जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌ (अंतिम)

Submitted by अन्नू on 17 May, 2018 - 17:05

समारोप

आज त्या गोष्टीला कित्येक महिने- वर्ष उलटून गेलं. तरीही तो प्रसंग आजही मनात जसाच्या तसा जीवंत आहे!
मध्यंतरी अनेक वेळा ती त्याच योगायोगाने भेटली- दिसली- अगदी नजरानजर होऊन समोरुन गेली; बोलली मात्र नाही.
साधी ओळखही दिली नाही.
मनाला लागलं- पण म्हटलं-
ठिक आहे. तुला जर माझ्यामुळे त्रास होत असेल तर मीही तुला ओळख दाखवणार नाही, फिरुन तुझ्या आयुष्यात येणार नाही, कधी आवाजही देणार नाही.

अगं, तुझ्याबरोबरचे योगायोग बंद करण्यासाठीच तर मी इतक्या लांब राहायला लागलोय ना, तुझ्याशी भेट होईल अशी प्रत्येक शक्यता मी संपवून टाकलीय.
आणि- काळजी करु नकोस तुला लाजिरवाणं वाटेल, ऑक्वर्ड वाटेल असं यापूर्वीही मी वागलो नव्हतो, आजही वागणार नाही.

त्या रात्री जेव्हा घरच्यांबरोबर तू बाहेरुन फिरुन येत होतीस, तेव्हा मला बघून तू लगेच चेहरा झाकत लपत होतीस! त्यावेळी तर आपण चांगले मित्र होतो. त्यावेळी आपल्यात असं काही झालंही नव्हतं. पण तरीही तुला भिती!
का? तर मी तुला आवाज देईन, तुझ्याकडे बघून हसून हात दाखवेन म्हणून?

वेडे, तू लपायच्या कितीतरी अगोदर मी तुला बघितलं होतं. ज्यावेळी तुझं माझ्याकडे लक्षही गेलं नव्हतं! पण घरच्यांसमोर ऑक्वर्ड वाटू नये म्हणून मी स्वत:च तुला ओळख दिली नव्हती. जेव्हा त्या मुलानं तुला बोलता बोलता मध्येच- कुठं पळून गेली म्हणून इकडे तिकडे बघत तुला आवाज दिला. अशी का लपतेस म्हणून विचारलं, त्यावेळी मी साधी नजर वळवूनही तुझ्याकडे बघण्याचे कष्ट घेतले नाही; त्यावरुनच खरं तर तुझ्या ते लक्षात यायला हवं होतं!
पण माझ्यापासून लपण्यात तू इतकी गुंग होऊन गेली होतीस की ती गोष्ट तुझ्या लक्षातही येऊ शकली नव्हती.

लांब कशाला? सिनेमाच्या प्रकरणानंतर तू जेव्हा पहिल्यांदा मला, मुद्दाम तुझ्या घरी- तुझ्या भावाच्या कंप्युटरमध्ये ओएस लोड करण्याच्या बहाण्याने बोलवलं होतंस, त्यावेळीही मी तुझ्या घरच्यांसमोर अगदी नॉर्मली वागलो होतो. एवढ्या मोठ्या घटनेचं दु:ख, शल्य किंचितही माझ्या वागण्या बोलण्यात दिसू दिलं नव्हतं, हे तरी कधी तुझ्या लक्षात आलं का?
पुढे बघून कंप्युटरवर काम करत असताना तू बारिक नजरेनं, अस्वस्थपणे माझ्या चेहर्‍यावरचे 'ते' भाव वाचत होतीस. माझ्या मनातल्या वेदनांचा, भावनांचा मागमूस तू माझ्या चेहर्‍यात शोधण्याचा प्रयत्न करत होतीस- हे काही मला कळत नव्हतं?
कळत होतं गं. सगळं कळत होतं. तरीही मी चेहरा ठार कोरा ठेवला होता. नजर जराही डगमगू दिली नव्हती. का? तर ते तुझं घर होतं. तिथे तुला लाजिरवाणं वाटेल असं मी वागणार नव्हतो. शिवाय सगळ्यांसमोर शो-ऑफ करुन प्रदर्शन करण्याचं मुळात माझं नेचरही नाही.

मी तुझ्यावर प्रेम केलं ते मनात पाप, खोट ठेऊन कधीच नाही. खरंच, तेव्हाही वाटत होतं तू माझी हक्काची आहेस.. फक्त माझी आहेस....
खरं म्हणजे, विनाकारण, विनास्वार्थ, जस्ट... होऊन जातं- म्हणूनच त्याला प्रेम म्हणतात ना! स्वार्थ मनात ठेऊन केलं जातं ते प्रेम नसतं, सौदा असतो.
आणि मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, सौदा केला नव्हता.
त्यामुळे तुझ्याकडून मी कधी, कसलीही अपेक्षा ठेवली नाही.
प्रत्येक प्रेम करणार्‍याची अपेक्षा असते, समोरच्याने त्याच्यावर तितकंच उत्कट प्रेम करावं, त्याला आपलं मानावं- मी तीही अपेक्षा तुझ्याकडून कधी केली नाही गं.
तू माझ्यावर प्रेम करत नाहीस- करणार नाहीस. कधी माझी होणारही नाहीस. हे कटू सत्य माहीत असूनही मी तुझ्यावर सतत प्रेम करत राहीलो. मोबदल्याची अपेक्षा मी कशी करु?

पण म्हणतात ना- मन वेड असतं

माझंही होतं..

एकदा वाटलं, आयुष्यभर तुझी साथ मागावी, तुला आपली करावी. पण तोही माझा शेवटी अक्षम्य गुन्हा ठरुन बसला. माझी अपेक्षा एक स्वप्नरंजन इच्छा बनून राहीली.
खूप धडपड केली, जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले. वेळोवेळी जीव तोडून तुला समजवण्याचा- सांगण्याचा प्रयत्न केला.... तू नाही समजलीस!
त्याही वेळी मी कमी पडलो. माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. मी तुला समजावू शकलो नाही..
हरकत नाही, राग तर अजिबात नाही.
तुला मिळवण्यासाठी मी काहीच धडपड केली नाही, निदान ही बोच तरी शेवटपर्यंत राहणार नाही!

त्या दिवशी अगदी सहज, तू मला खालच्या हीन पातळीवर आणून ठेवलंस. पण खरं सांगू, तुझ्याबद्दल वाईट वासना ठेऊन किंवा फक्त तू मुलगी आहे म्हणून फायदा घ्यायच्या उद्देशानं मी तुझ्यावर प्रेम केलं नव्हतं गं.
मी प्रेम केलं होतं ते तुझ्या शुद्ध मनावर; तुझ्या शरीराची न् सौंदयाची मी कधीच आस धरली नव्हती वेडे!

माझ्यासाठी तू एकमेव होतीस... माझं सर्वस्व होतीस.. बाजारातली एखादी निर्जीव वस्तू नव्हतीस, जी फायद्यासाठी विकत घ्यावी..
अगं त्या नजरेनं बघणं सोडा, कधी स्पर्शही करणं माझ्या मनात आलं नाही.
मला तू माझी सहचारीणी- पार्टनर म्हणून हवी होतीस. कारण तू माझी प्रेरणा होतीस... माझं जीवन होतीस.. माझा श्वास होतीस.. माझं जग होतीस!
आयुष्यभर मरणप्राय तडफडत राहण्यापेक्षा स्वत:चं जीवन मागणं, हे पाप आहे का?

आज अनेक जण तुला- तुझ्या बदलेल्या सौंदर्यावर प्रेम करायला धावतील. तुझ्याकडे अट्रॅक्ट होऊन तुला प्रपोजही करतील, त्यात निदान एक तरी कोणी माझ्यासारखा वेडा- तुझ्या मनावर, तुझ्या अस्तित्त्वावर प्रेम करणारा, तुझ्यावर जीव टाकणारा भेटला तर नक्की बघ!
मी काहीही हरायला तयार आहे!...
हरणं...
ह्ं! राहिलंच काय आता हरायला?..

तुझ्या बाबतीत, मी आजही तुझ्या पास्टचा फक्त एक ब्लॅक स्पॉट असेन, नाही?
तू मला आयुष्यात कोणीतरी एक ‘होता’ म्हणूनच लक्षात ठेवशील,
पण माझ्यासाठी तू आजही माझी ‘आहेस’!

खरंच, कधीकधी वाटतं किती भाग्यवान असतील ते लोक ज्यांना एखाद्याची आठवण येते. माझ्या नशीबी तर हेही सुख नाही बघ...
आजही मला तुझी आठवण काढता येत नाही!
जिथे विसरणंच शक्य नसेल तिथे तुझी विसरुन- पुन्हा आठवण कशी काय येईल?

सु.शिंच्या दुनियादारीमध्ये शिरिनचं एक वाक्य आहे, ‘माणसाला आयुष्यात सगळं काही मिळत असतं, फक्त मिळण्याची वेळ तेवढी चुकलेली असते!’
नाही शिरिन... तू चुकीची होतीस.. माणसाला आयुष्यात हवं ते कधीच मिळत नसतं, म्हणून तर ही दुनियादारी होते न!

आज इतका काळ लोटला, कित्येक महिने उलटून गेले.. दिवस, तास, मिनिट, सेकंद.. हिशोब नाही....
तिचा एकही शब्द कानावर पडलेला नाही.
चातक पक्षाला तरी वर्षातून एकदा पाणी भेटतं- तो तृप्त होतो. मी मात्र तुझ्याबाबतीत कायमचाच ताहनलेला राहिलो गं!

कधीतरी संध्याकाळच्या अशाच कातरवेळी मन कासाविस होतं, प्रकर्षाने तिची ओढ घ्यायला लागतं. आतमध्ये काहीतरी सलत उर भरुन येतो, श्वास घुसमटतो- हृदय तुटून निघतं. वाटतं झुगारुन द्यावं सगळं, असह्य होणारी चुप्पी तोडावी, एकदाच कडाडून भेटावं तिला- मन भरेपर्यंत बघावं- नजरेत भरुन घ्यावं, तिचा प्रत्येक शब्द कानात साठवून घ्यावा पण काटेरी वास्तवाच भान येतं अन् हे कधीच शक्य होणार नाही याची जाणीव डसायला लागते... मन आणखी आक्रंदून उठतं...

न राहावून मग लॅपटॉप चालू करतो. पहिल्या ट्रीटच्या वेळी घेतलेला तिचा फोटो नुसता भरल्या डोळ्यांनी पाहत राहतो. हाताची घडी घालून डावा हात हलकासा चेहर्‍याकडे नेलेला तिचा तो फोटो बघून पुन्हा एकदा क्लासच्या दिवसांतली ‘ती’ डोळ्यांसमोर तरळायला लागते. चष्म्याआडच्या तिच्या नशील्या धुंद डोळ्यांत मी पाहत राहतो. नकळत फोटो झुम करतो. वाटतं अशीच ती बघता-बघता स्क्रिनमधून बाहेर येईल माझ्यासमोर उभी राहिल अन...
ती येत नाही!

