सुटका भाग २

Submitted by somu on 30 April, 2018 - 14:00

-- सुटका भाग २ --

"कुमार, जर बाहेर येतो का ? ", एका स्त्रीचा आवाज कुमारच्या कानी पडला.

कुमार दार उघडून बाहेर गेला. त्याला बाहेर एक स्त्रीची धूसर आकृती दिसली.

"निशाताई " कुमार चाचपडत बोलला....

"हम्म, मीच आहे. मघाशी नाही बोलले कारण तुम्ही सर्वजण होता तिथे " धुक्यातून आवाज आला.

"ताई, मग माझ्याशीच का बोलत आहात तुम्ही ?" कुमारने विचारले

"मगाशीच, तू बोलला ना की मला न्याय मिळवून देशील म्हणून. आणि मला तुझी त्यामागची भावना योग्य वाटली म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले " निशाने कुमारच्या प्रश्नाला उत्तर दिले.

"आभारी आहे ताई माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून, पण तू त्या दिवशी बोलली की तुझा मर्डर झाला पण सदा बोलला की ती आत्महत्या होती. नक्की काय झाले होते ? "

निशा थोडी शांत होत उद्गारली " शांतपणे, विचारपूर्वक केलेला खुन होता तो, ज्याला आत्महत्या असे नाव दिले गेले"

"नाही समजलो मी "

"सांगते सर्व, "

"अरे माझ्या लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न बाळगून मी या गावात आले. राजेंद्रनी मला पती पेक्षा मैत्रिणीसारखे वागवले. चांगला सुखी संसार होता माझा.. लवकरच आमच्या सुखी संसाराच्या वेलीवर फुल उमळणार होते पण... "

"पण काय ताई " कुमार गोंधळून बोलला

"नजर लागली आमच्या संसाराला "

"कोणाची "

"आबासाहेब इनामदार, तालुक्याचे आमदार"

"नक्की काय झाले ताई"

"निशा, 4 महिने पूर्ण झाले आणि पाचवा महिना सुरू झाला आता, तुला भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे आता" डॉक्टर सुरेखा म्हणल्या.

"हम्म, आता कधी येऊ चेकअप साठी येऊ"

"पुढील आठवड्यात 13 तारखेला ये, एक टेस्ट करायची आहे. " डॉक्टर उद्गारल्या.

"सांगा डॉक्टर, कोणती टेस्ट करून येऊ"

"बाहेरून नाही, इथेच करेन मी टेस्ट. वेळ लागेल, त्या मुळे एकटीच ये, जाताना मी घरी सोडणं तुला. आणि कांही खाऊ नकोस दुपारी 12 पासून " डॉक्टर बोलल्या.

"ठीक आहे"

-------------------------------------------------------------------------------------------------------------

"हॅलो, आबासाहेब, तुम्ही सांगितल्यासारखी एक बाई मिळाली आहे. 5 महिन्याची गरोदर " थोडा वेळ थांबून डॉक्टर बोलल्या "तिला 13 तारखेला संध्याकाळी घेऊन येईन मी. तुमचे काम केलंय मी आता. आता माझी गर्भपातची केस तुम्ही बंद करायची."

"नक्की मॅडम, माझे किती कोठे काम केलंय तुम्ही " आबासाहेब खुश होऊन पुढे बोलले "त्याबरोबर, तुमच्या मोठ्या हॉस्पिटलला परवानगी पण घेऊन देईन मी"

"आभारी आहे आबासाहेब " डॉक्टर बोलल्या.

"शाम्या " आबासाहेबानी हाक मारली

"जी सरकार", झुकत शाम्या बोलला

"जैनुतला जाऊन निरोप दे, आपले काम झालय, 13 तारखेला अमावस्या आहे. पूजेची तयारी करून ठेव. आम्ही साहित्य घेऊन पोहोचतो"

"जी, सकाळी जाऊन देतो निरोप" शाम्या चाचपडत म्हणाला

"आत्ताच जाऊन ये म्हणून सांगितलंय ना एकदा" आबासाहेब गरजले

-------------------------------------------------------------------------------------------------------------

स्मशानभूमीत पाय ठेवताना, शाम्याच्या अंगात कंप सुटला होता.

