नाळेची वाट, बैल घाट आणि कौल्याची धार

Submitted by योगेश आहिरराव on 13 April, 2018 - 03:17

नाळेची वाट बैल घाट आणि कौल्याची धार

ठरल्याप्रमाणे सकाळी ५:३० ला कल्याणहून निघून बरोब्बर ७ वाजेच्या आत कशेळेत पोहचलो सुद्धा, या वेळी ‘जितेंद्र’ आणि सोबत होते पुण्याहून खास घाटवाटेच्या ट्रेक साठी आदल्या दिवशी रात्री माझ्याकडे मुक्कामी आलेले ‘संदीप’ आणि ‘रेश्मा’ हे ट्रेकर दांपत्य. संदीप सोबत चांगलीच मैत्री आणि घरोबा जमलाय. या आधी दोघांसोबत हरिश्चंद्रगड-राजनाळ-सादडे घाट आणि सहपरिवार आहुपे घाटाचा ट्रेक झाला होताच. त्यामुळे वेव्हलेंथ खूप चांगली जुळली, असे मोजकेच पण चांगली माणसं सोबत असली तर ट्रेक पण खऱ्या अर्थाने पुर्ण होऊन कायमचा स्मृती पटलावर कोरला जातो यात वादच नाही. कशेळेत नेहमीच्या हॉटेलात पहिल्या चहाला उकळी येत असताना, काही गरम गरम खायला मिळेल याची शक्यता कमीच. कारण आम्हीच पहिले गिऱ्हाईक, जास्त वेळ घालवणे परवडणारे नव्हते मग चहा आणि क्रिमरोल चे दांडुके यावर भागवले. हे क्रिमरोल चे दांडुके पाहून मला नेहमी ‘स्क्रू कॉम्प्रेसर’ आठवतो. पण आम्हाला ते इतके आवडले, त्याचा आख्खा एक मोठा पुडा घेऊन टाकला. असो पुरे झाले क्रिमरोल पुराण.
धामणी फाट्याला उजवीकडे वळलो तेव्हा कोथळीगड आणि मुख्य रांगेतल्या नाखिंड्या पल्याडहून सुर्योदयाचे दृश्य.
1.JPG
धामणीत राम राम शाम शाम करून गाडी आजोबांच्या घराच्या अंगणात लावली.
आजचं नियोजन बैल घाटाने चढाई करून कौल्याच्या धारेने उतराई. यासाठी जर कोकणातून सुरुवात करायची झाली तर कोथळीगडाला वळसा घालून जावं लागतंच. कोथळीगडाची आंबिवलीची प्रचलित वाट, डुक्करपाड्याची किल्याची वाट, पाऊलखाचीं वाट या वाटा कैक वेळा इथल्या घाटवाटेच्या ट्रेकला धुंडाळून झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी आम्ही कोथळीगडाच्या दक्षिणेला असणाऱ्या धामणी मार्गे चढाई ठरवली. नेहमी प्रमाणे जमलेली मंडळी, 'किल्यावर जाताय ना मंग आंबिवलीतून जावा, इथन कशापायी जाताय'? असं सांगू लागली. थोड्या चर्चेनंतर त्यांना आमचे डोंगर वेड लक्षात आले, त्यातलेच 'दरवडा' आजोबा आमच्या सोबत वाटेची सुरुवात दाखवायला आले.
गावाबाहेर पडतांच पुर्वेला कोथळीगडाचा माथा तर उजवीकडे कळकराई पठार आणि त्यांवरील फेण्यादेवी अलीकडील उंच टेपाड सहज ओळखू आलं.
या भागातल्या बहुतांश जमिनी विकल्या जाऊन मोठ मोठे फार्म हाऊस आणि रिसॉर्ट बांधली जात आहेत. खुद्द मुख्य वाटेला लागेपर्यंत कितीतरी फार्म हाऊसची कुंपण ओलांडावी लागली. एक मात्र खरं दरवडा आजोबा सोबत नसते तर आमचा या कुंपणामुळे बराच वेळ कदाचित वाट शोधण्यात गेला असता. प्रथमदर्शनी समोर पहाता पेठच्या पठाराचे सरळ सोट कातळकडे यातून कशी वाट असेल हे काही ध्यानात येत नाही पण नीट निरीक्षण केल्यावर उजवीकडे एक तिरक्या रेषेत नाळ दिसते तीच आहे धामणीतून पेठला जाणारी 'नाळेची वाट' याच भागातून आणखी दोन वाटा पेठ वर जातात. एक याच वाटे अलीकडून पेठ पठाराच्या खिंडीच्या दिशेने जाते तर दुसरी मेचकरवाडी मार्गे.
मुख्य चढाईला सुरुवात झाली, आता होती झक्क मळलेली वाट दिशेनुसार कसे जायचे ते समजून घेत आजोबांचा निरोप घेतला.
सुरुवातीचा झाडीचा टप्पा फार दाट मुळीच नाही, आंबा, साग, बेहडा, पळस यांचा. वीस मिनिटांच्या चढाई नंतर नाळेच्या समोर आलो.
नाळेच्या डावीकडे मुख्य कडा त्यावरून माकडे चक्क दगडं फेकत होती. तसेच थांबलो, काही वेळातच सारी माकडे तिथून पसार झालीं. अन्यथा अरुंद नाळेत वरून असे काही झाले तर डोकंच फुटायचं. नाळेतून दिसणारे कोथळीगडाचे आंबिवली कडचे पठार पाठीमागे अंधुकसा तुंगी.
नाळेतली दगड धोंड्यातली छोटीशी चढाई मग उजवीकडे वळसा घालून पठारावर दाखल झालो तोच सामोरा आला कोथळीगड.
नाळेतल्या ओढाच्या वरच्या भागात अजूनही थोडं पाणी.
अंधारी घाटाच्या ट्रेकच्या वेळी याच पेठच्या पदरातून उत्तरेची रामखंडा पर्यंतची बाजु पालथी घातलेली तर बैलदारा उर्फ पायरी घाटाच्या वेळी कळकराई ते घाटाच्या वाटेतला चौक इथपर्यंत चाल झाली होती. त्यामुळे तसा हा भाग चांगलाच परिचयाचा. आता मुख्य होते ते पेठ ते कळकराई वाटेत असलेल्या याच चौका पर्यंतचा पल्ला तसेच पुढे बैल घाटाची सुरुवात. सर्व उजळणी करत निघालो, कोथळीगड डावीकडे ठेऊन पठारावरची मोकळी चाल. मागे उत्तरेला भीमाशंकरचे नागफणी उंचावलेले दिसत होते. तर उजवीकडे कळकराई, फेण्यादेवी आणि घोडेपाडी घाटाच्या आठवणी ताज्या झाल्या.
पठारावर काही भागात गावकरींनी पावसाळी शेती केली होती, पेठ गावात न जाता परस्पर किल्ल्याला वळसा घालून खिंडीतल्या वाटनाक्याच्या खालच्या बाजूने उजवीकडे कळकराईच्या दिशेने वळालो. खिंडीतल्या वाटनाकेपासून तीन वाटा निघतात पहिली कौल्याच्या धारेने जाते, दुसरी पेठ गावात जाते आणि याच वाटेला पुढे उजवीकडे एक वाट जाते ती थेट नाखिंडा घाटात आणि तिसरी वाट आम्ही जात होतो ती कळकराईचीं
आता मिश्र स्वरूपाचा जंगलातला टप्पा सुरु झाला, कोथळीगड मागे पडू लागला.
समपातळी वरची ही आडवी चाल फारच रमणीय, थंड हवा साथीला कोवळं उन अधून मधून वाटेतल्या ओढ्यांना अजुनही वहाते पाणी आणि सह्याद्रीच्या ओढीने एकत्र आलेले चार भटके अजून काय हवं. अशाच एका लहान ओढ्याजवळ नाश्ता आणि थोडी विश्रांती घेतली.
थोड अंतर जाताच पहातो तर मोकाट गुरं त्यांच्याच धुंदीत बसलेली. वाटेत आणखी काही ओढे पार करून एके ठिकाणी स्वच्छ पाणी मिळाले पुन्हा बाटल्या भरुन घेतल्या. या ठिकाणी अर्धवट जळालेली लाकडे आणि प्लास्टिकचा कचरा, बहुतेक कुणी रात्री शिकारीला येत असावेत. आता जंगल कमी होत वाट उघड्या माळरानातून, डावीकडे मुख्य कडा तर उजवीकडे दरी, खाली मेचकरवाडी, धामणी इतर लहान वाडी वस्त्या. साधारणपणे खिंडीतून निघाल्यापासून दीड तासाच्या चालीनंतर मोठा ओढा आडवा आला पार करून पलिकडे जातो तर वाटच गायब.
चक्क ओढ्या पर्यंत मळलेली वाट तसेच या ओढ्यात सुद्धा जळालेली लाकडे आणि प्लास्टिक कचरा होताच मग पुढे वाट गेली कुठे ? ओढ्याच्या वरच्या बाजूला डावीकडून चढलो, अस्पष्ट वाट पण ती पण पुढे जाऊन नाहीशी झाली. वरच्या अंगाला वाट असावी त्यानुसार जितेंद्र आणि संदीप वर चढले पण काही फायदा झाला नाही. पुन्हा ओढ्यात आलो त्यांना तिथे थांबवून मी उजवीकडे झाडीत शिरलो पण गचपण आणि करवंदाच्या जाळी पल्याड काही दिसले नाही. शेवटी पुन्हा मागे जाऊन वाटेचा अंदाज घ्यावा असे ठरले. या वेळी मात्र आम्ही एक गोष्ट केली ती म्हणजे एकाने डोंगराकडे लगतच्या झाडीत लक्ष द्यायचे आणि दुसऱ्याने विरूद्ध बाजूला ( दरीच्या ) दिशेला पहायचे. त्यानुसार वाटेवरून माघारी जाताना मला थोडे खालच्या बाजूला जाणारी बारीक पण स्पष्ट अशी पायवाट दिसली, तरी सुद्धा फक्त लक्षात घेऊन जिथे पाणी भरले त्या ओढ्या पर्यंत माघारी परतलो. या सर्व धामधूमीत पाऊण तास गेला. पुन्हा चर्चेअंती असाही पर्याय आला वाट नाही मिळाली नाही तर पुन्हा खिंडीत जाऊन मागोवा घेण्याचा पण वेळ आणि अंतर पहाता ते काही फायद्याचे नव्हते आणि तसेही आम्ही मुख्य वाटेवरच होतो फक्त कुठेतरी उजवे डावे हुकलं होत. शेवटी मी पाहिलेल्या वाटेने जाऊन पहायचे ठरले कारण दिशेनुसार तीच योग्य होती आणि चान्स तर घ्यायचा होताच. पुन्हा त्या वाटेनं थोडं खाली जात उजवीकडे वळालो, दोन टप्प्यात वाट अगदी ओढ्याच्या खालच्या बाजूला आली आणि पार करतो तोच एका कातळाला शेंदूर फासलेला दिसला पुढे एकदम व्यवस्थित वाट. याच ओढ्याच्या वरच्या बाजूला आमचा वेळ गेला असो पण आणखी एक अनुभव मिळाला. खरंतर घाटवाटेच्या ट्रेकला असे अनुभव येतातच, विनावाटाड्या ट्रेकची योग्य अभ्यासाअंती एक वेगळीच मजा येते. वाट चुकल्यावर येणारे वेळेअभावी दडपण तसेच सोबतचे सहकारी किती खंबीरपणे ती स्थिती हाथाळून साथ देतात. एकमेकांच्या नजरेत पाहून, चेहर्या वरच्या हाव भावावरूनच कळली पाहिजे तुमच्या सोबतच्या सदस्याची परिस्थिती. प्रत्येकाची जमेची बाजू तसेच उणीव माहित हवी. मग आपापसात चांगले बंध निर्माण होतात हे जत्रेत जाऊन नाही होत आणि दुकांनदारांसोबत जाऊन तर मुळीच नाही. तुमचे कौशल्य,निर्णयक्षमता,अनुभव,अभ्यास याचा योग्य क्षमतेनुसार वापर. मग दरवेळी येणार्या अनुभवांती भटकंती समृद्ध होणार यात शंकाच नाही. असो.. यावर पुन्हा लिहिनच.
इथून पुढं झक्क मळलेली पायवाट, तसे पहिलं तर ‘कळकराई’ ते ‘पेठ’ या दोन पदारातल्या गावांना जोडणारी ही आडवी चाल फार रमणीय, अजूनही गावकरी आणि गुराखी यांच्या वापरातली. मध्ये उजवीकडे मोकळीक मिळाली खाली दरीत मेचकर वाडी तसेच बराच मागे पडलेला कोथळीगड. सकाळी सुरवात केली ते धामणी तर गडाच्या पलीकडच्या बाजूला, कुठून वळसा घालून किती अंतर कापले याचा अंदाज आला. साधारण नंतरच्या वीस मिनिटातच मुख्य वाटनाक्यावर पोहचलो तिथे मेचकर वाडीतले एक आजोबा आरामात बसले होते.
हाच तो वाटनाका जिथे आम्ही बैलदारा उर्फ पायरी घाटाच्या वेळी कळकराई कडून आलो होतो आणि आता विरूद्ध बाजूने म्हणजेच पेठ कडून थोडक्यात कळकराई ते पेठ ही आमची पदरातली वाट पुर्ण झाली.
मागे म्हणालो तसं या (चौक) वाटनाक्यापासून डावीकडील वाट बैलदारा (पायरी) घाटाने सावळाला जाते तर उजवीकडची खाली मेचकरवाडी- धामणीकडे व सरळ जाणारी वाट कळकराईकडे, तर आलो ती वाट, तसेच वरच्या बाजूला यू टर्न घेऊन जाणारी जंगलातल्या पुरातन विहीरीकडे. त्याच वाटेने पुढे गेल्यावर बैल घाटाची सुरुवात होती तिथे बसलेल्या आजोबांनी बैल घाटाच्या माथ्यापुढे तळपेवाडीच्या वाटेवर कुठं तरी पुरातन पाण्याची टाकी आहेत असे सांगितले पण काय माहित मला त्याचं बोलणं विसंगत वाटत नव्हते आणि आम्ही सुद्धा काही तळपेवाडीत जाणार नव्हतो. वाटेतला ओढा पार करून दहा मिनिटांतच मोठ्या दगडी बांधीव पुरातन विहिरी जवळ पोहचलो.
मागे बैलदारा घाटाच्या वेळी श्रावणात आलो होतो तेव्हा जशी झाडीने झाकली होती त्यामानाने डिसेंबर महिना असूनही झाडीने झाकलेली. उतरायला दगडी पायऱ्या, बाजूला जनावरांना पाणी पिण्यासाठी पन्हाळे. विहिरी पासून पुन्हा आडवी पदरातली चाल, थोडक्यात सांगायचे झाले तर आम्ही पेठहून ज्या वाटेने आलो त्याच वाटेला समांतर चाल पण वरच्या पदरात आणि या भागात जंगल चांगलेच बहरलेले. सुरुवातीची वाट थोडी ढासळली होती, मधला झाडी भरला टप्पा पार करून एका कोरड्या ओढ्या पलिकडे डावीकडे वळसा घेऊन बाहेर आलो तोच कोथळीगड नजरेस आला. त्याच धारेवर तिरक्या रेषेत चढाई अगदी गुरं ढोरं जाऊ शकतील, बैल घाट हे नाव सार्थ ठरावे अशी वाट.
उजवीकडे दरी खाली पदराततले दाट जंगल अशी शेवटच्या टप्प्यातील चढाई संपली.
उत्तरेला नखिंड्याचा डोंगर खूपच जवळ भासत होता, त्याच्या खालच्या भागात चांगलीच झाडी होती तिथूनच आमचा पुढचा मार्ग होता. माथ्यावर दाखल झालो तेव्हा दीड वाजून गेले होते.
क्षणभर खाली दाट जंगलातल्या पदरात पाहिले कुठून सुरुवात केली, कसें आलो सारे अजबच. अगदी भर उन्हात करता येईल अशी वाट, खरंच हा बैल घाट मला तरी खुपचं आवडला. या भागातल्या, किंबहूना बहुतेक घाटवाटा चढून जेव्हा आपण माथ्यावर येतो तेव्हा लागलीच अथवा समोर कुठलीही मानव वस्तीच्या खुणा नसतात. दूर दूर पर्यंत पठार, झाडोरा आणि माथ्या लगतच्या टेकड्या. मुख्य गाव गाठण्यासाठी एखादा झाडीचा टप्पा किंवा टेपाड उतरून अथवा वळसा घालून जावे लागतेच. तळपेवाडीची वाट सोडून डावीकडे वळालो, समोर नाखिंड्याच्या डोंगरावर रांगेत पवनचक्की. दहा मिनिटांच्या अंतरावर लोणावळा भीमाशंकर हायवे लागला. त्याच वाटेने मधला कारवीचा टप्पा पार करून गवताळ पठारावर आलो इथून उजवीकडची वांद्रे खिंडीची वाट सोडून डावीकडच्या वाटेला लागलो. ह्या मार्गावर जितेंद्र यांनी आधी फेण्यादेवी ते कौल्याची धार हा ट्रेक दोन वेळा केला असल्यामुळं वाटा चुकण्याचा प्रश्नच नव्हता.
