चारू

Submitted by बेफ़िकीर on 29 May, 2018 - 02:25

बन्सल म्हणजे टेरर! केबीनमध्ये नसले तरी जबरदस्त दरारा असायचा त्यांचा! अ‍ॅडमीन बिल्डिंग नावाचा अजस्त्र ठोकळा जणू भारावलेलाच असायचा बन्सल ह्या नावाने! आठ हजार कोटींच्या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बन्सल हे कंपनी आजच्या पातळीवर असण्याचे एक महत्वाचे कारण होते. स्थापनेपासून त्यांनी दुलारी घराण्याशी निष्ठा राखत ह्या कंपनीला साथ दिलेली होती.

बन्सल ह्या नावाचा दबदबा असण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेले फंक्शन! सप्लाय चेन! कंपनीच्या सगळ्या रक्तवाहिन्या बन्सलांमुळे काम करत होत्या. सप्लायर्स, कस्टमर्स, स्टोअर्स, डेपोज, एक्साईज, ट्रान्स्पोर्टर्स हे सगळे बन्सलच्या इशार्‍यावर नाचत! बन्सलच्या शब्दाची किंमत इतकी होती की एखाद्या लहानश्या कंपनीला गाशाही गुंडाळावा लागेल किंवा एखादी नगण्य कंपनी तेजीतही येईल. दुलारी केमिकल्सने आयुष्यभर भरभरून दिलेले असल्याने आणि मुळात ती वृत्तीच नसल्याने बन्सलचा स्वतःचा कारभार एकदम स्वच्छ होता. सप्लाय चेनमध्ये कोणाहीबाबत अफरातफर केल्याचा सुगावा जरी लागला तरी ती व्यक्ती बन्सलच्या एका अंगुलीनिर्देशाने कंपनीच्या गेटबाहेर फेकली जायची. फक्त स्वतःचॉ ऑफिसबॅग घेऊन जायला परवानगी असायची त्या व्यक्तीला! सर्व व्हिजिटिंग कार्ड्ससुद्धा काढून घेतली जायची. त्या व्यक्तीला दिलेला मेल आय डी ब्लॉक केला जायचा. एक थंड पण शहारे येतील अशी दोन वाक्याची नोट सगळ्या सप्लाय चेनमध्ये फिरायची. अमुक अमुक व्यक्ती आजपासून ह्या पदावर काम करणार नाही असे जाहीर करण्यात येत आहे. कंपनीचे कोणतेही काम ह्या व्यक्तीच्या मार्फत ह्यापुढे केले जाऊ नये. शिवाय त्या व्यक्तीला एक तासाच्या आत सगळे पेयेबल्स देऊन मोकळेही केले जायचे.

इतर फन्क्शन्सचे इडीज सुद्धा बन्सलच्याच फ्लोअरवर बसत. पण त्यांचे महत्व बन्सलैतके कधीच होऊ शकत नव्हते. एक तर बन्सल स्थापनेपासून होते. वयाने बरेच सिनियर होते. दुलारींशी घरगुती संबंध होते. आणि त्यांचे फन्क्शन असे होते की सर्वदेव नमस्कारः सारख्या सगळ्या गोष्टी तिथेच येऊन अडकायच्या.

बन्सलसाब बैठे है क्या? कंपनीत रोज किमान दोनशेवेळा हा प्रश्न विविध डिपार्टमेन्टमधून बन्सलच्या पी ए ला विचारला जायचा.

बन्सलची पी ए! चारू! एक चाळिशीची स्त्री जी गेली तीन वर्षे बन्सलची पी ए म्हणून काम पाहत होती. आधीचा पी ए कोणी साऊथ इन्डियन होता. तो रिटायर्ड झाल्यावर ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात चारू ही बन्सलांना त्यातल्यात्यात बरी वाटली. तिची क्वॉलिफिकेशन्सही ठीकठाक होती, भाषेवर प्रभुत्वही होते. हालचालीत चपळाई दिसत होती आणि ऑफिस टायमिंगपेक्षा अधिकवेळ थांबायला तिला काहीही हरकत नव्हती.

बन्सलची पी ए आहे म्हंटल्यावर आपोआपच तिलाही एक वलय लाभलेले होते. पहिले चार महिने ती प्रचंड वचकून होती. पण मग तिला हळूहळू साधारण अंदाज आला.

