माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?

Submitted by सचिन काळे on 11 May, 2018 - 02:36

एका संकेतस्थळावर आमचा एक गप्पांचा कट्टा आहे. तिथे एकदा सहज गप्पा मारता मारता तेथील अक्षय नावाच्या एका मित्राने सगळ्यांना 'माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?' ह्या विषयावर सर्वाना एक निबंध लिहिण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून मी तेथे खालील निबंध लिहिला. आपल्या सर्वांच्या वाचनाकरिता तोच निबंध मी खाली देत आहे.

विषय : माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?

माझं लिहिणं कसं सुरू झालं, हे लिहिण्याअगोदर मला वाटतं की माझ्या वाचन कसं सुरू झालं, ह्यावर मी दोन शब्द लिहावं. कारण माझ्या लिखाणाचा प्रवास हा माझ्या वाचनानेच सुरू झालेला आहे. माझ्या लिखाणाचे पुष्कळसे श्रेय मी माझ्या वाचनाला देतो. आपलं वाचन समृद्ध असलं की आपल्याला लेखन करणं सोपं जातं. आपल्या लिखाणाची भाषा समृद्ध होत जाते. आपल्या वाचनाचे प्रतिबिंब नेहमीच आपल्या लिखाणात उमटत असते. अवांतर वाचनानेच आपल्या लिखाणाचा प्रवाह, त्याचे व्याकरण कसे असावे याचे आपल्याला ज्ञान होत जाते. आणि म्हणूनच इथे माबोवर बरेच जण नवलेखकांना सल्ला देत असतात, की ' आपलं वाचन वाढवा', 'आपले वाचन वाढवण्याची गरज आहे' ते त्याकरिताच.

मला वाचनाचं वेड कधी लागलं ते आता नक्की आठवत नाही. पण अवांतर वाचनाला सुरवात केली तेव्हा मी चौथी पाचवीत वगैरे असेन. मी मराठी माध्यमातून शिकलोय. माझ्या अवांतर वाचनाला हातभार लावला तो आमच्या शाळेतल्या लायब्ररीयन बाईंनी. त्या बाईंचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. इतर विद्यार्थ्यांना त्या बाई आपल्या टेबलावर परत आलेलीच पुस्तकेच इतरांना देत. पण माझे वाचनाचे वेड पाहून त्या मला खास उशिरा बोलवत. मी उशिरा गेलो की मग त्या मी सांगेल ते कपाट उघडून मला पुस्तकं चाळू देत. आणि मला आवडेल ते पुस्तक माझ्या नावावर मला देत. इतरांना सात दिवसातून एक पुस्तक मिळे तर त्या मला रोज एक पुस्तक वाचायला देत. ५ वी ते १० पर्यंत आमच्या शाळेतल्या लायब्ररीमधील वीसेक कपाटातली एकूणएक पुस्तकं माझी वाचून झाली होती. अगदी भा. रा. भागवत, रत्नाकर मतकरी यांच्या बालसाहित्यापासून ते गदिमा, व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथासंग्रहापर्यंत लहानथोर लेखकांची सर्व पुस्तके मी वाचून काढली होती. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मी एका कपाटावर एकावर एक रचून ठेवलेली यजुर्वेद, सामवेद आणि भगवद्गीता यांची पाच सहा किलो वजनाची गलेलठ्ठ पुस्तकं वाचायला मागितली. त्या लायब्ररीयन बाईंनी मला कोपरापासून हात जोडले. "बाळा रे! हे सर्व वाचण्याचं तुझं आता वय नाहीये". त्यावेळी उठता, बसता, जेवता माझ्या हातात गोष्टींचं पुस्तक असे. माझे वडील माझ्यावर चिडत. "अरे! जरा जेवणाकडे लक्ष दे, नाहीतर नाकात घास जाईल". रस्त्याने चालतानाही माझं लक्ष खाली असे. आणि कुठलाही छापील कागद दिसला की मी तो बिनदिक्कत उचलून वाचत असे. कधीतरी वाचायला काही नसलं तर वाचलेलंच पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचे. अशी त्याच त्याच पुस्तकांची कितीतरी पारायणं मी तेव्हा केली होती. माझी आत्या एका म्युनिसिपल शाळेत शिक्षिका होती. मे महिन्याच्या सुट्टीत आमची शाळा बंद असल्याने मला वाचायला काही नसे, तेव्हा ती आत्या तिच्या शाळेच्या लायब्ररीतील पुस्तकांची थप्पीच्या थप्पी मला वाचायला घरी आणून देत असे.

