फणस

Submitted by विलास गोरे on 27 May, 2018 - 14:02

मे महिन्यातील ती एक संध्याकाळ, दिवेलागणीची वेळ. तळकोकणातील आमचे घरात आमची आई रात्रीच्या जेवणाची तयारी करीत होती, तर दादा म्हणजेच आमचे वडील ओसरीत त्यांच्या आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत होते. मी व माझा मोठा भाऊ सुरेश अभ्यास करीत होतो. एवढ्यात आमच्या शेजारी राहणारी पार्वती सांगत आली की तिचा नवरा महादू रात्री घरी येताना कोणाला तरी बघून घाबरलाय व त्याला ताप पण भरलाय. सर्वच घाबरून गेलेत. आईने पार्वतीला धीर दिला. दादानी माझा मोठा भाऊ सुरेश याला शहरातील डोंगरे डॉक्टरांना घेऊन यायला सांगितले. दादा व मी पार्वतीबरोबर महादूच्या घरी गेलो. महादूच्या घरी तशी बरीच माणसे जमली होती. एकंदर वातावरण तसे गंभीर वाटत होते. दादांना बघताच सर्व सावध झाले. आमच्या दादांना गावात खूप मान कारण दादा शहरातील शाळेत मुख्याध्यापक होते. दादांना बघून महादूचा भाऊ भिवा पुढे आला व आम्हाला घेऊन महादूकडे गेला. एका सतरंजीवर महादू झोपला होता. त्याने घोंगडी पांघरली होती. महादूची आई त्याच्या उशाशी बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत होती. महादूची मुले व शेजारपाजारची बायका-मुले चिंतातूरपणे बाजूला उभी होती. आम्ही येताच सर्व बाजूला सरकले. आम्ही पाहिले की महादूचे अंग थरथरत होते. त्याचा चेहरा पण थोडासा भेसूर दिसत होता. तो थोडासा कण्हत होता. डोळे निस्तेज व भकास दिसत होते. दादा महादूच्या जवळ गेले. त्यांनी त्याला हाक मारली पण महादूने काहीच प्रतिसाद दिला नाही. पुढे होऊन दादांनी महादूच्या डोक्यावर हात ठेवला. महादूला चांगलाच ताप भरला होता. ऐन उन्हाळ्यात त्याने घोंगडी पांघरली होती. त्यानंतर भिवाने आम्हाला थोडक्यात घडलेली घटना सांगितली.
त्या दिवशी नेहमीप्रमाणे महादू दुधाचे रतीब घालायला शहरात गेला. दुधाचा रतीब घालून बाजार करून तो साधारण दिवेलागणीच्या वेळी घरी येत असे. त्यादिवशी अचानक रस्त्यावरून महादूची किंकाळी व काहीतरी पडल्याचा आवाज खळ्यात खेळणारया मुलांनी ऐकला. त्यांनी लगेच भिवाकाकाला सांगितले व भिवा आणि महादूचे दोन मुलगे घाटीतून रस्त्याकडे धावले. रस्त्यावर जाताच ते हादरले कारण महादू रस्त्यावर पडला होता, त्याच्या अंगावर सायकल पडली होती. दुधाचे रिकामे कॅन व बाजारातून खरेदी केलेल्या सामानाच्या पुड्या रस्त्यावर इतस्तता पसरल्या होत्या. भिवाने पुढे होऊन महादूच्या अंगावरून सायकल उचलली. महादूचे डोळे भयप्रद व विस्फारलेले दिसत होते व थंडीने हुडहुडी भरावी तसा तो कापत होता.भिवाला बघून “जयराम फणस मागतोय” असं काहीतरी तो पुटपुटला आणि त्याने एका दिशेला हात दाखवला. भिवाने त्या दिशेला बघितले पण त्या ठिकाणी त्याला रस्त्याच्या त्या कडेला असणारे एक मोठे वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या वाऱ्या मुळे हलत होत्या. महादू सांगत होता तसा कोणी माणूस मात्र तिथे नव्हता. महादूची अवस्था पाहून भिवा व मुलांनी त्याला उचलूनच घरी आणले होते.
