बाळराजे

Submitted by पूनम पाटील on 20 April, 2018 - 10:01

बाळराज्यांच्या आगमनाची चाहूल लागली आणि घरात आनंदी आनंद झाला. मुलगा होणार कि मुलगी या विषयावर चर्चासत्र घडू लागली. मी काय खायला हवं , कस चालायला हवं , किती बोलायला हवं, कधी झोपायला हवं, कोणता व्यायाम कार्याला हवा यावर मार्गदर्शन, सल्ले, चर्चा, टीका आणि बरच काही होऊ लागले. हेल्दी फूड ,व्यायाम, गर्भसंस्कार अशा अनेक गोष्टींचा मारा चालू झाला. होणार बाळ गोर , सुधृढ, उंच, बुद्धीमंत, कीर्तिवंत आणि बराच काही व्हावं या हेतूने माझ्यावर विविध experiments होऊ लागले. 'आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?' पण या लोकांना सांगून उपयौग थोडाच होतो, तर करुदेत बापडे त्यांचे प्रयत्न म्हणून मीही त्यांच्यात सामील झाले.

तर सहा महिने अशा experiments मध्ये गेल्यावर एके दिवशी बाळराजांनी पोटात पहिली लाथ मारली आणि पुढे येणाऱ्या संकटांची पुसटशीहि चाहूल नसलेले आम्ही हर्षभरित झालो. पोटात राहूनहि आपण काहीतरी करू शकतो याचा बाळराजांना प्रथम साक्षात्कार झाला. त्याचा वापर भविष्यात कसा आणि कुठे करता येईल यावर बहुदा विचारमंथन पण झालं असावं, कारण त्यानंतर त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी केल्या कि ते पोटात अखंड लाथा मारत आपला निषेध व्यक्त करत आणि आवडणाऱ्या गोष्टी केल्या कि कधी नाजुकशी गिरकी घेऊन शांत झोपून राहत. बाळाचे पाय generally पाळण्यात दिसतात पण आमच्या बाळाचे पाय पोटात असल्यापासूनच दिसू लागले.
अशा प्रकारे आमचे decisions बाळराजांच्या आवडीनिवडीना ( लाथांना ) प्रमाण मानून घेण्यात येऊ लागले .
त्यांना ऐकून कंटाळा आलेल्या गर्भसंस्काराच्या CDs, मनाचे श्लोक, देवाचे मंत्र यांची उचलबांगडी झाली आणि आम्ही हिंदी, बॉलीवूड, पॉप म्युसिकवर डोलू लागलो. हेल्दी फूड, सलाड यावर असणाऱ्या बाळराजांच्या विशेष रागामुळं त्यांना सोडचिट्टी देऊन आम्ही चटपटीत आणि झणझणीत पदार्थ खाऊ लागलो. दिवसभर ऑफिसमध्ये मर मर काम करून रात्री अपरात्री केवळ बाळराज्यांच्या समाधानासाठी शतपावली करू लागलो.
दोन तीन महिने अशी मनमानी करून झाल्यावर शेवटी एकदाचा बाळराज्यांच्या प्रत्यक्ष आगमनाच्या दिवस उगवला, पण 'पोटात राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी गर्जना करत त्यांनी बाहेर येण्यास नकार दिला. सलग चोवीस तास प्रसूतीच्या मरणप्राय कळा, रक्तस्त्राव, नाकात oxygen च्या नळ्या, हाताला सलाईन असा टॉर्चर सहन केल्यावर अखेर नाईलाजाने बाळराजेनि बाहेरच्या जगात प्रवेश केला.
सासरच्या आनंदाला उधाण आलं, माहेरच्या आनंदाला पारावार राहिला नाही, बाळाचा बाबा आनंदाने वेडापिसा झाला आणि आईची मान आनंदाने ( कि अतिशक्तपणाने ?) डोलू लागली. अखेर कुणा अज्ञात व्यक्तींच्या दानातून मिळालेल्या रक्ताने आईच्या जीवात,अंगात आणि मानेत जीव आला.पण कंबर मात्र कामातून गेली ती गेलीच. त्यानंतर कित्येक दिवस एक हाताने कंबर धरून, 'डॉक्टर मला वाचवा' म्हणत, उन्हातान्हात दवाखान्याच्या पायऱ्या झिजवण्यात गेले. अशाच एका प्रेमळ डॉक्टरनी शब्दबद्ध केलेली माझी व्यथा :

ओळखलंत का सर मला पावसात आली कोणी
कपडे होते चकाचक पण डोळ्यामध्ये पाणी,

क्षणभर बसली नंतर हसली बोलली वरती पाहून
बाळराजा पाहुणा आला, गेला पोटात राहून,

माहेरवाशीण पोरीसारखा पोटामध्ये नाचला
मोकळ्या हाती जाईल कसा, जीव मात्र वाचला,

कंबर खचली, पोट सुटले, केस सारे गेले,
प्रसाद म्हणून भरमसाठ वजन मात्र राहिले,

OT कडे पाय वळताच रडत रडत उठली,
प्रसूतीमध्ये या सगळ्याची हौस माझी फिटली ,

मोडला नाही संसार पण मोडून पडला कणा,
पाठीमध्ये सुई खुपसून नुसते लढ म्हणा!

