सोमाज फिश

Submitted by onlynit26 on 11 April, 2018 - 01:11

तीन अँटमबॉंब वाजले तसा पडवीच्या कट्टयावर झोपलेला सोमा दचकला. अंगावर टॉवेल टाकून अंगणात आला आणि कानोसा घेऊ लागला.
"सुसल्या आज कोण गो गचाकला?"
घरातून सुसल्याने ऐकले नसावे. वरच्या आवाटाच्या दिशेने ढोल वाजू लागला तसे कोणीतली गचकलेच असावे हे निश्चित झाले. त्याने घरात येवून फोन फिरवला.
"हालव, मी सोमा गावकार बोलतय, तुमच्या आवाटात कोण वारला काय?" समोरून हो असे उत्तर आले असणार.
"मी आटमबामावरणाच वळाखलय.. शिक हूती काय? तीचे झील इले काय? "असे बरेच प्रश्न विचारू लागला. शेवटी समोरच्याने फोन ठेवला असणार.
"सुसल्या मी वरच्या आवाटात जातयं हा, पुतळा मयेकारानीन राम म्हटल्यान , तशी म्हातारी लय टिकान हूती."
"मग सांच्याक माशे हाडतलास? काय आपला याकच करू?
'याकच' करू हे ऐकल्याबरोबर तो विचारात पडला. म्हातारी मुळे माशे चुकायला नको. 'याकच' करणे म्हणजे साधारण घट्ट असे सांभार कींवा भाजी. तिचा उपयोग कालवण आणि भाजी असा होतो.
"थोड्या येळान मी मिस कॉल देयन तेव्हा बायग्याक नाक्यार पाठून दी, पिरत्या कडना माशे घेतय आणि तेच्या कडे पाठवतय."
त्याच्या बायकोला पण ही आयडीया आवडली. तोंडात पानाचा विडा ठेवत हसली.

सोमा , सुसल्या आणि बायग्या असे तिघांचे छोटेसे कुटूंब. एक मुलगा मुंबईला. सोमा अतिशय हुशार माणूस. इकडचे तिकडे करूनच पैसे कमवायचा. पावसाळ्यातली शेतीची कामे संपली की हा गुरांसारखा मोकळा व्हायचा. मुंबईत असणारा मुलगा वरखर्चाला पैसे पाठवायचा त्यात त्या तिघांचे छान भागायचे. वर्षाचे आठ-नऊ महीने मोकळा असणारा सोमा बरेच उद्योग करायचा. गावातल्या गावात इंपोर्ट एक्पोर्टचा खेळ खेळायचा. थोडक्यात सांगयचे झाले तर त्याने एक बेळगांवचा कॉन्ट्रक्टर पकडला होता. त्याला अगदी निम्म्या किंमतीत मटेरीयल सप्लाय करायचा. त्यामुळे त्या कॉन्ट्रक्टरचे चांगलेच फावले होते. गावात किंवा शेजारच्या गावात कुठेही कसले काम चाललेले असले की तिथले मटेरीयल गायब व्हायचे. रस्त्यावरची खडी, डांबराचे डबे, कोणाच्या सिमेंच्या गोणी, वाळू, चिरे काहीच नाही तर जुनी कौले यासारखे मटेरीयल हा सोमा समजणार नाही एवढ्या नगामध्ये गायब करायचा. काही दिवस लक्षात न आलेला हा प्रकार पुढे पुढे लोकांच्या लक्षात येऊ लागला. पण हे कोण करतय याचा पत्ता लागत नव्हता. डोळे उघडे ठेवून दुध पिणारा हा सोमा बोका लोकांना गाफील ठेवून हे सगळे करत होता. पण त्याचा हा इंपोर्ट एक्पोर्ट बिझनेस फार काळ टिकला नाही. गावात खोतांचे घर बांधत असताना त्यांच्या मुलाने सीसीटिव्ही कॅमेरा लावला होता. त्यात हा सोमा बिझनेसमन अडकला. खोतानी त्या बडव बडव बदडून सोडून दिला. तिथून सोमाने आपला उद्योग अंशत: थांबवला. त्याचा गुण मेल्याशिवाय जाणार नव्हता. काहीना काही छोट्या मोठ्या चोऱ्या करतच होता पण लोकांच्या नजरेत न येता.

सोमाने बायग्याकडे माशे घेऊन दिले आणि परत पुतळा मयेकारीनीच्या घरी पोचला तेव्हा तिची अंत्ययात्रा निघाली होती. सोमा मुद्दाम सगळ्यांच्या मागे राहीला. फुलांसोबत वाटेत टाकत असलेले धन/पैसे निवडून त्याची संध्याकाळची सोय करत होता. प्रेतयात्रा स्मशानात पोहचेपर्यंत त्याच्याकडे चांगले तीस पस्तीस रूपये जमा झाले. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी सगळेजण सरण लावण्याचे काम पटापट करत होते. मुंबईहून आलेले पुतळा मयेकारणीचे मुलगे टॉमेटो सारखे लाल झाले होते. सोमा सावली बघून एका कोपऱ्यात बसला होता. प्रेताला अग्नी दिला गेला. सुरूवातीला काही वेळ आग धुमसत राहीली. सोबत पाच लिटरचे रॉकेलने भरलेले कॅन आणले होते. त्यातले थोडे रॉकेल सरणावर टाकल्याबरोबर आग भडकली.
त्याबरोबर सरणाला प्रदक्षणा घालणारा पुतळा मयेकारणीचा मुलगा आगीचा होरपळ लागून भाजला.
"कधी अक्कल येतली तुमका? ह्या गरम्याच्या दीवसात राकेला कसली मारतास." पकल्या खोत रॉकेल टाकणाऱ्यावर चिडला.
"माका डूबलो मयेकार बोललो, राकेलचा कॅन पण घी बरोबर, म्हणान मिया घीतलय."
पकल्या खोताने डूबल्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकत ते कॅन झुडपात ठेऊन दिले. हे सर्व सोमाने पाहीले होते. त्याने काहीतरी मनाशी ठरवत सगळ्यांसोबत निघाला.
मागे राहीलेला डूबल्याने रॉकेलचे कॅन परत घरी घेण्यासाठी उचलले. त्या बरोबर पकल्या खोत त्याच्यावर परत चिडला.
"मेल्यानू अगदीच कशे भंडलास रे? समशानातला कायव घराक न्हेवचा नसता , ह्या तुमका आवशी बापाशीन शिकवूक नाय काय रे ? कधी सुदारतलास ता रवळनाथाकच म्हायत.." असे सुनवत त्याने त्याच्याकडचे कॅन घेत परत तिथेच ठेऊन दिले.
हे ऐकून सोमा मनातल्या मनात हसला.

सुसल्याने रांधलेले मासे खाऊन सोमा घराबाहेर पडला तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते. बाहेर भयाण काळोख होता. सोमाने स्मशानाकडच्या वाटेने जात असताना सहजच तिकडे पाहीले. पुतळा मयेकारीन पुर्णपणे जळली होती. पुढे गेल्यावर त्याला त्याचे तिघे मित्र मिळाले. एका ठिकाणी बसून थोडावेळ बसल्यावर ते चौघे जण गॅसबत्तीच्या उजेडाने नदीच्या दिशेने निघाले. ती अमावास्येनंतरची रात्र होती. याबद्दलची शंका एकाने काढली होती आणि त्याच्या या बोलण्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत ते सर्व जण मासेमारी साठी निघाले होते. सोमाकडे माशाची करंडी आणि गॅसबत्ती सांभाळायला देऊन ते तिघे मासे पकडत होते. सोमा ते काम लिलया करत होता. त्या दिवशी त्यांना खुप मासे मिळाले. सोमा भलताच खुश होता. रात्रीच्या जेवनातही मासे होते आणि पुढचे दोन दिवस पण आपली चंगळ होणार विचारनेच गडी खुशीत होता. छोट्या माशांसोबत मोठे मासे ही मिळाले होते. एव्हाना रात्रीचे बारा वाजून गेले होते. ते चौघेजण भरलेली माशाची करंडी घेऊन परतत होते. एका चिंचोळ्या वाटेवर पांढरी आकृती पाहून चौघांची बोबडी वळणार इतक्यात ती आकृती लगेचच नाहीशी झाली. चौघानी एकमेकांकडे पाहीले. त्या चौघात सोमा थोडा धीट दिसला. ते चौघे जण थोडे पुढे गेले असतील इतक्यात झुडपात जोराचा खस खस असा आवाज झाला आणि एक सफेद साडी नेसलेली बाई समोर आली. इतके दिवस ते चार जण फक्त भुताबद्द्ल ऐकून होते. पण आज प्रत्यक्षात भुताची गाठ पडत होती.
"मेल्यानू पुतळा मयेकारणीचा राकेल नडला, मयेकारीन आपणाक काय सोडीत नाय" तिघांपैकी एकजण बाकीच्यांना उद्देशून म्हणाला. एकमेकांना पाहण्यात वेळ न दवडता तिघे जण सैरावैरा धावू लागले. नेमकी त्याचवेळी गॅसबत्तीही विझली. सोमाने मात्र आपल्या जवळची माशाची करंडी घट्ट पकडून ठेवली. त्या सफेद साडीतल्या बाईचा नाच पाहून सोमाने एका हातात माशांची करंडी पकडत आपले कपडे काढले आणि दिगंबर अवस्थेत भुतासमोर नंगानाच करू लागला. त्याच्या ऐकिवात होतं की भूतं ही जास्त करून बायकांचीच असतात आणि त्यांच्यासमोर पुरूषाने कपडे काढले तर ती घाबरून पळतात. पण सोमाच्या दिगंबर अवस्थेला न घाबरता ते भूत अजुनच उसळले. हे पाहून सोमाचीही पाचावर धारण बसली. तो माशाची करंडी तिथेच टाकून पळत सुटला. बाकीचे तिघे अगोदरच पुढे पळाले होते.

