आणुया मशाल लोकशाहीची

Submitted by दत्तात्रय साळुंके on 19 May, 2018 - 07:24

आणुया मशाल लोकशाहीची

कर विटंबना रोज खुशाल लोकशाहीची
माफ करते प्रजा विशाल लोकशाहीची

जातपात धर्मापायी फुंकती घरदार
अन करीती जनता हलाल लोकशाहीची

ओठात एक आणि पोटात एक हिच निती
कोल्ह्याने पांघरली खाल लोकशाहीची

थकला काफिला असा चालून रात्रंदिवस
कोठवर वाहावी पखाल लोकशाहीची

बहुमत नसता होती वेडे राजकारणी
पळवापळवी चाले कमाल लोकशाहीची

कुणा भरवी तुपाशी कुणी भणंग उपाशी
अशीच असे सारी धमाल लोकशाहीची

झोपडीत युगायुगांचा दाटला अंधार
चला आणुया फिरुन मशाल लोकशाहीची

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults