दारा, रानशीळ आणि हिरड्याचं दार

Submitted by योगेश आहिरराव on 11 May, 2018 - 02:27

दारा, रानशीळ आणि हिरड्याचं दार

टीप : सदर ब्लॉग पोस्ट मोठी आहे कारण ‘दारा घाट’ आणि ‘रानशीळ घाट’ तसेच पुन्हा ‘दारा घाट’ आणि ‘हिरड्याचे दार’ हे दोन्ही ट्रेक सलग एका आठवड्यात करून दोन्ही ट्रेकचा वृत्तांत एकत्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आलेले अनुभव, घडलेल्या घडामोडी तसेच भरपूर फोटो या मुळे पोस्टची लांबी वाढली आहे.
दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भीमाशंकर परगण्यातील ‘दारा’ आणि ‘हिरड्याचे दार’ या अल्पपरिचित आणि खडतर अश्या घाटवाटा. दोन्ही वाटेसाठी तीव्र चढ-उतार, एक्सपोज आणि स्क्री याचा पुर्वानुभव हवा तसेच माहितगार अनुभवी मंडळी सोबत असणं गरजेचं आहे.
1.jpg
जानेवारी महिना संपत आला तरी ट्रेकचे काही ठरत नव्हते. नाही म्हणायला सहपरिवार नाणेघाट सहल आणि एका वीकेंडला कोरलाई, रेवदंडा आणि कुलाबा या सागरी किल्ल्यांना भेट देऊन झाली. २६ जानेवारीच्या जोडून येणाऱ्या शेवटच्या वीकेंड वर डोळे लावून होतो. मी आणि जितेंद्र मिळून दोन तीन पर्याय तयार ठेवले, नियोजन आणि अभ्यासाचा भाग म्हणून दोघं तिघ अनुभवी मित्रांसोबत चर्चा केली. जागा, जाणे, येणे, सोबतची मंडळी सारे काही सेट. बास गुरुवारी रात्री निघायचं आहे आणि बुधवार सायंकाळ नंतर माझी बोलतीच बंद झाली. कसे झाले? काय झाले? नाही माहित पण एक एक शब्द उच्चारणे कठीण जात होते. त्या रात्री काही झोप लागली नाही साहजिकच दुसऱ्या दिवशी आणखी हालत खराब त्यामुळे कामावर जाता आले नाही. गरम पाणी, मिठाच्या गुळण्या, लवंग, कंठ सुधारक बरेच उपाय केले काही फायदा नाही. डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सांगितले स्वर यंत्रला सुज आली आहे. मग बोच्यावर इंजेक्शन आणि अँटिबायोटिक टॅब्लेट. तशातच घरी आल्यावर पहिला कॉल जितेंद्र यांना लावला, त्यांना म्हणालो 'सगळी तयारी झाली आहे तुम्ही व्हा पुढे मला जमणे कठीण आहे', असं बोलून माझी अवस्था त्यांना सांगितली. त्यावर क्षणभरही न थांबता त्यांनी ट्रेक रद्द केला. सुनील, विनायक आणि हेमंत यांनी सुद्धा ते लागलीच मान्य केले. जायचं तर एकत्र आणि जी काही मजा करायची ती एकत्रच. खरंय या ट्रेक मध्ये आम्ही दोघांनी नियोजनापासून सर्व तयारी एकत्रपणे केली होती. मग एकाला सोडून जाणे शक्यच नव्हते. ‘People oriented and Place oriented’ चे उदाहरण त्यांनी प्रूव करून दाखवले.
या ट्रेक जगतात दोन प्रकारची लोकं असतात एक People oriented आणि दुसरी Place oriented. पहिल्या प्रकारातली मोडणारी व्यक्ती ही माणसं जपते भले मग ती ठराविक आणि मर्यादित का असेना पण त्यांच्या सोबतच यांचे बंध घट्ट जुळलेले असतात. ट्रेक कमी झाले तरी हरकत नाही पण जे करायचे ते आपल्या माणसांसोबतच. ट्रेकच्या लोकेशन पेक्षा सोबतची कंपनी आपली माणसं जास्त महत्वाची. हे दुसरीकडे फारसे रुळत नाहीच मुळी, हा झाला पहिला प्रकार. आता दुसऱ्या प्रकारातली मोडणारी व्यक्ती ही एक अजब रसायन असते. यांना फक्त आणि फक्त ट्रेकचे लोकेशन महत्वाचे मग तो कसा किती भारी इतर नफा तोटा वगैरे थोडक्यात pure place oriented. सोबत कोण आहे किती आहेत याचं त्यांना काही नसते. फक्त ट्रेक पूर्ण करून स्वतः ची यादी वाढविणे. आज इथे तर उद्या तिथे कायम भटकत रहाणार. मला व्यक्तिशः यांच भारी आश्र्चर्य वाटते. कसं काय जमत बुवा काय माहित. असो या बद्दल बरेच लिहिणे झाले. आता मूळ विषयावर येतो..