भिवाचे बोलणे संपतासंपताच डॉक्टर डोंगरे आले. दादांनी त्यांचे स्वागत केले व थोडक्यात भिवाने सांगितलेली महादूची हकीगत डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरानी महादूला तपासले. डॉक्टरांनी विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाला महादू उत्तर देत नव्हता. तो ग्लानीत होता आणी थोडासा कण्हत होता. डॉक्टरांनी महादूला तपासून औषध दिले. दादांनी डॉक्टरांना विचारले “तुम्हाला काय वाटतं? काय झालय याला ?” “नीट निदान होत नाहीये. हार्टबिट्स थोडे जलद पडताहेत. मला तो घाबरलेला वाटतोय. थोडासा मुका मार पण लागलाय. आता त्याला शुद्ध नाहीये, पण आता तरी मला खूप गंभीर वाटत नाहीये. सकाळ पर्यंत शुद्धीवर यायला पाहिजे.” डॉक्टर गेल्यावर महादूची आई दादांना म्हणाली “ दादा तुम्ही डॉक्टरांना आणले ठिक, पण महादूला जयराम दिसला असे तो म्हणाला. आज अमावस्या आहे आणि गेल्याच महिन्यातील अमावास्येलाच जयराम वारला. तेव्हा ही बाहेरची बाधा वाटते. आम्ही नाम्या गुरवाला बोलावले आहे.” महादूच्या आईने मांडलेला मुद्दा विचार करण्यासारखा होता, कारण जयराम जिवंत नव्हता. महादूच्या घरापासून ४ मैलावर डोंगरात चिरयाची खाण होती. जयराम हा आमच्या गावात राहणारा एक तरुण तिथे कामाला होता. महादूची व त्याची चांगली मैत्री होती. मागच्याच महिन्यात खाणीत काम करताना एक मोठा दगड त्याच्या अंगावर पडला व हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत त्याला मृत्युने गाठले होते. मात्र ही घटना घडली तेव्हा महादू गावात नव्हता. त्याच्या नात्यातील एका लग्नासाठी तो जिल्ह्याच्या गावी गेला होता. गावात परतल्यावर त्याला जयरामच्या अपघाती मृत्यूची बातमी समजली होती. आपल्या मित्राच्या अकाली व अनपेक्षित मृत्यूने महादुला खूप वाईट वाटले व धक्का बसला होता. महादूच्या आईच्या म्हणणे दादांना पटले नसले तरी ते काही बोलले नाहीत कारण गावातील बहुतेक जण बाहेरची बाधा, देवस्की, मानणारे होते,थोड्याच वेळात नाम्या गुरव आला. नाम्या गुरव गावातील रवळनाथ मंदिराचा पारंपारिक पुजारी होता. त्याला थोडी मंत्रविद्या पण अवगत होती त्यामुळे देवापुढे गाऱ्हाणे घालण्याव्यतिरिक्त तो कोणाला काही बाहेरची बाधा झाली तर त्यातून पण त्या माणसाची सुटका करीत असे. नाम्या काहीतरी मंत्र पुटपुटत महादूकडे गेला. आपल्या बरोबर आणलेले तांदूळ मंत्र म्हणत त्याने महादूवर टाकले. त्याला अंगारा लावला. डोळे मिटून पाच मिनिटे त्याचे मंत्र म्हणणे चालू होते. त्यानंतर मंत्र म्हणत एक असोला नारळ महादूच्या अंगावरून ओवाळला. भिवाकडे तो नारळ देत म्हणाला, “ झाडावरचा तयार झालेलो एक फणस घे आणि महादू ज्या दिशेक हात दाखवत होतो त्या दिशेला हा नारळ व फणस टाक व की मागे न बघता ये घरी ये.” त्यानंतर धीराचे चार शब्द बोलून दादांचा निरोप घेऊन नाम्या गेला. नाम्या गेल्यावर आम्ही पण निघालो.