‘प्लिज तू ये ना गं. मला भेट- फक्त एकदाच- एकदाच माझ्याजवळ बस-...
हे बघ- हे बघ, आपण ना खूप खूप दूर जाऊ. तिथे फक्त आपणच असू. तू खूप बोल- मी ऐकेन.. तुझी स्तुती करेन तू दमेपर्यंत करेन. एकदातरी तुला माझ्या स्तुतीनं भारावलेलं बघायचं आहे गं. ते लाजणं, हसणं, चिढणं मनात साठवायचं आहे.
राणी, ये ना... प्लिज ये ना.. हे बघ तू-....
ती येत नाही! फक्त गालात हसून बघत राहते. बोलत मात्र काहीच नाही.
मन पिळवटून जातं. वाटतं खूप मोठ्याने ओरडावं- डसाडसा रडावं. पण काहीच करु शकत नाही मी. काहीच नाही....
ती मात्र तशीच हसत राहते.
पिळवटल्या जाणार्‍या अंत:करणाला आणखीन घायाळ करत जाते...
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

+समाप्त+

dedicate to someone...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्ह, खुप वाईट वाटले, हे खरे आहे का????
असेल तर एक सांगेन, जे काही तुम्ही लिहीलेले वाचले त्यावरुन तरी ती मुलगी तुम्हाला योग्य वाटत नाही. ती चांगली वा वाईट मी काही बोलणार नाही पण तीने खुप आधीपासुन ठरवुन तुमच्या तीच्याप्रतीच्या भावना ओळखुन त्याचा थोडाफार का असेना वापर करुन घेतला असे वाटले. अश्या लोकांना शिफ्ट डिलीट करणेच बरे अर्थात हेमावैम

तुमच्या लिहीण्यातनं तिच्याविषयीचं तुमचं प्रेम दिसलं....पण शेवट वाचून वाईट वाटलं.... छान लिलीलय ....

लिहिलेय छान..

मागे कुठेतरी ही स्वत:चीच सध्या घडत असलेली कथा म्हणून वाचले होते. त्या संदर्भात व वर तुम्ही स्वतःच्या मनस्थितीचे जे वर्णन केलेत ते वाचून एक दोन गोष्टी सांगाव्याशा वाटल्या.

त्या मुलीला तुमची मनस्थिती माहीत आहे, तुमचे प्रेम माहीत आहे आणि तिला ते नकोय. वरच्या आठवण प्रसंगात तिने मुद्दाम स्वतःच्या चष्म्याचा उल्लेख केला, तुम्ही काय म्हणताय हे कळले हे दाखवले असते तर प्रसंग तसाच पुढे वाढला असता जे तिला नको होते.

तुम्ही केलेली मदत लक्षात घेऊन किंवा भिडेपोटी ती प्रत्येक वेळी तुमच्याबरोबर यायला तयार झाली पण ती आली म्हणजे तुमच्या मनात नविन आशा निर्माण होणार हे माहीत असल्यामुळे प्रत्येकवेळी कच खाल्ली. तुम्ही नाही म्हणणार नाही हे माहीत असल्यामुळे जेव्हा तिला गरज होती तेव्हा तिने तुमची मदत घेतली. सुरवातीला घरी एकट्याने जाणे नको म्हणून ती तुम्हाला सोबत घेत होती पण एकदाही तुमच्याशी गप्पा मारण्याचा अथवा तुम्ही आलात याबद्दल आभार मानण्याचा प्रयत्न तिने केला नाही यावरूनच तुम्ही ओळखायला हवे होते. असो.

ती वडिलांनी निवडलेला मुलगा गळ्यात घालून घ्यायला तयार आहे म्हणजे बॉयफ्रेंड ही थाप होती, तुम्हाला इशारा द्यायला की माझ्यामागे येऊ नको. खरच बॉयफ्रेंड असता तर तुमची गरज लागली नसती.

आता तुम्ही वडिलांना भेटून त्यांच्या संमतीने तिच्याशी विवाह करू शकता पण त्यात तुम्ही सुखी होणार नाही. ती अनोळखी नवऱ्याच्या प्रेमात पडेल पण तुमच्या प्रेमात कदापि पडणार नाही कारण तिने तुम्हाला नाकारलेय. अनोळखी नवऱ्याशी विवाह यशस्वी व्हायचे 50 टक्के चान्स आहेत पण तुमचाशी विवाह अयशस्वी होणार. तिची सोबत असली तरी पुरे, मी तिला सुखात ठेवेन असे तुम्हाला आज वाटतेय, संसार यावर चालत नाही. तिथे दोन्ही बाजूने प्रयत्न लागतात. तिच्या मनाविरुद्धच्या लग्नात सहा महिन्यात तुमच्या मनातील प्रेम तिरस्कारात परिवर्तित होईल. त्यापेक्षा लग्न न करून तिच्यावरचे प्रेम अबाधित ठेवणे परवडले Happy

इतका मोठा प्रेमभंग झाल्यावरही तुम्ही खूप धीराने घेतलेत याबद्दल तुमचे कौतुक वाटले. तुमच्या आयुष्यात तिची एवढीच साथ होती, ती साथ आता संपली. एकत्र पुढे काही चांगले व्हायचे असते तर ती साथ कायम राहिली असती असे म्हणून पुढे जा... पुढच्या उज्ज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा!!

तार्रुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाये तो उसको तोड़ना अच्छा
वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन
उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो....

खूप छान लिहिलंय.... Happy
पण वाईट देखील वाटलं ... Sad
साधनाताईंच्या प्रतिसादाशी सहमत....

साधना,
प्रतिसाद आवडला.

मुलगी बऱ्यापैकी क्लिअर होती सुरवातीपासून कि तुम्ही तिला फक्त acquaintance किंवा जास्तीत जास्त मित्र म्हणून हवे आहात.
तिने जी काही मदत मागितली तीदेखील याच दृष्टीने होती.
इतर ४-५ वर्गमैत्रिणींसोबत तुम्ही गप्पा मारतानाचे तिचे इर्रिटेशन तुम्ही misinterprete तर केले नाही ना आणि त्या चुकीच्या पायावरच पुढचे सगळे इमले बांधले नाहीत ना हे एकदा परत चेक करा.

दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जितक्यांदा तिला तुमच्या प्रेमाबद्दल सांगितलं/विषय काढायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हीदेखील backfootला गेलात किंवा विसरून जाऊ, अशाच गप्पा मारू वगैरे केलंत. त्यापेक्षा एकदाच स्पष्टपणे विचारून, वाटल्यास तुला विचार करायला वेळ घे म्हणून, हो/नकार जे काही असेल ते स्पष्ट उत्तर दे मी ते मान्य करेन असे सांगितले असते तर दोघांनाही कमी त्रास झाला असता.

असो.
पुढील आयुष्यासाठी आणि लेखासाठीही शुभेच्छा Happy

Such incidents are always true.एक नंबर कथा . येऊद्या पुन्हा पुढील लेखनास शुभेच्छा

सर्वांचे आभार
@साधना- तुमच्या बर्‍याच गोष्टी बरोबर आहेत पण काही गोष्टींबाबत जरा गैरसमज झालेला आहे.
जसं की मी पहिल्या भेटीपासून सांगितलं आहे की, ती सुरवातीला माझ्याकडे लक्ष देत नव्हती. पण नंतर तिच्या मनातही माझ्याविषयी काहीतरी वाटायला लागलं होतं. तिच्या बोलण्या, वागण्यात ते स्पष्ट दिसत होतं. तिच्या नजरेतूनही बर्‍याच वेळा ते स्पष्ट होत होतं. हे मलाच नव्हे तिच्या आईच्याही नजरेत आलं होतं. तिने त्यावरुन तिला विचारलं देखील होतं.
इथे मी फक्त उदाहरणादाखल दोन (-ग्रुप गप्पांचा आणि वसईचा-) प्रसंग सांगितले आहेत.
आता ते चष्म्याचं म्हणाल तर, तिला खरोखरच एका शब्दात कुठली गोष्ट समजत नव्हती. अगदी फोड करुन तिला कोणतीही गोष्ट मला सांगायला लागायची.

'तुम्ही केलेली मदत लक्षात घेऊन किंवा भिडेपोटी ती प्रत्येक वेळी तुमच्याबरोबर यायला तयार झाली पण...' --- इथेही वर दिलेलंच उत्तर आहे. ती मदतीपोटी नव्हे तर, त्या जाणीवेतूनच वारंवार मला बोलवत होती. भेटत होती. पण ती फिलिंग तिला स्वत:लाही सांगता आली नसती. मी मॉलमध्ये प्रपोज केल्यानंतर मात्र तिला त्या फिलिंगची प्रकर्षाने जाणीव झाली आणि इथेच तिने सावरत तटस्थतेची भुमिका घ्यायला सुरवात केली. कारण माझ्याशी जवळीक करणे म्हणजे तिला तिच्या प्रेमाची प्रतारणा वाटत होती. आणि एकप्रकारचा गिल्ट फिल वाटू लागला होता. एकीकडे वडील बॉयफ्रेंडशी लग्न करु देणार नाहीत आणि दुसरीकडे ती अपराधी भावना घेऊन माझ्याशी सूत जमवू शकणार नव्हती, या तणावातून तिने वडील जे बोलतील त्याच्याशीच लग्न करण्याचा अंतिम मार्ग पत्करला. मी शेवटच्या प्रसंगात तिच्या चेहर्‍यावरुन- 'तू सुखी नाहीस' म्हणून विचारलं होतं त्यावेळी तिची झालेली अति चिडचिड याच कारणामुळे झाली होती.
तिला त्या जाणीवेतून दूर जायचं होतं.
'आणि हो- तिला बॉयफ्रेंड होता आणि इतर टीपिकल मुलांसारखा तो संशयखोरही होता!' Wink

आता तुम्ही वडिलांना भेटून त्यांच्या संमतीने... --- याच्याशी पुर्णपणे सहमत. तिचे वडील मान्य होतील पण त्यात 'ती सुखी होणार नाही' आणि जिथे तिच सुखी होणार नसेल तिथे मीही माझ्या आनंदासाठी ते लग्न कदापी करु शकणार नाही!
थोडक्यात, तिला दु:खी करुन मी सुखी राहणार नाही..!
इथे तुम्ही सांगता तसं, लग्न झालंच तर- पुढे जाऊन आमच्यात अनबन झाली, वादावादी झाली तरी- माझ्या मनातल्या तिच्या प्रेमाचं रुपांतर तिरस्कारात नक्कीच होणार नाही- हा, हर्ट जरुर होईन, पण त्यात तिच्याबद्दल घृणा किंवा रागाचा तिळमात्रही अंश नसेल Happy
कारण मुळातच मी तिच्यावर कधी हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला नव्हता. फक्त प्रेम केलं होतं..

@VB- तिने कधीच माझा वापर करुन घेतला नाही. तिला मी आवडत होतो, पण तिचं स्वत:चं मनच हे कधी मान्य करायला तयार नव्हतं. कारण सत्य स्विकारण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. तसं केलं तर तिच्या प्रेमाची अवहेलना होत होती.
आता बॉयफ्रेंड असताना तिनं असं वागायचंच कशाला?
तर- मी वर दुनियादारीतल्या शिरिनचा उल्लेख केला आहे. त्यात तिचं यावर अचूक एक वाक्य आहे,
'नापास झालेल्या पोराला जर विचारलं की नापासच व्हायचं होतं तर वर्षाची फी का वाया घालवलीस? काय उत्तर देऊ शकणार तो?'
तिचंही थोड्याफार फरकानं हेच झालं होतं. आहे, पण मान्य करायचं नाही, कारण तशाने तिच्या प्रेमाची गद्दारी होत होती.