दोन दिवस आराम करून जर बरे वाटले तर शनिवार किंवा रविवार या पैकी एक दिवस कुठेतरी जवळपास जाऊन येऊ असे ठरले. मग पुन्हा लोकेशन, एका दिवसात जवळपास प्रवास आणि अंतर पहाता आम्हाला माळशेज, भीमाशंकर, कर्जत व लोणावळा सोडलं तर दुसरे काही नजरेत येतच नाही. त्यात गेल्या काही महिन्यांत भीमाशंकर ते ढाक परिसरातल्या बहुतांश प्रचलित घाटवाटा करून आलो होतो. शुक्रवारी दुपारनंतर आवाजात बराच फरक जाणवला आणि तब्येतीत सुधारणा. शनिवारचा एक दिवस सत्कारणी लावून रविवारी आराम असे ठरले. काय माहित पण यावेळी पुन्हा भीमाशंकर खुणावत होते, त्याच्या उत्तरेकडील दोन अल्पपरिचीत वाटा 'उंबरा' आणि 'दारा' या विशलिस्ट मध्ये होत्याच. त्यापैकी किमान एक तरी करू असे जितेंद्र आणि मी ठरवले. यात ऐन वेळी अचानक विनायक आणि हेमंत यांचे काही कारणास्तव येणे रद्द झाले. आता उरलो मी जितेंद्र आणि सुनील, आम्ही तिघेच. हरकत नाही ‘less people less co-ordination’ हे आणखी एक माझे महत्त्वाचे तत्व. दारा घाटाबद्दल, नांदगावहून भीमाशंकरच्या उत्तरेकडे वसलेल्या कोंढवळ गावात जाणारी खड्या चढाईची सरळसोट कड्यातून जाणारी वाट इतपतच माहिती होती. मागे एकदा ‘मधुकर धुरी’ यांचा एक या वाटेचा फोटो बघितलेला आठवलं. यावर त्यांच्याशी फोन वर बोलून माहिती घेतली. पूर्ण लक्ष दारा घाटावर केंद्रित करून आम्ही दारा ने चढाई आणि रानशीळ ने उतराई असे ठरवले.
शनिवारी सकाळी बदलापूरहून सुनीलला पिक अप करून बोराडपाडा मार्गे मुरबाड कर्जत रस्त्यावरून ओळमण - नांदगाव साठी डावीकडे वळालो. ओळमण ते नांदगाव रस्ता याचे वर्णन शब्दाच्या पलीकडचे. नांदगाव पोहचून दारा घाटाची चौकशी केली असता आम्हाला रानशीळ (बैल) घाटाने भीमाशंकर पाठविण्याचा प्रयत्न झाला. शेवटी जुन्या जाणत्या माणसाने भोमळवाडीत जाण्याबद्दल सुचवलं. दहा मिनिटात भोमळवाडीत पोहोचलो. तिथली स्थिती आणखीनच भारी. गावात एका घरात लग्नाची तयारी, दुसरीकडे घरभरणी तर तिसर्या ठिकाणी उत्तरकार्य. अशावेळी कुणी सोबत यायला तयारच होईना. नवीन पिढी तर हातात मोबाईल घेऊन, ते कधी या वाटेला गेलेच नाहीत.
हातात तंबाखू मळत, कपाळावर आठ्या, एक तर्जनी उडवत, टिपिकल एटीट्युड दाखवत ज्या पध्दतीने जुनी माणसं बोलत होती ते खरंच मनाला भावले. त्यांच्या पैकी एकाने ‘अंकुश सुपे’ यांना आमच्या सोबत येण्यास तयार केले. अशारीतीने भोमळवाडीतून निघेपर्यंत साडेनऊ वाजले. गावातून बाहेर पडताच समोर अंदाजे तीन हजार फुटा पेक्षाही अधिक उंचीची मुख्य रांग उजवीकडे बाहेरच्या बाजूला पदरगड त्यापल्याड तुंगी तर डावीकडे त्याच उंचीचे सिद्धगड दमदम्या मुख्य रांगेला काटकोनात जोडलेले. शेताडीतून वाट जात पायथ्याच्या विरळ झाडीतून सरळ वर चढू लागली. थोड वर सपाटीवर येत अंकुश मामाने काटकोनात उजवी मारत ओढयाला समांतर अशा वाटेने वर नेले. ही फारच मोठी खूण होती, अन्यथा कुणीही सरळ मळलेल्या वाटेने पुढे जाऊन पलिकडच्या वाडीत हमखास उतरणार. पहिल्याच चढाई ने चांगलाच दम काढला यापुढे ही अशीच चाल असणार याचा सरळ उभ्या पदरातल्या कड्याकडे पाहूनच अंदाज येत होता. मामा तर खूपच वेगात दौड मारत होते. 'एकटा असलो तर मी दोन तासात कोंढवळ जातो' असं म्हणाले. अर्ध्या तासात पहिला कातळ टप्पा आला.
दोन मोठ्या धोंड्यांमध्ये लाकडी मोळी ठेवलेली आहे. अगदी आपली निसण असते तशीच रचना. यालाच गावकरी शिडीची वाट म्हणतात. थोडक्यात पदरापर्यंत शिडीची वाट आणि पदर ते माथा दारा घाट तसेच बाजूच्या मोहपाडातून ‘दाभोळदारा’ नावाची वाट वर याच पदरात येऊन मिळते व पुढे दारा घाटाने कोंढवळ जाते. पाच मिनिटांत तो टप्पा पार केला. नंतर गवताळ घसरडे आणि तिरके कड्याला बिलगून अरूंद अशा नाळेतल्या दुसर्या कातळटप्प्यावर आलो. चिमणी क्लाईंब प्रकार मामा झटपट वर गेले, नंतर जितेंद्र मग आम्ही दोघे. थोडक्यात उभ्या कड्याला बिलगून असलेल्या अती अरुंद नाळेतच हे दोन्ही कातळटप्पे आहेत. या ठिकाणी फारसं दृष्टीभय नसले तरी पुरेशी सावधगिरी बाळगायला हवी. पुढे त्याच लहान अरुंद नाळेतून वळसा घेत पदरात आलो, वर माथ्याकडे पाहिले तर अंदाजे निम्म्याहून अधिक चढाई शिल्लक होती. जंगलातल्या एका पाणवठा जवळ नाश्ता उरकला.
याच पदरातून उजवीकडे जात रानशीळ घाटात, तसेच आणखी आडवे जात थेट पदरवाडी ते गणपती घाटाच्या वाटेला लागता येते.
पदरातले जंगल पार करून वाट चढाईला लागली माथ्याकडे मान वर करुन पाहिले तर कडा अंगावर येतोय की काय असे वाटले. पुढची वाट थरारक अनुभव देणार हे नक्की होतं. उत्तरेकडे मुख्य धारेवरचे एक टोक किंचित पुढे झुकलेले, तिथे आपल्याला जायचं आहे असे मामांनी सांगितले. सुरुवातीची वाट जसजशी वर जाऊ लागली तशी अरुंद होत गेली. एकदम कड्याला बिलगून जेमतेम पाऊल मावेल एवढी जागा. थोडी उंची गाठल्यावर बघतो तर उजवीकडे कपारीत दगडाला शेंदूर फासलेले. अशा अवघड आडनिड मार्गावरील ही श्रध्देने पुजलेली दैवतं, साहजिकच येणारे जाणारे यांचे मनोबल वाढवून प्रवास सुखकर व्हावा हेच काय ते उदिष्ट.
कातळात व्यवस्थित खोदलेल्या पावठ्या अरुंद वाटेवर चांगलाच आधार तसेच वाट पूर्वापार वापरात असल्याची ग्वाही देतात. कोंढवळचे काही लोकं अलीकडच्या काही वर्षांपर्यंत पावसाळी शेती या पदरात करीत होते, असे मामा म्हणाले.
असाच एक अवघड टप्पा. हा घाट मला तर रामपुर ते दुर्ग या मधील खुट्टेदार घाटासारखा वाटला, हवं तर त्याची छोटी कॉपी म्हणता येईल. उभ्या सरळ सोट कातळावर चढाई मग थोडी आडवी अरुंद चाल पुन्हा चढाई मग पुन्हा कधी कधी आडवा घसारा आणि जोडीला दृष्टिभय. पुरेसा अनुभवाचा अभाव आणि नवखे भिडू असतील तर या वाटेला न जाणे बेहत्तर. अशाच एका अरुंद वळणावर आलो तेव्हा समोर सिद्धगड आणि दमदम्या अगदी डोळ्यांचा सरळ रेषेत, याच दमदम्याच्या जवळील तिसऱ्या घळीतून उंबरा घाट उतरतो.
एव्हाना बरीच उंची गाठली होती. या वाटेवर एकही झाड नाहीच पण खालचे पदरातले जंगल चांगलेच बहरलेले.
शेवटची ट्रॅव्हर्स मारून माथ्यावर आलो पलीकडे पहिले तर नुसतं पठार आणि झाडीने वेढलेल्या लहान टेकड्या दूर दूर पर्यंत कुठेही वस्तीच्या खुणा नाहीत, यालाच गायमाळ असेही म्हणतात. कोंढावळ गाव साधारण सरळ रेषेत खालच्या बाजूला म्हणजेच दिड दोनशे फुटांची उतराई असणार आणि तिथे जाणे सहज सोपे मुळीच नाही. कारण फारशा मनुष्य खुणा या वाटेवर नाहीच, मुळात ही वाटच जास्त वापरात नाही त्यामुळे वाटा मळलेल्या नाही. अचूक नकाशा वाचन, दिशा ज्ञान किंवा माहितगार माणूस सोबत असलेलं बरे अन्यथा इथे चुकायला भरपूर वाव आहे.
डावीकडे दूरवर दमदम्या, त्यापलीकडे आहुपे घाटाची डोंगर रांग अगदी ठळक दिसत होते. हवा वाहती आणि स्वच्छ असल्यामुळे दूरवरचे सहज नजरेत येत होते, खूपच चांगले वातावरण मिळालें त्यात भर दुपार असून सुद्धा उन्हाचा त्रास नाही. वाट उतरणीला लागून झाडी भरल्या ओढ्यात शिरली तो पार केल्यावर आणखी खाली उतरून मोकळंवनात आली. बरेच अंतर जात पुन्हा एक झाडीचा टप्पा त्यानंतर जेव्हा बाहेर आलो तेव्हा काही ठिकाणी गुरांचे शेणाचे पो आणि ढोर वाटा. सुपे मामाने त्यातून अचूक वाट पकडली, खरचं त्यांचा या भागातला भूगोल खूपचं पक्का. एके ठिकाणी मोठे झाड पाहून सावलीत विसावलो, तेव्हा खालच्या दरीतून माणसांचा आवाज ऐकू आला. पुढे निघाल्यावर वाटेत लाकडाच्या मोळ्या रचलेल्या. कोंढवळ आणि आसपासच्या वाडीतली लोक रानात लाकूड फाटा गोळा करत होते.
