बक्षीस

Submitted by राजेश्री on 25 May, 2018 - 13:44

बक्षीस (१)
मी शाळा कॉलेज मध्ये शिकताना आमच्या पप्पांना वाटायच मला स्टेज वर जाऊन दरवर्षी बक्षीस मिळावं. शाळेत असताना मी अभ्यासात यथा तथा. तुमच्या मुलीच अभ्यासात लक्ष नाही,दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण होत नाही,वर्गात तीच लक्ष नसत हे सांगायला एकदा पप्पांना शाळेत बोलावलं होतं.पप्पा आले माझ्या सुमार अभ्यासाबद्दल त्यांना मुख्याध्यापकांनी सांगितलं.घरी आल्यावर पप्पा मला रागावले नाहीत.म्हणाले राजा,तुला जमलं तसा अभ्यास कर,खेळू वाटलं तर खेळ.पण कशात तरी बक्षीस मिळालं पाहिजे तुला मग हुरूप येतो.पण मग शाळेत अभ्यासात स्टेज वरच बक्षिस मिळणं म्हणजे गोगलगायीला पळतीत बक्षीस मिळण्याची अपेक्षा करण्याजोगे होते.पण कशात तरी बक्षीस मिळवणारच हा विचार पक्का झाला.
बक्षीस मिळावं म्हणून मग मी खेळाकडे माझा मोर्चा वळवला.शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत जेवढ्या खेळात भाग घेता येईल तितक्या खेळात भाग घ्यायचो.एखाद्या खेळात तरी बक्षीस मिळेल ही आशा.घराच्या आजूबाजूला उद्या स्पर्धा आणि आदल्या दिवशी रस्त्यावर पळायची प्रॅक्टिस करणार.वेळ मोजणे किंवा शास्त्रोक्त पद्धतीने काही नाहीच पण तरीही आपण लय फास्ट पळतोय आणि आपला उद्या नंबर येईल असं वाटायचं.पप्पा दिवसभर कामावर,मम्मी आपल्या व्यापात.उद्या सकाळी लवकर स्पर्धा आहे म्हंटल की मम्मी चहा चपाती करणार.मी चहा चपाती खाताना पप्पां कामावर जाताना मला म्हणायचे राजा पळताना आपल्याला दिलेला ट्रॅक असतो तो सोडू नकोस.फास्ट पळ नंबर येईल.मी जीव तोडून पळायचो. ट्रॅक सोडायचा नाही या अति विचाराने माझा ट्रॅक चुकायचा.कधी चौथा नंबर यायचा.मग पळून गोळा फेकायला हातात त्राण नसायचा. लंगडीत पळताना दुसरा पाय लगेच जमिनीवर टेकायचा त्यातून बाद व्हायचो.मग चारशे मीटर च्या स्पर्धेची अनऊसमेंट होत असताना मी लांब उडी मारत असायचो.तिकडे जायचं या नादात उडीचा फॉल जायचा. सारांश हा की,चार पाच खेळात भाग घेऊन मी एकही बक्षीस न मिळविता रिकाम्या हातांनी घरी यायचो.घरी येऊन मी धावबाद झालेल्या विनोद कांबळी सारख रडत रहायचो. तायडी सचिन तेंडुलकर सारखी माझी समजूत काढायची.पप्पा घरी येताना मला बक्षीस मिळालं असेल म्हणून येताना आण्णा बुढे यांचे पेढे घेऊन यायचे.पप्पांना मला बक्षीस न मिळाल्याचा आणि माझ्या कोणत्या स्पर्धेत काय चुका झाल्या याचा सविस्तर इतिवृतांत मम्मी पप्पाना सांगायची,पप्पा म्हणायचे,असुदे राजा बक्षीस नाही मिळाले तर जास्त वाईट वाटून नको घेऊस हे पेढे खा,यावर्षी काय चुकलंय कळलं असेल तुला पुढच्या वर्षी खेळात हमखास बक्षीस मिळेल.मग मी तेवढ्यापुरते पुढच्या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेची तयारी म्हणून रोज चार दिवस शाळा सुटली की रस्त्यावर पळणार, लंगडी ची प्रॅक्टिस करणार,,गोळा फेकायच्या सरावासाठी मोठे दगड उचलून टाकणार मला पुढच्या क्रीडा स्पर्धेत बक्षीस हवे म्हणून एकटीच एकलव्यासारखं सर्वाचा सराव तेवढ्यापुरते करीत राहणार.क्रीडा स्पर्धेच्या वाऱ्याचा ओघ कमी झाला की ते पाटीवर टाकून मी पुन्हा नव्या मोहिमेत आणि भूमिकेसाठी नव्या प्रांतात बक्षीस मिळावे म्हणून दुसरीकडेच वळायचे.
बक्षीस मिळावी ही फार तळमळ मग मी हस्ताक्षर स्पर्धेत भाग घ्यायचो.अक्षर सुधारावे म्हणून कितीतरी दिवस आधी बिट्या आणि तायडीच्या वहीची मागची पाने चोरून फाडून घ्यायचो आणि त्यावर सराव करीत बसायचो. बिट्याला त्याची वहीची पाने गायब वैगेरे झाली काय पत्ता नसायचा. तायडी मात्र मला तिच्या वहीची मागची पाने चोरल्याबद्दल जाब विचारायची.मग पप्पांना नाव सांगायची.पप्पा उलट मला या स्पर्धेच्या तयारीसाठी दुरेघी वही आणून द्यायचे.म ची गाठ सुधार. र चा पाय लय खाली नको की वर नको ,अक्षर रेल्वेच्या रुळासारखं वळवू नको अशा सुधारणा सुचवायचे.मग वाटायच माझं अक्षर छान येणार आणि मला निदान हस्ताक्षर स्पर्धेत तिसरे बक्षीस तरी नक्कीच मिळणार पण नाहीच मिळालं कधी हस्ताक्षर स्पर्धेत बक्षीस.घरी आल्यावर काही पानांवर रागाने गिर्गटकाना करीत बसायचे.जेवणार नाही आज म्हणायचे.एवढ्या लगेच सुधारत नसत राजा आक्षार(पप्पा अक्षर ला आक्षार म्हणायचे) मग पप्पा म्हणायचे रोज पान भरून चांगलं अक्षर काढायचा सराव कर, मन लावून शब्दन शब्द गिरव कधी ना कधी मिळेल बक्षीस. स्पर्धेत नाही मिळालं बक्षीस तरी पेपरात चांगल्या आक्षराला मार्क्स असतात राजा.ते पण एक प्रकारचं बक्षीसच आहे.मग मी तासंनतास मन लावून चांगलं अक्षर काढीत बसणार.वर्गात सरांकडे जाऊन पहिला नंबर आलेलं अक्षर बघायला मिळेल का विचारणार ते कधी मिळाले नाहीच कालांतराने चांगलं अक्षर काढायचाही कंटाळा यायचा. मुद्दाम कारण नसताना रागाने वहीत काही शब्दांची पोट फुगवून काही शब्दांचे पाय मोडून, काही अक्षरांना लांब लांब लिहून एका ओळीत दोन अक्षरांना एकट पाडायचे.कधी जोडाक्षरात एखादा शब्द मुद्दाम दुसऱ्या शब्दाच्या डोक्यावर चढवून ठेवायचे.जास्तच राग आला तर गृहपाठाच्या वहिच्या मागच्या पानावर निषेधाच्या रेघोट्या ओढत बसायचे.एकदा रागाने हस्ताक्षरात पहिलं बक्षीस मिळालेल्या मुलीच्या ड्रेसवर बेंचखालून शाईच्या पेनाचे शिंतोडे उडवून पेन दप्तरात ठेऊन दिला होता.सुंदर अक्षर हाच खरा दागिना पण हा दागिना घडवताना करावयाचे पेशन्स माझ्याकडे नसायचे पण मग मला बक्षीस हवं असायचंच आणि मी माझ्या मोर्चा दुसऱ्या स्पर्धेकडे वळवायचे(क्रमशः.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बक्षीस मिळावी ही फार तळमळ मग मी हस्ताक्षर स्पर्धेत भाग घ्यायचो.अक्षर सुधारावे म्हणून कितीतरी दिवस आधी बिट्या आणि तायडीच्या वहीची मागची पाने चोरून फाडून घ्यायचो आणि त्यावर सराव करीत बसायचो. -- हे टायपो झालाय का? घ्यायचे, बसायचे असे करा.

हि कोल्हापूरी भाषा आहे, जातो, येतो असेच बोलतात स्त्रिया पण!

असेच असू दे! छान वाटतेय >>> +१११११

कोल्हापूरात असेच बोलले जाते अन ते ऐकायला छान वाटते, खटकत नाही

हो कोल्हापूर आणि सांगलीत आम्ही असेच बोलतो
ऑफिस मध्ये मग जाणीवपूर्वक येते जाते असे शब्द वापरतो

हो कोल्हापूर आणि सांगलीत आम्ही असेच बोलतो
ऑफिस मध्ये मग जाणीवपूर्वक येते जाते असे शब्द वापरतो