पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ११. चित्रलेखा (१९६४)

Submitted by स्वप्ना_राज on 9 April, 2018 - 10:05

हा चित्रपट प्रथम पाहिल्याला खूप वर्षं उलटून गेली आहेत. शाळकरी वयात, बहुधा डीडीच्या कृपेने, पाहिला होता. ‘राजनर्तकी म्हणजे राजाच्या दरबारात नृत्य करून लोकांचं मनोरंजन करणारी नृत्यप्रवीण स्त्री' असा साधा, सरळ, सोपा अर्थ ठाऊक असण्याचं ते वय (आजकाल ते वय तसं राहिलेलं नाही असं ऐकतेय!) . ‘कुलटा' ह्या शब्दाचा अर्थ माहित असण्याचं काहीही कारण नसलेलं ते वय. 'स्त्रीजन्म' ह्या शब्दाचे अनेक अर्थ-अनर्थ माहित नसण्याचं ते वय. खरं तर हा चित्रपट फारसा लक्षात न राहण्याचंच ते वय. पण का कोणास ठाऊक, मनाचा कुठला तरी एक कोपरा चित्रलेखा अडवून बसली होती. शाळकरी वयात मला न उमगलेली तिची व्यथा आता तरी मी समजून घ्यावी असं कदाचित मूकपणे ती सांगत असावी.

टुकार, भिकार, चावून चोथा झालेले चित्रपट दाखवणाऱ्या टीव्ही चॅनेल्सवर हा चित्रपट आता बघायला मिळेल ही आशा करणं व्यर्थ म्हणून युट्यूबवरून डाऊनलोड करून घेतला. तरी तो बघायला दोन आठवडे झाले तरी मुहूर्त लागेना. शेवटी काल तो लागला. सुदैवाने प्रिंट चांगली निघाली आणि मी सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या पाटलीपुत्र नगरीत शिरले.

चित्रपट सुरु होतो तेव्हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा सामंत आर्यपुत्र बिजगुप्त अनेक दिवसानंतर पाटलीपुत्रात परत येत असतो. नगरात आल्या आल्या त्याने नव्या राजनर्तकी चित्रलेखाबद्दल, तिच्या अनुपम सौंदर्याबद्दल, तिच्या नृत्यकौशल्याबद्दल बरंच काही ऐकलेलं असतं. तो कुतूहलाने आपल्या दासींजवळ तिच्याबद्दल चौकशी करतो. चित्रलेखालाही तिच्या दासी बिजगुप्तबाबत सांगतात तेव्हा ती एक निर्णय घेते. राजदरबारात नृत्य करतेवेळी ती आणि तिच्या दोन सख्या एकसारखा मुखवटा घालून नृत्य करतात आणि बिजगुप्तने त्यातली चित्रलेखा नेमकी कोण ते ओळखून दाखवावं असं आव्हान ती त्याला देते. बिजगुप्तने तिला आधी कधी पाहिलेलं नसतं पण तो तिला नेमकं शोधून काढतो. प्रेक्षकांत बसलेली त्याची नियोजित वधू यशोधरा त्याचं हे कसब बघून आनंदित होते पण तिच्या सख्या मात्र अस्वस्थ होतात.

चित्रलेखा बिजगुप्तवर मोहित होते. लवकरच तो तिच्या घरी तिला भेटायला येतो. यशोधरेला तिच्या सख्या सावध करायचा प्रयत्न करतात पण तिचा आपल्या होणार्या नवर्यावर विश्वास असतो. तो चित्रलेखेच्या जाळ्यात अडकणार नाही ही तिला खात्री असते. आजवर अनेक स्त्रियांशी संबंध आलेल्या बिजगुप्ताने आपल्या सौंदर्याची तारीफ केली नाही हे बघून चित्रलेखा चकित होते. तो आपण आजवर कोणाच स्त्रीवर प्रेम केलं नाही ह्याची प्रांजळ कबुली देतो पण त्याचबरोबर तिला हेही सांगतो की प्रेम म्हणजे काय हे जाणून घ्यायची त्याची इच्छा आहे. दोघांच्या भेटी हळूहळू वाढत जातात आणि यशोधरेची अस्वस्थताही. शेवटी तिचे वडील 'बिजगुप्ताला चित्रलेखेच्या जाळ्यातून सोडवा' अशी विनंती करायला योगी कुमारगिरीकडे जातात. आपल्या तपसामर्थ्याचा गर्व झालेला, ‘स्त्री म्हणजे फक्त अंध:कार, मोह आणि माया. तिची आपल्या पायांना स्पर्श करायची सुध्दा लायकी नाही' अशी ठाम समजूत असलेला तो भगव्या वस्त्रातला कमंडलूधारी ब्रह्मचारी तपस्वी एका 'कलंकित, कुलटा' स्त्रीला सन्मार्गावर आणण्यासाठी, तिचं कल्याण करण्यासाठी, तिला ज्ञान देण्यासाठी तिच्या घरी जातो. तो तिला पटवून द्यायचा प्रयत्न करतो की जीवन क्षणभंगुर आहे, ज्या रूपाचा तिला एव्हढा गर्व आहे ते एक दिवस नाहीसं होणार आहे. शाश्वत आहे ते ईश्वराला शरण जाणं. तिने इच्छा-वासना जिंकून घेऊन मोक्षाचा मार्ग धरावा, बिजगुप्ताच्या आयुष्यातून निघून जावं असं तो तिला सुचवतो. पण ती मात्र त्याला 'तू स्वत: देवाने दिलेल्या आयुष्याकडे पाठ फिरवून बसला आहेस. तुला काय ईश्वराची प्राप्ती होणार?’ असं सुनावते.

योगी निघून जातो पण त्याचे शब्द चित्रलेखेच्या मनात रुतून बसतात. तश्यात तिला एक पत्र मिळतं. तिच्या दासीकडे ते पत्र देणाऱ्या स्त्रीने लिहिलेलं असतं की यशोधरेचं मन एव्हढं नितळ आहे की बिजगुप्ताच्या सुखासाठी ती त्याच्या मार्गातून बाजूला व्हायला तयार आहे. त्या स्त्रीने फक्त आपल्या सुखाचा विचार करणाऱ्या चित्रलेखेचा धिक्कार केलेला असतो. ते पत्र वाचून चित्रलेखा आणखी अस्वस्थ होते. त्यात तिची दासी महामाया आणि तिच्याकडे असलेली साध्वी गायत्री देवी दोघीही असंच म्हणतात की जे प्रेम देऊ शकतं ते फक्त घेणाऱ्या प्रेमापेक्षा जास्त श्रेष्ठ असतं. आणि मग एके दिवशी तिचे केस विन्चरणारी दासी डोक्यात एक पांढरा केस दिसत असल्याचं जेव्हा सांगते तेव्हा 'कृतांतकटकामल ध्वजजरा दिसो लागली' ही जाणीव झालेली चित्रलेखा मुळापासून हादरते. तिला योगी कुमारगिरीचे शब्द पुन्हा आठवतात. आणि ती कठोरपणे बिजगुप्ताला सोडून संन्यासाच्या मार्गाने जायचं ठरवते. त्याच्याकडून तो यशोधरेशी लग्न करेल हे वचन घेऊन, आपलं जे काही आहे ते गायत्रीदेवीच्या हाती योग्य विनिमयासाठी सोपवून ती कुमारगिरीच्या आश्रमाचा रस्ता धरते.

पण तिला आश्रमात ठेवून घ्यायला आधी तो योगी स्पष्ट नकार देतो. 'एका ब्रह्मचार्याच्या आश्रमात एक स्त्री कशी राहणार?’ हा त्याचा सवाल असतो. पण 'तुम्ही लोकांना सन्मार्गावर यायला मदत करू शकला नाहीत तर तुमच्या तपश्चर्येचा काय उपयोग' हा बिनतोड सवाल करून चित्रलेखा त्याला निरुत्तर करते. शेवटी हे एक आव्हान म्हणून तो तिला तिथे रहायची परवानगी देतो. खरं तर त्याच्या शिष्यांना चित्रलेखा सगळ्याचा त्याग करून आश्रमात आली ह्याचं कौतुक आणि तिच्याबद्दल आदर वाटत असतो. त्यांची तिच्याकडे पहायची दृष्टीही निकोप असते. पण स्वत:च्या तपाचा, साधनेचा गर्व झालेला कुमारगिरी तिच्याशी बोलायला त्यांना मनाई करतो. चित्रलेखा नव्या जीवनाचा सहज स्वीकार करते. मात्र कुमारगिरीच्या हळूहळू लक्षात येऊ लागतं की ज्या इच्छा-वासना त्याने दमन करून टाकल्या होत्या त्या चित्रलेखेच्या रूपाने पुन्हा डोकं वर काढू लागल्या आहेत.

चित्रलेखेला मोक्षाचा मार्ग मिळतो? का कुमारगिरी स्वत:च त्या वाटेवरून ढळतो? बिजगुप्त आणि यशोधरेचं काय होतं? ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवायलाच नव्हे तर मोक्ष, पाप-पुण्य, मोह ह्यांबाबत कधीही न पडलेले प्रश्न पाडून घ्यायला हा चित्रपट पाहायलाच हवा.

भगवतीचरण वर्मा ह्यांच्या 'चित्रलेखा' ह्या कादंबरीवर हा चित्रपट बेतला असल्याचं नेटवरून समजतं. केदार शर्माने (ह्याच्या नावाचं स्पेलिंग Kidar असं का आहे काय माहित!) ह्याच नावाचा चित्रपट १९४१ मध्येही काढला होता आणि त्याद्वारे भारत भूषणने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं (बाप रे!) अशीही माहिती मिळते. तो चित्रपट खूप गाजला होता पण १९६४ चा 'चित्रलेखा' फार गाजला नाही म्हणे.

चित्रपटातल्या नट-नट्यांविषयी आधी लिहिण्याचा माझा शिरस्ता मोडून मी ह्या लेखात चित्रपटातल्या गाण्यांचा उल्लेख प्रथम करणार आहे. कारण ह्या चित्रपटातली गाणी म्हणजे माझ्या मर्मबंधातली ठेव आहेत. ए री जाने ना दुंगी, छा गये बादल नील गगन पर, काहे तरसाये जियरा, मन रे तू काहे ना धीर धरे, संसारसे भागे फिरते हो आणि सखी री मेरा मन उलझे तन डोले अशी एकाहून एक सरस गाणी ह्यात आहेत. त्यातही संसारसे भागे फिरते हो आणि सखी री मेरा मन उलझे तन डोले ही अधिक प्रिय. ‘संसारसे भागे फिरते हो' मध्ये कुमारगिरी घरी भेटायला येऊन उपदेशाच्या गोष्टी सांगतो त्याला ती जे बिनतोड उत्तर देते ते गाणं 'रिपीट मोड' वरून ठेवून ऐकण्यासारखं आहे. ‘ये पाप है क्या, ये पुण्य है क्या रीतोंपर धर्मकी मुहरे है. हर युगमे बदलते धर्मोको कैसे आदर्श बनोओगे' हे साहीरचे शब्द केवळ कालातीत आहेत. तर 'सखी री मेरा मन उलझे तन डोले' मधले 'सांसभी लू तो आंचसी आये. कंचन काया पिघली जाये. अधरोमे तृष्णा बोले' हे शब्द म्हणजे विरहिणीची 'मनकी बात' आहेत. एक पुरुष असून साहीरने हे भाव किती अचूक पकडलेत. लिरिक्सबद्दल त्याची आणि संगीताबद्दल रोशन ह्यांची जितकी तारीफ करावी तितकी कमीच आहे. एखाद्या उदास सायंकाळी तितकाच उदास असलेला मूड क्षणार्धात बदलायचं विलक्षण सामर्थ्य ह्या सगळ्या गाण्यांत आहे. १००% फिदा! बिजगुप्तचा गुरुबंधू असलेल्या श्वेतांगच्या तोंडी असलेलं 'मारा गया ब्रह्मचारी' हे विनोदी बाजाचं गाणंही धमाल आहे.