डॉक्टरी उपचारांनी म्हणा किंवा नाम्याच्या उपायांनी म्हणा महादू सकाळी शुद्धीवर आला व दोन तीन दिवसात खडखडीत बरा झाला. आम्हा सर्वाना उत्सुकता होतीच म्हणून आम्ही महादूला त्या दिवशी घडलेल्या प्रकाराविषयी विचारले आणि महादू सांगू लागला ..... “त्यादिवशी मी गावात नेहमी प्रमाणे रतीब घातले, बाजारहाट केला. नंतर गावकरच्या हॉटेलात चहा घेण्यासाठी थांबलो. तिथे जयरामचा विषय निघाला. मला पण आठवलं की जयरामला माझ्या बागेतला फणस आवडायचा व त्याने मला फणस दे असे सांगितले होते पण द्यायचा राहूनच गेला. असं बरच बोलण झालं व मग मी निघालो. घाट सुरु होईपर्यंत बाकी लोकं होते पण नंतर मी एकटाच होतो. चढ लागल्यावर मी सायकल वरून उतरलो व सायकल हातात पकडून चालू लागलो. रस्ता निर्मनुष्य व अंधारलेला. सायकल हातात धरून चढताना धाप लागत होती. माझ्या घराची घाटी दिसायला लागली. चढावर दम लागल्याने मी थोडा थांबलो. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला वडाचे झाड आहे तिथे मला कोणीतरी दिसले. मी थोडा कानोसा घेतला आणि मला जाणवले कोणीतरी माझ्या दिशेने येत आहे, एवढेच नव्हे तर ती व्यक्ती मला हाताने थांबण्याची खूण करीत होती . मला आश्चर्य वाटले कोण बरे असेल या रात्रीच्या वेळेला. पण ती व्यक्ती जशी जशी जवळ येत गेली तशी ओळख पटली. तो जयराम होता. मी त्याची चौकशी केली, आमचे बोलणे झाले थोडावेळ. मला मी त्याच्याशी किती वेळ आणि नेमके काय बोललो ते नाही आठवत पण त्याचा शेवटचा प्रश्न चांगलाच आठवतो. ‘ अरे महादू तुझ्या बागेतला कापा फणस माझ्यासाठी ठेवला असशील ना ? कधी देणारेस मला ? त्याच्या या वाक्याने माझ्या सर्वांगावर काटा आला. मला जाणीव झाली की माझ्याकडे फणस मागणारा हा जयराम तर जिवंत नाहीये मग मी बोलतोय कोणाशी? काय बोलावे मला सुचेचना. त्यातच अजून आश्चर्य म्हणजे माझ्याशी बोलणारा जयराम आता दिसेनासा झाला होता. मी खूप घाबरलो, माझे पाय लटपटू लागले. छातीतली धडधड वाढली. मोठ्याने ओरडावे असे वाटले पण तोंडातून शब्दच फुटेना. आणि माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतरचे मला काहीच आठवत नाही.”
महादूची हकीगत इथे संपली. महादू कसा बरा झाला डॉक्टरांच्या औषधाने की नाम्याच्या उपायाने ? महादूची ही हकीगत गावात सगळीकडे पसरली, त्याला तिखट मीठ लाऊन शेजारच्या गावात पण पोचली आणी जयारामचे भूत नंतर अनेकांना दिसू लागले. या बाबतीत आमचे दादा ठाम होते . कारण भूताचं अस्तित्व त्यांना मान्य नव्हते. हे माणसाच्या मनाचे खेळ आहेत असे ते म्हणत. पण आपले म्हणणे त्यांनी कधी कोणावर लादले नाही त्यावेळी मी होतो १२ वर्षांचा. मला आणि माझ्या मित्रांना महादुला जयरामच्या भुताने पछाडले असेच वाटायचे. तसेच जयरामचे भुताच्या इतरांनी सांगितलेल्या गोष्टी पण खरया वाटत असत. आता मोठेपणी मागे वळून बघताना त्यावेळी ऐकलेली डोंगरे डॉक्टर व दादांची चर्चा आठवते व पटतेदेखील. “ हे बघा, जयराम हा महादूचा जवळचा मित्र होता. जेव्हा जयराम गेला तेव्हा महादू गावात नव्हता. त्यामुळे त्याचा अपघाती मृत्यू जेवढा ठसायला पाहिजे तेवढा त्याच्या मनावर ठसला नाही, त्याच प्रमाणे त्याच्या मृत्यूची बातमी कळल्यावर त्याने मागितलेली वस्तू महणजे फणस आपल्याला त्याला देता आला नाही याचा त्याच्या मनावर अनपेक्षित ताण आला व ही गोष्ट त्याच्या अंतर्मनात खोलवर रुजली होती. त्याला जयराम दिसणे,त्याच्याशी बोलणे हा त्याच्या अंतर्मनाचा एक भास होता,त्याच्या कल्पनेतील जयरामचे फणस मागणे ही त्याच्या कल्पनाविश्वाची साखळी तोडणारी घटना आणि त्यानंतर आपण मृत व्यक्तीशी बोललो या जाणीवेने तो खरोखरच घाबरला.” अर्थात हे डॉक्टरांचे म्हणणे सर्वांनाच पटावे असा काही माझा आग्रह नाही .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults