शुभ सकाळ

Submitted by विठ्ठल_यादव on 10 May, 2018 - 01:59

लघुकथा लिहण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे , घाई घाईत न वाचता २ मिनिटे वेळ काढून वाचावं हि विनंती. चुकांसाठी क्षमस्व.

लघुकथेचा नाव : शुभ सकाळ

" शुभ सकाळ "

दुपारचे २ वाजले होते , नॉर्मल ऑफिस वर्किंग डे होता , मी जेवण आटपून माझ्या कामाला लागलोच होतो , तितक्यात फोन ची रिंग वाजली , पाहताच काय वडिलांच्या मोबाइल वरून कॉल आला होता , सहसा वडिलांचा कॉल सकाळी आणि संध्याकाळी येतो , दुपारी त्यांच्या आरामाची वेळ असते , मी हि कुतुहलाने
फोन घेतला. तिकडून आवाज आला , " मामाssssssss मामाsssssssss!!!!! माझी परीक्षा संपली, मला सुट्टी मिळाली!! मी घरी आलोय , तु कधी येणार आहेस रे पुण्याहुन , ये लवकरsss "

हा आवाज होता माझ्या भाच्याचा , समर्थ चा ... स्वभावाने एकदम खोडकर , चंचल , टणाटणा उड्या मारणारा,१२ महिने २४ तास दात दाखवून हसणारा, तितकाच प्रेमळ आणि निरागस मुलगा, मामा त्याचा खूपच लाडका , आंघोळ घालण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याला मामाच लागतो. आता उन्हाळ्याच्या सुट्टीला मामाच्या घरी आला होता.

समर्थ शी फोन वर बोलून मी त्याला आश्वासन दिले की येत्या वीकएंडलाच घरी येईन. मग काय साहेबांचे रोज दिवसातुन ५ -६ कॉल्स , मामा काय करतोय , जेवलास का, झोपणार कधी , घरी कधी येणार ?? वगैरे वगैरे , काही पाठ असो वा नसो पण मामा चा मोबाईल नंबर त्याला तोंड पाठ.

असाच एकदा कॉल आल्यावर मी त्याला विचारणा केली , " समर्थsss!! सांग तुला पुण्याहून काय आणू ?"
समर्थ ला जास्त काही सुचले नाही त्याने फक्त " सापशिडी आन" एवढेच बोलला आणि म्हणाला " मामाssss पिशवी आहे ना तुझ्या जवळ खेळणी घेऊन यायला ??" खूप खुश झालोय हे न-दाखवता, उगाचच प्रश्न करून सगळं नॉर्मल आहे असा त्याने दाखवला.... मी पण सांगितलं कि " हो आहे पिशवी .. आणेन मी त्यात खेळणी .......".

एके दिवशी ऑफिस चं काम लवकर आटपून मी खेळण्याच्या दुकानात गेलो , सोबत खेळणी ठेवण्यासाठी एक पांढरी कापडी पिशवी पण घेऊन गेलो .... उन्हाळ्याच्या सुट्टीत करमणुक व्हावी अशी खेळणी घ्यायची होती , म्हणून मी सापशिडी , लुडो , चित्रकलेची वही , वॅक्स क्रेयॉंस, क्ले आणि क्रिकेट बॉल विकत घेतला आणि खाऊ म्हणून त्याला आवडते ती आंबा बर्फी, किंडर जॉय, जेम्सच्या गोळ्या आणि कोकोनट कुकीज घेतल्या. मी सोबत घेऊन गेलेली पांढरी कापडी पिशवी गच्च भरली.

