झाड

Submitted by जै on 10 April, 2018 - 10:56

झाड

",माये, चांगलं वाटन वाट आज बरका, लै दिवस झाले सागुती नही खाल्ली"

"परसू, अरे रानडुक्कर पन डुक्करच आसतनरे, महं आईक मी तुलं शंभर रूपये देते, मन्सुऱ्याकडून बोकड्याचं मटन आण पण हे डुक्कर नको खाऊ"

"माये तुलं कितीदा सांगितलं की , या जगातली प्रतेक सजीव गोष्ट मानवाची भूक भागवेल असं कॉरवर सांगून गेलाय"

"मेला तुहा कॉरवर..घाल त्यालं चुलीत.जावदे तु कही आईकणार. नही, वाटणालं लाल मिरच्या नही घरात, आण कोणाच्या इथून"

तसा परशा उठला अन दाराला लटकवलेल्या लिंबूमिरचीमधल्या मिरच्या काढून म्हातारीकड दिल्या

"हूं, धर भाज ह्या"

"कुठून आणल्या एवढ्या लवकर?"

"तुहा दारात लटकल्या होत्यानं, त्याच्यातल्याच काढल्या,इतक्या दिवस ठेवल्या तुहा मान राखून"

बाप गेल्यावर घर बांधनं नाही झालं पण ओसरीतच एक पाच पतराची खोली काढली होती , दारात त्याचा नकार असतानाही म्हातारीनं लिंबू मिरची लटकवली होती , म्हातारीला तो जास्त दुखवायचा नाही किंवा एखाद्याच्या श्रद्धास्थानावर त्याला आक्षेपही नव्हता पण त्या नावाखाली चाललेल कर्मकांड आवडायचं नाही त्याला.

"मेल्या, थोडा तरी भेजायनं देवागिवालं"

"इथं घरात मिरची नही अन दारालं काय लटकून ठेवायची, अन देव..काय असतो? दगडालं पोट नसतं बरका माये"

"तुह्या तोंडीच लागायलं नही पाहीजे, कुठून बुद्धी झालीन तुलं चार बुकं शिकवली, शिकून नोकरीबिकरी करायची तर मलच बसलाय ग्यान शिकवत, कर बापा तुह्या मनालं वाटन ते कर...मलं वाटतं तुह्या अंगात त्यो मोव्हन्याच शिरला काय कन्नू..खानाखराबा व्होवो त्या मेल्या भुताचा...मेल्यावर तरी सोडनारे मोव्हन्या मह्या लेकरालं" म्हतारीनं पदरानं डोळे पुसले अन मिरच्या भाजू लागली

मोहनचं नावं निघलं अन परशा शुन्यात हरवला, मोहन त्याच्यापेक्षा दहाबारा वर्षानं मोठा असेल पण दोघे चांगले मित्र होते, मोहन गावातलं एक अभ्यासू व्यक्तिमत्व पण गावातले लोक त्याला गांभिर्याने घेत नसायचे तो अंधश्रद्धा कर्मकांडांविरूद्ध बोलायचा, त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळे त्याचे लग्नही झाले नव्हते आणि याची त्याला तिळमात्र चिंता नव्हती, तो सत्याच्या शोधातला यात्री होता..परशा आठवी नववीला असेल तेव्हाची गोष्ट ,गावात मरीआईची यात्रा होती , बारागाड्या निघाल्यावर आईचं सोंग आलं , कला विरंगुळा म्हणून त्याला हे मान्य होतं पण ज्या बाईच्या अंगात आलं तिनं गावाविषय केलेलं भाकीत अन त्या भितीनं घाबरणारे बायामाणसं तिच्यापुढं लोटांगण घेऊ लागले तेव्हा मोहनने त्या प्रथेला विरोध केला..अन तो लोकांना हे ढोंग आहे असं पटवून देऊ लागला, लोकांनी त्याला होमाजवळून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, परशा तिथच वडिलांसोबत उभा होता, तेंव्हा ज्या बाईच्या अंगात देवी आली होती तिच गरजली...

'बोलुद़्या ..बोलुद्या त्याला...आईचा कोप होईल तेव्हा कळल त्याला...अन ती जोरानं कण्हत होमाभोवती मुंडकं फिरवू लागली...भग पाह्यजे , भग पह्यजे म्हणत....कोणीतरी कोंबड्याची मान चरकन कापली तिच्यापुढं..

आईची आज्ञा झाल्यावर लोकांनी त्याला सोडलं, मोहन आईपुढे गेला...

"मागच्या वर्षी तर म्हनली होतीना तू चांगला पाऊस होणार हे..मंग कहून नही झाला?"

"तुह्यासारके अधर्मी हेनं गावात कसा येईन पाऊस...आं हा ,आंहा आंहा" आईच्या अंगात जोरानं येऊ लागलं, डफडं घूमू लागलं,नगारे शिगेला पोचले,भोपे बोंबलू लागले...आ बो बो बो बो.. ,कुंकू हळदीनं माखलेलं तोंड अजून लालबूंद झालं , मोहन पुढचा प्रश्न विचारनार तोच आई गरजली,

"बाजुला हो, मुर्खा ...आई आता आगीत प्रवेश करणार " अन तडक आईनं होमाकडे झेप घेतली, बायाबापड्या रडू लागल्या कल्लोळ उडाला, पण भोप्यांनी आई जाळापाशी अलगद झेलली

"सोडा..सोडा..सोडा मला पाप वाढतयं" आईला भोपे मागे खेचत होते आई जाळाकड ओढत होती

"सोडा तिलं , नाटकं करती ती"

"सोडा मला, मी अग्निप्रवेश करून शाबूत निघून दाखवते...आईवर शंका घेतोस मुर्ख मुला"

"हो सोडा तिला ,ती जर आगीतून बाहेर शाबूत निघली तर पुन्हा आईविरूद्ध बोलनार नाही शब्द हे महा" तशी मोहनवर कुणीतरी लाथ घातली, क्षणभर शांतता झाली, डफडे थांबले....

कोणी काहीच बोलेना ,आई जाळाकड रागानं पहात होती

"यालं बाहेर काढा रे कोनी!!"

"बरूबर हे मोहनदाचं " परशा अनाहूतपणे बोलला,

"पोंघ्यात लै पाणी आलं का बाळा तुह्या? संप्या पोरगं घेऊन तू पण बाहेर व्हय, अन्यथा आईचा कोप होईल" मंदिराचा पुजारी रागाने बोलला

"मंदिरच काय गाव सोडून जातो, ईलं म्हनाव फक्त होमात उडी मार" तशा मोहनला भोप्यान दोनचार वाजवल्या....मोहनने प्रतिकार केला पण चारपाच जनांनीत्याला बाहेर खेचला...आईच्या अंगात अजून जोमानं आलं....ती होमाकडे सरकू लागली .....होमाजवळ जावून आई अचानक बेशुद्ध झाली,भोप्यानं चर्रर्रकन आईच्या डोक्यावर लिंबू कापलं..

संपत परशाला घेऊन कोपऱ्यात उभा राहिला, त्यानं परशाची समजूत घातली असं बोलू नये म्हणून...मोहनला लोकांनी मंदिराबाहेर काढले, परशाला हे आवडले नाही, मोहन तडक घराकडे निघाला..परशाने बापाच्या हाताला झटका दिला अन मंदिराबाहेर पडला...मोहन बकान्या लिंबाच्या पुढे गेला होता

"मोहन दा"

परशानं हाक मारली ,मोहनने थांबत वळून बघितले.
परशा जवळ येवून बोलला

"तुहं बरूबर होतं दा"

"हं...महीतीहे..पण कही फायदा नही"

"तुल भेव नही वाटत का बरं याह्यचं"

"भ्यायचं काय त्याच्यात..हे सगळे ढोंगी लोकहे"

"हाव मलबी तसच वाटतं" दोघं चालत चालत बोलत होते

"लै समजदार हे रे तू ,इतकुसाक आसुनबी"

चालत ते मोहनच्या घरापर्यंत आले , घर कसलं छोटीसी खोली, एकटाच रहायचा तो ,एक पलंग ,एक माठ, एक ग्लास अन थोडं गरजेपुरतं साहित्य...पण पुस्तकांचा मात्र खजिना होता त्याच्याकड...

"दा मी येजावु कारे तुह्याकड पुस्तकं वाचायलं?"

"येजाय ,येजाय कधीबी येजाय"

अन अशीच परशाची अन मोहनची मैत्री वाढत गेली, संवाद होऊ लागले, मोहनचे विचार परशाला आवडायचे,दोघं तासनतास गप्पा करायचे, मोहनचा एकट्याने जंगलात फिरण्याचा छंद परशालाही लागला होता, झाडझुडांशी गप्पा, पाखरांशी हितगूज, अनवाणी पायानं फिरणं,नदीत पोहणे...असेच त्यांचे दिवस जात होते... परशा आता कॉलेजला जाऊ लागला होता..

मिरगाचा एक पाऊस पडला अन आभाळानं तोंड काळं केलं, जमिनीतली गरमाट बाहेर पडत होती, अन त्या टळ्ळ दुपारी मोहन जंगलात फिरत होता, सागाच्या झाडाखालून जाताना ,पायाच्या घोट्याजवळ त्याला काहीतरी खरचटल्या सारखं जाणवलं
तो खाली बसला, सळकन आवाज आला बघतो तर जवळूनच एक नाग गेला, सापांविषयी माहिती असल्यानं त्याला नाग असल्याची खात्री झाली , पँड वर करून बघितलं तर घोट्याच्या थोडं वर दोन लालजरद रक्ताचे टबूने थेंब बाहेर आलेले...त्याने टरकन सदरा फाडला पोटरीवर घट्ट बांधला...अन गावाकडे धावत सुटला, पोटरीची पकड ढिली होत होती, गावापासून तो खुप दूर जंगलात आला होता, त्याला धाप लागली होती , विष अंगात भिनत होतं, सुर्य आग ओकत होता, मृत्यूची भिती अंतीम भिती असते...मुख्यरस्त्याजवळ आल्यावर त्याचा तोल गेला..तो पडला उठला.. पुन्हा धावू लागला शुद्ध हरपू लागली होती..त्याला जाणवलं आपण बेशुद्ध होणार त्याने खिशाचा पेन काढला अन तळहातावर लिहलं 'मला नाग चावला मला दवाखान्यात न्या' शेवटी पायांनी माघार घेतली अन तो गावठाणाजवळ येऊन पडला...कोणीतरी बैलगाडीवाल्यानं त्याला गावात आणलं..

'मोहनला पान लागलं, मोहनला पान लागलं "साऱ्या गावात बातमी पोचली,परशा कॉलेजला गेला होता आरबाडी मंडळ जमा झालं , तांब्याचा हंडा, पितळी परात ते कडं बाहेर काढलं , थप्पड अंधरलं, मोहनला मधोमध टाकण्यात आलं , आरबाडी मंडळ चोहोकडून बसले , नागाच्या फोटोला गुलाल वाहिला,नारळ फोडलं, अगरबत्ती पेटवली, परात हंड्यावर उपडी ठेवली , अन मोहनच्या अंगातलं विष उतरवण्यासाठी सुरू झाला एक अघोरी खेळ...बारी
थाप परातीवर पडू लागली, कडं हंड्याच्या बरगड्या बडवू लागलं एक अंधश्रद्धयुक्त भोळाभाव एका जिवाशी खेळू लागला, गाव जमा होवू लागलं,,मंडळ गळा आवळू लागलं,संगित सुरू झालं

छळ्ळांग,छळ्ळांग,छळ्ळांग, छळ्ळांग

देवा यावे , यावेच दर्शना
समजून घ्यावी, घ्यावीच वंचना
भक्त आला, आलाया शरण न
अभय द्यावे, द्यावेच मोहना

श्वासांची लढाई मंदावत होती, बारी जोर धरत होती पण मोहन हलत नव्हता, विझण्याआधीची फडफड असावी बहुधा, मोहन शुद्धीवर येत इतकच म्हटला" मला दवाखान्यात न्या" तो शुद्धीवर येतोय बघून मंडळाला अजून चेव चढला...कडं घुमू लागलं

पण खरीतर ती त्याची विझण्याआधीची फडफड होती, डोळ्यांच्या चिमण्या मंदावत होत्या ,छळ्ळांग, छळ्ळांग, छळ्ळांग... मोहनचा आर्त हरवला त्या आवाजात...त्याच्या तोंडून पांढरा फेस बाहेर येवू लागला...देहाने जगण्याच्या आसक्तीतून शेवटची उसळी घेतली...हातपाय वाकडे करून , गार झालेला देह शांत पडला , एक लाव्हा कायमचा शांत झाला एका निनावी प्रवासासाठी..हातावरच्या दोन ओळी वाचायला हव्या होत्या कुणी..?

"परसू, वाटण झालं रे तयार"

मायच्या आवाजानं परशा ध्यानावर आला, पण त्याच मन लागत नव्हतं, आज मोहनची आठवन बेचैन करून गेली, पण भाजी बनवून त्यानं जेवण केलंच..मोहन नेहमी म्हणायचा शहाण्याने पोटावर अन्याय करू नये..
दिवस जात होते परशा कॉलेज सम्पवून सिनियर कॉलेजला गेला होता...हे सगळं करताना त्याला जस शक्य होईल तशी तो जनजागृती करत होता..कॉलेज मध्ये पथनाट्य करणारा एक ग्रुप त्याने तयार केला होता, अंधश्रद्धा निर्मूलनाच काम तो त्याच्या परीने करत होता..पण त्याच्याच गावात त्याला ह्या कामासाठी कावडीची किंमत कुणी देत नव्हतं.. उलट लोक म्हणायचे याला मोहन्यान झपाटलय...

वर्गन्याना विरोध करतो हे माहित असूनही गावातलं एक शिष्टमंडळ परशा कडे वर्गणीसाठी आलं होतं...कारण सम्पूर्ण गावातून मरीआईच्या नवीन मंदिरासाठी घरपीच्छे पाच हजार वर्गणी गोळा करणं सुरु होत, त्यांची बाजू एकून घेतल्यावर परशा बोलला

"मला वाटतं मंदिरापेक्षा आपण सभामंडप बांधावा अन मराठी शाळेचं वालकम्पाऊंड करावं, सभामंडपात गोरगरिबांच्या मुलींची लग्न होतील, अन वालकम्पाऊंडने शाळा अधिक सुंदर होईल...हाय का नही...…?" परशाची माय सगळं ऐकत होती, आतापर्यंत शांत असलेलं शिष्ट मंडळ संतापल त्यातला एकजण बोलला

" लै आक्कल नको पाजू, वर्गणी देतो का नाही सांग?"

"अरे दादा मी जे म्हणतो ते गरजेचं है, दगडाला कुठं निवाऱ्याची गरज असती का?"

"शांते, पोराल आवर तुह्या, आईल पुन्हा त्यो दगड म्हणला" पुजारी गरजला

"परसू बाळा असं नको बोलू"

"तू तूह काम कर वं माये..यायल धडा शिकवलाच पाह्यजे"

"शांते , आईक आईक ह्यो आईच्या भक्ताह्यल धडा शिकवणार....मोहण्याचं काय झालं विसरली का तू बी'"

"साप चावला होता त्याल" परशा मधेच बोलला

"सापगीप काही नाही आईचा कोप होता त्यो...आजूनबी सुदर आईला शरण ये"

'जा रे ढोंग्या सांग तुह्या आईला काय करायचं कर म्हणावं"

"आबबब्बो....शांते याच कही खरं नहि ...याल खरंच मोहन्या लागला....चला रे" पुजारी बोंबल्ला अन सगळे बाहेर पडले...परशा हसला माय डोळे पुसत होती...पुजाऱ्याच्या बोलण्यानं ती घाबरली होती...

गुरं परतायच्या वेळेला परशाची नजर चुकवून माय आईच्या मंदिरात गेली, पुजाऱ्याच दर्शन घेतलं, पुजाऱ्याने तिला अंगारा लावला अन हळूच आईकडे पाहून पुटपुटला
"लेकराला पदरात घे वं मे"

थोडासा अंगारा जिभेवर ठेऊन माय पुजाऱ्यापुढं चिंतातुर होऊन बसली

"काय झालं म्हाराज म्हया परशाल..?"

"मोहन्याच भूत लागल त्याल'"

काळजात चरकन झालं..पदर डोळ्यावर आला.."त्यो बरा होइन्न...?"

"होईन...पण त्याल गुण्या मंत्रिकाकड न्यावं लागण...ह्यो अंगारा लाव त्याल झोपल्यावर अजून लै असर नही मोहण्याचा पण मंदिराचं काम सुरु झालं की दुखणं वर येईन" अंगारा देत पुजारी बोलला

माय डोळे पुसत अंगारा घेऊन घराकडं निघाली

सकाळी उठून गावातल्या पारावर तरुण मुलं गोळा करून परशा सभामंडप व वॉलकम्पाऊंड कसं गरजेचं आहे हे पोरांना पटवून देऊ लागला..गावात मरिआईची दहशत होती , तरुण मूलही तिच्याविरुद्ध ऐकून घेत नव्हती काहींना पटत होत पण ते घरच्यांना घाबरत होते,इकडं पुजारी अन शिष्ट मंडळाने गावात बातमी पसरवली कि परशाला मोहन्यांन झपाटल... परशा मोहण्याचं झाड झाला...त्यांना भीती होती परशाच तोंड बंद नाही केलं तर मंदिराचं काम पूर्ण होणार नाही

परशा जो भेटेल त्याला मंदिर कस गरजेचं नाही हे पटवून देत होता..म्हणून लोकांना अधिक खात्री पटत होती की परशाला मोहंन ने झपाटल ...कारण आईला विरोध करणारा मोहनच होता...

मायची काळजी वाढत होती, परशा भुताबिताच मानायला तयार नव्हता किंवा तीच ऐकूनच घेत नव्हता,मंत्रिकाकड जाणं तर दूरच मग , शेवटी पुजारी अन शिष्टमंडळाने एक डाव खेळला, पारशाच्या मायकड कसलं तरी गुंगीचं औषध दिल अन ते त्याच्या जेवणात कालवायच सांगितलं...मायच भोळ मन लेकरू नीट व्हावं म्हणून कुठल्याही थराला जायला तयार होत...

रात्री जेवणं उरकले अन परशा थोडा आडवा झाला , त्याला अचानक गुंगल्या सारखं झालं, तो पापण्या ताणून जगण्याचा प्रयत्न करू लागला...माय धावत पुजाऱ्याकडे आली..पुजारी अन शिष्टमंडळ तयारच होत..गावात हटकून बातमी पसरवली..परशा झाड झाला , परशा झाड झाला..गाव पारशाच्या दारी गोळा झालं...पुजारी पारशाच्या अंगावर अंगारा फेकत होता, परशा विरोध करायचा पण त्याला सुचत नव्हतं...सारखा तोल जात होता...

"ह्याला गुण्या मंत्रिकाकड घ्या" कुणीतरी गर्दीतून बोलला, परशाला बैल गाडीत घातला, तो विरोध करत होता, मंत्रिकाच घर आलं..गावातली बरीच मंडळी तिथपर्यंत आली होती...दोनचार जणांनी टेम्भे पेटवले होते..मांत्रिक म्हसनाच्या बाजूला रहात होता

परशाला खाली उतरवलं...अन मांत्रिक मंत्र बडबडू लागला...पुन्हा एका अघोरी खेळाला सुरुवात झाली होती..एका सुद्न्य व्यक्तीची मुस्कटदाबी करत होता एक अंधार प्यालेला समाज...

परशा फक्त इतकंच म्हणत होता.. मी झाड नाही...मी झाड नाही

...जयदीप विघ्ने

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान कथा आहे. मला आवडली. हे असं अजूनही असेल तर दुर्दैव आहे.
चौथीत असताना अशा आशयाची एक कथा वाचलेली. त्यात दरवर्षी गावातल्या एका बाईला अंगार्यांवरून चालायची प्रथा असते. आणि एकदा चालताना एका बाईची साडी पेटते आणि त्यात ती मरते. एक मुलगी आग विझवायला जाते पण देवीची इच्छा म्हणून लोकं थांबवतात आणि त्या बाईला तसंच मरणाच्या दारात सोडतात आणि ते नसते प्रयोग करतात. एक्झॅक्ट आठवत नाही पण अशीच होती ती कथा....

Sad अवघड आहे.

लेखनशैली छान आहे. लिहित रहा.