टेपाड वरुन वाट उतरू लागली खाली कोंढवळ गाव नजरेत आले. दोन वाजेच्या सुमारास गावात पोहचलो. सुपे मामांचे नातेवाईक ‘दाते’ यांच्या घराच्या पडवीत जेवणासाठी थांबलो. मेथीचे पराठे, नारळाची चटणी, चपाती भाजी असा मेनू, डबा नेहमी प्रमाणे घरातून आणलेला. दाते आजी सोबत गप्पा मारताना बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. खुद्द आजींची मुलगी खालच्या भोमळवाडीत दिली आहे त्यानिमित्ताने त्यांचे अजूनही या वाटेने येणे जाणे होते. अगदी काही वर्षांपूर्वी इथली काही मंडळी त्याच पदरात शेती करत, खंडीभर नाचणी आणि तांदुळाचे भारे या अवघड वाटेने स्वतः वाहून आणत. दाते आजींना या भागाची इथल्या वाटांची परिसराची भरपूर माहिती अगदी नाणेघाट, गायदरा उंबरा पासून ते खेतोबा वाजंत्री पर्यंत सर्व वाटा चक्क तोंडपाठ. जेवण आणि थोडा आराम यातच तीन वाजून गेले. भीमाशंकर पर्यंत एखादी जीप गाडी मिळाली असती तर बरे झाले असते पण इथे दिवसातून सकाळी एकदा जीप गाडी गेली की नंतर सायंकाळीच परत फार क्वचित अधे मधे एखाद दुसरी आली तरच. तसे पाहता भीमाशंकर अभयारण्य मध्ये वसलेल्या कोंढवळ गावात थेट एस टी नाही भीमाशंकर रस्त्यावरून कोंढवळ फाटा पासून ४-५ किमी ची चाल. इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती, पशुपालन, नाहीतर मंचर, घोडेगाव किंवा भीमाशंकर या ठिकाणी जाऊन छोटी मोठी काम करून पोट भरणे. नवीन पिढी आणि शेती बद्दल आजी व मामांनी बरेच सांगितले त्याबद्दृल न बोललेले बरे. असो... आजींचा निरोप घेतला व डांबरी रस्त्याने चालू पडलो. वाटेत गोहरी नदीवरचा कोंढवळचा पावसाळ्यात हल्ली प्रसिध्दी पावलेला (कोरडा) धबधबा. सुरुवातीला कंटाळवाणी वाटणारी भली मोठी चढण पार करुन जेव्हा जंगल भाग लागला तेव्हा बरं वाटलं विविध पक्ष्यांचे आवाज त्यात दोन चार वेळा शेकरूचे झालेलं दर्शन. धनगर पाडाच्या पुढे मोठा ओढा लागला इथूनच एक शॉर्टकट थेट जंगलाच्या मधून एमटीडीसीकडे निघतो, ते काही चटकन नजरेत आले नाही आणि आम्हीही शोधायच्या भानगडीत वेळ घालवू इच्छित नव्हतो. फाट्यावर आलो तेव्हा हाथ दाखवून मंचर भीमाशंकर जाणारी जीप थांबली म्हटले चला पुढचे तीन चार किमी डांबरी सडकेने चालायचे तरी वाचतील. जीप एखादं दिड किमी जात नाही तो रस्त्यावर हे वाहनांच्या रांगच रांगा, जोडून सुट्टी आल्याचा परिणाम. पुढे आणखी अवस्था बिकट, बेशिस्त पर्यटकांनी कुठेही कसेही गाडया उभ्या आडव्या लावल्या होत्या. तसेच चालत गर्दीतून वाट काढत भीमाशंकर स्थानकात पोहचलो तेव्हा चार वाजून गेले होते, इथंही तोबा गर्दी, दर्शनाचा प्रश्नच नव्हता मनातूनच दंडवत घातले. गर्दीत आणि जत्रेत माझा तरी जीव गुदमरतो, सकाळपासूनची अनुभवलेली प्रसन्नता मुळीच घालवायची नव्हती. कडक चहा पिऊन तडक रानशीळच्या वाटेला निघालो. याआधी एस टी स्टॅन्डच्या भिंती पल्याड भगदाड मधून जाता येत असे, आता स्टॅन्ड नवीन रंगरंगोटी करून भिंत बांधलेली. मागून फिरून वाटेला लागलो, वाटेची सुरुवातच महाभयानक अत्यंत दुर्गंधी नाक दाबूनच जावे लागले, प्रचंड कचरा आणि घाणीचे साम्राज्य. यापूर्वी भीमाशंकरच्या कैक वर्षे वाऱ्या केल्या, गणपती घाट, शिडी घाट आणि हा रानशीळ घाट प्रत्येक ऋतूत इथे येणे झाले. पण हल्ली कितीही वाटले तरी अशी परिस्थिती पाहून यायची इच्छाच होत नाही. ९९ साली मी पहिली घाटवाट केली, ती याच रानशीळ ने चढाई करून गणपती घाटाने उतराई. बऱ्याच काही आठवणी आहेत माझ्या इथे, त्यामुळे भीमाशंकर बद्दल मनात कायमस्वरूपी ममत्व राहणार यात वादच नाही. असो तर...