मोठ्या झाडाच्या सावलीत जेवणाची पंगत मांडली अर्थातच जेवण घरातून आणलेले. जेवण मग थोडा आराम होईस्तोर तीन वाजून गेले. निघताना प्रत्येकानं स्वतः जवळचा पाण्याचा स्टॉक चेक केला कारण कौल्याची धार उतरून पेठ गावापर्यंत तरी पाणी मिळण्याची शक्यता कमीच त्यासाठी काटेकोर नियोजन गरजेचे होते. नाखिंडाचा डोंगर समोर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूस काही अंतरावर दरी अशी मस्त चाल, पुन्हा कारवीचा टप्पा पार करून वाट काटकोनात वळाली थोड बाहेर येतो,तोच समोर दरीपलीकडे कुसूर, दुरवर ढाक आणि त्याचं अवाढव्य पठार. ढाककडे पाहून गेल्या पंधरवड्यात केलेल्या अवसरी आणि पालीचा धोंड ट्रेकची आठवण आली.
पण या मळलेल्या वाटेत एक गोष्ट मात्र खटकली ते म्हणजे बराचसा कचरा अगदी प्लास्टिक बाटली पासून ते विमल पुडी पर्यंत सर्व काही. मध्ये एक ओढा नाखिंड्याच्या डोंगराच्या पासून निघून दरीत झेपावलेला चक्क अजूनही चांगले थोडे वाहते पाणी. तसे माणशी एक लिटरच्या वर पाणी आमच्याकडे होते तेवढ्या पाण्यात पेठ गावापर्यंत मजल मारू शकत होतो तरी पण रिकाम्या पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या.
ट्रेक मध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची समोर चांगले पाणी असताना रिकाम्या बाटल्या भरून घेतल्याचं पाहिजे कारण कधी काय वेळ प्रसंग येईल काही सांगता येत नाही. पाणी हे हवेच. समोर ईशान्येला भीमाशंकर नागफणीचे टोक जवळ भासत होते म्हणजे कौल्याची धार आली तर.
तसेच गवताळ पठारावरून दरीच्या दिशेने जातो तोच कोथळीगडाचा सुळका वर आलेला दिसला. तसेच पुढे निघालो. उजवीकडे नखिंडा घाट तर समोर तुंगी पदरगड भीमाशंकर मागे अंधुक दर्शन देणारा सिद्धगड ते पार आंबेनळी खेतोबा वाजंत्री घाटापर्यंतची मुख्य शिरोधारा.
कौल्याच्या माथ्यावर म्हणजे उतराई सुरु करण्याच्या आधी बसून बराच वेळ ते दृश्य पाहत होतो. शेवटी वेळेचं भान राखत उतराई सुरु केली. जेमतेम पाचशे मीटरच्या आसपास उंचीची साठ सत्तर अंशातली हि निमुळती वाट, दोन्ही बाजूला दरी आणि मधोमध अरुंद निमुळती वाट. पण स्थानिक गावकरी आजही कायम या वाटेने ये जा करतात. थोडे उतरतो तोच पहिला रॉकपॅच लागला उजवीकडे दरी किंचित दृष्टीभय पण आधाराला कातळात व्यवस्थित खोबण्या. एक एक करून सावकाश उतरलो.
त्या पुढची पन्नास साठ मीटरची वाट मात्र थोडी जास्तच अरुंद आणि किंचित घसारा असणारी त्यानंतरचा आणखी एक छोटा रॉकपॅच ते पार करून जातो तोच एका टोकावर वाट संपली असेच वाटते, जवळ गेल्यावर त्या टोकाच्या अलिकडून डावीकडे अरुंद वाट थेट दरीत उतरलेली दिसली.
सुरुवातीला पाहताना जेवढे अवघड दिसते तेवढे प्रत्यक्षात मुळीच नाही फक्त सुरुवातीची पहिली स्टेप सांभाळून पुढंचा मामला फारसा अवघड नाही. पण थोडाफार घसारा मात्र आहे. आता उतार सौम्य आणि वाट बऱ्यापैकी रुंद.
डावीकडे लक्ष गेले तर कळकराई पल्याड सुर्य अस्ताला जात होता तर पूर्वेकडे नाखिंड्याचा डोंगरामागून चंद्र वर आलेला.