जन्मापूर्वी आपल्याकडे फक्त लाथा मारणे हेच एक अस्त्र होते पण बाहेरच्या जगात 'रडणे' हे नवीन शस्त्र आहे, याचा शोध लागायला बाळराजेंना वेळ लागला नाही. त्यातच रात्र जागवणे हा आवडता छंद जडल्यामुळे, दिवसभर गाढ झोपून रात्री दहाच्या ठोक्याला ते जागे होत . आणि त्यांच्या उपस्थितीत चुकून आम्ही झोपण्याचा विचार केलाच तर, आपल्या निसर्गदत्त मोठ्या (कि अतिमोठ्या?) आवाजाच्या वापर करून, रडून रडून घरच काय शेजारपाजारही डोक्यावर घेतले जाई. शेवटी निद्रानाशेनी हैराण झालेल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या विनंतीवजा आज्ञेवरून घरातील लोक आळीपाळीने नाईट शिफ्ट करू लागले. या शिफ्ट मध्ये करावे लागणारे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम खालीलप्रमाणे:
१. बाळराजेंना उचलून घरात किंवा घरासमोर फेऱ्या मारणे.
२. रात्री अपरात्री घरासमोरील बागेत त्यांना मांडीवर घेऊन झोपाळ्यावर झुलत राहणे.
3. धागडधिंगा असणारी गाणी लावून, त्यावर नाचून दाखवणे.
४ . एखादी पातळ ओढणी पायापासून डोक्यावर पांघरणे आणि बाळराजेंनी पाय मारून ती बाजूला केली कि
चेहऱ्यावर आनंदमिश्रित आश्चर्याचे भाव दाखवणे.
५. मांडीवर बसवून दोन्ही हातानी पुढे मागे डुलवत बॉलीवूड गीते म्हणणे.

आपल्या पोटी जन्म घेणारे बाळ हे कोणी सामान्य व्यक्तिमत्व नव्हे, हे सांगायला आम्हाला ज्योतिषाची गरजच पडली नाही. कलेकलेने वाढणाऱ्या बाळराजांनी जेंव्हा रांगायला सुरवात केली तेव्हा त्यांना आकाश ठेंगणे झाले. जन्मताच अंगी असलेल्या स्वाभिमान आणि स्वावलंबन या गोष्टींचा वापर करण्याची हीच वेळ आहे अशी ग्वाही त्यांच्या अंतर्मनाने दिल्याने, 'जाईन तिथे रांगतच जाईन' अशी त्यांनी भीष्मप्रतिज्ञा केली. त्यामुळं घरी, शेजारी, पार्किंगमध्ये एवढेच नवे तर बाजार, रस्ते, शॉपिंग मॉल्स इत्यादी ठिकाणी हे बाणेदार बाळ आमच्यासोबत (?) रांगू लागले. सार्वजनिक ठिकाणी आमच्या आजूबाजूला बघ्यांची गर्दी वाढू लागली. राग, आश्चर्य, कुचेष्टा भरल्या नजरांनी आम्हाला घायाळ करण्यात येऊ लागले, आमच्या पालकत्वावर निष्काळजी पणाचा कलंक लावण्यात येऊ लागला. पण अंदर कि बात सांगूनही कोणाला न पटल्यामुळं आम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे सहन करू लागलो.

'पंछी, नदियां, पवन के झोके...कोई सरहद आगर इन्हे ना रोके' , तर मुझे रोखने वली कौन होती है? असा सवाल विचारात 'हे विश्वची माझे घर' हा नारा देत, विश्व explore करण्याची सुरवात आपल्या शेजाऱ्यांपासून का करू नये या निर्णयाप्रत आलेले बाळराजे आपल्या चार पायावर दुडू दुडू रांगत शेजारीपजऱ्यांच्या घरी मुक्त संचार करू लागले. सुरवातीला केवळ कौतुक म्हणून बाळराजांना घरी घेऊन जाणार्यांवर पश्चातापाची वेळ आली नसती तरच नवल...
शेजाऱ्यांच्या घरात घुसलेल्या बाळराजांनी आपल्या बाललीलांनी शेजार्यांना लवकरच जेरीस आणले. शोकेसे मधल्या वस्तू काढून इतरत्र फेकणे, शक्य झाल्यास फोडणे, किचन मधले ड्रॉवर्स उघडून भांडी ,वाणसामान बाहेर फेकणे. शेव , चिरमुरे इत्यादी खाऊ जमिनीवर ओतून घरच्या कानाकोपऱ्यात पसरवणे. वाट्या, प्लेट्स, लाटणे इत्यादी वस्तू नकळत येण्याजाण्याच्या रस्त्यावर ठेवून रोज किमान एखाद्या व्यक्तीला घसरून पाडणे या आणि अशा अनेक गोष्टींनी शेजारीपाजारी लवकरच त्रस्त झाले. पण तोवर फार उशीर झाला होता, बंद दारावर जोरजोरात ढुश्या मारणाऱ्या आणि कानठिळ्या बसवणर्या आवाजात ओरडणाऱ्या बाळराजेंना घराबाहेर थोपवणे केवळ अशक्य असल्याचे लक्षात आल्याने, हताश शेजऱ्यानी आपली दारे सताड उघडी ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला.
जन्मापासूनच वेगळेपण जपणाऱ्या बाळराजेंसाठी , निरनिराळ्या उद्योगात दिवसभर busy असल्यामुळं, शु सारख्या गोष्टींसाठी वेगळा वेळ काढणं महाकठीण काम. आणि त्यांच्या मनाविरुद्ध टॉयलेट मध्ये नेवून बसवणं 'मुश्किल हि नहीं नमुन्किन' होत. त्यामुळं इतर उद्योग करता करताच ते हा कार्यक्रम बसल्या जागी उरकून घेत. पण नवीनच जडलेल्या स्वच्छतेच्या आवडीखातर दिसेल त्या कपड्याने (बाबाचे शर्ट ते आईचे स्कर्ट पासून परकरची नाडी ते भरजरी साडीपर्यंत) पुसून हि घेत. शौचास मात्र चारचौघांच्या समोर बसणं बाळराजेंना पसंत नसे. यावर उपाय म्हणून घरातच(आपल्या किंवा शेजाऱ्यांच्या) एखादा निवांत कोपरा, जसे कि पलंग किंवा सोफ्याच्या आडोश्याला एकांतात बसुन हा कार्यक्रम ते उरकून घेत आणि काही घडलेच नाही अशा अविर्भावात, बाहेर येऊन पुन्हा खेळू लागत. त्यामुळं समस्त शेजार वर्गाला आपल्या घरातील कानाकोपऱ्यांची नित्यनेमाने कसून तपासणी करावी लागे.
आपल्या आपत्त्यांवर ओरडणे, झाडू , काठी , पट्टी, लाटण किंवा तत्सम आयुधांनी त्यांस बडवणे हाच एकमेव छंद असणाऱ्या आमच्या मातोश्री, एकामागून एक अपत्ये मोठी होऊन घराबाहेर पडल्यामुळे आणि केवळ मार खाण्यासाठी घरी कुणीच न उरल्याच्या दुख्खामुळे, निराशेच्या गर्तेत गेल्या होत्या. शिवाय मारण्याचा व्यायाम थांबवल्यामुळं हाताचं दुखणं हि माग लागलं होत. एका अतिउत्साही डॉक्टर कम counselor च्या उपदेशावरून , कापूस भरलेल्या पोत्यावर लाटण्याने मारण्याच्या उपायाने हाताचं दुखणं जरी आटोक्यात आलं तरी मानसिक स्थितीत फारसा फरक पडत नव्हता. अशा स्थितीमध्ये, बाळराज्यांच्या जन्मानंतर मात्र मातोश्रींच्या मनस्थितीत आश्चर्यकारक सुधारणा झाली. आपल्या अपत्त्यांना सळो कि पळो करून सोडण्याच्या कलेत आपलं नातवंड आपल्यापेक्षाही प्रवीण आहे, याचा त्या माउलीला कोण आंनद झाला होता!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स Angelica, atuldpatil !
@ जाई : माझ्या आईला मी असा त्रास दिला होता हे विचारावं लागेल >>> हो , विचार आईला, आम्हाला पण कळू दे तुझे लहानपणीचे किस्से Happy

मस्त लिहिलंय :D:D

या विषयावर आईच्या नजरेतून अशा विनोदी शैलीत लिहिलेलं पहिल्यांदाच वाचतोय. >> +१

एका अतिउत्साही डॉक्टर कम counselor च्या उपदेशावरून , कापूस भरलेल्या पोत्यावर लाटण्याने मारण्याच्या उपायाने हाताचं दुखणं जरी आटोक्यात आलं
>>> लोल.. हे खरं आहे का ☺️

हे खरं आहे का ☺️ >> असा कुठला डॉक्टर असता तर सगळ्यात आधी त्याला बडवला असता आमच्या मातोश्रीनी हे खरंय ...☺️

मस्त लिहिलंय Happy
या विषयावर आईच्या नजरेतून अशा विनोदी शैलीत लिहिलेलं पहिल्यांदाच वाचतोय. >> +१

Pages