पोहण्याची कला

Submitted by पूनम पाटील on 13 April, 2018 - 16:51

नमस्कार मायबोलीकर,
मागील एक वर्षापासून मी माबो ची नियमित वाचक आहे, पण लिहिण्याचा प्रयत्न आयुष्यात प्रथमच केलाय.
तेंव्हा तुमच्या सूचना, टीका आणि प्रतिसाद अवश्य कळवा.
- ज्वाला

माझ्या मुलाला पोहायचे भारी हौस. तस बेसिक पोहणं येत त्याला, पण पुढे अजून शिकायचं म्हणून कधीपासून मागे लकडा लावला होता. पुण्यात असताना चौकशी केली होती स्विमिन्ग क्लास ची, पण सतत शाळा, अभ्यास आणि परीक्षा त्यामुळं वेळच नाही मिळाला. इथं US मध्ये येऊन स्थिरस्थावर झाल्यावर त्याला ऍडमिशन घेतली. स्विमिंग सूट, गॉगल्स अशी बरीच काही खरेदी आणि भरमसाठ ऍडमिशन फीस आणि मंथली फीस भरल्यावर एकदाचा क्लास सुरु झाला. त्याचा सेशन चालू असताना waiting हॉल मध्ये बसून कौतुकान काचेतून त्याच्याकडं बघताना माझ्याही नकळत माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
मलाही लहानपणी पोहायला शिकायची हौस ,सांगलीत असताना एकदोनदा बाबानी स्विमिन्ग पूल ला नेवून शिकवलं होत पण त्याचा फारसा काही फायदा झाला नव्हता. सुट्टीत आजोळी गेल्यावर मात्र हि आवड उफाळून आली. त्याच झालं असं कि मला सख्खे आणि चुलत मिळून ११ मामा, सगळ्यात मोठे मामा आईपेक्षा दहा वर्षांनी मोठे तर सगळ्यात लहान माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान. एरवी नोकरीनिमित्त इकडेतिकडे असणारे उन्हाळ्यात मात्र आवर्जून सगळे गावी यायचे आणि भल्या मोठ्या दगडी वाड्याला अक्षरशः यात्रेचं रूप यायचं. दिवसभर पत्ते, विटीदांडू आणि गप्पांचे फड जमायचे. तर हे सगळे मोठे मामा लोक सकाळी सकाळी शेतातल्या मोठ्या विहिरीत पोहायला जायचे, पण आम्हा लहान मुलांना शिकवायला मात्र कुणी तयार व्हायचं नाही. चौथीतल्या उन्हाळयाच्या सुट्टीत मात्र लहान काका आजोबानि हे काम मनावर घेतलं.
हे आजोबा माझ्या बाबांच्याच वयाचे आणि त्यांची मुलं माझ्यापेक्षाही लहान. तर हे काका आजोबा, आजी त्यांची मुलं (छोटे मामा) आणि आम्ही सगळी मामे मावस भावंडं, आई आणि मावश्या मिळून १०-१५ जणांचा ग्रुप सकाळी उठून, चहा-दूध पिऊन शेताच्या मार्गाला लागायचा. आजोबा पोहायला शिकवायला, आम्ही शिकायला, आजी शेतातल्या घरी नाश्ता बनवायला आणि आई मावश्या केवळ मजा म्हणून. निघताना आपापले कपडे टॉवेलमध्ये गुंडाळून त्याची सुरळी करून काखेत मारायची कि झाली तयारी. जवळ जवळ दोन मैल खडकाळ कच्चा रस्ता चालल्यावर शेतातलं घर लागायचं. आणि तिथून दहा मिनिट शेतातल्या बांधावरून चाललं कि विहीर आलीच. काठावर मोठी लिंबाची झाडी असलेली भली मोठी विहीर, आतून दगडांनी बांधलेली, आणि आत उतरायला कडेकडेनि पायऱ्या असलेली. वरून आत वाकून बघितलं कि कधीच तळ न दिसणार काळ हिरवं पाणी बघून पोटात धस्स व्हायचं. पण आजोबा खूप धीर द्यायचे. 'अरे आपल्याला काय तळाशी पोहायचे आहे का, पाण्याच्या वर तरंगायला शिकायचं आहे ना , मग विहीर कितीही खोल असली तरी काय फरक पडतो ?'. मुलांना भीती न घालता त्यांच्या कलाकलाने शिकवण्याकडं त्यांचा भर असायचा.