बन्सल सकाळी साडे दहाला येतात तेव्हा कंपनी सुरू होऊन दोन तास झालेले असतात. कालचे सगळे रिपोर्ट त्यांना मेलवर हवे असतात. काही डिपार्टमेन्ट्सचे हेड्स ते त्यांना थेट पाठवतात तर काही आपल्याकडे येतात व आपण फॉर्वर्ड करायचे असतात. त्यांना आल्यावर एक ग्लास ताक व एक फळ हवे असते. आजच्या दिवसाच्या अपॉईन्टमेन्ट्स व मीटिंग्जची यादी त्यांना आपल्याकडून लागते. येणारा प्रत्येक इन्टरनल आणि बाहेरचा कॉल कोणाचा आहे हे समजून घेऊन त्या व्यक्तीने आत्ता बन्सलशी बोलावे की नाही हा निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात असणे अपेक्षित आहे. दुलारी सरांच्या पीएचा कॉल अजिबात अडवायचा नसतो. आत दिल्या जाणार्‍या कॉल्सची प्रायॉरिटी लिस्ट साधारण फायनान्स, पर्चेस, प्रॉडक्शन, टूलिंग, स्टोअर्स, ब्रँचेस अशी असते. डिझाईनसारखी डिपार्टमेन्ट बन्सलच्या खिजगणतीत येत नाहीत. मिनिस्ट्रीचे कॉल्स अत्यंत महत्वाचे असतात. सरकारी ऑफिसेसमधील कॉल्सही अतिशय महत्वाचे असतात. बन्सल दुपारी सॅलड, दोन फुलके आणि एक आळणी भाजी खातात. बन्सल मीटिंगमध्ये जे बोलत असतात आणि समोरचे जे बोलत असतात त्याचे प्रचंड वेगाने डोक्यात रेकॉर्डिंग करावे लागते. मीटिंग झाल्याझाल्या पॉईंट्स लिहून बन्सलना इमेल करावे लागतात. पाच वाजता बन्सल परत एक फळ आणि कॉफी घेतात.

दिवस खरा त्यानंतर सुरू होतो. एका पाठोपाठ एक प्रत्येक डिपार्टमेन्ट्सचे हेड्स, मिडल मॅनेजमेन्ट हे रांगा लावून उभे राहतात. सतराशे साठ प्रपोजल्स, समस्या, अ‍ॅप्रूव्हल्स, झापाझापी, भयाण शांतता, पडलेले चेहरे, घाबरलेल्या देहबोली, 'काम करना है या नही'हा प्रश्न सर्वांदेखत विचारला जाणे, वाढलेले रक्तदाब! पाच ते साडे आठ ह्या साडे तीन तासांत बन्सलची केबीन म्हणजे कुरुक्षेत्र बनते. सर्वात महत्वाचे हे साडे तीन तास असतात. साडे आठला बन्सल ताडकन् खुर्चीतून उठतात तेव्हा रिसेप्शनसमोर डार्क निळ्या रंगाची मर्सिडिझ केव्हाच उभी राहिलेली असते. बन्सलचा झंझावात सहन केलेले आणि पडेल चेहर्‍याचे सगळे लेफ्टनंट्स केबीनबाहेर तसेच सुन्न उभे असतात आणि बन्सल ताडताड चालत निघून जातात. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात आपण मोकळे होऊ शकतो.

चारू चार महिन्यांत बरेच शिकली होती.

चारूनेही झाप खाल्ली होती अनेकदा! पण एक तर ती बाई होती, नव्यानेच कामाला लागली होती आणि तिच्यावर बर्‍याच महत्वाच्या गोष्टी अवलंबून असल्याने तिची मनस्थिती व्यवस्थित राहायला हवी हे बन्सलांना माहीत होते. ह्या जागेवरचा माणूस सारखा सारखा बदलता येत नाही हे त्यांनाही समजत होते. त्यामुळे चारूला ते जरा सौम्यपणेच झापायचे.

चारू कंपनीजवळ राहायची त्यामुळे साडेनऊपर्यंत घरी पोचली तरी तिला चालायचे. घरी फक्त म्हातारी आईच होती. अर्थात, सकाळी मात्र चारूला आठ पंचवीसला स्वतःच्या खुर्चीत बसणे आवश्यक होते. आठ तीसपासून जे फोन सुरू व्हायचे ते दिवसभर कोसळतच राहायचे.

सुट्टीच्या दिवशी सुदैवाने चारूला काही काम पडायचे नाही. पाच दिवसांचा आठवडा असल्याने वीकेंडही बर्‍यापैकी मिळायचा. त्यामुळे एरवी अधिक वेळ काम करायला तिची हरकत नव्हती. त्यात बन्सलांची पीए असल्याने पॅकेजही जबरदस्त होते. साधारण एखाद्या मिडल लेव्हल मॅनेजमेन्टच्या अधिकार्‍याइतके! त्यात महिन्यातून आठ दिवसतरी बन्सल ऑफिसला नसायचे. हे आठ दिवस तसे सुखावह असायचे. ती थोडी लवकरही निघू शकायची.