सुरुवातीचे काही मिनिटे तसेच घाणीतून जात वाट कड्याला वळसा घालून उजवीकडे उतरू लागली खाली नांदगाव आसपासचे कोकण नजरेत आले. ही वाट नेहमीची वापरातली, अगदी रचाई करून बांधलेली, रुंद कुठंही तीव्र चढ अथवा उतार नाही आणि जोडीला सदाबहार जंगल. अगदी जनावरांना तसेच आपल्यातील हवशे नवशे गवशे आणि अबाल वृद्धांना सोयीची. हल्ली वाटेत प्रत्येक ठिकाणी दगडावर बाणाच्या खुणा मारलेल्या तसेच बाजूंच्या झाडावर चुना आणि गेरू फासलेला. मोठा अर्थात कोरडा धबधबा पार करून खालच्या टप्प्यात आलो. मला भीमाशंकरच्या या भागातल्या मोठ मोठ्या झाडांचं नेहमी आकर्षण वाटत त्यांची आभाळात जाणारी उंची, रुंद मोठे बुंधे आणि खोड. आंबा, फणस, बेहडा इ. तसेच राक्षसी पण काही पिळदार अश्या वेली. अशा चांगल्या समृध्द रानातल्या वाटेवर ठिकठिकाणी पडलेला कचरा पाहून संताप येत होता. लोकांना सांगावे लागते कि कचरा करू नका टाकू नका म्हणून, या गोष्टीचे मला सर्वात जास्त आश्चर्य वाटते. अगदी स्वछता कर भारत सरकारने लागू करावा या सारखी लाजिरवाणी बाब नाही, म्हणजे कर रुपी पैसे देऊन आम्ही कुठेही कचरा टाकायला मोकळे घेईल शासन जबाबदारी ! प्रत्येकानं स्वतः ठरवले तर काय अवघड आहे. घरी दारी सार्वजनिक ठिकाणी या गोष्टी पाळणे इतकं कठीण आहे ? असो विषय वाढत जाईल…
तासाभरानंतर पदरात आलो डावीकडे पदरवाडी - गणपती घाटाची वाट आम्ही सरळ उजवीकडे मुख्य वाट धरली, रानशीळ उर्फ बैल घाटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे वाट साधारण दक्षिण उत्तर तिरक्या रेषेत उतरते कुठेही जास्त उजव डाव प्रकरण नाही. मोकळं वनात ऐके ठिकाणी काही झाप आणि मोडकीस आलेल्या राहुट्या दिसल्या. पुन्हा दाट जंगलाचा टप्पा, पुढे सरळ वाटेत ‘करवंददारा’ घाटाची कातकरवाडी नांदगावकडे उतरणारी वाट छेदून गेली. बरेच छोटे मोठे ओढे वाटेत लागतात, अशाच एका ओढ्याच्या उजवीकडून एक वाट दारा घाटाकडे जाते. आधी सांगितल्याप्रमाणे. पदरातून डावीकडे कातळभिंत ठेवत नागमोडी वळणे घेत उतराई सुरु झाली.
थोडं बाहेर येताच उजवीकडे सिध्दगड दिसला. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, आम्ही सुध्दा झपाट्याने पावलं टाकत निघालो. सुपे मामा तर आमच्यापेक्षा खुपचं पुढे अगदी मेरॅथॉन रनर. भोमळवाडी ते कोंढावळ ते दोन तासात जात असतील या बद्दल मला आता कुठलीही शंका नाही. वळणा वळणाची दगडी घाटाची उतराई संपवून झाडीतून बाहेर आलो तेव्हा सूर्यास्त होऊन संधीप्रकाश पसरत होता. घाटाची फार्म हाऊस - नांदगावकडे उतरणारी मुख्य वाट सोडून मामांच्या पाठी पाठी उजवीकडच्या बारीक पायवाटेला लागलो, कमी उजेडात मामांनी हि वाट अचूक शोधली अन्यथा मुख्य वाटेने जाऊन बराच फेरा पडला असता. वाटेतील एक मोठा ओढा पार करून, शेताच्या बांधावरून चालत साडेसातच्या सुमारास भोमळवाडीत परतलो. परतीच्या प्रवासात आंबे टेम्बे मार्गे म्हसा रोड पकडला. सकाळच्या ओळमण रस्त्याच्या तुलनेत सांगायचं झालं तर आगीतून फुफाट्यात अशी स्थिती. म्हसा बोराडपाडा मुळगाव मार्गे बदलापुरात सुनीलला सोडून कल्याण गाठेपर्यंत साडेदहा वाजले. दोन दिवसानंतर जितेंद्र यांनी फोटो अपलोड केले, ते पाहून आणि ट्रेकचे खास करुन दारा घाटाचे वर्णन ऐकून आमच्या मंडळातील उत्साही भिडू अंकल, हेमंत, विनायक, शिल्पा हे सारे हट्टाला पेटले. लगेच येणाऱ्या रविवारी ‘दारा घाट’ त्याला जोडून ‘उंबरा घाट’ असं ठरले. या वेळी स्वतः नारायण अंकलनी पुढाकार घेतला. काही कारणांमुळे जितेंद्र, सुनील आणि विनायक यांना जमलं नाही.