मग बरोबर असलेली मोठी मंडळी धडाधड पाण्यात उड्या मारायची आणि आम्ही मात्र ओल्या दगडी शेवाळलेल्या पायऱ्या शिस्तीत उतरून एका कडेला थांबायचो. मग आजोबा आधी स्वतः पोहून दाखवायचे. हात पाय कसे मारायचे, पाण्यात उभं ना होता आडवं होऊन पोटावर कस बॅलन्स करायचं, नाकात पाणी जाऊ नये म्हणून काय करायचं हे सगळं दाखवून मग एका एकाला पेटीकोट/ बनियान धरून पाण्यातून दहा दहा मिनिट फिरवून आणायचे. आणि जरा नीट हातपाय मारायला यायला लागले कि वरच्या वर्गात म्हणजे मोठ्या मामांच्या हाताखाली पुढचं ट्रैनिंग. लहान मुलांकडं मात्र ते स्वतःच जातीं लक्ष द्यायचे. तासभर हा प्रोग्रॅम झाला कि पोटात कावळे ओरडायला लागायचे, कि वर येऊन पळतच शेतातल्या घरी पोहोचायचं. आणि बघता बघता काकी आजीनी मोठाल्या कढईत बनवलेल्या शिरा- पोहे किंवा शिरा-उपम्याचा फडशा पडायचा.
दहा पंधरा दिवस असा प्रोग्रॅम झाल्यावर थोडंफार , अगदीच जीव वाचवता येण्यापुरतं पोहता येऊ लागलं. पण कुठल्याशा कामानिमित्त काका आजोळी आले आणि आमची वरात पोहणं अर्ध्यावर सोडून काकांच्या म्हणजे आमच्याच मूळ गावी निघाली. हे गाव तस मोठं असलं तरी शेतापासून लांब, रोज गावातून शेतात ये-जा करण अवघड , त्यामुळं शेतातच घर बांधून भावकीतली आठ-दहा कुटुंब इथं स्थायिक झालेली, इथली घर सगळी पाटलांची म्हणून हि पाटील वस्ती.
तर वस्तीवर आल्यावर भावकीतल्या भावा बहिणींच्या समोर मिरवावं कि मला पोहायला येत म्हणून तर ते सगळे आधीच शिकलेले आणि पट्टीचे पोहणारे. पण मला निराश न करता 'येत ना तुला थोडं पोहायला, मग चल कि आमच्याबरोबर उद्या आंब्याच्या विहिरीवर. काही लागलं तर आम्ही आहेच ' म्हटल्यावर निघालेच मी दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर. पण इथल्या पोहायला शिकवण्याच्या अघोरी पद्धती माहिती असल्यामुळं बऱ्याच टर्म्स आणि कंडिशन्स त्यांच्याकडून आधीच मान्य करून घेतल्या.
बहिणी त्यातल्या त्यात कमी धोकादायक त्यामुळं त्यांना आधी विहिरीत उतरायला लावून , भावांना विहिरीपासून चार हात दूर थांबायला लावून, सगळे धोके टळल्यावर, मी हळू हळू पायऱ्या उतरतेय तोच धाड धाड आवाज करत मोठी भावंडं दोन्ही दिशेनी माझ्या दिशेनी झेपावली आणि पुढच्या परिस्थितीची कल्पना येऊन मी घाबरून किंचाळत वरच्या दिशेनी पळायला लागले, तर वरती पण गस्त. मग काही झालं तरी हार मानायची नाही म्हणून विहिरीत आतल्या बाजूला उगवलेल्या लिंबाच्या झाडाच्या फांदीला गच्च आवळून उभी राहिले, एका बहिणीने पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला तर तिला मी च दिली खाली ढकलून, तेवढ्यात दुसऱ्या भावाने गनिमी काव्याने मागून येऊन त्या फांदीसहित ढकललं मला