एकदा तिने चुकीची फ्लाईट बूक केली तेव्हा बन्सल भडकले होते. तेव्हा त्यांचा चेहरा बघून तिच्या लक्षात आले. झिरो एरर पद्धतीने काम केले तरच ही नोकरी टिकेल. तेव्हापासून चारूने कामात पूर्ण जीव ओतला होता.

नंदीच्या पाठीला स्पर्श केल्याशिवाय भाविक शंकराच्या गाभार्‍यात जात नाही त्या प्रकारे वर्ष दिडवर्षांतच चारूचे महत्व वाढले. आजवर सगळ्यांनाच वचकून असणारी चारू आता जरा हास्यविनोद वगैरे करू लागली. एकंदर बन्सल ह्या व्यक्तीचा वावर आणि आपल्याकडून असलेल्या अपेक्षा ह्यांचा तिला व्यवस्थित अंदाज आलेला असल्याने तिला आता कामाची हातोटी जमलेली होती. ह्यापूर्वी केलेल्या जॉब्जमध्ये तिच्या नशिबात इतके वर्किंग अवर्स वगैरे नव्हते किंवा इतका ताणही नव्हता. पण मग इतका पगारही नव्हता. एक वर्ष झाल्यावर बन्सलांनी तिच्या हातात ती पर्मनन्ट झाल्याचे पत्र दिले व अभिनंदनही केले. चारू स्वर्गात पोचली होती त्या क्षणी!

आता जरा सरावलेली चारू इतर अधिकार्‍यांच्या पीएंशी हास्यविनोद व गॉसिप करायला वगैरे वेळ काढू शकत होती. आपण सर्वात मोठ्या साहेबाच्या पी ए आहोत ह्याचा आब राखत ती कोणत्याच इतर पीएबरोबर फार दोस्तीखात्यात वागत नव्हती पण निदान आधीपेक्षा थोडी सैलसर वागणूक झाली होती तिची! इतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टअर्सचे फोन आले तर त्यांना विश करणे, कसे काय आहेत विचारणे इतपत धाडस तिच्यात जमा झालेले होते.

बन्सलांची किती तारखेला कुठल्या शहरात किंवा देशात मीटिंग आहे हे पाहून ती वेळच्यावेळी फ्लाईट्स बूक करत होती. दुलारी सरांचा पीए मात्र तिच्या आवाक्याबाहेर होता. त्याला ती वचकूनच होती. अनेक कागद द्यायला त्याच्याकडे जावे लागायचे तेव्हा ती 'आत येऊ का 'असे विचारून आत पाऊल टाकायची.

चारूच्या राहणीमानातही फरक पडला. आधीपेक्षा महागड्या साड्या, अ‍ॅक्सेसरीज आता ती सर्रास वापरू लागली. इतर पीएम्च्या तुलनेत ती कोणीतरी वेगळी आहे हे सहज कळायचे कोणालाही!

सर्वात महत्वाचे म्हणजे सतत बन्सलांच्या सान्निध्यात बसून बसून तिला चक्क बिझिनेस कळू लागला होता. हा टर्निंग पॉईंट होता. दोन अडीच वर्षांत जी दोन बिझिनेस सायकल्स झाली त्यातून तिच्या लक्षात आले की प्राधान्य कशाला आहे. तसेच, कोणाला आहे हेही!

पर्चेसकडून आलेल्या ग्राफ्समध्ये एखादा पॉईंट राहिला असेल तर ती स्वतःच फोनवरून त्या मॅनेजरला विचारायला लागली. बन्सलांकडे चुकीचे रिपोर्ट जाऊन उगीच त्या मॅनेजरला झाप पडू नये म्हणून ती असे करत असे. मॅनेजरला जर समजले की अरे हो, ही साधी पीए असून हिच्या ते लक्षात आले आणि आपण विसरलओ होतो, तर तो प्रचंड भारावून जाऊन करेक्टेड डेटा पाठवायचा व चारूचे खूप आभार मानायचा. अनेकदा तिच्या शंका हास्यास्पदही असायच्या पण ती समर्थाघरचे श्वान असल्याने तिला कोणी हसायचे नाही. फक्त समजावून सांगायचे. पण हास्यास्पद शंका विचारण्यामुळे तिचा उलट एक फायदाच होत होता. आपले काय चुकले हे कळू लागल्यामुळे काय बरोबर असते हे डोक्यात फिट्ट बसू लागले. स्टोअरच्या कोणी एखादवेळी तिच्या शंकेत काय चूक आहे हे तिला आज सांगितले आणि पुढच्यावेळी त्याच्याचकडून ती चूक झाली तर चारू ते बरोब्बर लक्षात ठेवून त्याच्या निदर्शनास आणायची. ह्यावर तो खजील होऊन सुधारीत माहिती पाठवायचा.

