भयभीत

Submitted by आनंद. on 14 April, 2018 - 07:32

बेडवर पडल्यानंतर तिच्या नाजूक कपाळावर हलकेच ओठ टेकवून मी तिचा पापा घेतला आणि झोपेच्या स्वाधीन झालो !

मोबाईलच्या स्क्रिनवर नेहेमीप्रमाणे सराईतपणे स्क्रोलींग करणारी माझ्या हाताची बोटं आज थरथरत होती, काहीशी जडही पडली होती. निरागसपणे माझ्याकडे एकटक बघणारे ते हरिणीसारखे सुंदर डोळे मला काहीतरी प्रश्न विचारत होते.. तिच्या त्या भेदक नजरेनं माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं.. तिच्याशी नजरानजर होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत होतो पण तेही मला जमत नव्हतं. विषण्ण आणि अगतिक झालेला मी.. शेवटी मोबाईल बंद करून समोर बघितलं.

नजरेसमोर होती माझ्या बेडरूमची खिडकी ! खिडकीतलं दृश्य बघून मी अस्वस्थ झालो.. तेथे कोणीतरी उभं होतं, काळोख असल्यानं चेहरा मात्र दिसत नव्हता. अचानक एकाऐवजी तिथं अनेकजणांची डोकी दिसू लागली आणि ती गर्दी एकसारखी वाढतच चालली. असंख्यजण होते ते ! एवढ्यात गडगडाटी आवाज होऊन विज चमकल्याचा लखलखाट झाला. क्षणमात्र पसरलेल्या त्या उजेडातही मी अनेकजणांना पाहू शकलो !

काय दिसलं मला त्या गर्दीत ?

कोणकोण होतं त्या ठिकाणी ?

कपाळाला गंध लावलेले होते तेथे, डोक्यावर जाळीदार टोपी घातलेले होते आणि गळ्यात क्रॉस अडकवलेलेही होते. दाढीमिशा राखलेले होते तसेच मुंडण केलेलेही होते. भगवे वस्त्र नेसलेलेही असंख्यजण दिसत होते. त्या गर्दीत वृद्ध होते आणि अजून मिसरूढही न फुटलेले किशोरवयीन मुलंही होते.. हायफाय सूटवाले उच्चविद्याविभूषीत दिसणारे होते तसेच खेडेगावातील गावंढळ वाटणारे अडाणी, अशिक्षितही होते.. कायदा करणारे आणि कायद्याचे राखणदार असणारेही त्या गर्दीत होते..
मी विचारच करत होतो आणि अचानक मला जाणवलं, ते सगळेजण माझ्याच दिशेनं येत आहेत ! कशासाठी बरं ? मला आधी उत्सुकता वाटली पण लक्षपूर्वक त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला दिसलं,त्यांचं लक्ष माझ्याकडे नाहीच. त्यांची सगळ्यांची नजर एकवटलेल्या ठिकाणी मी माझ्या डाव्या बाजूला बघितलं आणि मी उडालोच...

ते सगळेजण ईश्वरीकडे निघाले होते, वखवखलेल्या नजरा घेऊन ! क्षणार्धात संतापानं मी बेभान झालो. चपळाईने जागेवरून उठलो आणि बाजूला असलेला लाकडी टेबल तोडला आणि येणाऱ्या गर्दीवर तुटून पडलो..
एक.. दोन.. तिन.. मी एकामागोमाग एकसारखे वार करतच होतो पण ती गर्दी मला काही केल्या आवरत नव्हती. एवढ्यात कोणीतरी मला गच्च धरून ठेवलं. मी सुटण्यासाठी व्यर्थ धडपड करायला लागलो. पण इतक्यात एकाजणानं हाताचा एक जोरदार ठोसा माझ्या तोंडावर मारला.. रक्ताची चिळकांडी उडाली..नाका तोंडावाटे रक्ताची धार वाहू लागली. ते ठोसे एकामागून एक बसत राहीले..मी पुरता घायाळ होत चाललो.

मा..माझ्या डोळ्यांदेखत त्या गर्दीतल्या नराधमांनी माझ्या प्राणप्रिय ईश्वरीला उचललं आणि ते जाऊ लागले.. मी फक्त आक्रोश करत राहीलो.. हळूहळू त्या गर्दीसमवेत माझी ईशू दिसेनाशी झाली आणि मी जिव तोडून ओरडलो, "नाssही... नाही, मी असं होऊ देणार नाही.."

माझ्या कपाळावर कुणीतरी हात ठेवलेला जाणवला म्हणून मी डोळे उघडून बघितलं. बाजूला झोपलेली आरती माझ्या अचानक ओरडण्यामुळे जागी होऊन काळजीयुक्त स्वरांत मला विचारत होती, 'राहुल, काय झालं रे ?'

मी तिच्या बोलण्याकडं साफ दुर्लक्ष करून आमच्या दोघांच्या मध्ये सुरक्षित आणि शांतपणे झोपलेल्या ईश्वरीला जवळ ओढून छातीशी घट्ट कवटाळलं.. डोळ्यांतून घळघळा आसवं वाहू लागले. कितीतरी वेळ तिला छातीशी धरून मी रडतच होतो..

काल आसिफा, आज दुसरं कोणी आणि उद्या...? उद्या कदाचित् माझी ईश्वरी- माझी मुलगी....

नाही.. हे असं व्हायला नको..आम्ही हे होऊ देणार नाही.. प..पण मग नेमकं काय करणार आहोत ?
विचार कर करून मी सैरभैर झालोय.. या सामाजिक विकृतीवर कायमस्वरूपी इलाज व्हायला हवा... पण कसा ते कळत नाहीये.. तूर्तास फक्त एखादी मेणबत्ती पेटवू शकतो..

प्लिज हेल्प मी.. मला मदत करा.. माझी मुलगी वाचवण्यासाठी, माझी आसिफा वाचवण्यासाठी.. आपली आसिफा वाचवण्यासाठी...

© /१३.४.१८

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप चांगलं लिहीलय आनंद दादा. अशा गोष्टींसाठी कडक शिक्षा आणि जास्त वेळ न घालवता केली तर काहीतरी होण्याची शक्यता आहे.

जोपर्यंत बलात्कार करणाऱ्याची बाजू मांडणारे वकील आहेत, बलात्कार्यांना बाजू मांडू देणारी न्यायव्यवस्था आहे, त्यांचा कळवळा येणारी मानवी हक्क संघटना आहे तोपर्यंत हे असेच सुरु राहणार. खरी गरज आहे ती, पिडीतेच्या वैद्यकीय तपासणीनंतर किंवा CCTV आणि तत्सम तांत्रिक पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्यानंतर गुन्हेगारास बचावाची 'कोणतीही' संधी न देता फाशीची (व त्याहून शक्य असल्यास तडफडत मरण्याची) शिक्षा देण्याची आणि या शिक्षेचे टीव्हीवर थेट प्रसारण करण्याची.

फाशीची शिक्षा पण खूपच सोपी झाली...चांगल्याच वेदना देऊन दोन दिवस तडफडत ठेऊन मारायचं...एकाला जरी अशी शिक्षा मिळाली तरी पुन्हा कोणी असा विचार करायला धजावणार नाही....त्यांचा कळवळा यायची काहीच गरज नाही....गुन्हा करताना करणार्याने विचार नाही केला तर शिक्षा देणार्याने तरी का करायचा....हे माझं मत आहे ...पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.....

यावर उपाय एकच त्याला सोडून द्यायच. जख्मी औरत सारखी ट्रीटमेंट देऊन.
तो रोज मरेल रोज मानसिक बलात्कार होईल त्याच्यावर . एकवेळ बलात्कारीत मुलगी सावरेलही पण "तो" कधीच सावरू शकणार नाही.

मला देखील अशीच भीती वाटते. माझी मुलगीदेखील लहान आहे. असे वाटते देव खरोखर आहे ती नाही. का तो निरपराधी लोकांच्या मागे लागतो आणी असल्या विक्रूत लोकांना माञ मोकाट सोडतो. हाल हाल करून मारले पाहीजे असल्यांना.

मला देखील अशीच भीती वाटते. माझी मुलगीदेखील लहान आहे. असे वाटते देव खरोखर आहे ती नाही. का तो निरपराधी लोकांच्या मागे लागतो आणी असल्या विक्रूत लोकांना माञ मोकाट सोडतो. हाल हाल करून मारले पाहीजे असल्यांना.

मला देखील अशीच भीती वाटते. माझी मुलगीदेखील लहान आहे. असे वाटते देव खरोखर आहे ती नाही. का तो निरपराधी लोकांच्या मागे लागतो आणी असल्या विक्रूत लोकांना माञ मोकाट सोडतो. हाल हाल करून मारले पाहीजे असल्यांना.

मला देखील अशीच भीती वाटते. माझी मुलगीदेखील लहान आहे. असे वाटते देव खरोखर आहे ती नाही. का तो निरपराधी लोकांच्या मागे लागतो आणी असल्या विक्रूत लोकांना माञ मोकाट सोडतो. हाल हाल करून मारले पाहीजे असल्यांना.

राक्षसी वृत्तीचे राक्षस आहेत हे लोक यांना माणूस म्हणताच येणार नाही. त्यामुळे यांना शिक्षा ही राक्षसा सारखीच दिली पाहिजे.भर चौकात दगडाने ठेचून मारलं पाहिजे.

राक्षसांनाही लाजवतील अशी प्रजाती आहे ही. अशा गुन्हांतल्या दोषींसाठी फाशीच्या शिक्षा फारच सौम्य आहे. यांना विकलांग करुन समाजात कोठेही तोंड दाखवता येवू नये अशाप्रकारे जिवंत ठेवण्याची तरतूद कायद्यात हवी. बलात्कारासारखी आयुष्यभर जाळणारी पीडा देणार्याला फाशी म्हणजे आयुष्यातून मुक्ती देण्यासारखे आहे....दुसर्या धाग्यावरही हेच टाइपलं होतं.

*शर्म से झुका है सिर इस चमन का*
*बेटियां मुल्क़ की बेआबरू हो रही हैं ।*

*बाद अपहरण के बी महफूज़ थी सीता*
*कैसी शराफत उस दौर के रावण में थी।*

अगदी योग्य शब्दांत मांडलंय.

बोबडं बोलण्याच्या वयातल्या लहान चिमुरड्यांनाही संरक्षण नाहीय, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

व्यथा, वेदना, आवेश आणि अपेक्षांना आपण सुंदर शब्दात गुंफलं आहे.. पण, >तूर्तास फक्त एखादी मेणबत्ती पेटवू शकतो..< हे वाक्य निराश करणारे वाटले. फक्त मेणबत्ती पेटवणार.. अहो, निर्भया प्रकरणानंतर आपण मेणबत्त्या पेटवल्या ना.. कोपर्डी नंतरही पेटवल्या. तरीही कठुवा उन्नाव घडलेच ना. तसेही कठुवा आणि उणाव ह्या फक्त माध्यमात आलेल्या प्रातिनिधिक घटना आहेत. अशा अमानवीय आणि विकृत घटना देशभरात दररोज घडत असतात. काही समोर येतात तर काही दडपून टाकल्या जातात, हे वास्तव आहे. माणसातील विकृत राक्षसीपणा एकाद्या साथीच्या रोगासारखा वाढत असताना आपण फक्त मेणबत्ती पेटवून कसं चालेल? आपण आतातरी हातात मशाल घेतली पाहिजे.. क्रांतीची मशाल..!

नवीन Submitted by अँड. हरिदास on 1 May, 2018 - 09:39>>>>

धन्यवाद हरीदास Happy
मला अशाच प्रतिसादाची अपेक्षा होती.
आपण नेमकं माझ्या मुद्यावर बोट ठेवलंत.

'तूर्तास फक्त एखादी मेणबत्ती पेटवू शकतो..' या वाक्यातून सर्वसामान्य माणसाची त्याक्षणीची हतबलता आणि निराशा दिसून येत असली तरी ती वास्तव आहे. त्यानंतरच्या पुढील ओळींत मी एक कळकळीचं आवाहन केलेलं आहे जे एका सर्वसमावेशक चर्चेला निमंत्रण देतंय.

या गुन्हेगारांना सर्वोच्च कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी पण त्याबरोबरच आपल्याला इतर अनेक आघाडींवर प्रयत्न करावे लागणार आहेत.
'बलात्कार' या विकृतीविरोधात लढण्यासाठी आपल्याला तिच्या मुळाशी जायला हवं. मुळात ही विकृती येते कुठून हा मुद्दा मला वाटतं जास्त महत्वाचा आहे.
बलात्कार करणारा तुमच्या आमच्यातलाच कुणीतरी असतो. उद्या तो म्हणजे मी किंवा माझा मुलगाही असू शकतो !
प्रत्येक मुल जन्म घेतेवेळी निरागस आणि निष्पाप असतं. त्याच्या शारीरीक, बौद्धिक आणि मानसिक वाढीदरम्यान त्याच्यामध्ये गुणावगुण विकसित होत जातात. यादरम्यानच एखाद्यामध्ये बलात्कारी प्रवृत्तीची बीजं रोवली जातात. आपल्याला हा मुलांच्या विकासाचा जो महत्वपूर्ण टप्पा आहे, या टप्प्यावर काम करावं लागणार आहे असं मला वाटतं. आपण आज यावर सुरवात केली तर पुढील पंधरा वीस वर्षांनी खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला दिसतील आणि एक निकोप आणि सुरक्षित समाजव्यवस्था आपण आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांना देऊ शकू.

या विषयावर सर्व अंगांनी विस्तृत चर्चा मला अपेक्षित आहे. येथील अभ्यासू मंडळींनी यावर चर्चा घडवावी असं मला वाटतंय.

<या विषयावर सर्व अंगांनी विस्तृत चर्चा मला अपेक्षित आहे. >
बला त्कार फक्त दबलेल्या कामवासनेचे शमन करण्यासाठी होतो असे कोणाला वाटत असेल, तर तो गैरसमज आहे.

वर्चस्व दाखवण्यासाठी , तिला तिची जागा दाखवण्यासाठी, ती स्त्री असून आपल्या पुढे आहे म्हणून अशी अनेक कारणं आहेत. स्त्रीला जखमी करण्यासाठी बलात्कार हे सर्वाधिक धारदार शस्त्र म्हणून वापरलं जातं.

आता हे वर्चस्व किंवा अन्य गोष्टी प्रत्यक्ष त्या स्त्रीवरच असेल असं नाही. एका समूहाकडून दुसर्‍या समूहा बद्दलही असतं.

स्त्रीच्या लैंगिक पावित्र्याचा संबंध एका समूहाच्या सन्मानाशी जोडला जातो.