वावटळ भाग - ४

Submitted by Vrushali Dehadray on 19 May, 2018 - 02:36

वावटळ भाग - ४

त्या रविवारी रात्री कधी नव्हे तो त्याचा फोन आला. “मी उद्या नेहमीच्याच वेळी घरी येईन. तू कोणत्या गाडीने मुंबईला येणार आहेस?” पुढे तो उगाच इकडचे तिकडचे बोलत राहिला. खरे विचारायचे होते ते तसेच मनात ठेवून. ती नेहमी सकाळच्या पहिल्या शिवनेरीने जायची आणि तो डेक्कन क्विनने. तिची नेहमीची बस त्यालाही माहिती होती आणि तरीही.....

दुसऱ्या दिवशी ती नेहमीच्या स्टॉपवर बसमध्ये चढली. रिकामी जागा बघायला लागली तर तिसऱ्या रांगेत खिडकीजवळची सीट सोडून सोहम बसलेला. गंभीर चेहऱ्याने. ती मुकाट्याने त्याच्या शेजारी जाऊन बसली. तेव्हाही धोक्याची घंटा कशी वाजली नाही आपल्या डोक्यात?

“काय झाल?”

“कशाचं?” तिने कळूनही न कळल्यासारखे विचारले. त्याने नुसतेच तिच्याकडे पाहिले.

“इथेच रहा म्हणाला.” त्याने नकळत मोठा नि:श्वास सोडला. तिच्या मनातलं अनाम आंदोलन तिने मैत्रीच्या मुखवट्याखाली दडपलं. तो या बसमध्ये कसा हे तिनेही विचारले नाही आणि त्यानेही सांगितले नाही. प्रवासात दोघे कामापुरतेच बोलले. दोन तीन दिवस तो अस्वस्थच होता.

आणि मग ती दुसरी रात्र आली. नात्यांची वेगळी समीकरणे मांडणारी. त्या दिवशी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. दोघेही नेहमीप्रमाणे कामावर गेली. दुपारी पावसाचा जोर वाढला म्हणून त्यांना ऑफिसातून लवकर सोडून दिले. ती घरी पोचली तर सोहम आधीच घरी आलेला होता. त्याच्या खोलीत झोपला होता. संध्याकाळपर्यंत पावसाने रौद्ररूप धारण केले. मुबईचा तो खास पाउस ती पहिल्यांदाच बघत होती. खूप वेळ झाला तरी सोहम बाहेर आला नाही म्हणून ती त्याच्या खोलीत डोकावली तर तो डोक्यावर पांघरून घेऊन झोपला होता. तेवढ्यात डबेवाल्या काकूंचा पोचवायला कोणी नाही म्हणून डबा पाठवता येणार नाही हे सांगायला म्हणून फोन आला. स्वयंपाक काय करू म्हणून विचारायला ती परत त्याच्या खोलीत डोकावली तर त्याच्या कण्हण्याचा आवाज आला. ती जवळ गेली.

“सोहम” उत्तर नाही. तिने परत जवळ जाऊन हाक मारली.

“खूप डोकं दुखतंय.” तो कण्हत म्हणाला.

“काही खाल्लं आहेस का? त्याने नकारार्थी मान हलवली.

ती स्वयंपाकघरात गेली. घरात त्याला खायला देण्याजोगे फारसे काही नव्हते. तिने सरळ दुधपोहे भिजवले आणि त्याच्या खोलीत घेऊन आली. “घे. थोड खाऊन घे म्हणजे गोळी घेता येईल.”

“नकोय मला. इच्छा नाहीये.”

“लहान मुलासारखं करू नकोस. पोटात काही नाहीये म्हणून जास्त त्रास होतोय.”

तो कसाबसा उठून बसला. पांघरून काढल्यावर त्याचे अंग एकदम शहारून आले.

“थंडी वाजतीये का तुला?”

“हो. जरा कपाटातले जॅकेट देतेस प्लीज?”

तिने जॅकेट दिले. जॅकेट देताना तिचा हात त्याच्या हाताला लागला. तो हात एकदम गरम होता. न राहवून तिने त्याच्या कपाळाला हात लावला. कपाळ तव्यासारखं तापलं होतं.

“अरे खूप ताप आहे तुला. मला आधीच का नाही हाक मारलीस?”

त्याने दोन घास खाले. तिने त्याबरोबर क्रोसिन दिली. तो परत आडवा झाला. तिने आमटीभात खाऊन घेतला. परत तिने आत जाऊन पाहिले. तो दोन पांघरुण घेऊनही कुडकुडत होता. तिने त्याच्या खोलीत पाहिले तर जास्तीचे पांघरूण काही दिसले नाही. मुंबईच्या हवेला जास्तीची पांघरूण लागताहेत कशाला! तिने तिचे पांघरूण आणून त्याला घातले. कपाळावर हात ठेवला तर ताप वाढल्यासारखे वाटले. थर्मामिटर नसल्याने ताप मोजता आला नाही तरी एकाच्या पुढे होता हे नाकी. बाहेर तुफान पाउस पडत होता. तो कण्हत होता.

“सोहम काय होतंय?” “डोकं ठणकतय.” ती त्याच्या उशाशी बसली आणि हलक्या हाताने डोके चेपू लागली. जरा वेळाने ती कपाळावरून हात बाजूला करायला लागल्यावर तो म्हणाला, “ठेव ना हात कपाळावर. बरं वाटतंय.” ती काही वेळ तशीच बसून राहिली. ताप वाढत असल्यासारखा वाटला. काय करावा ते तिला सुचेना. ‘कपाळवर पाण्याच्या घड्या ठेऊन बघते’ ती मनाशीच म्हणाली. ती पाणी आणण्यासाठी उठायला लागल्यावर त्याने हात पकडला. “नको जाऊस. इथेच बस.”

“हो बसते. पण तुझा ताप अजून उतरला नाहीये. कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवते.”

ती बराच वेळ त्याच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवत होती. पण ताप उतरल्यासारखा काही वाटत नव्हता. “तू मला सोडून जाऊ नकोस.” तो अस्पष्ट आवाजात म्हणाला. ती चमकली. पण तापात बोलत असेल म्हणून तिने मनाची समजूत घातली. बाहेरचा पाऊस थांबण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. आता तो सतत काहीतरी बोलत होता, कण्हत होता. आता मात्र ती घाबरली. काय करावे ते तिला सुचेना. बिल्डींगमधले फारसे कोणी तिच्या ओळखीचे नव्हते. एकतर ती दिवसभर बाहेर असायची आणि सुट्टीच्या दिवशी पुण्याला. शिवाय त्यांच्या नात्याबद्दल कोणी चौकशी केली तर काय उत्तर द्यायचे असा विचार करून तिने कोणाशी ओळखही वाढवली नव्हती. शिवाय त्या बिल्डींगमधे रहिवासी कमी आणि ऑफिसे जास्त होती.

त्याचा एक मित्र तिच्या साधारण ओळखीचा होता. तिने सोहमच्या मोबाईलवरून त्याला फोन लावला.
“हॅलो, मी सोहमची रूम पार्टनर बोलतीये. सोहमला खूप ताप भरलाय. मी त्याला क्रोसिन दिली. कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवल्या, पण उतरतच नाहीये. आणि आता तो तापात बडबड करतोय. बिल्डींगमध्ये माझी कोणाशी ओळखही नाहीये. मला खूप भीती वाटतीये. तुम्ही इकडे येता का प्लीज?” ती एका दमात बोलली. समोर एक क्षणभर शांतता. सोहमच्या फोनवरून बाईचा आवाज आल्यामुळे ती नेमके काय बोलते आहे हे त्याला कळायलाच काही क्षण लागले असावेत. “घाबरू नका. मी येतो.”

काही मिनिटांनी परत सोहमचा फोन वाजला. त्याच्या मित्राचा आवाज, “अहो प्रॅाब्लेम झालाय. आमच्या बिल्डींगच्या बाहेर कंबरभर पाणी आहे. बाईक काढता येणार नाही आणि इतर कुठलेही वाहन रस्त्यावर नाहीये. माझी बायको म्हणतीये की त्याचे अंग गार पाण्याने पुसून काढा. अंगावर गार पाण्याचा टॅावेल आणि कपाळावर मिठाच्या घड्या ठेवल्यावर उतरेल ताप. आणि काही तासांनी परत एक गोळी द्या. मी पाणी ओसरले की लगेच येतो.”

ती बंद फोनकडे पहात बसली. शेवटी मनाचा हिय्या करून ती उठली. त्याच्या कपाटातून तिने त्याचा टॅावेल काढला. पाणी आणले. आता सर्वात कठीण काम. तिने त्याला आधार देऊन उठवले. तो गुंगीतच होता. “तुझा शर्ट काढूया.” त्याला फारसे कळलेही नाही. त्याचा शर्ट काढला. शर्ट काढताना त्याच्या छातीपोटाला झालेला स्पर्श. त्याला घट्ट मिठी मारावी अशी अनावर ओढ तिला वाटायला लागली. स्वत:ला सावरून तिने ओला टॅावेल त्याच्या अंगावर ठेवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळाने त्याला घाम यायला लागला. तिने त्याला पुसणे थांबवले. ती आता दमली होती. तिने त्याचे अंग कोरड्या कपड्याने पुसले. पण त्याला परत उठवून कसाबसा दुसरा शर्ट चढवला. त्याच्या अंगाखालाची चादर थोडी ओली झाली होती. त्याला कुशीवर सरकवून ती चादर तिने कशीबशी ओढून काढली. स्वत:च्या खोलीतली कोरडी चादर त्याच्या अंगाखाली सरकवली. पांघरुणं निट केले. हे होईस्तोवर पहाटेचे पाच वाजले होते. आता पाऊसही थोडा कमी झाला होता. तिने तिथेच खाली चटई टाकली आणि आडवी झाली. दमल्यामुळे तिला काही क्षणातच गाढ झोप लागली.

बेलच्या आवाजानेही तिला जाग आली नाही. बेलचा आवाज ऐकून सोहम जागा झाला. पण थकव्यामुळे उठल्यावर त्याचा तोल जायला लागला. तेवढ्यात त्याची नजर खाली झोपलेल्या तिच्याकडे गेली आणि तो आश्चर्याने बघतच राहिला. आपल्या अंगावर बटण न लावलेला शर्ट, बाजूला पाण्याने अर्धी भरलेली बादली, ओला टॉवेल हे सगळ बघून तो जरा विचारात पडला. बाहेरची बेल पुन्हा वाजली. शेवटी त्याने तिलाच हाक मारली. ती खडबडून उठली. “बेल वाजतीये.” ती दार उघडायला गेली. बाहेर त्याचा मित्र उभा होता. “पाणी ओसरल्यावर लगेच निघालो.” तो म्हणाला. “आता कसा आहे?”

“बहुतेक ताप उतरलाय आता.” ते आता गेले.

“काय रे? इतरांना ताप देतोस तू. तुला कसा काय ताप आला?” तो हसला फक्त. ते आत जाईपर्यंत त्याने शर्टाची बटणं लावली होती.

“काय झाल? तू आता इथे कसा?”

मित्राने रात्रीची सगळी कथा सांगितली. तो शांतपणे सगळे ऐकतच राहिला. ती दमली होती. आज ऑफिसला जायचं नाही असे तिने ठरवले. शिवाय पुन्हा सोहमला ताप आला तर त्याच्याजवळ कोणीतरी असणे आवश्यक होते. तो मित्राबरोबर डॉक्टरकडे जाऊन आला. औषध चालू झाले तरी दुपारी थोडा ताप आलाच. तो दिवस होता शुक्रवार. पुण्याला जायचे का नाही, न गेल्यास घरी काय सांगायचे? याच्याजवळ इथे कोणी थांबू शकणार आहे का? त्याच्या बाबांना अजून पूर्ण बरे वाटत नव्हते. त्यामुळे ते इथे येण्याची शक्यता नाहीच. मित्राच्या बायकोचे दिवस भरत आले होते त्यामुळे तिला सोडून त्याला इथे राहणे शक्य नव्हते. त्याच्या बायकोला इन्फेक्शन होईल म्हणून याला त्याच्या घरी नेणेही शक्य नव्हते. हे सगळे विचार सोहमपर्यंत नेणेही शक्य नव्हते. तो ‘तू घरी जा.’ म्हणून मागे लागला असता. शेवटी तिनेच घरी न जाण्याचा निर्णय घेतला. नवऱ्याला फोन करून सोहमच्या तब्बेतीची माहिती दिली आणि या वेळी घरी येत नाही म्हणून सांगितले. मात्र त्या रात्रीचे फारसे डीटेल्स दिले नाहीत. नवरा नेहमीप्रमाणे फारसं काही न बोलता बर म्हणाला.