पाण्यात. क्षणात अंधारी आली डोळ्यासमोर , बुडाले मी, खोल खोल जात राहिले, नाकातोंडात पाणी गेलेलं, जीव गुदमरलेला, बघेल तिकडे काळोख, हातात आधारासाठी धरलेली फांदी अजूनही तशीच, एक मोठी गटांगळी खाल्ली आणि जगण्याची अशा सोडलीच होती कि कशीबशी वरती आले, मोठा श्वास घेतला , येतील तसे हात पाय मारले , तरी डोळ्यासमोरचा अंधार काही जाईना,दुरून येणारे भावा बहिणींचे आवाज कानावर पडले, 'अग तो फ्रॉक काढ डोक्यावरून', मग लक्षात आलं कि फ्रॉकचाच एक भाग घुंघट सारखा तोंडावर आलाय म्हणून. एका हाताने तो सरळ करावा तर परत बुडायला लागले , शेवटी तो नाद सोडून आवाजाच्या दिशेनी कशीबशी पोहत राहिले आणि काठाजवळ आल्यावर हात देऊन सगळ्यांनी बाहेर काढलं.
पहिल्याच प्रयत्नात एवढं छान पोहायला आल्यामुळं , सगळे हसत, टाळ्या वाजवून कौतुक करत होते आणि मी मात्र रागाने, भीतीने थरथरत , रडवेल्या तोंडानं, एका हाताने नाक पुसत, दुसऱ्या हातात दगड घेऊन त्या भावाच्या माग लागले ज्यानं मला ढकललं, आम्ही वरती पोहोचणारच तेवढ्यात वरून एक काका आले, माझ्याकडं बघून त्यांना परिस्थितीची कल्पना आली असावी. 'या भाऊंनी ढकललं ना तुला? थांब बघतो त्याच्याकडे' रागाने गर्जत ते आत उतरले, ' काय रे असं पाण्यात ढकलून भीती मोडणार आहे का तिची?....' , पुढच्याच क्षणाला मला परत पाण्यात फेकत ते म्हणाले, ' कमीत कमी दोन चार उड्या मारल्याशिवाय भीती नाही जायची....'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेम ! Happy चांगले लिहिले आहे. आणि असेच वातावरण एकेकाळी जगलो असल्याने सगळे प्रसंग व ते वातावरण डोळ्यासमोर उभे राहिले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही सगळे असेच एकत्र येत असू आणि असेच वातावरण होते. माझे लहानपणीचे पोहण्याचे धडे पण असेच काकांनी विहिरीवर किंवा शेताच्या बाजूने नदी होती त्या घाटावर झाले. पण त्या शिकवण्याच्या पद्धती तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे खरेच इतक्या अघोरी आणि क्रूड होत्या कि शिकण्यात रस निर्माण होण्या ऐवजी भीतीच जास्त निर्माण झाली. "पाण्याची भीती मोडायला हवी तरच पोहता येईल" असे तत्वज्ञान सांगून जे केले जात असे (पाण्यात ढकलून देणे वगैरे) त्यामुळे भीती मोडण्या ऐवजी भीती वाढतच असे Biggrin पण सांगणार कुणाला? कारण पोहायला शिकवणारे सगळे वयाने खूप मोठे आणि त्यांना आपल्या पद्धतीवर कोण दृढविश्वास! अर्थात त्यांच्या पद्धतीने सुद्धा (सर्वच नसली तरी) अनेक मुले पोहायला शिकतच. त्यामुळे त्यांच्या पद्धतीला चॅलेंज करण्याचा प्रश्नच नव्हता. भले ती अशास्त्रीय किंवा सर्वाना सूट होईल अशी नसली तरी. आणि दुसरे म्हणजे, विहीर असो वा नदी, शिकत असताना सुरवातीच्या काळात पाय टेकण्याची जी आवश्यकता असते त्यासाठी तिथे काही स्कोपच नसायचा. पोहायला शिकण्यात ते अजून एक मुख्य आव्हान असे.