एकुण बिझिनेसचा आवाका, सहभागी एजन्सीज, राजकारणी, सरकारी बाबू, बृअँचेसमधील स्टाफ ह्या सगळ्यांचे कोणत्या वेळी किती महत्व असते हे समजायला चारूला फक्त तीन वर्षे पुरली.

रोजचे, आठवड्याचे, महिन्याचे, त्रैमासिक, वार्षिक असे रिपोर्ट्स, स्ट्रॅटेजीच्या वार्षिक मीटिंग्ज, फाईव्ह इयर प्लॅन्स, रिव्ह्यू मीटिंग्ज, ह्या सगळ्या सगळ्या मंथन प्रक्रियांमधून ती आता इतपत तयार झाली की बन्सलांनी काही रिपोर्ट्स सहकार्‍यांकडे मागण्याआधीच ती मागून ठेवू लागली. सहकार्‍यांना एक तर हे समजायचे तरी नाही की बन्सलांनी न मागताच ही मागत आहे किंवा समजले तरी ते अ‍ॅप्रिशिएट करायचे की बरे झाले बन्सल साहेबांनी मागण्याआधीच आपल्याकडून ते दिले जात आहे. त्यामुळे चारूबद्दल एकुण कंपनीत आदर व कौतुक वाढू लागले.

माणसे येतात, जातात, संस्था तशीच राहते. चारू जॉईन झाल्यापसून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असे अनेकजण काही ना काही कारणांनी कंपनी सोडून गेले आणि त्यांच्याजागी नवीन आले. हे नवीन आलेले लोक जे होते त्यांच्यादृष्टीने चारू ही एक सेट झालेली आणि सर्वात मोठ्या साहेबाची पीए होती. त्यामुळे ते अर्थातच तिला वचकून असायचे. नवीन आलेले लहान पोस्टवरचे ऑफिसर्स तर तिच्याशी फारच आदराने बोलायचे.

बन्सलही आता चारूमुळे बरेच निर्धास्त होते. तिला बिझिनेस समजत आहे ह्याची जाणीव खरे तर त्यांना झालेलीही होती. पण त्यांना त्यात अडचण न वाटता उलट बरे वाटत होते की कामे जरा अधिक सुरळीत व व्यवस्थित अंडरस्टँडिंगसकट होतील. तीन वर्षात तिला दोन वेळा बर्‍यापैकी पगारवाढ व एक प्रमोशनही मिळाले.

कामानिमित्त ऑफिसबाहेर राहण्याचे बन्सल ह्यांचे प्रमाण काहीसे कमी झाले. बरेचदा ते दुलारी सरांच्या ऑफिसमध्ये काहीतरी महत्वाचे बोलत बसत. कंपनी एक्स्पान्शनचा मोठा प्लॅन आखत होती. ह्या विस्तारकार्यात प्रत्येकच फन्क्शनच्या अधिकार्‍यांना प्रचंड दबावयुक्त मानसिकतेत रिझल्ट्स द्यावे लागत होते. अजून बर्‍याच गोष्टी कागदोपत्रीच होत्या. पण जागा घेऊन झालेली होती. मशीनरीची अर्धी ऑर्डर झालेली होती. रीतसर परवाने मिळावेत ह्यासाठी सर्वोच्च पातळीवर हालचाली झालेल्या होत्या. स्थानिक जनतेला त्रास तर होऊच नये उलट त्यांना नोकर्‍या मिळाव्यात असाही रंग नवीन प्रोजेक्टला दिला जात होता.

ह्या विस्तारकार्यात सहभागी असलेल्या प्रत्येकच अधिकार्‍याच्या कारकीर्दीचे अक्षरशः सोने होणार होते. जे स्थापनेपासून असतात व ज्यांच्यामुळे स्थापना यशस्वी होते त्यांना कंपनीकडून खूप मोठे लाभ मिळू शकतात. नव्यानेच जॉईन झालेले ट्रेनी येथपासून ते मोठ्या पदावरचे अधिकारी ह्या सगळ्यांनाच शानदार लाभ होणार ह्यात शंका नव्हती. मात्र आत्ताचे वातावरण फार तणावयुक्त होते. नियोजनात झालेल्या चुकांचा सरळ अर्थ आर्थिक तोटा असा होत होता. एकुणच कंपनीतील वातावरण गरमागरम होते. अंतर्गत राजकारण नियमीतपणे होत होते कारण प्रत्येकालाच स्वतःची कातडी वाचवायची असायची.

संध्याकाळी पाच ते साडे आठ ज्या मीटिंग्ज चालत त्या आता दुपारपासूनच होऊ लागल्या. सतत कोणी ना कोणी केबीनबाहेर घाबरलेल्या मनस्थितीत ताटकळत असायचे. एकीकडे कंपनीत हे वातावरण होते तर चारूची मनस्थिती मात्र कधी नव्हे इतके उत्तम होती. ह्याचे कारण तिला हे नक्की समजत होते की नेमके काय चाललेले आहे. म्हणजे इन्व्हेन्टरी वाढली म्हणून पर्चेसवाले झाप खातात तेव्हा प्लॅनिंगवाल्यांनी काहीतरी घोडचूक केलेली असते आणि ती लगेचच त्यांच्यावर शेकते. ती शेकू नये म्हणून ते आधीच मार्केटिंगकडे बोट दाखवतात. पण मार्केटिंगवाले ऑप्टिमिस्टिक प्लॅनिंगचा हा परिणाम आहे व सेल वाढेलच म्हणतात. प्रोजेक्टसाठीचे पैसे रोटेशनमधून द्यायला फायनान्स भयंकर कुरकुर करतात तेव्हा प्रोजेक्ट्सचा कोणीतरी बन्सलसाहेबांसमोर भीक मागितल्याच्या आविर्भावात अ‍ॅप्रुव्हल मागतो.

चारूमध्ये फार वेगाने व फार वेगळेच बदल होत होते. ती आता तिच्या स्वतःच्या कामाच्या एक नाही, दोन नाही तर अनेक पावले पुढे होती. ती आता डिमांडिंग झाली होती. काल झालेल्या मीटिंगच्या बेसीसवर ती आता स्वतःच विविध डिपार्टमेन्ट्सना रिमाईन्डर्स देऊन प्रोग्रेस रिपोर्ट्स मागू लागली होती. आता सर्वांनी हे मान्यही केलेले होते की चारूला बिझिनेस समजत आहे आणि ती जे मागते ते काही वेळाने बन्सल साहेब मागणारच आहेत. इकडे बन्सल साहेबांना भारी कौतुक वाटत होते की आपल्याला काम ज्या पद्धतीने व्हायला हवे आहे ते नेमके ह्या बाईला समजलेले असल्याने आपल्याला तिच्यामधून परफॉर्मन्स काढून घेण्यासाठी जो वेळ घालवावा लागत असे तो आता लागत नाही. सगळे काही वेळच्यावेळी समोर येते.

शंकराचा नंदी हा आता खूपच जास्त महत्वाचा झाला. आधी जे अधिकारी काही रिपोर्ट्स थेट बन्सलांना पाठवायचे ते आता ते रिपोर्ट्स चारूला पाठवायला लागले. चारूच्या केबीनचे स्वरूपही बदलले. वेगवेगळे चार्ट्स भिंतीवर लागले. वेगवेगळे कॉर्पोरेट कोट्स चिकटले. तिच्यासमोर बसणारे आधी तिला निरखायचे, तिच्यावर आपला दबाव राहील असे बघायचे. आता ते तिच्यासमोर अदबीने बसू लागले. कोणीही धाडकन् दार उघडून आत येईनासे झाले. चारूच्या व्यक्तीमत्वालाही झळाळी आली.

चारूनेही कामात स्वतःला झोकले. एक स्टेज अशी असते की तेव्हा पैशापेक्षाही पदाची नशा डोक्यात अधिक असते. आठ पंचवीसला ऑफिसला पोचणारी चारू आता साडे सातलाच येऊ लागली. वेगवेगळे करस्पॉन्डन्स धडाडीने करू लागली. बन्सल साहेब ऑफिसमध्ये नसले तर आधी ती त्यांना फोन करायला किंचित वचकायची. पण आता तिला ते टेन्शन वाटत नव्हते कारण त्यांच्या अपेक्षांहून अधिक ती परफॉर्मन्स देत होती.

लहानसहान अधिकारी तर तिला मॅडमच म्हणू लागले होते. काही रिपोर्ट्स तर चक्क अ‍ॅड्रेसच तिला होऊ लागले.

चारूमध्ये आणखी एक सूक्ष्म बदल झाला जो बन्सलांनी टिपला पण तूर्त दुर्लक्षित ठेवला. एका महत्वाच्या मीटिंगमध्ये फायनान्सचा जी एम प्रोजेक्ट्स्च्या मॅनेजरला क्वेश्चनिंग करत असताना मधेच चारू उद्गारली........