घरी जायच्या आधल्या रात्री मी समर्थ ला फोन लावला आणि सांगितले " बाळाsssss , मी उद्या पहाटे ५ वाजता येणार आहे , आणि येताना तुझ्या साठी गम्मत आणि खाऊ पण आणणार आहे , माझ्या पांढऱ्या पिशवीत सगळं ठेवलं आहे मी" , हे सगळं ऐकून समर्थ पण खुश झाला होता , मामा खेळणी आणि खाऊ घेऊन येतोय हे ऐकून त्याचा आनंद गगनात मावेना ..... समर्थ ने घरात सगळ्यांना सज्जड दम दिला " मामाच्या पांढऱ्या पिशवीला कोणी हात लावायचा नाहीssss "

मी लाल एसटीचा रात्रभर प्रवास करून पहाटे ४.४५ ला सोलापूर मध्ये पोहचलो ... एरवी गझबजलेलं एसटी स्टँड आता थोडस शांत होता , बसेसची रेलचेल कमीच होती , शेजारीच चहा कॅन्टीन वाल्यांनी चहाची टपरी नुकतीच चालू केली होती , चहाचा सुगंध दरवळत होता .. मी लगतच्या बाकड्यावर बसून रिक्षाची वाट बघू लागलो.. २च मिनिटात पांढरे शुभ्र कपडे घातलेला , कपाळावर भगवा नाम ओढलेला , कुरळे केस असलेला रिक्षा वाला माझा समोर उभा होता , त्याने विचारले " भैय्याsss, कुठं सोडू सांग तुला? " मी त्यांना पत्ता सांगितला , भाडं ठरवून आम्ही निघालो ...... रिक्षा जोरात निघाली , उन्हाळ्यात पहाटेचा थंड वारा आणि रिक्षा मध्ये लागलेली भक्ती गीते मन सुखावणारी होती, मन एकदम प्रसन्न झाल होत.

रिक्षावाल्या सोबत गप्पा मारता मारता माझ्या नकळत लक्षात आल कि खेळणी आणि खाऊ ने भरलेली पांढरी पिशवी कुठे दिसत नाहीये .. मी मोबाईलचा टॉर्च ऑन करून शोधण्याचा प्रयत्न केला पण पिशवी कुठे दिसत नव्हती , माझा जीव आता कासावीस होऊ लागला होता .. मला असा वाटलं कि मी पिशवी चहा टपरी जवळच्या बाकड्यावरच विसरली असावी कदाचित .....
" दादाssss दादाsss !!!!!! रिक्षा वळवा , रिक्षा वळवा माझी पिशवी राहिली आहे स्टँड वर " माझ्या आवाजातला मृदुपणा ओळखुन एका क्षणाचाही विलंब ना करता , एकदम फिल्मी स्टाइल ने रिक्षावाल्याने रिक्षा वळवली.

" काय महत्वाच समान होत काय त्यात ???? " रिक्षा वाल्याने विचारपूस केली ..

२ सेकंद विचार करून मी म्हणलो "खूप महत्वाच सामान होत". असं म्हणता म्हणता माझ्या डोळ्या समोर समर्थ चा चेहरा येऊ लागला होता , मी समर्थ ला आश्वासन दिला होता कि मी त्याच्यासाठी खेळनी आणि खाऊ घेऊन येतोय , त्याने त्याच्या छोट्या मित्रांना , त्याच्या पप्पाना खूप आनंदने सांगितलं होत कि मामा खेळणी घेऊन येतोय , मी घरी पोहोचल्यावर जर समर्थ ला खेळण्याची पिशवी दिसली नाही तर त्याचा हिरमोड होणार होता आणि त्याचा पडलेला चेहेरा मी कदापि पाहू शकणार नव्हतो.

आता आम्ही स्टँड जवळ येऊ लागलो होतो , ना राहून मी रिक्षाच्या बाहेर डोक काढून पिशवी दिसतीय का ते पाहत होतो .. अंधार असल्यामुळे पिशवी दिसायचं काय नाव घेत नव्हती , बाकड्या जवळ येताच , रिक्षा थांबण्याचा विलंब ना करता संथ धावत्या रिक्षातुनच मी उडी टाकली ..... आणि बकड्याकडे पाहिलं , बाकड्यावर पांढरी पिशवी तशीच होती ....... हा क्षण खूप खूप सुखावणारा होता , रणरणत्या उन्हात माठातील थंड पाण्याचा घोट घेतल्यावर मन कसं तृप्त होतं अगदी तसं.........