शाळा संपली. पुढे शिक्षण पूर्ण केलं. नोकरीला लागलो. लग्न झालं. त्याकाळात दादर सार्वजनिक वाचनालयाचा मी सभासद झालो होतो. रोज दोन पुस्तकांचा वाचून फडशा पाडायचो. जवळ स्कुटर होती. पुटूपुटू जाऊन पुस्तकं बदलून आणायचो. पुढे कल्याणला आलो. २९ व्या वर्षी मूल झालं. आणि सगळा घोटाळा झाला. संसार, नोकरी, आणि मूल यांच्यात पूर्ण गुरफटलो गेलो. लायब्ररीत जाणेयेणे होत नसे. माझं अवांतर वाचन पूर्णपणे ठप्प झालं. पण एक मात्र झालं. रोज ट्रेनने येऊन जाऊन दोन तासाचा प्रवास सत्कारणी लावला. तेव्हा प्रवासात मी रोज दोनेक तरी वर्तमानपत्र वाचत असे. त्याबरोबर येणाऱ्या पुरवण्या मी आधाश्यासारखा वाचून माझी अवांतर वाचनाची भूक शमवे.

अशातच काही वर्षांपूर्वी मोबाईलचे आगमन झाले. मोबाईलवर सर्फिंग करता करता मला मायबोली संकेतस्थळाचा शोध लागला. माबोचा सभासद होण्यापूर्वी मी दोन वर्षे फक्त माबोचा वाचनमात्र होतो. माबोवरसुद्धा पुष्कळ वाचन केले. वाचता वाचता मला असे वाटू लागले की आपणही आपल्या आवडलेल्या लेख, कथांना प्रतिसाद द्यावा. आपलेही मत नोंदवावे. म्हणून मी मायबोलीचा रीतसर सभासद झालो. आवडलेल्या लेख, कथा, कवितांना प्रतिसाद देऊ लागलो. सुरवातीला मी एका ओळीचा प्रतिसाद लिही. 'आवडले, छान लिहिलंय, झकास आहे, वगैरे'. मग हळूहळू माझी भीड चेपली. मी चारपाच ओळीत माझे मत मांडू लागलो.

मी माबोचा सभासद होऊन चार एक महिने झाले होते. दीडवर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१६ साली तो दिवस नव्हे रात्र उजाडली, जेव्हा माझ्यासारख्या वाचकाचे एका नवलेखकात रूपांतर झाले. एका सुरवंटाने कात टाकली. त्याचे एका सुंदर फुलपाखरात रूपांतर झाले आणि माझा माझ्या वयाच्या ५४ व्या वर्षी वाचनाकडून लेखनाकडे प्रवास सुरू झाला. त्या रात्री माबोवर मी एक धागा वाचत होतो. त्यामध्ये रामानंद सागर यांच्या दूरदर्शनवरील रामायण मालिकेचा उल्लेख होता. आमच्या तरुणपणी दूरदर्शनवर ही मालिका फारच प्रसिद्ध झाली होती. त्यासंबंधीच्या माझ्याही काही आठवणी उचंबळून येऊ लागल्या. मी प्रतिसादात दोनचार आठवणी सलग लिहून काढल्या. पण पाहतो तर प्रतिसाद चांगलाच मोठा झालेला. एक प्रकारे लेखच झाला होता. मग माझ्या मनात आले, हे सर्व आपण प्रतिसादात न लिहिता त्याचा नवा धागाच का काढू नये?

पण माझी नवा धागा काढायची हिम्मत काही होईना. माझ्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. प्रतिसादात काही लिहिणे वेगळे आणि स्वतंत्र लेखन करणे वेगळे. लेख सर्वच जण वाचणार. लोकं काय म्हणतील? लोकं माझ्या लिहिण्यावर बरेवाईट टीका करणार. कोणी वाद घालणार. कोणी माझ्या मागे हसणार. टिंगल करणार. मग मला शरमेने मेल्याहून मेल्यासारखे होणार. माझ्या मनावर भयंकर ताण येऊ लागला. तरीही मी स्वतःला धीर दिला. जे व्हायचे ते होऊन जाऊ दे. मी नवा धागा काढणारच. मग मी त्या प्रतिसादात थोडाफार बदल करून त्याचा मध्यरात्री १ वाजता एक स्वतंत्र धागा काढला. आणि त्याला नाव दिले 'दूरदर्शनवरील रामायण मालिकेची एक आठवण'