"बट लास्ट वीक यू हॅड कमिटेड दॅट यू वूड रिलीज द फन्ड्स फॉर स्टोरेज टँक एल सी"

मीटिंगमध्ये सन्नाटा पसरला क्षणभर! चारू अगदी जीभ चावायच्या बेतात आली होती पण तिने चेहरा ठक्क कोरडा ठेवला व कागदांकडे बघत राहिली. एखादा असता तर त्याने कानफडातच वाजवली असती चारूच्या! पण स्वतः बन्सल तिथे बसलेले होते. चारू पटकन् बन्सलांकडे बघत म्हणाली........

"सर, धिस इज द प्लॅन शेअर्ड बाय फायनान्स लास्ट वीक, आय वॉज जस्ट गोईन्ग बाय दॅट"

बन्सल क्षणभर चारूकडे बघत नंतर फायनान्सच्या जी एम ला म्हणाले....

"स्टोरेजची एल सी मस्ट आहे, रिलीज इट"

"येस सर "

जी एम ने अदबीने होकार दिला.

जे व्हायला नको होते ते झाले. नंदी दोन पावले गाभार्‍याकडे सरकला. सर्वांदेखत चारूच्या विधानाला बन्सल साहेबांना पुष्टी द्यावी लागली व चारूच्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या.

एक म्हणजे तिचा भाव वधारलेला आहे हे सर्वमान्य झाले आणि दुसरे म्हणजे तिच्याबद्दल एका क्षणात अनेकांच्या मनात अढी बसली.

मिळालेला हा विजय चारूला उन्माद देऊन गेला. बन्सलसाहेबांची लेव्हल एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होती. त्या लेव्हलला असणारे इतर अधिकारी सोडले तर इतर सर्वांना चारू नावाने हाक मारू लागली. म्हणजे मिस्टर किंवा मिस म्हणायची, पण सर किंवा मॅडम म्हणणे तिने बंद केले. लेव्हलच्या दृष्टीने ती साधारण मॅनेजरीयल केडरची होती. इतर अधिकारी तिच्या खूप वरचे होते. पण चारूत झालेला हा बदल सगळ्यांनीच टिपला. प्रोजेक्त्सच्या ज्या मॅनेजरला मीटिंगमध्ये क्वेश्चनिंग केले जात होते तो मात्र चारूवर खुष झाला होता कारण तिच्यामुळे फायनान्सवाले ऐन समर प्रसंगी तोंडघशी पडले होते आणि फन्ड्स रिलीज होणार होते.

एकदा एक निराळा प्रसंग घडला. बन्सल साहेबांना कामानिमित्त बाहेर जावे लागले पण त्यांच्या केबीनमध्ये ठरलेली मीटिंग होणे अत्यावश्यक होते. त्यामुळे त्यांनी सप्लाय चेनच्या व्हीपीला ती मीटिंग हेड करायला सांगितली आणि चारूला मिनिट्स करायला सांगितली. बन्सलांच्या अनुपस्थितीतीत कॉन्फरन्समध्ये ही मीटिंग सुरू झाली. सप्लाय चेनचा व्हीपी हा बन्सलांना नेक्स्ट होता. त्याचे नांव आहुजा! आहुजाने मीटिंगची प्रस्तावना मांडली व प्लॅनिंगचा मुकेश स्लाईड्स दाखवू लागला. चर्चा सुरू झाली. काहीच मिनिटांत चर्चा हॉट होऊ लागली. सौम्य शब्दांत दोषारोप होऊ लागले. इकडे चारू विद्युत गतीने सगळे टिपून घेत असतानाच तिच्या डोक्यात वेगळीच चक्रे सुरू झाले. सातत्याने बन्सलांच्या सान्निध्यात असल्याने तिची विचार करण्याची पद्धतही बन्सलांसारखी झाली होती. पुन्हा तसाच प्रकार घडला. प्लॅनिंगचे जी एम काहीतरी एक्प्लेन करत असताना चारू अचानक म्हणाली........

"बन्सल सर वूड नॉट अ‍ॅप्रूव्ह इट, आय डोन्ट थिंक सो"

पुन्हा सन्नाटा पसरला. पण ह्याहीवेळी तिचा पॉईंट पटण्यासारखाच होता. आहूजाने शून्यात बघत होकारार्थी मान हालवली. तो विशिष्ट मुद्दा बन्सलांना कसा डील केला जावासा वाटेल ह्या निकषानुसार पुढची चर्चा झाली.