दुसऱ्या दिवशी सोमा सोडून त्या तिघांना ताप भरला. सोमा मात्र खडखडीत होता. तो सकाळचे अकरा वाजायचे वाट बघत होता. अकरा वाजले तसे तो काणेकरांच्या चाळीत मागच्या बाजूने दगडी कुंपन पार करून आत घुसला. त्या चाळीत इंजिनियरींग कॉलेजला शिकणारी मुले राहायची. ती कॉलेजला गेली होती. त्यामुळे सोमाचे चांगलेच फावले. त्याने विशिष्ट खोलीजवळ येऊन कौले काढून खोलीत उडी मारली. त्याला हवा असलेला माल आपल्या ताब्यात घेऊन तिथून बाहेर पडला.

दुसऱ्या दिवशी सोमाच्या घरी पोलीस हजर झाले. त्याला बेड्या ठोकून घेऊन जाऊ लागले. सोमा एकटाच घरी होता.
"सायबानू मी काय केलय ता तरी सांगा" असे पोलीसांना विनवू लागला. त्याच्या आज पर्यंतच्या कारकीर्दीत त्याला कधीच अटक झाली नव्हती.
पोलीस स्टेशनला घेवून गेल्यावर त्याला मोठ्या साहेबांसमोर उभे केले गेले.
" काय रे, काल काणेकरांच्या चाळीत का गेला होतास?" पोलीसांनी जबानीला सुरूवात केली.
प्रश्नात काणेकर चाळीचा उल्लेख झाल्यावर त्याला सगळा प्रकार लक्षात आला. पोलीसांच्या माराबद्दल तो ऐकून होता. त्याने सर्व खरे सांगायचे ठरवले. इतक्यात इंजिनियरींग कॉलेजची फिर्यादी पोर देखील तिथे हजर झाली.
"या पोरांचा तुझ्यावर मोबाईल चोरीचा आरोप आहे आणि तुला चाळीच्या आवारात फिरताना एका माणसाने पाहीलय, तेव्हा खरे काय ते सांग."
"सांगतय सायबानू, पण मिया हेंचो मोबाईल चोरूक नाय ओ."
"मग काय तिथे झक मारायला गेला होतास, खोटं बोलू नकोस, बोलते कसं करायचे ते आम्हाला चांगलं ठाऊक आहे"
" सांगतय खरा काय ता, मी माझे माशे हाडूक हेंच्या रूममध्ये घुसलय"
" कसले माशे" असे विचारल्यावर पोलीसांना सोमाने दिलेली जबानी अशी होती.