“आता फक्त आई राहिली.”

सोहमच्या आवाजाने ती विचारांतून बाहेर आली.

“आता तू एकदा आईसाठी असच काहीतरी केलेस की मग आमच्या संपूर्ण कुटुंबाची रक्षणकर्ती म्हणून तुला सटीर्फिकीट देता येईल.” तो नेहमीच्या मिश्किल आवाजात कपाळ खाजवत म्हणाला. आज जुना सोहम अनेक दिवसांनंतर दिसला होता, पण तात्पुरता.

पुढचे दोन दिवस दिवसातले चोवीस तास ती दोघ एकमेकांच्या पूर्ण सहवासात होती. रात्री ती त्याच्या खोलीत डोकावली. औषधाच्या प्रभावामुळे तो लगेच झोपून गेला होता. न रहावून तिने त्याच्या कपाळावरून हात फिरवला. नंतर ती कितीतरी वेळ जागीच होती. शनिवारीही त्याला थोडा ताप आला. रविवारी ताप आला नाही पण थकवा मात्र होता. एरवी ती त्याचे काही काम करायला लागली की विरोध करायाचा. पण आता मात्र तो निमुटपणे तिची मदत घेत होता. दोघांनाही जाणवले होते की त्यांच्यातले बरेच काही बदलले होते. या जाणीवेने त्यांच्यातला संवाद कमी झाला होता. फक्त एकदाच त्याने विचारले की तिने जागा बदलण्याबाबत काय ठरवलंय. तिने नकारार्थी मान हलवल्यावर त्याचा चेहरा शांत झाला. त्याने काहे दिवस रजा घेतली होती. तिचे रुटीन मात्र सोमवारपासून सुरू झाले.

एकीकडे ती अस्वस्थही व्हायला लागली होती. “हे काय आहे?” मैत्रीच्या सीमारेषेवरून आपण बरेच पुढे आलो आहोत हे तिला जाणवत होतं. पण मी हे फक्त तो आजारी आहे म्हणून करतीये असं म्हणून तिने तो विचार झटकून टाकायचा प्रयत्न केला. ‘तो आपल्यापेक्षा लहान आहे तरी ही वेगळी जाणीव का होतीये? हे प्रेम आहे का?’ तिने परत तो विचार झटकायचा प्रयत्न केला. ‘याला असा अचानक एवढा ताप का आला? म्हणजे तो सुद्धा ......'

पुढच्या विकेंडला ती नेहमी प्रमाणे घरी गेली. सोहमच्या आजारपणाचा विषय पुन्हा निघाला. ती थांबली ते योग्यच होता हे सगळ्यांनीच तिला सांगून आश्स्वस्त केलं. मुंबईच्या पावसाबद्दल बोलत असताना तिची सासू अचानक म्हणाली, “अशा वेळी वाटा फार निसरड्या होतात. नी एकदा घसरलो की मग कितीही ठरवले की तोल सावरता येत नाही. आणि निसरड्या वाटेने कुठे जाताही येत नाही. त्यामुळे नव्या वाटेवर पुढे जाताना आधी वाट नीट बघावी आणि पाऊल उचलावे. न पेक्षा रोजची वाट पकडावी. कितीही कंटाळवाणी असली तरी सवयीची असते.” तिने चमकून बघितले.

(क्रमश:)

Group content visibility: 
Use group defaults

व्वा आज मी पहीला वाचली
जाम उत्सुकता आहे पुढे काय घडतय या दोघांच्या आयुष्यात.

छान रंगवताहात गोष्ट.. Happy

हेच दोन मुली किंवा दोन मुले असते तर?? काहीच प्रश्न कोणालाच पडला नसता.. आजच्या जनरेशनमधल्या मुलांना " यात काय विशेष ?" असे नक्की वाटेल...

छान रंगत चालली आहे कथा. तुमची लिखाणाची शैली फारच ओघवती आहे. नक्की काय घडणार आहे याचा अंदाज येतो आहे पण तरीही वाचण्याची उत्सुकता ताणली जाते आहे. पुलेशु.