पुढचे दोन दिवस माझे कठीण गेले. मी गुपचूप माझा तो लेख उघडून बघायचो, की काही प्रतिसाद आलाय का? आणि माझ्याकरिता आनंदाची गोष्ट होती, की सर्व प्रतिसाद सकारात्मक आले होते. काहींनी माझ्या लिखाणाचे कौतुकही केले होते. ते पाहून माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. मग कालांतराने मी छोटे छोटे लेख, कथा लिहून माबोवर प्रसिद्ध करू लागलो. ते वाचून त्यावर काही नकारात्मक प्रतिसादही येत होते. पण तोपर्यंत माझीही भीड चेपली होती. तशा प्रतिसादांनाही तोंड द्यायला मी शिकलो होतो. माझे लिखाण बऱ्याच जणांना आवडू लागले होते. काही लोकं व्यक्तिशः भेटल्यावर माझे अभिनंदन करू लागले. मी विविध मराठी संकेतस्थळावरही लिहू लागलो. माझा स्वतंत्र ब्लॉग तयार केला. व्हाट्सएप, फेसबुकद्वारे माझे लेख, कथा मी विविध वाचकांपर्यंत पोहोचवू लागलो.

मला निव्वळ वाचक या भूमिकेतून लेखकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचवण्यामध्ये मायबोलीवरील लेखक आणि वाचकांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. मायबोलीवरील 'आपला कट्टा' भाग १ या धाग्यावरील अक्षय, मेघा, च्रप्स, सायुरी, पंडित, अंबज्ञ आणि धागामालक र।हूल यांनी वेळोवेळी माझ्या लिखाणाला दिलेल्या प्रोत्साहनाचा मी शतशः ऋणी राहीन. अक्षय यांचे मी पुन्हा आभार मानतो की त्यांनी मला हा निबंध लिहिण्यास प्रवृत्त केले. तसेच फेसबुक आणि व्हाट्सएपच्या माझ्या मित्रमैत्रिणींचेही मी आभार मानतो, की ते माझे मोडके तोडके लेख, कथा गोड मानून मला लिखाण करायला नेहमीच प्रोत्साहित करीत असतात. धन्यवाद.

(समाप्त)

