दुःख

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 4 May, 2018 - 07:23

ते Subjective म्हणतात तसं असतं...ज्याचं त्याच वेगळं...त्याच्यापुरतं असलेलं...
असं अलगद येतं....
फारसा गाजावाजा नसतो त्याचा..सगळ्यांना सांगून नाही येत ते....
बऱ्याचदा ते सगळ्यांना सांगण्यासारखं नसतंच..ते एकट्याचंच असतं,एकट्यासाठी असतं !
हे दुःख भेदभाव नाही मानत...जेवढं बंगल्यात असतं तेवढंच झोपडीत...जसं सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर येतं तसं साबणाच्या वडीसारख्या गुळगुळीत चेहर्यावरपण ...त्याला कुठलाच भेद मान्य नाही...त्याची मात्रा कमीजास्त होत असते..पण ते असतं,नेहमी,प्रत्येकाच्या मनांत,खोल कुठेतरी कोपऱ्यात...मग हळूहळू सवय होते त्याची,ते नसेल तर चुकल्यासारखं वाटायला लागतं,अधांतरी व्हायला लागतो आपण...

दुःख कधी एकेकटं नाही येतं... रूप घेऊन येतं,मायावी राक्षसासारखं...
गरिबी आणि दारिद्र्याचं रूप,अपूर्णपणाचं रूप,आठवणींचं रूप,अपेक्षांचं रूप,कळतेपणाचं रूप....
हे दुःख कवी,लेखक,कलाकार यांना जिवापेक्षा प्यारं !
त्याच दुःखाची मशागत करून पीक काढत असतात ते आपल्या कलाकृतींचं !
मग प्रत्येकाची शैली तयार होते ते मांडण्याची...
ते जेवढं नेमकेपणानं मांडता येईल तेवढं ते जास्त पोचतं...
प्रत्येकाशी वेगवेगळी ओळख करून घेत हे...
पलीकडच्या चिंट्याला बॅट हरवल्याचं दुःख,मिनीला बाहुलीचा पाय मोडल्याचं दुःख,श्वेताला स्कॉलरशिप क्लाससाठी लवकर उठण्याचं दुःख,अनुजला बारावीसाठी क्रिकेट सोडावं लागल्याचं दुःख,प्रिया ताईला समोरच्या खिडकीतून बघणारा कैलास गाव सोडून मुंबईला गेल्याचं दुःख,राहुल दादाला आशु वाहिनी सोबत नसल्याचं दुःख,साने काकांना शाळेतून रिटायर्ड झाल्याचं दुःख आणि आजोबांना स्वतःच असं काहीच न राहिल्याचं दुःख...
ते सहन करण्याची प्रत्येकाची ताकद वेगळी..
याला वयही मान्य नसतं..ते असतं तर त्या आठ महिन्याच्या बाळाच्या आयुष्यातून आई काढून घेऊन त्याच्या आयुष्यात ते कायमच येऊन बसलं असतं का ?
काहींनी हे दुःख पुरवण्याचं कंत्राटच घेतलेलं असतं..
खून,मारामाऱ्या,बॉम्बहल्ले,बलात्कार,फसवणूक हीच माध्यमं असतात त्यांची ते पुरवण्याची...
बाऊ करतात काहीजण याचा आणि फक्त सहानुभूतीवर जगायची घाणेरडी सवय लावून घेतात स्वतःला...
काही असतात खमके,जे याच्यासमोर मान तुकवायला तयारच नसतात,उभे राहतात पुन्हापुन्हा डोळ्यातडोळे घालून...
दुःख हे मार्केटिंगसाठी अगदी उत्तम टूल !
माहेरच्या साडीचा अक्खा इतिहास जाणतोच आपण सगळे...
याच्याच भरवश्यावर तयार होतात रंगीबेरंगी बाटल्या आणि रिकाम्यादेखील होतात ग्लास मध्ये तितक्याच झटपट रोजच्यारोज...
तात्याराव शिरवाडकर,गडकरी,Shakespeare…
किशोर कुमार,कुमार सानू,रफी,अरिजित सिंग आणि दिलीप कुमार,अमिताभ बच्चन,शाहरुख,रणबीर कपूर हे Brand Ambassador याचे...
प्रेमाचा आणि दुःखाचा घनिष्ठ संबंध !
प्रेम नसेल तर दुःख असतंच...पण असेल तर नक्कीच दुःख असतं !
ते एकदा वाट्याला आलं कि ते व्यक्त करायची पद्धतदेखील प्रत्येकाची वेगवेगळी...
रडतात काहीजण शांतपणे तर काहीजण लहान मुलासारखे अगदी आवाज करत..काहींचं रडणंच विसरलेलं असतं..त्यांना सवय झालेली असते त्या दुःखाला साठवून ठेवण्याची...डोळ्यातून खूप बोलत असतात अशी लोकं !

ते असतं त्याच्या जागी..
तुम्हाला जाणीव करून देत असतं त्याच्या असण्याची...
त्याच्याशिवाय काहीच नाही पूर्ण होऊ शकत...
कारुण्याची किनार विनोदाला एका उंचीवर न्हेऊन ठेवते......

ते असतंच...असायलाही हवं,त्याच्याशिवाय मजा नाही...
त्याच्याशिवाय कशालाच किंमत नाही,अगदी आनंदालाही !
.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users