'त्याचे असे झाले , आदल्या रात्री भूत दिसल्यावर पळताना सोमा रस्त्याच्या बाजुला असलेल्या चरात पडला. तिथून त्याला बाहेर पडता येत नव्हते. त्याचे साथीदार केव्हाच पुढे निघून गेले होते. काही वेळाने त्याला दुसरेच तिघेजण रस्त्याने येताना दिसले. सोमाने कसाबसा चरात अडकलेला पाय बाहेर काढला . उठून बघतो तर त्यांच्यापैकी एकाच्या हातात माशाची करंडी होती. ती त्याने पाहील्याबरोबर त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला त्याच्या सोबत झालेला नकली भूताचा डाव कळला. पण घाई करून चालणार नव्हते. सोमा चरात तसाच पडून राहीला. ते तिघेजण कुजबुजत्या आवाजात आपण कसे घाबरवून मासे मिळवले याबद्दल बोलत जात होते. हसत होते. सोमा त्यांच्या मागून चरातूनच सरपटत जाऊ लागला. मिट्ट अंधार असल्यामुळे चरातून गुडघ्यावर चालणे त्याला कठीण होऊ लागले. तो त्यांच्या मागोमाग रस्त्यावर आला. थोडं चालल्यानंतर ते तिघे काणेकरांच्या चाळीच्या आवारात घुसले तसा सोमा थबकला. त्यातल्या एकाला सोमाने आवाजावरून ओळखले होते. ते तिघे कोणत्या खोलीत जातात ते पाहू लागला. शेवटच्या रूम मधली लाईट लागली तसा सोमा तिथून निघाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सोमा कौले काढून चाळीतल्या खोलीत शिरला तेव्हा किचनमध्ये सगळीकडे मच्छीफ्रायचा घमघमाट सुटला होता. त्याने फ्रिज उघडला. पोरानी सर्व मासे साफ करून एका टोपात ठेवले होते. हे काम रत्नागिरीहून आलेल्या रूपेशचेच असणार असा सोमाने अंदाज बांधला. त्यालाच मासे साफ करायला उत्तम जमायचे. टोपातले साफ केलेले मासे त्याने आपल्या जवळील पिशवीत घेतले. त्याचबरोबर फ्राय केलेल्या माश्यापैकी एकही तुकडी तिथे न ठेवता सगळे आपल्याकडे घेवून तिथून निसटला. '
हे सारं ऐकून पोलीस आणि पोरं पण अवाक झाली.
"पण माका याक कळत नाय, आम्ही माशांका जातलव ह्या पोरांका कसा कळला?" आपली जबानी परिणामकारक झाल्यामुळे सोमालाही जोर चढला त्याने पोलीसांसमोर इंजिनियरींगच्या पोरांना उलट सवाल केला.
"हा, असं का केलात पोरांनो?" पोलीसांनी पोरांकडे पाहत पोलीसांनी विचारले.
रूपेशला कळून चुकले. सारं काही कळलेय त्यामुळे लपवून ठेवने काहीच उपयोगाचे नव्हते.
"जेव्हा स्मशानातील रॉकेलचे कॅन घ्यायला हे आले तेव्हा आम्ही यांना पाहीले. आम्ही गंमत म्हणून त्यांचा पाठलाग केला. कारण यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्यांनी ते रॉकेल एका मांगरात नेऊन गॅसबत्तीमध्ये भरले. तिथेच त्यांचा मिंत्रासोबत मासेमारीचा प्लान ठरला आणि आमचा प्लान यांना घाबरवून मासे मिळवायचा. "
" ओह.. असे आहे तर.., पण मग मोबाईल कोणी चोरला?"
आणि तेवढ्यात कोणाचा तरी मोबाईल वाजला.
"अरे संदीप, ही रिंगटोन तर तुझीच आहे ना" रूपेश संदीप कडे पाहत म्हणाला.
"हो, पण मोबाईल आहे कुठे?"
"संदीप शेठ तुमच्या पाटलनीक किशे कीती ओ? ढोपराखालच्या किशात कायतरी लुकलुकताहा बघा." सोमा असे बोलताच. त्याने खिसा चाचपला. खरचं तिथे मोबाईल होता. हे पाहून सगळे हसायला लागले.
"सगळे आता जाऊ शकता, फुकटचा डोक्याला ताप मात्र करून ठेवलात." जबानीचा कागद फाडत पोलीस म्हणाले.
"नायतर काय, झक मारलय आणि मयेकारीनीचा राकेल घीतलय. तिनाच माशांसाठी माका तळतळाक लावल्यान." असे बोलून सोमा बाहेर पडला. एव्हाना ही बातमी गावात पोचली आणि सोमाच्या तिघा मित्रांचा ताप ही उतरला. लगेचच ते तिघे माशांच्या वाट्याला मात्र सोमाच्या घरी हजर झाले.

समाप्त...
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
---------------------------------------------------
( टिप :- ही कथा कल्पनिक असुन कोणत्याही व्यक्तीगत जीवनाशी काहीही संबध नाही. )

लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
९००४६०२७६८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे.. मालवणी भाषेच्या टचमुळे मजा आली..
गाव गाता गजाली म्हणून एक सिरीअल आहे ना एक.. त्यांना द्या. मस्त एपिसोड बनेल.

मस्तच कथा आहे. खूप आवडली. मालवणी भाषेचा टच असल्यामुळे आजीला पण वाचायला दिली. तीला पण फार आवडली . तुमच्या इतर कथा पण छानच आहेत.

मस्त Lol