ता. क. - वरील निबंधात माझे साहित्यिक लिखाण कधी आणि कसे सुरू झाले हे लिहायला मला खूप गंमत आली. मी माझ्या भूतकाळात पुन्हा फिरून आलो. सुरवातीला लिखाण करायला आणि त्याकरिता माहिती गोळा करायला मी घेतलेली  मेहनत आठवली. तेव्हा आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय आठवले. लोकांना आपले लिखाण आवडेल की नाही, हया मानसिक अस्वस्थतेमध्ये जागवलेल्या रात्री आठवल्या. माझ्या लिखाणावर लोकांनी ओढलेले ताशेरे तसेच त्यांनी केलेले कौतुकही आठवले. हा निबंध लिहिण्याचा माझा एक खरोखरच सुखद अनुभव होता. या विषयावर मला तुमचेही अनुभव वाचायला नक्कीच आवडतील. त्यातून मला नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी शाळेत जायच्या आधी घरीच वाचायला शिकले.... बालवर्गात अॅडमीशन घ्यायच्या आधी बाबांनी मला पुस्तकं वाचायला शिकवलेलं... त्यामुळे तेव्हा शाळेत जाऊन टाईमपास करणं हेच माझं काम असायचं...पहिलीत गेल्यापासनं मी रोज शाळेत गोष्टीची पुस्तकं घेऊन जायचे आणि वाट्टेल त्या वेळी वाचत बसायचे... बर्याचदा मार पण खाल्लाय वर्गात यासाठी... पण पहिल्या टर्मचा रिझल्ट लागल्यावर फटक्यांच्या संख्येत एक्पोनेन्शियली घट झाली... हळूहळू बाई मारायच्या ऐवजी माझं अचानक कौतुक करू लागल्या.... एकदा तर कडेवर घेऊन चक्क शाळा पण फिरवून आणली त्यांनी.... नंतर मला त्या परिवर्तनामागचं रहस्य कळलं... माझा पहिला नंबर आल्यामुळे मी कधीही पुस्तक काढून वाचण्याचा अपराध माफ झालेला....नंतर मला वाचायचं जे वेड किंवा व्यसन आहे ते अजूनही आहे.... मी आठवीत असताना एका अतिशय बोअर ; बकवास तासाला शेवटच्या बेंचवर बसून डुलक्या काढत होते.... तितक्यात तास संपल्याच्या बेलने माझी झोपमोड झाली..... पुढचा तास तर त्याहून बेक्कार होता... आणि झोपही लागत नव्हती... मग असाच काहीपण विचार करता करता मला कथा सुचली...आयुष्यात पहिल्यांदा मी कथा लिहीलेली...ती कथा वहीच्या मागे लिहीलेली... नंतर नववीत असताना तीच वही रफ बुक म्हणून वापरत असताना ते फाटलेलं पान खाली पडलं... मी आणि आदित्य एकत्र अभ्यास करत होतो... त्याला ते सापडलं आणि त्याने वाचलं.... आणि छान आहे अजून लिही म्हणून सांगितलं... पण मी काही लक्ष दिलं नाही... मधेमधे त्याचा हट्ट सुरू असायचा... पण अभ्यासामुळे मी दुर्लक्ष केलं...कविता मला कधी समजल्याही नाहीत आणि मी कधी लिहील्याही नाहीत...
नंतर आता बारावीत असताना असंच नेटवर वाचत असताना त्याला आपल्या मायबोलीची वेबसाईट सापडली... त्याने पहिल्यांदा वाचली आणि मग मला दाखवली... आणि ती कथा इथे टाईप करून टाकायला लावली...त्याने त्याचा आयडी इथे काढला नाही...मी माझा आयडी इथे काढला आणि कथा पोस्ट केली... ती करतानाही सेव्ह वर टॅप करताना मला फार भीती वाटत होती... तेव्हा त्यानेच हातातनं मोबाईल काढून घेतला आणि पोस्ट केली... नंतर दर पंधरा वीस मिनीटांनी काय रिप्लाय आला असेल यासाठी मी मोबाईल उघडून बघत होते....मग सकारात्मक प्रतिक्रीयांनी पोस्टायचा काॅन्फिडन्स वाढत गेला..सांगितलेल्या चुकांमधनं शिकत गेले... मैत्री ही संपूर्ण कथा मी लिहीली यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये... यात मला प्रोत्साहन देणार्या दोन व्यक्ती होत्या एक आदित्य आणि दुसरी सगळ्यात महत्वाची आपली जुई ... तिनेही माझ्यातला लिखाणाचा कीडा पुन्हा जागवला... तिचेही आभार... आणि तुम्ही सगळ्यांनी प्रतिक्रीया देऊन उत्साह वाढवल्याबद्दल धन्यवाद...  Happy

लेख छान आहे Happy

आदिबाई, आपली शाळा कोणती हो? पहिलीतल्या मुलीला कोणत्या शाळेत कडेवर घेतेत ते जाणायचे हुतं.

@अनघाबाई
माझ्या पहिलीतल्या आणि सातवीतल्या मॅडमचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं... त्यांना अजूनही मी आवडते... त्या माझ्या सगळ्यात आवडत्या शिक्षिका होत्या....

बाकी या विषयावर अवांतर पोस्ट टाकून धागा भरकटवायला नको... त्यापेक्षा निबंध लिहुया... सचिनकाका साॅरी फाॅर अवांतर....

खुप सुंदर प्रवास मांडलाय !
प्रापंचिक कारणाने इतक्या मोठ्या गॅपनंतरसुद्धा चिकाटी सोडली नाही हे विशेष Happy

@ आदिसिद्धी, अनघा, अंबज्ञ प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!

अजून इतरांचे अनुभव वाचण्यासाठी मी उत्सुक आहे. Happy

छान लेख !

लिखाणासाठी वाचनासोबत आयुष्यही अनुभवसमृद्ध हवे.

माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास मी माझ्या लायकीपेक्षा बरेच जास्त लिहून ठेवले आहे. पण जे उत्स्फुर्तपणे आतून आले आहे तेच लिखाण मी काऊंट करतो. अन्यथा बाकीचे बरेच दिवसात आपला काही धागा आला नाही म्हणून पाडलेल्या जिलब्या असतात.