"जैतून, अरे जैतून" शाम्याने साद घातली.

जैतून झोपडीतून बाहेर आला. अंगात फक्त धोतर, अंगाला चितेची राख फसलेली आणि कपाळावर कुंकवाचा मळवट हा अवतार बघून, शाम्या घाबरला.

"सरकारनी, निरोप दिलाय. 13 तारखेला पूजेची तयारी कर, सरकार, साहित्य घेऊन येतील"

जैतूनच्या डोळ्यात चमक दिसली. "ठीक आहे" जैतून बोलला आणि झोपडीत निघून गेला.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

"आलीस निशा, बरे झाले. बस थोडा वेळ, माझे पेशंट संपले की आपण टेस्ट करू. काही खाल्ले नाही ना तू ? " डॉक्टर बोलल्या.

"नाही, बसते मी बाहेर " निशा बोलली.

"अग, बाहेर नको. काही खाल्ले पण नाही तू. घरी कोणी नाही, वरती जाऊन झोप बेडरूम मध्ये. माझे आवरले की बोलावून घेईन मी" डॉक्टर बोलल्या.

"ठीक आहे" म्हणून निशा वरती जाऊन एक पुस्तक घेऊन वाचत बसली.

थोड्या वेळानी डॉक्टर स्वतः वरती आल्या. निशा उठून उभी राहिली.

"अग बस, ही एक नवी टेस्ट आहे. ही टेस्ट केली की आपल्याला समजेल की बाळाची वाढ कशी आहे " असे म्हणत डॉक्टरनी कपाटातून एक इंजेक्शन काढले.

"हे इंजेक्शन घेतले की आपण टेस्ट सुरू करू " असे म्हणत त्यांनी इंजेक्शन निशाच्या दंडात टोचले.
"पड थोडी ", निशाच्या डोक्यावर थापत डॉक्टर बोलल्या.

5 मिनिटात निशाला झोप लागली.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

"आबासाहेब, आपले काम झालंय. "

"मॅडम, आता तुमची केस आता मिटलीच असे समजा " आबासाहेब खुश होत बोलले.

"शाम्या, मॅडमकडे जाऊन घेऊन ये तिला जैतूनकडे. आम्ही पोचतो रात्री 12 ला तिथे." आबासाहेब बोलले.

"जैतून, झाली का तयारी" आबासाहेबानी जैतूनच्या खोलीत पाय टाकत विचारले.

"व्हय मालक, झालीच तयारी " जैतून उद्गारला.

एकदम भयाण वातावरण होते. खोलीच्या मध्यभागी कुंकवाची विचीत्र आकृती, त्याच्या मध्यभागी एक माणसाची खोपडी, मांडीची 2 हाडे, कसल्याश्या बाहुल्या, लिंबू वैगरे साहित्य तेथे मांडले होते. बाजूला, निशाला झोपवले होते. शेजारी जैतून नग्न अवस्थेत बसून कसले तरी मंत्र म्हणत होता.

जैतूनने आबासाहेबाना बसायला सांगितले. पुढील 3 तास तो कांही मंत्र म्हणत बसला होता.

बरोबर 3 वाजता, जैतूनने आबासाहेबांच्या हातात चाकू दिला आणि आणि सांगितले "देवी प्रसन्न झाली आहे. आता तुम्ही प्रसाद वाढा म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री झालात सरकार. सर्वजण तुमचे गुलाम होतील ".
आबासाहेबानी शांतपणे चाकू निशाच्या गळ्यावर फिरवला...

"जधावसर, माझी बायको निशा संध्याकाळपासून कोठे गेली ते परत आली नाही. तिचा फोनपण लागत नाही" राजेंद्र हताशपणे इन्स्पेक्टर अजिंक्य जाधव यांच्या समोर बसून बोलत होता.