यावेळी दारा चढून कोंढवळ गाठून भट्टीच्या राना अलीकडच्या उंबरा घाटाने उतरायचे ठरवले असल्याने वेळेचं नियोजन म्हणून आदल्या रात्रीच गावात मुक्कामासाठी दाखल झालो. मी, नारायण अंकल, हेमंत, शिल्पा आणि पुण्याहून खास ट्रेक साठी आलेले ज्येष्ठ ईश्र्वर काका. एकत्र भेटून निघायला उशीर झाला त्यात बदलापूरात डिझेल भरुन ओळमण (चुकूनही या रस्त्याने कुणी जाऊ नये आणि रात्री तर मुळीच नाही) मार्गे नांदगाव मग भोमळवाडीत पोहचेपर्यंत साडेबारा वाजून गेले होते. बांगर भाऊ आमची वाट पहातच होते, त्यांनीच रात्रीच्या मुक्कामासाठी जवळच्या घरात सोय केली होती. दुसऱ्या दिवशी सोबतीला उंबरा घाटासाठी त्यांनाच सांगून ठेवले. पल्ला लांबचा असल्यामुळे फार जागरण गप्पा टप्पा न करता झोपी गेलो. सकाळी पाचचा अलार्म वाजला. पाच दहा मिनिटे लोळत, डोळे चोळत उठलो. सगळं आवरून सहा वाजता आम्ही सर्व मंडळी तयार. बघतो तर सर्व वाडी आजूनही गाढ झोपेत ? बाहेर कसलीच हालचाल दिसत नव्हती. बांगर भाऊंना फोन लावला, ते केंगळे मामांना आमच्यासाठी सोबत म्हणून घेऊन आले. त्यांना उंबरा घाटाबद्दल विचारलं नुसतीच मान हलवली, तुम्ही जातात ना या वाटेनं असं विचारल्यावर चक्क नाहीं म्हणाले. त्याचं हे बोलणं ऐकून आम्ही एकमेकाकडे बघून काय ते समजून गेलो. बांगर भाऊंना विचारलं, काय हे ? ते म्हणाले, ‘विश्वास ठेवा बिंधास रहा हा माणूस तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाणार. अहो नेहमी रानात फिरणारी ही तुम्हाला बरोबर वाटेला लावतील’. आता जास्त बोलण्यात अर्थ नव्हता, वाटेला लावतील की वाट लागेल, जे होईल ते आता निघायचं. ‘अजून अंधार आहे जरा उजाडू द्या मग निघा’ बांगर भाऊ म्हणाले. आता निघुया आमची सर्व तयारी झाली आहे. यावर केंगळे मामा म्हणाले, ‘सकाळी रानात डुक्करांचा लय त्रास आहे’. त्याचं म्हणणं ऐकून घेत निघेपर्यंत सात वाजून गेले. सुरुवातीची विरळ जंगलातून वाट, सौम्य मग तीव्र होत जाणारी चढाई. शिडीच्या वाटेचे दोन कातळ टप्पे पार करून पदरातल्या पाणवठा जवळ नाश्ता उरके पर्यंत नऊ वाजून गेले. घड्याळ आणि पल्ला आठवत चालू पडलो. अंकल आणि केंगळे मामा बरेच पुढे होते. फोटोग्राफी, गप्पा टप्पा, ईश्र्वर काकांचे कॉमेडी पंच.
2_1.JPG
वाटेतले लहान कातळ टप्पे पार करत घाट माथा गाठेपर्यंत दुपारचे बारा वाजून गेले.
एका झाडाच्या सावलीत विसावलो, सर्व जण आल्यावर नारायण अंकल आणि मी तिथेच उंबरा घाटाने उतराई न करण्याचा निर्णय जाहीर केला. कारण चाल आणि अंतर त्यात वाट शोधण्यासाठी बफर वेळ हवा होता जो आम्ही चढाई करताना घालवला.
बहुतेक वेळा ट्रेक मध्ये असे निर्णय घ्यावेच लागतात, शेवटी कुणा एका दुसऱ्याच्या हट्टापायी इतर बाबींवर दुर्लक्ष करून नाही चालत. अशावेळी खरतर संघभावना महत्वाची. अर्थात बाकीच्या मंडळींनी त्यावर काही आक्षेप घेतला नाही. सगळी तयारी असून सुद्धा उंबरा राहिला याचं थोड वाईट वाटले पण हरकत नाही, जे होते ते चांगल्यासाठीच या मताचा मी. असो पुन्हा येणे होईलच, डोंगर कुठे पळून जात नाही शेवटी माणसे महत्वाची. आधी म्हणालो तसे People oriented.
आता प्रश्न होता ते पुढे काय ? कोंढवळात जाऊन जेवण करून रानशीळ घाटाने खाली परत जसे मी गेल्या आठवड्यात केलं होतं. पण रानशीळ घाटाने उतराई साठी आमच्यातले काही जण फारसे खुश नव्हते. यावर आमची चर्चा सुरू असताना, ईश्वर काकांनी केंगळे मामांचा इंटरव्ह्यू घेतला. मग आता एखादा दुसरा मार्ग किंवा रानशीळला पर्याय यावर खलबत चालू असताना, केंगळे मामांनी ‘हिरड्याचं दारा’ बद्दल सांगितलं. नवीन वाट म्हंटल्यावर आमचे सर्वांचे चेहरे फुलले. दारा घाट चढताना मामांनी याच वाटे बद्दल सांगितलं होतं. पूर्वी अर्थातच जेव्हा वाहतुकीची फारशी साधन नव्हती त्यावेळी कोंढवळ मधली ग्रामस्त खांडस भागात जाण्यासाठी भीमाशंकर न जाता परस्पर या वाटेने ये जा करत. दारा घाट आणि रानशीळ या मध्ये असणारी ही वाट पदरात रानशीळच्या वाटेला मिळते. सध्या फार क्वचित कुणी गुराखी अथवा रानांत शिकारीसाठी सोडले तर बाकी कुणीही या वाटेने जात नाही, याचा पुरेपूर प्रत्यय आम्हाला पुढे आलाच. थोडा फार सोबतचा सुका खाऊ पोटात ढकलून मामांच्या मागे निघालो. घाट सुरु होण्याआधी वाटेवर तळ आहे असे मामा म्हणाले त्यामुळे तिथेच जेवण करायचं ठरले.
कोंढवळकडे न जाता पुसटशी उजवी वाट धरली. वाट माथ्यावरच्या दाट रानात शिरली, अस्ताव्यस्त पसरलेल्या करवंदाच्या जाळ्या, मोठमोठ्या वेली, काटेरी झुडुपे आणि पायाखाली गर्द पाचोळा.
पुढे उंच कारवीचा टप्पा त्यातून बाहेर येताच पुन्हा जंगलात शिरली. पण एक मात्र खरं या भागात भीमाशंकर अभयारण्य अगदी नावा प्रमाणे चांगलेच बहरलेले चारही दिशांना जंगलाने वेढलेल्या टेकड्या.