खरे तर ह्यात कोणाचा अपमान नव्हता, उलट कंपनीच्या इन्टरेस्टमध्येच होते ते! पण हे तिने बोलायला नको होते. आहुजा स्वतःच्या शैलीने तिथे पोचलेच असते. बन्सलांच्या नावाच्या उच्चाराने सर्वांना गप्प बसावे लागले असले तरी आज प्रथमच मीटिंग संपल्यावर अनेकांची आपापसात कुजबूज झाली. ही कुजबूज कानावर पडली असती तरी चारू सावरली असती. पण नंदी गाभार्‍याच्या अगदी जवळ पोचला होता. आताचा त्याचा उन्माद सावरण्यापलीकडचा होता.

काही दिवसांनी चारू हा एक विचारात घेण्यासारखा घटकच बनला अनेकांसाठी! ह्या बयेला आधी शांत केल्याशिवाय आतपर्यंत पोचताच येणार नाही हे सगळ्यांना समजले. तरी त्यातील एकाने एक दिवस रिपोर्ट्स थेट बन्सलांनाच मेल करायला सुरुवात केली कारण तो चारूच्या शहाणपणावर भडकलेला होता व तिला तिची जागा दाखवून द्यायची त्याला फार इच्छा होती. बन्सलांची मेल असली तरी ती वाचायची आधी चारूच! चारूने त्या मेल्स सलग दोन दिवस वाचल्या आणि त्या दिवशी जी मीटिंग झाली ती मीटिंग संपता संपता ती एक वाक्य बोलली........

"मिस्टर यादव, लास्ट टू डेज यू हॅव बीन सेन्डिंग द मेल्स डिरेक्टली टू सर. आय अ‍ॅम एनी वे द फर्स्ट वन टू रीड दॅट. सो, प्ली़ सेन्ड देम टू मी ओन्ली"

ह्याही मीटिंगला बन्सल स्वतः नव्हते.

आता ह्या वाक्याने पुन्हा सन्नाटा पसरला. बन्सललंना काही मेल्स डायरेक्टली जाणे ह्यात नाक खुपसायचा तिला काहीही अधिकार नव्हता. जर बन्सल स्वतः तसे म्हणाले असते तर ठीक होते. बरं, हिला असे तरी कसे म्हणणार की हे सांगणारी तू कोण? खरेच तिच्याकडे बन्सलांची तशी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असली तर आपलाच पोपट व्हायचा. कशीशी मान हालवत त्या यादवने तिथून काढता पाय घेतला. पण त्यामुळे एक गोष्ट ठळक झाली. आता बन्सलांना मेल्स थेट पाठवणे बरे नाही असे उगाचच प्रत्येकाला वाटले. कोण जाणे, ही काहीतरी कुरापत काढायची आणि आपल्यालाच झाप पडायची!

शंकराच्या दर्शनात नंदीचा अडथळा बराच वाढला.

आणि एक दिवस........

नंदीने आपला एक पाय गाभार्‍यात टाकला.

एका मीटिंगला सगळे कॉन्फरन्समध्ये जमलेले होते. बन्सल साहेबांसाठी थांबले होते. बन्सल साहेबांना यायला काहीतरी दहा पंधरा मिनिटे लागणार असे कळले. चारू तिथेच सगळ्यांसोबत बसली होती. अजून मीटिंग सुरू व्हायची असल्यामुळे थोडी कुजबूज वाढली. कोणी क्रिकेटवर तर कोणी राजकारणावर बोलू लागले. अर्ध्या तासाने जे बुद्धिबळाच्या पटावरील उंट घोड्यांप्रमाणे एकमेकांना काटणार आणि छाटणार होते ते आत्ता जरा रिलॅक्स मूडमध्ये बोलत होते. चारूच्या मनात गेली चार वर्षे दडून बसलेला सुप्त राक्षस अचानक बाहेर आला. तिचे भान सुटले. आपण कोण आहोत, कोणात बसलो आहोत आणि वाट कोणाची बघितली जात आहे ह्याचा विचारही न करता ती बोलून गेली........

"व्हॉट इफ सर इज नॉट देअर, वुई कॅन ऑल्वेज स्टार्ट द मीटिंग ना? ही विल जॉईन शॉर्टली "

गाभार्‍यात शंकरच नसला तर नंदीला कोण जुमानणार!!!!

आहुजा चारूकडे रोखून बघत करड्या स्वरात म्हणाला.

"चारू, आय अ‍ॅम हिअर टू डिसाईड व्हेदर टू स्टार्ट द मीटिंग ऑर नॉट, यू डोन्ट हॅव टू पोक यूअर नोज इन टू समथिंग दॅट यू डोन्ट अंडरस्टँड!! यू आर जस्ट अ पीए टू हिम

खाडकन कानाखाली वाजवली गेल्यासारखा चेहरा झाला चारुचा! सगळ्यांच्याच मनातले बोलले गेले खरे तर! "पण उन्माद!!!! क्षणार्धातच चारू उसळली.