" काळे, पाणी द्या साहेबाना. काय झाले ते नीट सांगा जर " जाधव बोलले

" सर, निशा संध्याकाळी चेकअप साठी गेली होती डॉक्टर सुनीता कडे. तिथुन परत नाही आली"

" तुम्ही, दवाखान्यात चौकशी केली का ? "

" हो, मॅडम बोलल्या की, ती सात वाजताच निघाली दवाखान्यातुन. मी सोडते म्हणाले तर नको म्हणाली"

पाण्याचा घोट घेऊन राजेंद्र रडत बोलला "कोठे गेली असेल हो माझी निशा ?"

"हे बघा राजेंद्र, आम्ही त्यांना नक्की शोधून काढू" राजेंद्रच्या खांद्यावर थोपटत जाधव उद्गारले.

"तुम्ही घरी जाऊन बघा त्या आल्या का ? त्याच्या मैत्रिणी, ओळखीच्या कडे थोडी चौकशी करा. आम्ही पण माणसे पाठवतो शोधायला."

"आणि जाताना त्यांचा फोटो देऊन जा म्हणजे आम्हाला शोधायला बरे "

-------------------------------------------------------------------------------------------------------------

"बोला काळे काय झाले ? ", झोपेतून उठत जाधव फोन घेत बोलले.

"सर, निशाची बॉडी सापडली घाटात " काळे फोनवर

"काय ??? " जाधवांची झोप उडाली

"तिने उडी मारून आत्महत्या केली " काळे पुढे माहिती देत म्हणाले

"थांबा, मी लगेच आलो तिकडे" जाधव बेडवरून उतरत म्हणाले.

"बोला काळे, कशावरून तुम्ही म्हणता की आत्महत्या होती ? " जाधवांनी विचारले

"हा शाम्या, आमदारसाहेबांचा ड्राइवर, याने स्टेटमेंट दिलय", काळेंनी शाम्याला पुढे बोलावले.

"मी काल रात्री 9 वाजता दारू प्यायला इकडे आलो होतो. थोड्या वेळाने कड्याकडे कोणीतरी बसलेले दिसले म्हणून तिकडे गेलो तर या बाई तिथे रडत बसल्या होत्या. मला बघून म्हणाल्या की इकडे येऊ नको, मला जगायचे नाही आता" शाम्या बोलला

"मी म्हणाले, आहो काय झाले ? आत्महत्या का काही पर्याय नाही"

"नाही, आता मला जगायचे नाही म्हणत तिने उडी मारली खाली "

"मला धक्काच बसला आणि मटकन मी खालीच बसलो. थोडे बरे वाटल्यावर मी पोलीस स्टेशनला फोन केला" शाम्या बोलला.

"काळे बॉडी पोस्ट मार्टिम ला पाठवा आणि याला चौकशीला घेऊन चला स्टेशनला" जाधवांनी ऑर्डर सोडली.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

"नाही हे शक्य नाही, सर आमच्यात कधीच भांडण झाले नाही, हवे असेल तर तुम्ही कॉलनीत येऊन चौकशी करा" राजेंद्र रडत बोलला.

"काल मी जायला हवे होते निशासोबत दवाखान्यात " राजेंद्र पुन्हा रडू लागला.

"काळे, मला वाटतंय आपण दवाखान्यात चौकशी करायला पाहिजे. चला आत्ताच जाऊ. देशमुख तुम्ही सुद्धा चला बरोबर" जाधव बोलले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

"हे बघा इन्स्पेक्टरसाहेब, माझ्याकडे पन्नास पेशंट येतात दररोज. मी काय सर्वजण कसे येतात कोठे जातात याची नोंद ठेवत बसू का ? " डॉक्टर चिडून बोलल्या

"आणि निशा म्हणत होती, जर मला मुलगी झाली तर घरचे त्रास देतील म्हणून, मे बी तिने बाहेरून तपासून घेतले असेल आणि मुलगी आहे म्हणून आत्महत्या केली असेल"

"काळे डॉक्टरकडून काहीच क्लू मिळत नाहीय" सिगरेटचा धूर सोडत जाधव म्हणाले.