कातळात एके ठिकाणी साई ने त्याच्या ब्लॉग मध्ये उल्लेख केलेली पॉट होल्स दिसली ह्या खुणा हि वाट प्राचीन असल्याची साक्ष देतात.
एके ठिकाणी ऑटो मोड वर ग्रुप फोटो घेतला आणि तिथेच या वर्षातला शेवटचा सूर्यास्त पाहत बसलो.
2_0.JPG
खरंतर या वर्षाची माझी सुरुवात मकर संक्रांत १४ जानेवारी २०१७ याच भागातल्या आंबेनळी खेतोबा पासून झाली. बघता बघता या भागातल्या अंधारी, पाऊलखा, वाजंत्री, नाखिंडा, कौल्या, बैल, बैलदारा उर्फ पायरी, फेण्यादेवी, घोडेपाडी, वाघजाई उर्फ गवळदेव, कुसूर, साईडोंगर ते ढाकच्या कुठराई अवसरी, पालीचा धोंड या सर्व प्रचलित वाटा पालथ्या घालून झाल्या अर्थातच यात माझ्या सोबत येणारे मला समजून घेत मला साथ देणारे माझ्या या मित्रांचा हवतंर छोटे कुटुंबच म्हणता येईल यांचे खुप मोठे योगदान आहे. कातरवेळी पेठ गावाच्या वेशीबाहेर पडे पर्यंत ह्याच भावना उफाळून येत होत्या, इथल्या प्रत्येक भागात माझ्या आठवणी आता कायम स्वरूपी माझ्या सोबतच असणार.
मागे वळून पाहताना कौल्याची धार. तासाभराच्या चालीनंतर आंबिवलीत आलो. खाली सावंतकडे ३१ डिसेंबरची जोरदार तयारी केली होती. आता प्रश्र्न होता, ते धामणी तून माझी गाडी परत आणायचा. दिवसभराच्या तंगडतोड नंतर आणखी डांबरी सडकने चालत जायची कुणाचीही ईच्छा नव्हती. कुणी जाणारे दिसलं तर लिफ्ट मागणे अगदीच नाही तर नाईलाजाने निघाव चालत. एक दोघे न थांबता निघून गेले. दोघं तिघ फुल्ल तर्राटनुभूती घेतलेले. काही वेळात दोन जण बाईकवर येताना दिसली, त्यांनी मात्र मला व्यवस्थित धामणीत सोडलं. गाडी काढताना घरातल्या आजोबांनी विचारलेच बाकीची मंडळी कुठं आहेत? ‘आंबिवलीच्या वाटेने उतरलो , उशीर झाला अंधार पडला त्यात धामणीच्या वाटने उतरून त्या फार्म हाऊस, बंगले आणि कुंपण यातून अंधारातून वाट काढणं अवघड होऊन बसले असते’. असे सांगितल्यावर आजोबांनी लगेच मागच्या पंधरवड्यात एक ग्रुप रात्री असाच चुकला होता ते उदाहरण दिले. तिथून गाडी काढून, तिघांना घेऊन आंबिवलीतून निघालो ते रात्री दहाच्या सुमारास कुठेही न अडकता कल्याणात परतलो ते वर्षाचा शेवटचा दिवस सह्याद्रीत सत्कारणी लावून येणाऱ्या वर्षांच्या मोहिमेचे मनसुबे रचत.

अधिक फोटो साठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2018/01/nalechi-vaat-bail-ghat-kaulyach...

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, विचार आणि टवणे सर .
कोपलँडमध्ये कामाला होता काय? >>> नाही ओ Engineering Background असल्यामुळे माहित आहे.

धन्यवाद, विचार आणि टवणे सर .
कोपलँडमध्ये कामाला होता काय? >>> नाही ओ Engineering Background असल्यामुळे माहित आहे.

कराडच्याना? टवणे सर तुम्ही होता काय ? मी होतो १९९३ मधे. आता Emerson झाली आहे.
>>>

हो, तीच ती. इमर्सन आमचा क्लायंट आहे. होतो दीड वर्षे तिथे एका प्रोजेक्ट साठी.

एकदम स्कृ कॉम्प्रेसरची उपमा पाहून मला वाटलं कोपलँडला होता की काय. ती टेक्नोलॉजी अजून कुणाकडे नाहीये फारशी