"मिस्टर आहुजा, आय रिप्रेझेंट मिस्टर बन्सल इन धिस मीटिंग"

उन्माद नडला. ती हे वाक्य बोलत असताना बन्सल दार उघडून आत आले आणि चारूच्या हिंस्त्र चेहर्‍याकडे बघतच त्यांनी तिच्या तोंडचे ते वाक्य ऐकले. क्षणभर डोकेच सरकले त्यांचे! पण शेवटी ती एक बाई होती. एकदम ओरडणे चांगले ठरले नसते. त्यांनी आहुजाला विचारले....

"व्हॉट हॅपन्ड आहुजा??"

आहुजाने थेट जे झाले ते सांगितले आणि म्हणाला....

"तुमच्या अनुपस्थितीत ही आमच्याशी तुमच्याच स्ताईलने वागते, बोलते. आम्ही इथे ह्या असल्या लेव्हलच्या पीएंकडून अपमान करून घ्यायला काम करत नाही. आणि इथल्या सगळ्यांचे हिच्याबद्दल हेच मत आहे"

दोघाचौघांनी मानाही डोलावल्या.

चारू मुळापासून जादरलेली होती.

बन्सल म्हणाले....

"चारू, यू गो टू यूअर केबीन, सी मी इन द इव्हिनिंग"

त्या दिवशी संध्याकाळी साडे सहा वाजता एक थंड शब्दांतली नोट इमेलवर फिरली.

'मिस चारूलता सरकार डझन्ट वर्क विथ धिस कंपनी एनी मोर........'

त्या दिवशी गेटबाहेर पडताना नेहमी सलाम करणारा सिक्युरिटीही तिच्याकडे तुच्छपणे पाहून हसला.

========

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉलिड आहे कथा.
हे वातावरण अनुभवलेले नाही पण कल्पना आलीच.व्यक्तिरेखा उत्तम रंगवली आहे.

खूपच मस्त.!
खास बेफी टच..!
असे लेखन करत राहा. ब्रेक नका घेउ..+१
खूप दिवसांनी तुमची कथा आल्याने, वाचून आनंद झाला.. Happy

छान कथा!
फक्त एक टायपो दिसला (जनरली बेफिंच्या लिखाणात कधी नसतो) , चारू मुळापासून जादरलेली होती.

खुप छान..

अर्धी वाचल्यावर अंदाज आलाच होता शेवटाचा

मी अजून दोन चार वेगवेगळे शेवट कल्पले होते, चारु त्रिशूल मधला गद्दार एम्प्लॉयी बनून कॉम्पीटीटर ला जॉइन होते/बन्सल यांची बायको निवर्तते आणि चारुशी लग्न होते/चारु वेगळा बिझनेस काढून त्यांचे कॉन्ट्रॅक्ट पळवते वगैरे
(अती जास्त बॉलीवूड पिक्चर पाहिल्याचा परीणाम Happy )

आहे हा शेवट परफेक्ट आहेच.

mi_anu हा शेवट परफेक्ट नाहीए. तीने जे काही केले, चांगलं वाईट पण एक वॉचमन तिच्याकडे तुच्छतेने पाहतो हे पटत नाही.

बर्याच दिवसानी बेफि. टच कथा आली
झक्क्क्क्क्क्क्क्क्कास
आने दो आने दो>>>>+ १११११११
एका दमात वाचून काढली.

"तीने जे काही केले, चांगलं वाईट पण एक वॉचमन तिच्याकडे तुच्छतेने पाहतो हे पटत नाही."

वॉचमन ने असं बघणं हे वाईट. पण ज्या कंपनीत लोक असे तडकाफडकी काढले जाण्याचं कल्चर असेल तिथे सिक्युरिटी वालेही उगवत्या सूर्याला सलाम करुन फेकल्या गेलेल्या कडे तुच्छतेने पाहणं हे अशक्य नाही.

<<तीने जे काही केले, चांगलं वाईट पण एक वॉचमन तिच्याकडे तुच्छतेने पाहतो हे पटत नाही.

वॉचमन ने असं बघणं हे वाईट. पण ज्या कंपनीत लोक असे तडकाफडकी काढले जाण्याचं कल्चर असेल तिथे सिक्युरिटी वालेही उगवत्या सूर्याला सलाम करुन फेकल्या गेलेल्या कडे तुच्छतेने पाहणं हे अशक्य नाही.>> खरे आहे.
शिवाय तिच्या अॅटिटयूड मुळे इतरांप्रमाणेच तो सुद्धा दुखावला गेला असेल..

Pages