जरा फुंकरावे

Submitted by निशिकांत on 30 May, 2018 - 01:03

मनी कैक जखमा किती भळभळावे
मला मीच आता जरा फुंकरावे

जिवा लागली वाळवी आपुल्यांची
मनीच्या नमीला कसे वाळवावे?

किती माळ ओसाड माझ्या मनाचा!
बिजाने खुशीच्या कसे अंकुरावे?

हुबेहुब जसा चेहरा, बिंब दावी
वृथा आरशावर कुणी का चिडावे?

तिचा अंत होतो जरी सागरी पण
नदीने प्रवाही न का खळखळावे?

जरी भाग्य अपुल्या हातात असते
तरी कुंडलीतील गुण का बघावे?

दुशाली न देती खरी ऊब आई!
कुशीला तुझ्या शांत वाटे निजावे

जरी जाहलो डोंगरा एवढा मी
दुरूनच मला साजरे का म्हणावे?

तिचे वेड "निशिकांत"ला एवढे की
तिला भेटण्या श्वास बाकी उरावे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिवा लागली वाळवी आपुल्यांची
मनीच्या नमीला कसे वाळवावे?

हे 'नमी' या शब्दामुळे अजिबात आवडले नाही. दर्जा ढासळल्या सारखे वाटले.
तुमची गझल सहजतेने येते साहेब. या गझलेत सहजता नाही.

तरी

जरी जाहलो डोंगरा एवढा मी
दुरूनच मला साजरे का म्हणावे?

हा शेर आवडला.