बाय द वे- शिफ्ट डिलिट त्या व्यक्तींना केलं जातं जे आयुष्यात नकोसे असतात. पण तिच्याबद्दल मला असं कधी वाटलंच नाही. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे, ती माझी गरज नव्हती- ती माझं जग होती, माझी प्रेरणा होती..
आजही ती माझे प्रेरणास्थान आहे. माझ्या प्रत्येक लेखनाच्या वेळी ती माझ्याबरोबर असते. कधी भावना बनून तर कधी शब्द बनून ती माझ्या लेखणीतून येत असते. अ‍ॅन्ड आय थिंक, प्रेम करणार्‍या कोणाच्याही बाबतीत ही सगळ्यात मोठी गोष्ट असते.
असंही ती माझी कमजोरी नसून माझी पॉझिटीव्ह एनर्जी आहे. Happy
थँक्स अगेन Happy

बाय द वे- शिफ्ट डिलिट त्या व्यक्तींना केलं जातं जे आयुष्यात नकोसे असतात. पण तिच्याबद्दल मला असं कधी वाटलंच नाही. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे, ती माझी गरज नव्हती- ती माझं जग होती, माझी प्रेरणा होती..
आजही ती माझे प्रेरणास्थान आहे. माझ्या प्रत्येक लेखनाच्या वेळी ती माझ्याबरोबर असते. कधी भावना बनून तर कधी शब्द बनून ती माझ्या लेखणीतून येत असते. अ‍ॅन्ड आय थिंक, प्रेम करणार्‍या कोणाच्याही बाबतीत ही सगळ्यात मोठी गोष्ट असते.>>>>> +१११११

पण नंतर तिच्या मनातही माझ्याविषयी काहीतरी वाटायला लागलं होतं. तिच्या बोलण्या, वागण्यात ते स्पष्ट दिसत होतं. तिच्या नजरेतूनही बर्याच वेळा ते स्पष्ट होत होतं. हे मलाच नव्हे तिच्या आईच्याही नजरेत आलं होतं. तिने त्यावरुन तिला विचारलं देखील होतं.

ती मदतीपोटी नव्हे तर, त्या जाणीवेतूनच वारंवार मला बोलवत होती. भेटत होती. पण ती फिलिंग तिला स्वत:लाही सांगता आली नसती. मी मॉलमध्ये प्रपोज केल्यानंतर मात्र तिला त्या फिलिंगची प्रकर्षाने जाणीव झाली
>> शारीरिक आकर्षण असेल. Afterall homo sapiens are NOT monogamous species.

===
आणि इथेच तिने सावरत तटस्थतेची भुमिका घ्यायला सुरवात केली. कारण माझ्याशी जवळीक करणे म्हणजे तिला तिच्या प्रेमाची प्रतारणा वाटत होती. आणि एकप्रकारचा गिल्ट फिल वाटू लागला होता. एकीकडे वडील बॉयफ्रेंडशी लग्न करु देणार नाहीत आणि दुसरीकडे ती अपराधी भावना घेऊन माझ्याशी सूत जमवू शकणार नव्हती, या तणावातून तिने वडील जे बोलतील त्याच्याशीच लग्न करण्याचा अंतिम मार्ग पत्करला. मी शेवटच्या प्रसंगात तिच्या चेहर्यावरुन- 'तू सुखी नाहीस' म्हणून विचारलं होतं त्यावेळी तिची झालेली अति चिडचिड याच कारणामुळे झाली होती.
तिला त्या जाणीवेतून दूर जायचं होतं.
>> किंवा हे केवळ शारीरिक आकर्षण आहे आणि ते नंतर ओसरणार आहे आणि ते ओसरल्यावरदेखील तुमच्यासोबत राहणे शक्य आहे असे तिला वाटत नसेल.

शारीरिक आकर्षण, प्रेम, लग्न या सगळ्या गोष्टी एकत्र, एका नात्यातूनच मिळतील असे नाही...

===
हा, हर्ट जरुर होईन, पण त्यात तिच्याबद्दल घृणा किंवा रागाचा तिळमात्रही अंश नसेल
>> You never know!