जंगल पुन्हा थोडे मोकळवन, पुन्हा जंगल मग मोकळवन असे दोन चार वेळा झाल्यावर वाट दाटरानातून उतरू लागली. याच भागाला सांबर शिंग्याच रान असेही म्हणतात. वाटेत मध्येच दगडावर बाणाची खुण दिसली तसेच दोन तीन ठिकाणी सुक्या काटक्यांचे वेटोळे ते पाहून मामा म्हणाले, पावसाळ्यात रानडुक्कर खालची माती उरकून त्या काट्याकाडक्यांच्या आत स्वतः जाऊन बसतात.
उतरण संपवून वाट ओढयाजवळ आली. घड्याळात पाहिलं तर एक वाजून गेला होता. ओढा भर जंगलात असनुही कोरडा पडला होता.
आम्हाला तिथेच थांबवून मामा पुढची वाट शोधायला गेले, कधी काळी मामांनी ही वाट केली होती. आता तर फारशी कुणी वापरत नाहीच मुळी त्यात जंगल वाढलेलं त्यामुळे थोडी शोधा शोध आलीच. आम्ही तिथेच विश्रांती घेत बसलो, दहा पंधरा मिनिटे झाली तरी मामांचा पत्ता नाही. माझ्या मनात लगेच पुढचे तर्क वितर्क जर वाट नाही मिळाली तर पुन्हा कोंढवळ जावे का ? नाहीतर मग आहेच रानशीळ. तसेही दिशेनुसार समोरच्या टेकडीवरून कोंढवळ भीमाशंकर रस्ता असणार हे तर पक्के होते आणि हाच ओढा कोंढवळच्या दिशेने जात होता. काही वेळात मामा आले. 'चला आहे वाट तळ्यापाशी निघते', म्हणाले. हाच ओढा उजवीकडे ठेवत जंगलातल्या टप्प्यातून बाहेर आलो पुढे चांगली मळलेली पायवाट.
डावीकडे कोंढवळच्या दिशेने जाणारी वाट ती सोडून उजवीकडे थोडक्यात पश्चिमेकडे वळालो. ओढ्याच्या संगतीने पुढे मोकळ्या माळरानात अगदी वन विभागाने पध्दतशीरपणे तयार केलेली वाट, मध्ये पाणी अडवण्यासाठी बांधलेले दगडी बांध, तसेच खोदलेले चरे. वीस एक मिनिटाच्या चालीनंतर तळ्याजवळ आलो.
3.jpg
या वाटेवरचा बारामाही शुद्ध पाण्याचा एकमेव साठा. जवळच पंगत मांडली जेवण अर्थातच घरातून आणलेले.
जेवण उरकून गप्पा टप्पा आणि थोडा आराम करेपर्यंत केंगळे मामा घाटाची सुरुवात कन्फर्म करायला गेले. मामा परत आल्यावर म्हणाले चला पटापट थोडी अवघड वाट आहे. हे ऐकल्यावर आता पर्यंत रिलॅक्स मूड मध्ये असणारे आम्ही तडक भानावर आलो. वाटत होते तासाभरात पदरात उतरू मग थोडं मागे फिरून करवंद दाराच्या वाटेने पायथ्याच्या जंगलातून आडवे जात भोमळवाडी गाठू. तरी निघेपर्यंत तीन वाजून गेले होते. दहा पंधरा मिनिटे पठारावरून चालल्यावर वाट जंगलात शिरून चढणीला लागली. या भागात कारवीचे रान त्याचा नेहमीचा मस्त ओळखीचा गंध खरंच खूप छान वाटत होते. वाट डावीकडे वळून थेट बाहेर आली.
दूरवर नांदगाव बाजूचे कोकण आणि खाली अडीच तीनशे फुटांवर झाडी भरला पदरतला टप्पा. मनात विचार आला गणपती घाट आणि रानशीळ घाट या मधील पदर तर साधारण निम्म्याहून अधिक उतराई केल्यावर लागतो मग हा कोणता? असो..वाट उतरणीला लागली सुरुवात पाहून मला नाणदांड घाटाची आठवण झाली, अगदी तसाच घसारा आणि थोडं दृष्टीभय. कमरे एवढ्या वाढलेल्या गवतातून अरुंद घसरड्या वाटेने अर्ध्या तासात पदरातल्या जंगलात आलो.
वाटेत काही ठिकाणी झाडावर प्राण्यांच्या शिंगांचे अगदी ओरखडा तसे निशाण तसेच मातीत पायांचे ठसे मग विष्टा.
आडवे जात तो जंगलाचा टप्पा पार करून बाहेर आलो आम्हाला थांबवून मामा पुढची वाट शोधायला गेले. आता मात्र हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही हे कळून चुकलं. जोडीला नारायण अंकल व ईश्र्वर काका सारखे अनुभवी मातब्बर तसेच सोबतचे इतर खंबीर भिडू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मामा, कसेही असले तरी आता आमचा त्यांच्यावर पूर्ण भरवसा होता. काहीही करून हा माणूस बरोब्बर उतरवणार. मामा परतल्यावर दरीच्या कडेला आलो तो पलीकडचा नजारा पाहून डोळेच विस्फारले. दूरवर डावीकडे नागफणी टोक त्याखाली पदरगड अर्धवट लपलेला. भीमाशंकर चा टॉवर तसेच रानशीळ घाटाची झाडी भरली वाट आणि खाली मुख्य पदर. त्याच पदरात हिरड्याचं दाराने आम्हाला उतरायचं होतं. वाटेत हिरड्याची झाडी बरीच म्हणून हे नाव. पण सरळसोट उतरलेले कडे आणि तीव्र उतार असणाऱ्या घळी पाहून उतरायचं कसं हा प्रश्न पडला. मामा आणि अंकल पुढे गेले त्यांच्या मागोमाग आम्ही.