"सर, मला वाटते या देशमुखचा काही तरी डाव असणार यात" काळेंनी शंका बोलून दाखवली.

"नाही, मला तर तो जेन्यूअन वाटला. तरी पण, तुम्ही जर माहिती काढा, कॉलनीत, ऑफिस सगळीकडे चौकशी करा, मग बघू काय होतंय ते " जाधवांनी काळेंना कामाला जुंपले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

"सरकार, आपले काम फत्ते झालाय.आता तुम्हाला मंत्री होण्यापासून कोणीही रोखणार नाही " जैतून आबासाहेबाना म्हणाला.

"जर का काम नाही झाले तर कसा पाय घालतो ते बघच तू. साहित्य गोळा करताना किती वैताग आलाय हे माहिती आहे का तुला. म्हणे 5 महिन्याची गरोदर, 4 नको आणि 6 नको . तरी बरे, डॉक्टरची केस माझ्याकडे होती म्हणून हे काम तरी झाले. " आबासाहेब मिशीवर हात फिरवत म्हणाले.

"डॉक्टर पण मस्त माल आहे रे शाम्या. बोलवूया तिला नंतर. अशी पण सापडली आहेच तावडीत " हसत आबासाहेब बोलले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

"जय हिंद सर ", काळे सॅल्युट ठोकून जाधवांसमोर उभे राहिले .

"बोला काळे, काय खबर" जाधवांनी गंभीर होत विचारले.

"सर, देशमुख एकदम सुखी जोडपे, कधी भांडण, वादावादी नाही दोघात. सगळ्याशी मिळून मिसळून वागणूक. पोरगी गरोदर असल्यापासून देशमुख एकदम काळजी घायचा तिची. सगळे शेजारीपाजारी चेष्टा पण करायचे तिची यावरून." काळेंनी एक दमात सांगितले.

"दोघांनी मुलगा झाला तर आणि मुलगी झाली तर ही नावे पण ठरवली होती. सर, पूर्ण गावात दोघांविषयी खराब बोलणारा माणूस नाही भेटला मला " काळेंनी पुढे सांगितले.

" मग, डॉक्टर असे का बोलल्या " जाधवांनी विचारले.

" सर, मला अगोदरपासून शंका होतीच डॉक्टरबद्दल, दिसती तशी नाही ती सर. तिच्यावर केस सुरू आहे अवैध गर्भपातची 2 वर्षा पासून" काळेंनी माहिती पुरवली.

" चला काळे, डॉक्टरला भेटून येऊ "

" सर, कितीदा सांगू मी तुम्हाला, मला यातील काहीच माहिती नाही म्हणून" डॉक्टरनी चिडूनच जाधवांना म्हणले.

" मॅडम, जो पर्यंत आमचा तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत सांगावेच लागेल, ती निशा शेवटी तुमच्या दवाखान्यात आली होती आणि इथून ती गायब झालीय हे लक्षात ठेवा" जाधव पोलिसी आवाजात बोलले.

" काही लागले तर परत येऊच. आणि काळे, एका दिवसात यांची पूर्ण माहिती मला हवी आहे माझ्या टेबलवर " डॉक्टरकडे पाहत जाधव म्हणाले.

डॉक्टरच्या कपाळावर धर्मबिंदू उमटलेले पाहत जाधव तिथुन निघाले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

" आबासाहेब, या इन्स्पेक्टर जाधवचे काही तरी बघा , भरपूर त्रास देत आहे. सारखे चौकशी साठी येतो दवाखान्यात " डॉक्टर सुरेखा आबासाहेबांच्या समोर बसून बोलली.

" आम्ही असताना कशालापण घाबरायचे नाही बघा सुरेखाबाई , बाकी नावाप्रमाणे तुम्ही पण सुरेख आहेत. " छद्मीपणे हसत आबासाहेब बोलले.

"तुमच्या समोर प्रकरण निस्तारतो बघा " असे म्हणत आबासाहेबांनी हाक मारली "शिंदे, SP ला फोन लावा जरा "

शिंदेंनी फोन हातात दिल्यावर "नमस्कार गवळी साहेब"

"बोला आबासाहेब, आम्हाला बोलवायचं ना, तुम्ही का त्रास घेतला फोन करण्याचा "

"अहो, त्यात त्रास कसला, आम्हाला वाटायचे तुमची माणसे आहेत की आमच्या जनतेला सांभाळायला, पण "
" पण काय आबासाहेब ? "

" ते इंस्पेक्टर जाधव जर जास्त ड्युटी करत आहेत. आमच्या डॉक्टर मॅडमला मुद्दाम त्रास देत आहेत. त्यांच्या केस बाहेर काढतो धमकी देत आहेत. आता सांगा, कसे जगायचे आमच्या जनतेने "

" हम्म, बोलतो मी जाधवशी, पण तो तसा नाही, माझा विश्वास आहे त्याच्यावर "

" अहो, विश्वासच झालं पानिपत. इसरला का "

" मला एक सांगा, ती आत्महत्या केस, माझ्या ड्राइवरने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय त्या पोरीला कड्यावरून उडी मारताना, आणि हा तपास करतोय, कसला ते सांगा तुम्ही आता " आणि थोडावेळ थांबून आबासाहेब बोलले " उगीच साध्यासुध्या कारणासाठी आम्हाला गृहामंत्र्याना फोन करायला लावू नका. समजतंय ना काय म्हणतोय आम्ही. ठेवू का फोन"

"बास का मॅडम, तुम्ही आपली माणसे म्हणल्यावर आपण तुमच्या साठी काहीपण करणार बघा , काय म्हणताय शिंदे ? "

"अगदी बरोबर " अजिजीच्या स्वरात शिंदे उद्गारले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

" जाधव, गवळी बोलतोय "

"जय हिंद सर " सावध होत जाधव उद्गारले.

" कसला तपास लावलाय तुम्ही सध्या आत्महत्या केसचा ? "

" सर, आत्महत्या वाटत नाही ही, काहीतरी पाणी मुरतंय यात "

" थांबवा हा तपास नाहीतर तुम्हाला आणि मला जिथे पाणी पण नाही मिळणार अश्या ठिकाणी जावे लागेल. समजतंय ना. "

" हो सर " हताश होत जाधव उद्गारले.

" जर त्या पोरीचा नवरा जास्त गडबड करू लागला तर त्याला घ्या आत, आत्महत्येला कारण म्हणून.. परत फोन करायला लावू नका "

-------------------------------------------------------------------------------------------------------------

" देशमुख, माझे पण हात बांधले गेलेत. मी काहींच नाही करू शकत. जर जास्त काही बोलले तर त्या डॉक्टरच्या जबानी वरून मला तुम्हाला बायकोला आत्महत्याला प्रवृत्त केले म्हणून अटक करायची ऑर्डर आहे वरून."

" इंस्पेक्टर म्हणून नाही तर एक मोठा भाऊ म्हणून सांगतो नाद सोडा सगळा, पुढे आयुष्य पडलंय तुमच्या. विचार करा एकदा परत. या आता" स्वतःच्या चेहऱ्याची नाराजी लपवत जाधव बोलत होते

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहीलंय.. आवडले दोन्ही भाग.
एखाद्या खऱ्या घटनेवर आधारित असावं असं सहज वाटून गेलं..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. Happy

Phar chan lihile ahe
Awadla bhag

PAN

Dr.SUNITA CHI Dr.SUREKHA
Zhalye

BAKI MAST AHE STORY