तिने कधीच माझा वापर करुन घेतला नाही. तिला मी आवडत होतो, पण तिचं स्वत:चं मनच हे कधी मान्य करायला तयार नव्हतं. कारण सत्य स्विकारण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. तसं केलं तर तिच्या प्रेमाची अवहेलना होत होती.
आता बॉयफ्रेंड असताना तिनं असं वागायचंच कशाला? >>>> अन्नुजी, हे तीने सांगीतले का तुम्हाला की तुम्हीच आपला अंदाज बांधला
तुमच्या ह्या सिरीजमधुन ती जेवढी मला कळली त्यावरुन मलातरी असेच वाटले की तीने हे मुद्दामहुन केले अन जसे तुम्ही म्हणता तसे तुम्ही तीला आवडायला लागला होता पण तीचा बॉयफ्रेंड असल्यामुळे तीने तीचे प्रेम व्यक्त केले नाही तरी ते पटत नाही म्हणजे किमान मला पटत नाही कारण अश्या परीस्थितीत तीने तुमच्याशी वेळीच अंतर ठेवले असते. असो ,

बाय द वे- शिफ्ट डिलिट त्या व्यक्तींना केलं जातं जे आयुष्यात नकोसे असतात. >>> नाही... शिफ्ट डिलीट त्या व्यक्तींना केले जाते ज्यांना वेळीच आपल्या आयुष्यातुन बाहेर काढणे गरजेचे असते , आपली ईच्छा असो वा नसो कधी कधी असे टफ डिसीजन घेणे गरजेचे असते, कारण फक्त भावनेच्या आहारी जावुन आयुष्य जगणे खुप कठीण आहे अन कधी कधी आत्मसन्मान सुद्धा खुप गरजेचा असतो Happy

आजही ती माझे प्रेरणास्थान आहे. माझ्या प्रत्येक लेखनाच्या वेळी ती माझ्याबरोबर असते. कधी भावना बनून तर कधी शब्द बनून ती माझ्या लेखणीतून येत असते. अ‍ॅन्ड आय थिंक, प्रेम करणार्‍या कोणाच्याही बाबतीत ही सगळ्यात मोठी गोष्ट असते.
असंही ती माझी कमजोरी नसून माझी पॉझिटीव्ह एनर्जी आहे. >>> खरतर मी काही बोलणे चुकीचे आहे, पण जर आता तुम्हा दोघांचे एकत्रीत असे काही भविष्य नाही हे तुम्हाला ठामपणे माहित आहे अन पुढे जावुन तुम्ही दोघेही लग्न करणार, नविन जोडीदार शोधणार तर तुम्हाला यातुन पुर्ण पणे बाहेर निघणे गरजेचे आहे नाहीतर नकळत का होईना पण तुम्ही तुमच्या जोडीदाराची तीच्याशी तुलना करणार अन बरेच काही... मला शब्दात निट मांडता येत नाहीये..... पण एकच सांगेन की एकदा कळले की एखादा रस्ता आपल्यासाठी चुकीचा आहे तर मागे वळावे अन सोबत त्याच्या पाऊलखुणाही पुसुन टाकाव्या..

सॉरी , जर तुम्हाला माझा प्रतिसाद आवडला नाही... तर दुर्लक्ष करा.... वाईट वाटुन घेऊ नका.

अन हो ते, असंभव पुर्ण करा हो आधी

सगळे भाग वाचले. छान लिहिता. पुढील आयुष्यासाठी आणि लेखासाठी शुभेच्छा. Happy
असंभव चे लेखक तुम्ही आहात हे माहित न्हवते. जमल्यास लवकर पुर्ण करा.
साधना छान लिहिले आहेस

Some things will automatically switch off if you keep it in standby mode for a long time, Relation is first one in those things .....

Some things will automatically switch off if you keep it in standby mode for a long time, Relation is first one in those things .....

नवीन Submitted by भूमिपुत्र on 24 May, 2018 - 10:47 >>>> अगदी अगदी भूमिपुत्र
चला, कळले कुणालातरी , बरे झाले Wink