सुरुवातीला गवताची घसरडी वाट मग कातळात आडवी मारत खालच्या टप्प्यात उतरलो. इथून पुढची वाट आणखी तीव्र उताराची,वाळलेले गवत खाली भुसभुशीत मातीची ढेकळं आणि जोडीला दृष्टीभय.
बहुतेक ठिकाणी बुड टेकवून उतरावं लागलं, पुढे गेलेले मामा जेव्हा त्यांची चप्पल हातात घ्यायचे तेव्हाच आम्ही काय ते समजून जायचो.
दोन मोठे कातळ टप्पे अत्यंत सावकाश पार करून एके ठिकाणी विसावलो तेव्हा जरा बरे वाटले. पण त्या कातळात ठीक ठिकाणी होल्ड्स होते आणि त्याजोगे ही वाट नक्कीच कधी काळी वापरती असणार यात शंकाच नाही. थोड आडवे जात नाही तो पुन्हा उतरण सुरू अगदी ६०-७० अंशातली भरपूर घसारा युक्त अशी. आजुबाजुला नजर फिरवली पण पदरात उतरणारी एखादी सोंड किंवा घळ असे काहीही दिसत नव्हते, खाली तर उतरत होतो पण पदरात जाणार कसे कारण दोन्ही बाजूला सरळसोट कडे. पुन्हा मामा वाट पाहायला गेले, लगेच विचार आला वाट नाही मिळाली तर, पुन्हा या वाटेने वर जायचं वेळ भराभर जातोय मग तर घाटात ना गावात असे जरी मनात आले तरी कुणाला बोलून दाखवले नाही. अर्थात तसे झालेही नाही, मामा परत आले ते ग्रीन सिग्नल दाखवत.
त्यांच्या मागोमाग एका टेपाडाला वळसा मारल्यावर पलीकडे डाव्या हाताला सोंड पदरात उतरताना दिसली मग जरा हायसे वाटले.
पण तिथं पर्यंत जाण्याचा मार्ग काही सोपा नव्हताच कड्याला बिलगून जेमतेम पाऊल मावेल एवढी जागा, वाट कसली मामा जात होते म्हणून जायचे असे. असा एक्सपोज ट्रेव्हर्स मारुन पुन्हा तीव्र उतरणं आणि समोर दरी.
उतरणं आणि घसरण हे तर समीकरणच झाले होते. काठी आणि वेळ प्रसंगी बुड टेकवून त्यावर सहज मात करता येते.
अशाच एका अवघड वळणावर हेमंत.. हा ट्रॅव्हर्स तर खूपच अरुंद जेमतेम पाऊल तेही अर्धवट कसंबसं मावेल इतकीच जागा बाकी मामला एक टप्पा आऊट.
अशा ठिकाणी थोडी चूक हि फार महागात पडू शकते. असे पूर्ण एक्सपोज ट्रेव्हर्स आणि तीव्र उताराचे टप्पे एक संपला की दुसरा हजर.
एक दोघांना थोडा त्रास झाला पण सांभाळून घेत सावकाश उतरत एकदाचे सोंडेवर आलो. सुर्य मावळत होता घड्याळात पाहिलं तर सहा वाजून गेले होते. सोंडेची उतराई इथेही घसारा सोबतीला होतात पण उतार फारसा तीव्र नव्हता, थोडक्यात दगडापेक्षा वीट मऊ असा प्रकार.
सोंडेची उतराई अपेक्षेपेक्षा जास्त वेळ खाऊ निघाली. बराच वेळ उतरल्यावर जेव्हा झाडांचे शेंडे जवळ भासू लागले तेव्हा समजले की बास झालं, एक पाडाव पार केला. वाट थेट रानशीळ घाटाच्या पदरातल्या वाटेला एका मोठ्या आंब्याच्या झाडाजवळ येऊन मिळाली. ‘ड’ गटातील गणित बरोब्बर सोडवल्यासारख सगळ्यांच्या चेहऱ्यावर भाव अगदी तसेच. मोठ्या दगडावर विश्रांती घेतली, संधी प्रकाश सर्वत्र पसरला होता घड्याळात सात वाजून गेले होते. अर्थातच त्यामुळे कुणीही करवंददारा घाटाचे नाव ही काढले नाही. गप गुमानान रानशीळची पदरातली आडवी वाट चालू पडलो. उशीर झाला म्हणून वाटेत असताना बांगर भाऊंचा फोन आला त्यांना काळजी वाटली की उंबरा उतरायला एवढा वेळ कसा लागला की काही गडबड झाली, त्यांना सांगितलं, ‘रानशीळच्या पदरात आहोत हिरड्याच्या दाराने उतरलो’. हे ऐकून ते आणखी आश्र्चर्यचकित झाले. टॉर्च बाहेर काढून दगडी घाटाची सुरुवात केली. मध्ये एक दोन थांबे घेत जंगलाच्या बाहेर येत मुख्य वाट सोडून उजवीकडे वळून ओढा पार करून भोमळवाडीत पोहचेपर्यंत नऊ वाजून गेले. केंगळे मामांनी त्यांच्या घरी चहा साठी नेले नंतर जेवणाचा आग्रह पण नम्रपणे नकार देऊन मामांची गळाभेट घेऊन निघालो. खरंच अनपेक्षित अश्या नवीन वाटेने अनुभवाची श्रीमंती आणखीनच वाढली, सह्याद्री कृपा जाहली..

योगेश चंद्रकांत आहिरे
अधिक फोटो साठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/02/dara-ranshil-hirada.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानलं राव तुम्हाला आणि तुमच्या भटकंतीला. लिहिलेही अतिशय सुरेख. अजुन फोटो हवे होते.
पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा!