या घडीला माणसांना पारखावे मी कसे ?

Submitted by विशाल कुलकर्णी on 23 April, 2018 - 00:21

कोण अपुला कोण परका ओळखावे मी कसे?
काळजाचे प्रश्न अवघड समजवावे मी कसे?

कोरड्या रस्त्यात स्वप्नांचे विखुरले पंख कां,
जखम ओली, तप्त रुधिरा आवरावे मी कसे?

हासऱ्या त्या लेकराचे हरवले हसणे कुठे,
रक्त त्या डोळ्यातले सांगा पुसावे मी कसे?

ऐक वेड्या ओळखीचे चोर दिसती साजरे
या घडीला माणसांना पारखावे मी कसे ?

स्वार्थ सत्ता द्वेष मत्सर माणसांचे सोयरे
बंधुभावाचे नगारे वाजवावे मी कसे ?

शांतचित्ताने विशाला आळवावे राघवा
दांभिकांचे दंभ फुसके जोजवावे मी कसे?

© विशाल कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह अप्रतिम. वास्तवदर्शी आहे.

<<<कोरड्या रस्त्यात स्वप्नांचे विखुरले पंख कां,
जखम ओली, तप्त रुधिरा आवरावे मी कसे?>>> या ओळी खूप आवडल्या.