पण नंतर हे दिवस राहिले नाहीत. पोहायला शिकणे पण त्यामुळे अर्ध्यातच सुटले ते सुटलेच. म्हणतात ना आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. पुढे शाळा मग कॉलेज मग विद्यापीठ मग नोकरी मग लग्न या चक्रात आयुष्य इतके गढून गेले कि पोहायला शिकणे कधीच मागे पडले. नाही म्हणायला कॉलेजात असताना काही वेळा स्विमिंगपूल मध्ये जात होतो पण जास्त नाही. त्यामुळे तेंव्हा सुद्धा पोहायला शिकणे राहूनच गेले.

मग मागच्या कि त्याच्या मागच्या वर्षी सोसायटीतला स्वीमींगपूल सुरु झाला. तसा तो दरवर्षी सुरूच असतो उन्हाळ्यात. पण त्यावर्षी माझा पाच वर्षाचा मुलगा पोहायला शिकला Lol मग मात्र पोहायला शिकण्याच्या उर्मीने पुन्हा उचल खाल्ली. मनाने ठरवलेच कि काही झाले तरी आता स्वत:हून शिकायचे म्हणजे शिकायचेच. मनावरच घेतले. आजकाल सुदैवाने इंटरनेट आहे. पोहायला कसे शिकावे यावर खूप म्हणजे खूप आर्टिकल्स, व्हिडीओज, ब्लॉग्ज, फोरम्स आणि खूप काही आहे. मी थियरीच्या नावाखाली सर्वांचा अभ्यास करायचो. व्हिडीओ पाहायचो. आणि रात्री झोपताना इतका मस्त आत्मविश्वास यायचा कि कधी एकदा सकाळ होते आणि ते ट्राय करून पाहतो असे व्हायचे Lol दुसऱ्या दिवशी पाण्यात उतरल्यावर लक्षात यायचे कि थियरी ओके आहे पण प्रॅक्टीकल करताना भलत्याच समस्या येत आहेत Biggrin मग पुन्हा इंटरनेट, व्हिडिओज. त्या समस्या अजून कुणाला आलेल्या आहेत का. त्यांनी काय उपाय केले. विशेषकरून पोहताना श्वासोच्छवास शिकणे. हे खूपच आव्हानात्मक गेले.

पण अखेर एकदाचे शिकलो पोहायला मागच्या वर्षी Happy आणि मग एक दिवस त्या सगळ्या स्टेप्स लिहून काढल्या. जेणेकरून कुणाला शिकायचे असेल तर त्यांना पुन्हा ते सगळे प्रयास पडू नयेत. त्यातून हा धागा निर्माण झाला:

या उन्हाळ्यात स्वत:हून पोहायला असे शिका:
https://www.maayboli.com/node/65239

आजकाल अनेकदा पोहायला जाणे होते. पण लहानपणीच्या आठवणी अजूनही तशाच ताजा आहेत Happy

आम्हीही गेलेलो तासगावला पाटलांच्या विहिरीवर. पण कंटाळा आला. बाजूचया आमराईतल्या कैय्रांवरच आमचं लक्ष. पुढे मोठेपणी अॉफिसने स्विमिंग पूल दिला आणि हातपाय झाडण्याचा खटाटोप पाहून एकाने लक्ष घातले आणि समज दिली. अशी पाण्याशी दंगामस्ती करून नाही येत पोहायला.
लेख छान झाला आहे.

धन्यवाद श्री आणि मेघा.
@Atuldpatil पूर्वीच्या पद्धती खरंच अघोरी होत्या , पण result हि तसे इन्स्टंट मिळायचे , स्वानुभव
तुमचा लेख वाचला , तुम्ही खूपच अभ्यास आणि विचार करून लिहिलंय , proper precautions घेतल्या तर शिकायला खूपच उपयोगी पडेल!

हा हा हा.. छान लेख. मोठे लोक असेच दुष्ट असत, म्हणून आंम्ही कधी विहिर नदीच्या जास्त काठाजवळ गेलो नाही. Sad त्यात उलटी उडी मारुन पाण्यात सूर मारणे. उंचावरुन सूर मारुन थेट तळात फेकलेला दगड वर आणणे आणि हात वर करुन एकाच जाग्यावर स्थिर पाण्यात उभं राहणे हा गावातल्या चौथी पाचवीपासूनच्या पोरांचा महाखतरनाक खेळ. Uhoh असल्यात नेहमी आमची चेष्टा व्हायची पण आंम्ही चुकून असा वेडेपणा केला नाही. हा, एकदा पाण्यात डुबकी मारुन डोळे उघडले होते. मस्त सिनेमात अंडरवॉटर सीन दाखवतात असं लोभनिय दृश्य दिसलं होतं. Happy

धन्यवाद srd ani मयुरी
@अन्नू ...हो खरंय पूर्वीचे मोठे लोक शिकवताना दुष्टपणा करायचे , त्यांच्याबरोबर पोहणं म्हणजे पोटात धडकीच भरायची

खरंय, रॉकेलचे डबे, तणसाच्या काड्यांचा बिंडा किंवा टायरच्या inner tubes हे फ्लोट म्हणून वापरत, कधी कधी दोरी बांधून पण पाण्यात सोडत.

