शब्द शब्द जपून ठेव...

Submitted by अश्विनी शेंडे on 22 April, 2018 - 10:10

शब्द शब्द जपून ठेव...बकुळीच्या फुलापरी...
पाडगावकरांच्या काही खास ठेवणीतल्या गाण्यातलं हे एक गाणं.... या गाण्याला बकुळीचा गंध आहे... मला स्वतःला बकुळ या फुलाबद्धल अनाम विचित्र भावना आहेत- मला त्याचा गंध आवडतो असंही नाही आणि आवडत नाही असंही नाही... त्यात मोग-याचा मादक दरवळ नाही, जाई जुईचा हसरा गंध नाही, सायलीची शांत सुगंधी झुळूक नाही.. चाफ्याचा टवटवीतपणा नाही, इतकंच काय गुलाबाचा दिखावूपणा पण नाही... पण त्यात काहीतरी विलक्षण आहे- जी ए कुलकर्णींच्या कथांसारखं, आरती प्रभूंच्या कवितांसारखं.... काहीतरी अनवट....
जाउदे... शब्दांबद्धल बोलायचं तर बकुळीविषयीच बोलत बसले... शब्द शब्द जपून ठेव हे त्यांनी वेगळ्या अर्थाने म्हटलं असलं तरी आपण लिहिलेले शब्द जपून ठेवावेत असं मला कधीच वाटलं नाही- ते जपून ठेवले तर त्यांनाही बकुळफुलांसारखा वास येईल असं काहीतरी वेडपट असावं माझ्या डोक्यात... म्हणजे गाण्यांबद्धल बोलतेय मी हे सगळं... मला आधीच गाणी लिहून ठेवणं जमत नाही... कविता म्हणाल तर ती मी लिहायला बसले म्हणून येतच नाही- ती प्रचंड मानी आहे... उंबरठा मधल्या स्मिता पाटील सारखी... (हे नुसतं म्हणतानाही मला इतकं छान वाटतंय- स्मिता पाटील नावाचं रसायन... उफ्फ...) ती तिला हवी तेव्हाच कागदावर उतरते,,, एरवी मी मरत असेन तर तुळशीपत्र तोंडात ठेवायला सुद्धा फिरकत नाही ती...
पण गाण्यांचं असं नाही- गाण्यांचे शब्द हे मित्रासारखे... एक फोन टाकला किंवा एसेमेस की लगेच उठून भेटायला येणारे... माझ्यापर्यंत पोचायला जो काही वेळ लागेल तेवढाच- पण असं असूनही मी गाणी साठवून ठेवलेली नाहीत.... अनेकदा निर्माते संगीतकार मला विचारतात- “तुम्ही काही गाणी लिहून ठेवली असतील तर ती पाठवा आम्हाला म्हणजे आपण त्यातूनच काहीतरी निवडू-’’
मला हे जमत नाही... मी ते तसं त्यांना सांगूनही टाकते... पदार्थ काय किंवा गाणं काय... त्याच्या निर्मिती मागचं कारण जितकं इंटरेस्टिंग तितकं ते करताना मजा येते... टेन्शन येतं, कसं होईल आवडेल ना असे प्रश्न डोक्यात येतात आणि मनाला गुदगुल्या होतात... कोणी तरी येणारे म्हणून त्या माणसाच्या आवडीचं काहीतरी बनवणं, त्याला आवडतं हे लक्षात ठेवून चिमूटभर साखर जास्त पेरणं, वेलची दाताखाली आलेली आवडत नाही हे ध्यानात ठेवून तिची पूड टाकणं... हे सगळं करण्यात जितकी मजा असते- आणि मग चपला काढताना त्या माणसाने म्हणावं- वा, दारापर्यंत आलाय हां वास...
ही सगळी मजा ते गाणं ताजं ताजं लिहिण्यात असते- सिच्युएशन काय आहे- कोणासाठी आहे- नायक कोण आहे- नायिका कशी आहे- तिला खळी पडते का, नायकाचे डोळे काळे आहेत का, त्यातलं कोणतं पात्र अबोल आहे- कोणाचं हसणं खळाळतं आहे.... कित्ती फरक पडतो एकेका तपशिलाने... प्रेमगीत जरी म्हटलं तरी ते कधी शूट होणारे यावर “चिंब भिजलेले” असेल की “ही गुलाबी हवा” असेल हे ठरतं ना... आणि ते सगळं जरी नंतर ठरलं तरी गाण्याला “ये” म्हणून बोलवायला कारण हवं की नको... ते कारण जितकं लोभस, गाणं तितकंच राजस... आणि सगळा फ्रेश मामला- आपल्याकडे स्टॉक नाही...
आज या blog साठी लिहायचं ठरल्यावर लक्षात आलं की लेख सुध्दा नाहीयेत लिहून ठेवलेले- पण काही फरक पडला नाही- नव्या उत्साहाने... नव्या उमेदीने घेतलेच की लिहायला.... कारण, ‘’कारण’’ तेवढं इंटरेस्टिंग आहे.....

-अश्विनी शेंडे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.maayboli.com/user/63198

प्रत्येक पहिल्या गोष्टीचं अप्रूप असतं. मायबोलीवर मला मिळालेली ही पहिली कमेंट - धन्यवाद अंबज्ञ.

खूप छान लिहलंय!
'ओल्या सांजवेळी' गाण्याच्या गीतकार अश्विनी शेंडे तुम्हीच का?

छान लिहीलंय, आवडलं Happy

हे लिहीलेलं 'लेखनाचा धागा' ऐवजी 'वाहते पान' मध्ये लिहीलं गेलं त्यामुळे ३० हून अधिक प्रतिसाद आल्यास आधीचे प्रतिसाद डिलीट होतील. पुढील वेळी 'लेखनाचा धागा' मध्ये लेखन करण्याची काळजी घ्या आणि या धाग्याच्या तांत्रिक बदलासाठी प्रशासकांना https://www.maayboli.com/user/1/guestbook या लिंकवर जाऊन लिहा.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा !

अहा, किती सुरेख लिहिलंय!

मला स्वतःला बकुळ या फुलाबद्धल अनाम विचित्र भावना आहेत- मला त्याचा गंध आवडतो असंही नाही आणि आवडत नाही असंही नाही... त्यात मोग-याचा मादक दरवळ नाही, जाई जुईचा हसरा गंध नाही, सायलीची शांत सुगंधी झुळूक नाही.. चाफ्याचा टवटवीतपणा नाही, इतकंच काय गुलाबाचा दिखावूपणा पण नाही... पण त्यात काहीतरी विलक्षण आहे>>>>>>>>>>> अगदी माझ्या मनातलं लिहिलंत.

धन्यवाद अक्षय दुधाळ, हो ओल्या सांजवेळी गाण्याची गीतकार मीच आहे.

आनंद खूप मोलाचा सल्ला. खूप धन्यवाद. हाच लेख आता लेखनाचा धागा मध्ये पोस्ट केला आहे. मायबोली वर नवीन आहे मी अजून. चाचपडते आहे.

देवकी.. thanks..

खूप छान लिहिले आहे. मायबोलीवर स्वागत. तुमचे गीतलेखनाचे अनुभव वाचायला आवडतील.