परत विकत आणून देतो. बाळगा जरा. >>> आरारा तुमची तर हरवलीच असावी असे वाटते एकेक प्रतिसाद बघुन
Happy

बेफि, स्फुट मस्त!

भारतात जातीव्यवस्थेची अवस्था काहिशी अनारकली सारखी आहे. सलिम (सरकार) उसे मरने नहि देगा, और जिल्लेलाहि (जनता) उसे जीने नहि देगी...

बाळ भूषण,
केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा!
(या आयडीने) (पुरेसे) मोठे झालात की बोलू. Wink

स्फुटाने उद्दिष्ट गाठले असे म्हणता येईल

अनेक मुखवटे गळून पडले किंवा कार्यरत झाले

विद्वेष हा जगण्याचे इंधन ठरू शकतो हे तथाकथित निरपेक्षवाद्यांकडून सिद्ध झाले

<< शिंपी, सोनार, न्हावी, ब्राह्मण, चांभार, महार, धनगर, माळी, गुरव, कोळी, मातंग, मराठा >>

--------- मला पडलेला प्रश्न वर कोणीतरी विचारलेला आहेच.
लोकान्च्या सम्पर्कात आल्यावर, त्यान्च्या वरिल प्रमाणे जाती आहेत हे तुम्हाला कसे कळाले? ते स्वत: पुढाकाराने सान्गता का? तुम्ही विचारता का ?
त्यान्च्याकडुन पुढाकार घेतला जात असेल तर तुम्ही त्यान्ना त्यान्ची जात सान्गण्यापासुन थाम्बवता का ?

<< पण ब्राह्मण्य आणि जातीयवादी असण्याचा शिक्का, दोन्ही जात नाही >>
------- वाचुन दु:ख झाले. अशी परिस्थिती निर्माण होण्यास आपल्या कळत - नकळत आपण काही योगदान करत असतो का असा प्रश्न मला पडतो.

समाजाची निस्वार्थी, निरपेक्ष सेवा करणारे अनेक लोक बघितले आहेत, त्यान्ना असा शिक्का बसलेला नाही.

मी समोरच्या व्यक्तिला त्याची जात विचारत नाही, ते मला माझी जात विचारत नाही. चुकत माकत एखाद्याने जात विचारलीच तरी मी सान्गत नाही., पण जात महत्वाची का नाही आहे हे मात्र आवर्जुन सान्गतो, भविष्यात विचारणारा इतरान्ना विचारतान्ना विचार करेल. मी जात मानत नाही या फुटकळ शब्दान्ना काही अर्थ नाही तर तसे आचरणही हवे.... असो.

स्फुट प्रामाणिकपणे लिहिलंय.

स्वाती२ यांनी लिहिलेल्या प्रतिसादानंतर लिहिण्यासारखं फार काही नाही. तो मह्त्त्वाचा आहे, म्हणून कॉपी पेस्ट करतोय.
"जात मनात असते. कुणाबरोबर जेवताना, काम करताना, कुणाला मदत करताना त्या व्यक्तीची जात आठवणार असेल तर काय उपयोग? आणि 'त्या केल्या की सगळे सुरळीत होईल' यापुढले सार्वत्रीकरण , एक प्रकारचे चौकटीत बसवणे नाही आवडले.

कुणी 'गोडसेची अवलाद' म्हणत असेल तर तो त्या व्यक्तीचा दृष्टीकोन, मी तशी नाही हे मला माहितेय तर अंगाला लावून का घ्यावे? मी समोरच्या व्यक्तीकडे फक्त माणूस म्हणून बघते हे माझ्यापुरते पुरेसे. दुसर्‍याकडून 'जातीयवादी नाही' या शिक्क्याची अपेक्षा का करावी? समोरची व्यक्ती आपली जात विसरायला तयार नसेल तर तो त्या व्यक्तीचा चॉईस. माझे सर्वांशी माणूसकीने वागणे हे , तसे वर्तन नैतिकदृष्ट्या योग्य आहे म्हणून आहे तर मग इतरांकडून प्रशस्तीपत्रकाची मला गरजच नाही."

लेखकाने उत्तरार्थ लिहिलेल्या प्रतिसादातलं "आपण जात न पाळता समाजात मिसळलो " यातलं जात पाळणं किंवा न पाळणं, बरंच काही सांगून जातं. म्हणजे आपण जात पाळत तर नाही, पण ती मनात कायम असते. अशाने जात्यंत कसा व्हावा?

"बहुधा काही गोष्टी राहून गेल्या" याच्या पुढच्या ओळींनी ती जात मनात ठसठशीत आहे.

<हे काम मी इतर जातीचा असतो तरी (जर मला असे लिहावेसे वाटले असते आणि लिहिले असते तर) त्या स्फुटाने केलेच असते>

(मी जात मानत नसताना) कोणी माझ्या जातीवरून देषपूर्ण उल्लेख केला असता , तर ज्या लोकांना अनेक शतके हे भोगावं लागतंय, त्यांचं स्मरण मला झालं असतं;.
संवेदनशील विचारक्षम लेखक व्यक्ती म्हणून.मला जातीचं लेबल लागलं याचा उद्वेग वाटण्याऐवजी जातीजातींतला द्वेष वाढतच चाललाय, याचा उद्वेग वाटला असता.
अर्थात प्रत्येक व्यक्तीची विचाराची पद्धत वेगळी असते हे संपूर्णपणे मान्य आहे. तसं असण्याची कारणं काही आपल्या हातातली असतात, काही हाताबाहेरची.

मोठमोठाल्या पोस्टी पाडणारा एखादा तरी आयडी माझ्या प्रश्नाचे उत्तर देइल असे वाटलेले....
"नक्की कुठकुठल्या जातीचा उल्लेख म्हणजे जातीयवाद?"

प्रश्न फारच अडचणीत आणणारा आहे का?

मला वाटते माझे जग वेगळे आहे आणि या लेखासारखे अनुभव येणारयांचे वेगळे.

मुंबईत राहतो मी. सकाळी घरातून बाहेर पडलो की ट्रेनच्या गर्दीत मला आपल्या घामाचा वास देत चिरडणारी चौदा लोकं, शेअर रिक्षामध्ये माझ्या मांडीला मांडी लाऊन बसणारे दोघे जणं, मला सकाळच्या नाश्त्याला भुर्जीपाव खाऊ घालणारा, मला चहा आणि त्यासोबत ग्लासात बोट बुडवत पाणी पाजणारा, कामाच्या जागी रोजच माझ्या संपर्कात येणारे दिवसभरातील विविध शेकडो लोकं......
साली कुठल्या जातीची आहेत हे ना मी त्यांना कधी विचारायला गेलो ना ते मला कधी सांगायला आले.

ऑनलाईन प्रेमात पडलो एका मुलीच्या. लग्नाचं वचन देऊन झाले. आईला भेटवून झाले. मग घरच्यांनी विचारले तिची जात काय?
तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मी कोणाला तरी तुझी जात काय हे विचारले आणि कोणीतरी ती मला सांगितली Happy

माझ्यामते तुम्ही लोकांची जात बघितली तर लोकं तुमची बघणार. मग त्यानंतर ते तुमच्या जातीचे कौतुक करताहेत की टीका यावरून आसवे गाळणे वा फुशारक्या मारणे हे गौण आहे.

जातीयवादाचा अंत करायचा असेल तर स्वत:ची जात मानणेच सोडून द्यावे. आपल्यापुरतातरी जातीयवादाचा अंत होतो.
माझी स्वत:ची कुठलीही जात नाहीये, मी मानत नाही. आता कागदोपत्री जी जात आहे त्या जातीला लोकांनी शिव्या घाला किंवा आरती ओवाळा मला काडीचाही फरक पडत नाही. तसेच मी माझीच जात मानत नसल्याने ईतरांच्या जाती मानण्याचाही प्रश्नच उद्भवत नाही.

भन्नाट भास्कर फार मस्त लिहिलेत तुम्ही! आता एकदा स्फुट आणि माझ्या वरच्या दोन पोस्ट्स काळजीपूर्वक वाचा व खालील मुद्यांवर मार्गदर्शन करा.

१. मी आजवर फक्त स्वजातीयांबरोबरच वावरलो असा विचार स्फुटातून तुम्हाला आढळत आहे का? नसेल आढळत तर तुम्ही शेकडो लोकांबरोबर वावरता हे सांगण्यात काही मतलब तरी आहे का?
२. मी मुद्दाम लोकांची जात बघायला गेलो असा विचार स्फुटातून व प्रतिसादातून आढळत आहे का? (प्रतिसाद नीट वाचा, त्यात लिहिले आहे जाती का व कशा कळल्या.)
३. आपण आपलीच जात मानली नाही की आपल्यापुरता जातीयवाद संपतो हे वाक्य तुम्हाला आलेल्या अनुभवांवर आधारीत आहे. इथे मी असे म्हणतोय (स्फुटात) की मीही माझी जात पाळलेली नसताना माझ्यावरचा तो शिक्का पुसला का जात नाही! म्हणजे तुम्ही तुमची आणि मीही माझी जात पाळत नाही पण तुमच्यापेक्षा वेगळा अनुभव मला येऊ शकत नाही का?

धन्यवाद

इतर पोस्ट्सना आधीच दिलेली उत्तरे पुरेशी आहेत. तेच तेच परत लिहायचे नाही म्हणून लिहीत नाही.

म्हणजे तुम्ही तुमची आणि मीही माझी जात पाळत नाही पण तुमच्यापेक्षा वेगळा अनुभव मला येऊ शकत नाही का?
>>>>

तुम्ही जात पाळत नाही म्हणजे काय करता हे सांगाल का?

मी जात पाळत नाही म्हणजे मी कोणत्या जातीचा आहे हे माझ्या डोक्यातही नाही. मी मानतही नाही. त्या (माझ्या) जातीच्या लोकांना कोणी सरसकट शिव्या दिल्या तर मला काही फरकही पडत नाही. कारण मी स्वत:ला मूळात कोणत्या जात समूहाशी बांधून घेतले नसल्याने त्या शिव्या माझ्यासाठी आहेत असे वाटतही नाही.

तुमचे जात न पाळणे या कॅटेगरीत असेल तरच माझ्याशी तुलना करा.

पण मला वाटते तुम्ही जे म्हणत आहात ते यात येत नाही. तुम्ही आपली जात मानता आणि पाळता. म्हणून तुम्हाला त्या जातीवरून कोणी सुनावल्यास त्रास होतो.

तुम्हाला म्हणायचे आहे की तुम्ही स्वत: जातीवरून भेद उच्चनीच करत नाहीत. पण तरीही लोकं तुमची जात काढतात. आणि याचा तुम्हाला त्रास होतो. तुमच्या या भावनेशी सहमत आहे. पण या त्रासापासून खरेच कायम सुटका हवी असेल तर एक पाऊल आणखी पुढे जाऊन जात पाळणे म्हणजे स्वत:ची जात माननेच सोडून द्या.

पण जर आपल्यासोबत जन्माने चिकटलेल्या जातीला आपल्यापासून दूर लोटणे, मनातून दूर सारणे, खरेच अवघड असेल तर मग तो त्रास भोगण्यावाचून पर्याय नाही. जगात विविध प्रकारची माणसे आहेत, चांगलावाईट अनुभव येणारच..

{{{ जातीयवादाचा अंत करायचा असेल तर स्वत:ची जात मानणेच सोडून द्यावे. आपल्यापुरतातरी जातीयवादाचा अंत होतो. }}}

बकरी स्वतः शाकाहारी आहे म्हणून कोणताही मांसाहारी प्राणी तिला मारुन खाऊ शकत नाही असा भाबडा समज जपणार्‍यांच्या पंथाचे विचार वाटतात हे.

स्फुट आवडले.

वर कित्येकांनी लिहिलेय की घराबाहेर अमुक तमुक करताना जाती लक्षात येत नाही, अमुक एकाने जातीचा उल्लेख केला म्हणजे त्याच्या डोक्यात ती आहे, म्हणून त्याला दुसऱ्याची जात कळली, आम्हाला कद्धी कुणाची जात कळली नाही वगैरे वगैरे वाचून हसायलाच आले. इथे मायबोलीबर दिवसभर एकमेकांच्या जाती काढणारे व्यक्तिगत आयुष्यात अगदीच सज्जन दिसताहेत.

असेच स्फुट कुणी दलितांबद्दल लिहिले असते तर त्याला आज इथे डोक्यावर घेऊन लोक नाचले असते. कुणी त्याला म्हटले नसते की बाबारे तू का नाही विसरत तुझी जात? जो त्रास तुझ्या पूर्वजाना झाला, जो तुला झाला तो सगळा मागे टाकून तू स्वकष्टांवर वर आलास.. मग तरीही जात का कवटाळून बसला आहेस? अमुक जात उच्चवर्णीय, म्हणून मला तिरस्करणीय हे तू म्हणतोयस, असे म्हणणे म्हणजे तू जात मानतोस, म्हणजे तू जातीयवादी आहेस याचा पुरावा नाही का? स्वतःच्या जातीला धरून बसलास, म्हणजे तु
तू जातीयवादीच. का नाही सगळ्याच जातींवर लाथा घालून त्या तुझ्यापुरत्या हद्दपार करत?

हे प्रश्न त्याला कुणीही विचारणार नाही. उलट त्याच्या जातीला किती कसा त्रास झाला याची परत परत उजळणी होईल. जे हे करताहेत ते त्याला अमुक जातीचा म्हणून वेगळे पाडताहेत, त्याला जातीयवादी बनवताहेत, स्वतःही जातीयवादी होताहेत, इतरांनाही स्वतःबरोबर खेचून कुणीही, कधीही, कुणाचीही जात विसरणार नाही याची तजवीज करताहेत. आणि इतरांची जातीयवादी म्हणून निर्भर्त्सना करताहेत.

सगळेच हास्यास्पद!!!

साधना, संपूर्ण पोस्टला अनुमोदन

म्हणूनच बहुतेक मी दोनदोनदा विचारलेल्या प्रश्नाला केवळ एकाच आयडीने रिप्लाय दिला

जातीविषयक धाग्यावर लगेच्च पोचणाऱ्या आणि भरभरुन लिहणाऱ्या आयडींनी लेखकाला जातीयवादी जातीयवादी म्हणून हिणवल्याने गम्मत वाटली

जात मिरवण्याची गोष्ट नाही तशीच हिणवण्याचीही नाही
आणि कुणी हिणवतोय म्हणून लपवण्याचीही तर नाहीच नाही

<जो त्रास तुझ्या पूर्वजाना झाला, जो तुला झाला तो सगळा मागे टाकून,
लट त्याच्या जातीला किती कसा त्रास झाला याची परत परत उजळणी होईल>

हे सगळं एका डिस्टंट भूतकाळातलं आहे. वर्तमानात असं का ही ही होत नाहीए. नाही का?

असेच स्फुट कुणी दलितांबद्दल लिहिले असते तर त्याला आज इथे डोक्यावर घेऊन लोक नाचले असते.

आजिबात नाही ! एखाद्या दलिताने आपल्याला आलेल्या दाहक अनुभवावर लिहिणे आणी पबमध्ये बसल्यावर दुसर्‍या टेबलावर बसलेल्या व्यक्तीने केलेल्या शेर्‍यावर स्फूट पाडणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. आंबेडकर लहान असताना त्यांनी आणलेल्या डब्याचा इतरांना विटाळ होईल म्हणून त्यांचा डबा वेगळा ठेवत. ते साहेब झाल्यावरही उच्चवर्णीय चपराशी फाईल त्यांच्या टेबलवर वरून टाकत. कालांतराने ते या सर्वांवर मात करून मोठे झाले. म्हणून त्यांनी या अनुभवावर लिहूच नये ? इतरही दलित साहित्यिकांनी आपले जेन्युईन अनुभव लिहिले आहेत.

वाक्यागणिक चार शिव्या हव्यात ,बायकोला थोबाडायला हवे वगैरे वाक्ये तर संतापजनक व हास्यापद आहेत. हे करणारे ब्राह्मण नसतातच ? असली स्टिरिओटिपिकल विधाने करणारे म्हणे जाती अंत करणार! सुदैवाने सांगली भागात काही बौद्ध लग्नाला जाण्याचा योग आला. आंबेडकरांच्या व बुद्धाच्या फोटोला हार घालणे व काही प्रतिज्ञा ( ज्यात दारू न पिणे ही असते) करणे इतकेच विधि असतात. ते असंस्कृत आणी लाखो रुपये खर्च करून कन्यादाना सारखे रिग्रेसिव्ह व लाजाहोमासारखे कालबाह्य विधी करणारे सुसंकृत ?

काही विशेष प्रसंग सोडून इतर वेळी जानवे न घालणे हा आळशीपणा आहे. तो ९०% ब्राह्मण करतात. त्याने जातीअंत कसा होईल ? बादरायण संबंध !

>म्हणूनच बहुतेक मी दोनदोनदा विचारलेल्या प्रश्नाला केवळ एकाच आयडीने रिप्लाय दिला.
हा प्रश्न फार बाळबोध असल्याने दुर्लक्ष झाले असावे. मीही देतो. कोणत्याही जातीला हीन लेखणे चूक व निषेधार्ह आहे. ब्राम्हणांचा उल्लेख भटुरडे वगैरे करणेही निषेधार्हच आहे. तसले लेखन कुणी केले तर निषेधच होईल.

भन्नाट भास्कर स्वाती वगैरेंना अनुमोदन.
मी काही सुचवेन.
१ मी चांभाराच्या मुलाबरोबर जेवलो, धनगराच्या घरी चहा घेतला, असली आपण जणू त्यांच्यावर फार मोठे उपकार केले व काहीतरी क्रांतीकरक केले छाप वाक्ये टाळावीत.
२ एखाद्याने "ब्राह्मण मूर्ख आहेत" असे विधान केले तरी ते आपल्याला उद्देशून केले असा गैरसमज करून घेऊन लेखणी सरसावू नये.
३ ब्राह्मण सुसंकृत, इतर लोक बायकोला शिव्यागाळ व मारहाण करणारे, हा गोड गैरसमज मनातून काढून टाकणे.

Pages