एक मात्र आहे, आपल्या लिखाणावर कोण चांगल्या प्रतिक्रिया देतेय की वाईट याचे मला कधीच काही पडलेले नसते. लिखाण प्रकाशित करायचे की नाही हा प्रश्नही मला कधी पडला नाही. कारण लिखाणाला सुरुवात करण्याआधी मी ऑर्कुटच्या जमान्यापासून धागासम्राट म्हणून ओळखलो जायचो. त्यामुळे एखाद्या सोशलसाईटवर स्वतंत्र धागा प्रकाशित करायचा धीटपणा माझ्या अंगी बाय डिफॉल्ट होता.

छान लेख सचिनजी... Happy
अरे कट्ट्यावर लिहिलेल्यांनी इथे लिहा की...
चिप्स,आनन्द,अक्षय लिहा की इथे...किती मस्त लिहिलेलं त्यादिवशी.....

लेख वाचुन हुरूप आला. तुम्ही 54 व्या वर्षी सुरुवात करू शकता तर मी 35 व्या वर्षी नक्कीच करू शकते, असं वाटून गेलं.

@ अक्षय, मेघा, ऋन्मेष धन्यवाद.

@ suruchi13, लेख वाचुन हुरूप आला. तुम्ही 54 व्या वर्षी सुरुवात करू शकता तर मी 35 व्या वर्षी नक्कीच करू शकते, असं वाटून गेलं. >>> हो! नक्कीच. आपणांस लेखनाच्या शुभेच्छा!!! चरित्र अभिनेते ए. के. हंगल यांनी वयाच्या ५२व्या वर्षी चित्रपटात काम करायला सुरुवात करून पुढे भरपूर नांव कमावलं.

मी सध्या पाचवीत आहे, सातवीच्या सकोलरशीप ची परीक्षा झाली मी मी देखील लिखाण सुरू करणार आहे.
आदी ताई , द्वादशांगुला ताई यांचा आदर्श आहेच !
त्यामुळे 2 वर्षानंतर मी लेखन सुरू केले की या धाग्यावर अपडेट मारेन.

Lol शुभेच्छा शुभेच्छा !!!!
पण कट्ट्यावर लिहिलेलं जास्त आवडलेल चिप्स...ते जास्त रियल वाटलेलं...हे नाही...

ए के हंगल चित्रपटांत यायच्या आधीपासून रंगभूमीवर होते. शिवाय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावासही झाला होता.

दिवसाला दोन दोन पुस्तकांचा फडशा पाडण्यासारखी कोणती पुस्तकं होती ती?

तुमच्या लिखाणात एक असोशी आहे.

आता विषयाला धरून : कॉलेजात असताना आपल्याला कविता करता येतात असे भास होऊ लागले. मध्ये गायब झाले. मग मायबोलीचा शोध लागल्यावर पुन्हा काही काळ ते भास झालेले. आता तसलं काही होत नाही.

त्यामध्ये रामानंद सागर यांच्या दूरदर्शनवरील रामायण मालिकेचा उल्लेख होता. आमच्या लहानपणी दूरदर्शनवर ही मालिका फारच प्रसिद्ध झाली होती.

Sorry but I think Ramayan was telecasted on Doordarshan in 1987. If you were in school during that time, how can you be 54/55 years old now. I myself was born in 1980 and remember watching this serial when I was in 2nd / 3rd standard.

@ मोद, आपण म्हणताय ते बरोबर आहे. मी लहानपणी लिहिण्याऐवजी तरुणपणी असे लिहायला हवे होते. लिहिण्याच्या फ्लोमध्ये माझ्या हातून चूक झाली. चूक दाखवून दिल्याबद्दल आपले आभार. मी दुरुस्त करतो. By the way माझी जन्मतारीख ०३.१०.१९६३ आहे.

सचिनजी, उगाच एखाद्याला prove करण्यासाठी आपली खरी जन्मतारीख सोशल साईट वर देने बरोबर नाही.
इट्स पर्सनल इन्फो.. शक्य असेल तर डिलीट करा.
तुमचे खरे नाव सगळ्यांना माहीत आहेच आता तुम्ही DOB पण टाकली.. careful रहा !
खोटी असेल तर इग्नोर..

@ च्रप्स, आपण माझ्याकरिता दाखविलेल्या आत्मीयतेबद्दल आपले फार फार आभार. एखाद्याचा आपल्यावर अविश्वास होणे हे माझ्याकरिता मरणप्राय वेदना देणारे आहे. आणि तो अविश्वास दूर करताना होणारे नुकसान मला मान्य आहे. ती DOB खरी आहे.

अहो, माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये मी म्हातारा दिसत नाही का? Lol