अशी सोच आहे

Submitted by निशिकांत on 20 April, 2018 - 01:50

असो सावली, ऊन जगतोच आहे
सदा खुश असावे अशी सोच आहे

कशाला करावी फिकिर वादळाची?
तसा आतल्याआत खचतोच आहे

उधारीत का सुख, नि नगदीत दु:खे?
जगावे कसे? प्रश्न उरतोच आहे

जरी प्रश्नचिन्हात अस्तिस्त्व देवा
तुझी आरती रोज करतोच आहे

जुनी कागदी नाव भिजलीच नाही
तरी बालपण रोज स्मरतोच आहे

न करताच पापे घडा का भरावा?
अशी चित्रगुप्ता! मनी बोच आहे

कसा कावळा आज पिंडास शिवला?
जरी आपुल्यांच्यात फसलोच आहे

अता काय झाकू? जगापासुनी या
नको मी तसा आज दिसलोच आहे

हवे ते तसे का कधी होत नाही?
तुझे प्राक्तना खेळ बघतोच आहे

तुला एवढी काय "निशिकांत" चिंता?
प्रभू अन्न देतो, जिथे चोच आहे

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users