आता थोडं कलाकारांबद्दल. चित्रलेखाच्या भूमिकेत ट्रॅजेडी क्कीन मीनाकुमारी आहे. खरं तर नुसत्या दिसण्याचा विचार केला तर पुरुषांना घायाळ करणाऱ्या मदालसेच्या भूमिकेला ती शोभत नाही. अजिबात शोभत नाही. म्हणजे तिचा चेहेरा पूर्वीइतकाच सुरेख दिसतो पण तिचं शरीर इतकं बोजड आहे की नर्तकीच्या काहीश्या मादक वस्त्रांत तिला पाहताना डोळ्यांना खूप त्रास होतो. पण ही कसर तिने आपल्या डोळ्यांतून आणि चेहेर्यातून केलेल्या अभिनयाने भरून काढली आहे. मग तो आपल्याला ज्ञान शिकवायला आलेल्या तपस्व्याशी बोलताना डोळ्यात फुललेला अंगार असो, कळीची कहाणी सांगून झाल्यावर 'ये मेरी अपनी कहानी थी. शुरूमे इस लिये सुना दी ताकी अंतमे तुम्हे मुझसे घृणा न हो' असं म्हणत उरातली वेदना लपवण्याचा निष्फळ प्रयत्न असो, ‘ना कभी ईश्वरने चित्रलेखाको याद किया, ना चित्रलेखाने ईश्वरको' म्हणतानाचा ताठा असो की बिजगुप्तला आपल्या डोक्याला झालेली जखम प्रेमिकेच्या तारुण्यसुलभ मुग्धतेने दाखवता दाखवता 'जो कही किस्मत फूट जाती बिजगुप्त' म्हणत क्षणात विव्हल होण्याचा प्रसंग असो - मीनाकुमारी 'चित्रलेखा' जगली आहे. किंबहुना चित्रलेखा असलीच तर अशीच असली पाहिजे ह्याबद्दल माझी खात्री आहे.

बिजगुप्त म्हणून ज्या कोणी प्रदीपकुमारची निवड केली तो काबील-ए-तारीफ है. अर्थात हे मी उपहासाने म्हणते आहे हे त्याचा एखादा तरी चित्रपट पाहिल्याचं पुण्य (!) गाठीशी असलेल्यांना लगेच लक्षात येईल. योगी कुमारगिरीच्या भूमिकेत अशोककुमार आहे. त्याने योग्याचा अभिनय ठीकठाक केला असला तरी चित्रलेखा आश्रमात राहायला आल्यावर होणारी त्याची घालमेल व्यक्त करताना तो कमी पडलाय असंच मला वाटलं. एखाद्या शक्तिशाली तापसाच्या चेहेर्यावर, त्याच्या हालचालीतून जे तेज, सामर्थ्य व्यक्त व्हायला हवं ते अजिबात दिसत नाही. सम्राट चंद्रगुप्त म्हणून जो कोणी नट दाखवलाय तो एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या सेटवरून भाड्याने आणला असावा तसा दिसतो. यशोधरेच्या भूमिकेत शोभना समर्थ आहेत असं विकीपीडीया सांगतो पण मला त्या नटीचा चेहेरा अजिबात शोभनाबाईंसारखा दिसला नाही. जाणकार इथे खुलासा करतीलच. ब्रह्मचारी श्वेतांगच्या भूमिकेत महमूद आपली कामगिरी चोख बजावतो. चित्रलेखेच्या दासीच्या भूमिकेत बेला बोस आणि मिनू मुमताज तर गायत्रीदेवीच्या भूमिकेत अचला सचदेव दिसतात.

गाण्याइतकंच चित्रपटातले सम्राट चंद्रगुप्ताच्या दरबाराचे, चित्रलेखा आणि बिजगुप्ताच्या वाड्याचे सेट्स सुरेख आहेत. चित्रपटातले संवाद, विशेषत: चित्रलेखा आणि कुमारगिरीमधले - मग ते त्यांच्या प्रथम भेटीचे असोत, ती आश्रमात दीक्षा घ्यायला येते तेव्हाचे असोत किंवा ती तिथे राहायला लागल्यानंतरचे असोत - पुन्हापुन्हा ऐकण्यासारखेच.

बरं मंडळी........तुम्ही हा चित्रपट पाहणार असालच त्यामुळे ह्यापुढे वाचू नका...........

खरं सांगायचं तर मला चित्रपटाचा शेवट कळला नाही. बिजगुप्त आणि चित्रलेखा सन्यास घेतात का लग्न करतात? लग्न करत असतील तर मग चित्रलेखाच्या त्या कळीच्या कहाणीला काही अर्थ उरत नाही. तिच्या सर्वसंगपरित्यागाला काही अर्थ उरत नाही. तिची मोक्षाची ओढ मिथ्या ठरते. त्यांचं भावी जीवन खरं तर यशोधरेच्या त्यागावर उभं आहे. कारण त्याग फक्त तिने केलाय. बाकी सगळ्यांनी आपल्याला हवं तेच केलंय. आणि हेच लग्न चित्रलेखेला आधीही करता आलं असतं कारण बिजगुप्ताचं तिच्यावर खरं प्रेम असतं, ते फक्त शारीरिक आकर्षण नसतं.

बिजगुप्तच्या ऐवजी श्वेतांगला सामंत करतात तेही पटत नाही. त्याला त्या कामाचा ना अनुभव असतो ना त्याचं ज्ञान. मग केवळ बिजगुप्तच्या विनंतीवरून चंद्रगुप्त हा निर्णय का घेईल? बिजगुप्त श्वेतांगला सांगतो की 'एखादी गोष्ट केल्याबद्दल पश्चात्ताप होत असेल तर ती करणं म्हणजे पाप' पण हे तत्त्वज्ञान चुकीचं वाटतं. म्हणजे एखाद्याला खून करून त्याचा पश्चात्ताप होत नसेल तर तो खून पाप नाही? बिजगुप्त यशोधरेच्या वडिलांना तिचं लग्न श्वेतांगशी लावून द्यायला सांगतो आणि तीही ऐकते? तिच्या मताला काही किंमत नाही? त्याच्या ब्रह्मचर्याच्या शपथेचं काय? दासी रंभाचं बिजगुप्तवर प्रेम असतं का नाही? गायत्री देवी कोण असते? ती चित्रलेखेच्या घरी काय करत असते? हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहिले. ओह, आणि मजेची गोष्ट अशी की चित्रपटभर इतक्या बायका आणि बायकाच दिसतात की चंद्रगुप्ताच्या काळात gender ratio उलट बाजूने skewed होता की काय अशी शंका यावी. Happy

हा चित्रपट पुन्हा पहायच्या आधी मायबोलीकर साधनाशी व्होट्सपवर बोलणं झालं तेव्हा मी तिला चित्रपट प्रथम पाहिला तेव्हाचा मला समजलेला अर्थ सांगितला होता. तो असा की सगळ्या ऐहिक सुखांचा भोग घेऊन माणूस जेव्हा त्यांच्यापासून दूर जातो तेव्हा त्याचा परित्याग अधिक सच्चा असतो. पण ह्या सुखांचा अनुभव न घेता त्या इच्छा नुसत्या दाबून टाकल्या तर पुढे कधीतरी 'की तोडीला तरु फुटे आणखी भराने' ह्या न्यायाने त्या पुन्हा उफाळून येतात. त्यावर ती म्हणाली होती की चित्रलेखा आपल्या वाट्याला आयुष्याने दिलेल्या दोन्ही भूमिका समरसून जगते - आधी राजनर्तकीची (का गणिकेची?) आणि नंतर संन्यासिनीची. आणि बाकीचे लोकही त्या तश्याच निभावतील अशी तिची अपेक्षा असते जी फोल ठरते. तसंच प्रत्येक पुरुष हा स्त्रीवर अत्याचार करणारा ठरू शकतो. जे करत नाहीत त्यांना फक्त संधी मिळत नाही म्हणून.

इतक्या वर्षांनी हा चित्रपट पाहताना लक्षात आलं की ह्याव्यतिरिक्त कथेचे अजून लक्षात न आलेले अनेक पैलू असू शकतात. ‘समाप्त' ची पाटी झळकली तरी विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. आणि म्हणूनच तो पुन्हापुन्हा पाहण्याजोगा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह.
नेहमीप्रमाणेच उत्तम.
अर्थात ज्याकाळी हा दुरदर्शनवर दाखवला तेव्हा बराच कापला, .
निव्वळ प्रौढांसाठी आहे म्हणून पहायला बसलो होतो, अजिबात कळला नाही आणि कंटाळलो एव्हढच आठवताय.

खूप सुंदर लिहिलंस गं.. परत परत वाचण्यासारखे.

मला वाटते की कादंबरी पडद्यावर आणताना काहीतरी राहून गेले असावे. बीजगुप्ताने सर्वसंगपरित्याग केला हे कानी पडताच चित्रलेखा ज्या ओढीने धावत त्याच्याकडे जाते ते पाहता ती केवळ यशोधरा व त्याचा संसार व्हावा यासाठी आश्रमात येते असे वाटते, ईश्प्राप्तीची ओढ तिला आणत नाही किंवा तिथे आल्यावर तिथल्या एकंदर अनुभवाने तिला त्यात रस राहत नाही..

अशोक कुमारचा दुसरा भाग अभिनयाच्या दृष्टीतून मला जास्त
चांगला वाटला. पहिल्यांदा तो चित्रलेखेला भेटतो तेव्हा तो स्वतःच्या तपसामर्थ्यावर विश्वास व त्याचा अभिमान बाळगणारा तपस्वी असतो. पण जेव्हा ती त्याच्याकडे इशचरणी लिन होण्यासाठी येते तेव्हा तिच्या सौंदर्यापूढे तो एक कामलोलुप पुरुष उरतो. त्याच्या दृष्टीला तिचे फक्त सौंदर्य दिसते. ती मिळायला हवीच ही वासना व त्याचवेळी मनाच्या एका कोपऱ्यात आपण चुकतोय ही भावना यांच्या कुतरओढीत सापडलेला कुमारस्वामी त्याने व्यवस्थित दाखवला. ती आश्रमात आल्याबरोबर त्याचे तपसामर्थ्य ओसरून जाते.

मिसफीट कास्टिंग हा चित्रपटातला मुख्य दोष आहेच. प्रदीपकुमार तेव्हा राजांच्या भूमिकेत शोभून दिसायचा, त्यामुळे त्याच्याशिवाय पर्याय नसेल कदाचित. त्या दासीचेही मला थोडे आश्चर्य वाटले. मूळ कादंबरी वाचली तर काही प्रश्न सुटतील. आणि युट्युबवर काही भाग गाळलेले असतात, कदाचित फिल्म खराब वगैरे झालेली असते.

यशोधरेच्या तोंडचे शेवटचे संवाद ऐकून वाईट वाटते. पण तिच्याशी लग्न न करण्याचा बीजगुप्ताचा निर्णय योग्य वाटतो. मला वाटते तिथे तो असेही म्हणतो की तिचे नसले तरी श्वेतांगचे तिच्यावर प्रेम आहे, त्यामुळे तो तिला सुखात ठेवेल. मी अजून एक व्हर्जन पाहीली त्यात हा प्रसंग पूर्ण कापलाय.

यातल्या गाण्यांबद्दल काय बोलावे? आजही एखाद्या पावसाळी संध्याकाळी भरलेले आभाळ पाहून अवचित 'छा गये बादल नील गगन पर,
घूल गया कजरा सांज ढले' या ओळी तोंडी येतात.
कधी मन निराश होते तेव्हा मनावर
'उतना ही उपकार समझ कोई
जितना साथ निभा दे
जनम मरण का मेल है सपना
ये सपना बिसरा दे
कोई न संग मरे
मन रे ...' या ओळी फुंकर घालतात.. कसला जादूगार होता साहिर!!!

विकीवर यशोधरेच्या भूमिकेत शोभना समर्थ लिहिलेय ते चूक आहे. त्या नटीचे नाव शोभना आहे, आडनाव समर्थ नाही. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा शोभना समर्थ नक्कीच आजी झालेली असणार.

स्वप्ना, आता आम्रपाली बघ. मी कालच त्यातली गाणी पाहत होते. वैजयंती कसली प्र चं ड सुंदर आणि sensual दिसते, तिच्यावरून नजर हटुच नाही इतकी. तिचे कपडे, केस, दागिने सगळे इतके भारी व खरे वाटतात, कुठेही खोटेपणा नाही. आणि सेट्स कसले भारी आहेत...

५० वर्षांपूर्वीच्या या चित्रपटातील सेट्स व कॉस्टयुम्सची तुलना आजच्या ऐतिहासिक चित्रपटांशी करणे अशक्य आहे. तशी माणसे आता राहिलीच नाहीत. आता सगळा दिखावा फक्त.

मस्त लिहीलंयस. पिक्चर पाहिलेला नसला तरी स्पॉयलर अलर्ट वाचलाच! Proud मला तुझं पूर्ण मत वाचायचं होतं.

मी पण हा चित्रपट खूप लहान असताना बघितला होता. आता काहीच आठवत नाहीये फारसे. फक्त तेंव्हा पडलेला एक प्रश्ण आजही आठवतोय - चित्रलेखा त्याला सन्यासी जीवनावर एवढे लेक्चर देते तर मग ती सन्यास घ्यायला का जाते? मला कुमारस्वामीपेक्षा चित्रलेखाच जास्त दांभिक वाटली. होती Happy

तुझे परीक्षण वाचून त्यावर शिक्कामोर्तब झाले.

मस्त लिहिलंय.
हा चित्रपट लहानपणी पाहिलेला. आता आठवत नाहीए.
मेहमूदचीही भूमिका आहे ना यात?

माधव, स्वतःची मतं चुकीची आहेत असं अनुभवास आल्यावरही त्यावर ठाम राहायला हवं का?

भरत, माझे मत फक्त चित्रलेखा या पात्राबद्दल दिले आहे. मी सिनेमा खूप लहानपणी पाहिला आहे. तो फारसा आठवत नाहीये हे वर लिहिले आहेच. पण तेंव्हा जो प्रश्ण पडला होता तो हे परीक्षण वाचल्यावर पण तसाच आहे.

पाकिझामधली साहेबजानची व्यथा जेवढी मनाला भिडते आणि मग 'तीर-ए-नजर देखेंगे, जख्म-ए-जीगर देखेंगे' ऐकताना जसा काटा येतो तसं काही चित्रलेखेच्या बाबतीत घडत नाही.

हे परीक्षण वाचून:
दुसर्‍या स्त्रीचे प्रेम हिरावून घेणारी, एका सन्याशाची अवहेलना करणारी स्त्री सन्यास घेते हे मला दांभिकपणाचेच वाटते. सन्यास घेते ते पण कधी, तर आता आपण म्हातारे होतोय, आपले सौंदर्य लोप पावणार हे समजल्यावर! त्यामुळे तो दांभिकपणा अधिकच ठळक होतो. बिजगुप्तावर तिचे प्रेम असते तर तिला म्हातारपणाच्या चाहुलीने सन्यास घ्यावासा नसता वाटला.

वाल्याचा वाल्मिकी होतो. यात चूकीचे काहीच नाहीये. पण जर वाल्याने नारदमुनींची टर उडवली असती आणि मग पुढे फाशीची शिक्षा झाल्यावर जीवाच्या भितीने जर तप केले असते तर त्यात काहीच राम नसता.

तर हे माझे मत आणि त्यावर मी ठामच आहे.

स्वप्ना नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर लिहिलंयस. बर्‍याच दिवसांनी बॉलिंग केलिस पण एकदम दमदार.
चित्रपट एकूण समजायला थोडा अवघड आहे असे दिसतेय.
साधनाची पोस्ट पण मस्तच आहे. खूप आवडली.
चित्रलेखा आणि आम्रपाली मध्ये माझा कायम घोळ होतो. (खास करून गाणी ऐकताना.)
संपुर्ण लेख वाचताना डोळ्यासमोर फक्त वैजयंती माला येत होती, आणि कास्टिंग बद्दल वाचताना चांगली तोंडावर आपटले.
त्याकाळी प्रदिप कुमार अक्षरशः या दिग्गज कलाकारांच्या गर्दीत चालून खपून गेला. सध्याच्या काळात हिरो म्हणून तो अज्जिबात स्विकारला गेला नसता.

सुंदर लिहिलं आहेस. आता मी पण हा सिनेमा पाहणार.

माधव, चित्रलेखा दांभिक आहे असं मला नव्हतं म्हणायचं. चित्रपटाचा शेवट कैच्या कैच केल्याने तिच्याबद्दल तसं मत होऊन तिच्यावर अन्याय होतोय असंच मला वाटलं.

साधना, आम्रपाली पहायचाच आहे. त्यात वैजयंती खरंच अतिशय सुरेख दिसलेय.
सर्वांना अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

सारेगममध्ये अमीन सायानींचे बिनाका गीतमालावर आधारित कार्यक्रमही आहेत.
त्यांनी सांगितलं की चित्रलेखातलं फक्त एकच गाणं टॉप ३२ मध्ये आलं होतं. तेही शेवटाकडे.
मन रे तू काहे न धीर धरे, छा गए बादल, काहे तरसाए जियरा, संसार से भागे फिरते हो यांतलं एकही नाही; तर "मारा गया ब्रह्मचारी" हे मेहमूदवर चित्रित झालेलं गाणं! Uhoh