सिधम सातवाहनस!!!

Submitted by shantanu paranjpe on 24 May, 2018 - 12:28

महाराष्ट्रातील लेणी पहिली की पहिले नाव ऐकायला मिळते की ही लेणी सातवाहन कालीन आहेत आणि मग प्रश्न पडतो की हा सातवाहन नक्की कोण? तो कुठे होता? त्याच्या बद्दल काय काय माहिती उपलब्ध आहे? त्याचे कार्य काय?. असे असंख्य प्रश्न मनात ठेवत आपण ती लेणी पाहत असतो, तिथे असलेले अगम्य भाषेतील शिलालेख बघत असतो, भगवान बुद्धाची मूर्ती बघून एक जुनी वास्तू पाहिली या आनंदात घरी जातो तरी ते प्रश्न काही पिच्छा सोडत नाहीत. या सर्वांची उत्तरे मिळवण्यासाठी या लेखाचा प्रपंच!!

सध्याच्या घडीला आपल्याला माहिती असलेला महाराष्ट्राचा इतिहास हा सातवाहनांपासून सुरु होतो!! त्याच्या आधी महाराष्ट्रात काय झाले याची काहीच माहिती आपल्या दुर्दैवाने उपलब्ध नाही. तर, सातवाहन हा महाराष्ट्रातील पहिला राजवंश आणि म्हणूनच याचा अभ्यास करणे हे जास्त महत्वाचे ठरते. मग त्याच्या आधी महाराष्ट्र नव्हता का? तर याचे उत्तर होता असे होते. लेण्यातील काही लेखांमधून आपल्याला त्या काळी असलेल्या रठीक, भोजक अशा लहान सरंजाम सत्ताधार्यांची माहिती मिळते. पण सातवाहनांच्या इतिहासापासून आपल्याला महाराष्ट्र कसा होता, इथले सामाजिक जीवन कसे होते, व्यापार कसा होता, राज्यशासन पद्धत काय होती, कौटुंबिक जीवन कसे होते याची माहिती मिळते यातच सातवाहनांचे महत्व दिसून येते.

सलग साडेचारशे वर्ष या भूमीवर राज्य करणारा असा हा महापराक्रमी वंश. याधी किंवा या नंतर असा कोणताही राजा झाला नाही की त्याने किंवा त्याच्या वंशाने साडेचारशे वर्ष सलग राज्य केले. बरे, नुसते राज्यच केले नाही तर त्या राज्यात संपन्नता आणली, व्यापार वाढवला, कला व स्थापत्य यात भरीव कामगिरी करून पुढच्या पिढीला राज्य कसे करावे याबद्दल प्रेरणा दिली. सातवाहन राजाच्या यशाचे गमक तिथे आहे की त्याच्या राज्यातील जनता ही सुखी होती.

आपले दुर्दैव की या राजाबद्दल आपल्याकडे अस्सल साधने फार तोकडी आहेत. याचे कारण म्हणजे त्या काळात लिखाण फार कमी झाले किंवा इतिहास जतन करून ठेवायला हवा असा विचार तेव्हा कुणाच्या मनाला शिवला नाही. विविध लेण्यांमध्ये असणारे विविध लेख यांवरून आपल्याला त्या काळातील समाजजीवनाची, तसेच राजांची माहिती मिळते इतकेच. पुराणात सातवाहन राजांच्या वंशावळी दिल्या आहेत मात्र सध्या उपलब्ध असलेली पुराणे ही तेव्हाची लिहिलेली पुराणे असतील का अशी शंका घ्यायला सहज वाव आहे. आता हेच बघा, वायू, ब्रम्हांड, भागवत व विष्णू ही सर्व पुराणे ३० सातवाहन राजे होऊन गेले असे सांगतात मात्र प्रत्यक्षात नवे देताना ही संख्या कमी होते. मत्स्य पुराण २९ राजे सांगते पण नावे ३० देते. आता अभ्यासकांनी ३० हा आकडा मान्य करून पुढे अभ्यास केला ती गोष्ट वेगळी. सातवाहनांचा कालावधी कोणता याबाबत पण अभ्यासकात एकमत नाही. कुणी म्हणते ख्रिस्तपूर्व पहिले शतक तर कुणी म्हणते दुसरे. याबद्दलचे विवेचन श्री. मिराशी यांनी त्यांच्या ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख’ या पुस्तकात अतिशय छान मांडले आहे, ते अभ्यासकांनी जरूर वाचावे.

शुङ गानाां चापि यछिष्टं
क्षपयित्वा बलं तदा ।
सिन्धुको ह्यन्ध्रजातीयः
प्राप्स्यतीमाां वसुन्धराम् ॥

पुराणातील वरील श्लोकात सातवाहनांचा उल्लेख हा ‘आंध्र’ असा आला आहे. त्यामुळे त्यांच्या स्थानाविषयी शंका निर्माण होतात. वास्तविक काही होण्याचे कारण नाही पण काही अभ्यासकांनी सातवाहन हे मुळचे आंध्र प्रदेशातील होते असा सिद्धांत मांडल्याने त्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. या अभ्यासकांच्या नुसार जर त्यांचे मूळ आंध्रात होते तर लगेच सातवाहन राजे महाराष्ट्रात आले आणि इथे विशाल राज्य उभे केले आणि पुन्हा आंध्र प्रदेशात गेले असेच म्हणावे लागेल, जे संभवनीय अजिबात वाटत नाही. भांडारकर यांनी नाशिक मधल्या एका लेखात असलेले धेनुकाकट हे नाव वाचून, ते गाव आंध्र मधील धरणीकोट असावे असे सांगितले. अर्थात या गोष्टीला पुरावा काही नाहीच. कारण कार्ले किंवा घोरावडेश्वर येथील लेण्यांमध्ये सुद्धा धेनुकाकटचा उल्लेख येतो आणि तो म्हणजे तेथील रहिवाशांनी दिलेल्या दानाविषयी येतो. आता आंध्र मधील एखाद्या शहरातील एखादा व्यापारी कार्ले लेण्यांसाठी दान देण्याचे कारण काय?!! असो, धेनुकाकाट वर एक वेगळा लेख लिहिता येईल. तर सातवाहन यांचे मूळ स्थान हे आंध्र नसून महाराष्ट्र असले पाहिजे कारण महाराष्ट्रातच त्यांचे सर्वाधिक लेख आढळले आहेत आणि सुरुवातीच्या राजांची नाणी सुद्धा इथेच सापडली आहेत. याला मजबूत दुजोरा मिळतो तो म्हणजे टोलेमी म्हणतो की ‘पुळूमावी राजा प्रतिष्ठान(सध्याचे पैठण) नगरीमध्ये राज्य करतो’. आंध्र भागात सातवाहनांचा विस्तार नक्कीच झाला पण तो नंतर झाला. त्यामुळे जेव्हा पुराणे लिहिली तेव्हा सातवाहन हे आंध्र मध्ये असल्याने त्यांना ‘आंध्र’ असे नाव दिले गेले हे साहजिक आहे.

सातवाहन राजांविषयी अभ्यास करताना जाणवते की हा विषय अतिशय दुर्लक्षित केलेला आहे. त्यामुळे मध्ययुगीन इतिहासाच्या बरोबर या विषयाचा अभ्यास झाल्यास त्याकाळी समाजजीवन कसे होते आणि तिथला व्यापार कसा होता हे समजणे सोपे जाईल. या अभ्यासाला लेण्यांच्या भटकंतीची जोड दिल्यास काही नवीन बाबी सुद्धा समोर येऊ शकतात. तूर्तास हा लेख इथेच थांबवतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. सातवाहनकालीन कुठल्याही लेण्यांमध्ये बुद्धाची मूर्ती/ प्रतिमा नाही
२. आपल्याला महाराष्ट्र/ दख्खनच्या इतिहासाबद्दल किमान साताठ लाख वर्षपूर्वी पासूनच्या कालखंडाविषयी तुटक आणि साडेचारहजार वर्षपूर्वीपासूनची जवळजवळ सलग माहिती आहे.
३. सातवाहनांनी साडेचारशे वर्षे राज्य केले याला काहीही भक्कम पुरावा नाही.
४. मिराशींचे संशोधन अत्यंत महत्वाचे असले तरी आता जुने झाले आहे. त्यानंतर सातवाहनकालीन नाणी, लेख, लेण्या, वसाहती यावर कितीतरी संशोधन झालेले आहे. ते महाराष्ट्रांतील विविध विद्यापीठांची वाचनालये, संशोधन संस्थांची वाचनालये, आंतर्जाल उर्फ इंटरनेट, छापील पुस्तके व पाठ्यपुस्तके अशा विविध स्रोतांमधून बर्‍यापैकी सहजी उपलब्ध आहे. (अभ्यासकांनी लेण्यांची भटकंती केली नसेल असं तुम्हाला का बरे वाटले?)

मी तुम्हाला आधीही लिहिलं होतं तसं, की खरडायच्या आधी निदान त्या विषयातील काय माहिती स्वतःला आहे/नाही हे तरी तपासा. एकच पुस्तक वाचून तुम्ही स्वतःला इतिहासअभ्यासक म्हणवता? धाडसी आहात ___/\___

आणि हो, 'महाराष्ट्र' ही संकल्पना सातवाहनांच्या काळात निश्चितपणे नव्हती. प्राचीन कालाचा अभ्यास करताना या भागाला दख्खन, पश्चिम दख्खन अशा सर्वसमावेशक किंवा त्या त्या नदीची खोरी, इतर भौगोलिक उपप्रदेश इत्यादीच्या नावाने ओळखले जाते/ लिहिले जाते

वरदाजी आपल्या या माझ्याबद्दलच्या सर्व विधानांना साष्टांग नमस्कार करतो. इथे उत्तरे देण्यात मला काहीही स्वारस्य वाटत नाही!!
तुमची प्रश्न सहज खोडता येतील पण ते करायची अजिबात इच्छा नाही. एक म्हणल की एकच धरून बसायचं आणि त्यातला मतितार्थ समजून घ्यायचा नाही याची कदाचित सवय असावी..
असो.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!