पिशवी घेऊन आम्ही परत निघालो , पिशवी ला कुशीत घेऊनच बसलो होतो मी. १० मिनीटांत आम्ही घराजवळ पोहचलो .... रिक्षा वाल्याने ना-नु न करता पिशवी मिळवण्यासाठी जी लगबग केली होती त्यामुळे रिक्षावाल्यासाठी माझ्या मनात रिक्षावल्यासाठी आदर वाढला होता .. ठरलेल्या भाड्यापेक्षा मी ५० रुपये जास्तीचे देऊ केले .... आपण दाखवलेल्या तत्परतेची जाणीव प्रवाश्याला आहे हे पाहून रिक्षावाला पण सुखावला होता , त्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहण्या सारखा होता.....

" टिंग टॉंग " मी दाराची बेल वाजवली. आई ने दार उघडलं , नुकतेच तिने योगासने पूर्ण केले होते बहुतेक , आपल्या मुलाला घरी आलेलं पाहून झालेला आनंद तिच्या चेहर्यावर पाहताच दिसत होता. आईच्या पदरा मागे कोणी तरी चुळबुळ करत होता .. मला कळलं होतं कि समर्थ मागे लपला होता ...
"भोssssssssss" समर्थ ने आवाज केला .... मी पण घाबरल्यासारखा केलं.. आणि एकच हशा पिकला .. आम्ही दोघे एकमेकाकडे पाहून हसत राहिलो .. पळत पळत येऊन त्याने मला मिठी मारली.

आता समर्थ ला कुतूहल होतं ते खेळण्याच्या पिशवीचा.. मी हि मिश्कील पणे पिशवी मागे लपवून ठेवली .. "मामाssss , मागे काय लपवतोय , सापशिडी आहे ना .. दाखव कि .." मी त्याला पिशवी देऊ केली ..

पिशवीची गाठ सोडताना पिशवीत काय काय असेल याचं कुतूहल आणि खेळणी मिळाल्याचा आनंद मी समर्थच्या चेहऱ्यावर पाहू शकत होतो , हे पाहणे माझ्यासाठी एक पर्वणीच होती.. जर मी पिशवी गमावली असती तर हा अमूल्य क्षण मी गमावून बसलो असतो ..

रिक्षावाला चांगली बोहनी झाल्याने आणि जास्तीचे पैसे मिळाल्यामुळे खुश होता , आपल्या मुलाला दारात पाहून आई खुश होती , समर्थ ला मामा आणि खेळणी पाहून आनंद झाला होता आणि ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी पण सुखावलो होतो.

" होय , ती एक आनंददायी सकाळ होती !!!! अशी सकाळ सगळ्यांना अनुभवायला मिळो हे प्रार्थना.

शुभ सकाळ "

- विठ्ठल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिली आहे कथा. आपली महत्वाची वस्तू एस टी स्टॅण्डवर राहिल्यावर जीवाची खूप घालमेल होते आणि ती वस्तू परत तिथेच तशीच्या तशी मिळाल्यावर जीव भांड्यात पडतो. हा खरोखर सुखाचा क्षण असतो. अशावेळी आपल्याला मदत करणारी व्यक्ती आपल्यासाठी देवदूतच असते.

मस्त. खरंच पिशवी आणि पिशवीतल्या सामानापेक्षा सगळ्यांचा आनंदी चेहरा गमवावा लागला नाही हे भाग्यच.

मस्त. खरंच पिशवी आणि पिशवीतल्या सामानापेक्षा सगळ्यांचा आनंदी चेहरा गमवावा लागला नाही हे भाग्यच. >>> +११११

खूपच छान लिहिलंय... Happy
पु.ले.शु।
>>>>> लघु कथा पहिल्यांदाच लिहली आहे मी आणि माय बोली वरती अपलोड केली आहे .. पु.ले.शु चा लॉंग फॉर्म काय आहे .. खूप ठिकाणी पहिले आहे मी पण मला समजले नाही ...

गोल्डफिश , अनघा , मेघा , आनंद , किट्टू21 ,सायुरी, अधांतरी , राया ,किल्ली , अभिजीत, फॉरएण्ड , पुरंदरे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार , तुमचे प्रतिसाद प्रेरणा देणारे आहेत . धन्यवाद

व्वा अप्रतिम
माझा भाचाही असाच आहे. मी दिलेल्या छोट्या भेटवस्तुंचा ही त्याला खुप आनंद होतो.