कधी कधी दोरी बांधून पण पाण्यात सोडत >>>>
तो प्रयोग आमच्यावरच झालाय! Sad सारखं काय तेलाच्या कॅनने पोहतोस म्हणून मला नुसत्या दोरी कमरेला बांधलेल्या अवस्थेत पाण्यात जायची धमकी दिली. 'जा, मी आहे ना- मी दोरी ओढून धरेन' वगैरे आश्वासन देत त्या पोराने मला पोहायला लावले विहिरीचे दोन राऊंड झाल्यावर कळलं म्हशीला पळून जाईल म्हणून नावाला हातात घेतलेल्या दाव्यासारखं त्यानं नुसताच दोर हातावर घेतलाय आणि चांगला जर्दा मळत माझ्या पोहण्याकडे मख्खपणे बघत बसलाय!

इतक्यात बाजुला, बघ घाबरायचं नाही, 'अश्शी' उडी मारायची म्हणून घर बांधायला आलेल्या मिस्त्रीने मला पाण्यात कोलांटी उडी मारुन दाखवली. चांगला ऐकू येईल असा 'चट्ट' आवाज झाला. चार चौघात पाठ हुरळून निघाल्यावर मात्र मिस्त्रीने परत कधी तशी उडी मारण्याचा प्रयत्न केला नाही. Biggrin

अन्नू, मिस्त्रीची गोष्ट भारी आहे Lol
मीही लहानपणी विहिरीतच पोहायला शिकले. पण धबाधब उड्या मारण्याइतकी धिटाई माझ्यात आली नाही.
आमच्याकडे कोकणात पावसाळ्यात विहिरीत पोहायला जाण्याची पद्धत आहे. कारण उन्हाळ्यात पाणी खाली गेलेलं असतं. श्रावणानंतर पोहायला जातात विहिरीत.
आत्ता ३-४ वर्षांपूर्वी परत स्विमिंग क्लासला जाऊन शिकले, कारण विहिरीत शिकताना डोकं पाण्याच्या वर ठेवून पोहायला शिकले होते.

अन्नू, मिस्त्रीची गोष्ट भारी आहे >> +१
पाण्यात उडी मारायला चुकली कि पाठीवर/पोटावर कस लागत याचा चांगलाच अनुभव घेतलाय मी.

आमच्याकडे कोकणात पावसाळ्यात विहिरीत पोहायला जाण्याची पद्धत आहे. कारण उन्हाळ्यात पाणी खाली गेलेलं असतं. >> आमच्याकडेही हि परिस्थिती असायची उन्हाळ्यात बरेचदा , पण बऱ्याच वेळा पोहण्यासाठी म्हणून बोअरचे पाणी विहिरीमध्ये सोडले जायचे.

आलिंपिकमध्रे तीन मिटरस डाइविंगची स्पर्धा पाहत होतो. एकेक मुलगी उडी मारायची कोलांट्या मारून. गुण दाखवत होते 9.3,9.4,9.1,9.0 वगैरे. हे कसे ठरवतात याची उत्सुकता. मग मागची एक चॅम्पिअन आली. पाण्यात जाताना नुसताच चुबुक आवाज आणि पाणी फारसं उडालंच नाही!

पोहोण्याची चर्चा - डबा,दोरी,भोपळे वगैरे बराच वेळ ऐकत असणारा मंगळुरी बोलला - आम्ही चालायला शिकतो तसं पोहायला शिकलो गावाला.

डबा,दोरी,भोपळे वगैरे बराच वेळ ऐकत असणारा मंगळुरी बोलला - आम्ही चालायला शिकतो तसं पोहायला शिकलो गावाला >> खर असावं, खूप लहान वयात पाण्याची भिती कमी असते शिवाय शरीर लवचिक असल्यामुळं पोहायलाही पटकन जमत.

मस्त लिहिलं आहे ज्वाला!

आम्ही स्विमिंग टॅंकमधे पोहायला शिकलो पण बऱ्याच आठवणी वाचताना अगदी अगदी झालं.
पाय तळाशी न टेकणे, रॉकेलचा डब्बा सील करून पाठीवर बांधणे, डब्बा काढल्यावर कोणीतरी पाण्यात फेकून देणे, नंतर पोहणे जमायला लागल्यावर 12-13 फूट खोलवरचा दगड शोधून आणणे, कोण किती सेकंद पाण्याखाली राहू शकतो याची स्पर्धा, बॅकस्ट्रोक बटरफ्लाय शिकणे, पाण्यात पाठीवर तरंगत राहणे. मज्जा यायची फार Lol गेले ते दिन...

3 मीटर आणि 5 मीटर वरून उडी मारणंमात्र काही आवडलं+जमलं नाही Lol