थेयरी तर पाठ केली, प्रॅक्टिकल देवू कशी ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 April, 2018 - 05:44

ह्याच एका काळजीने रात्रभर भिजते उशी
थेयरी तर पाठ केली, प्रॅक्टिकल देवू कशी ?

ह्याचसाठी काढले जाते तुला मोडीमधे
डाग नसलेला असा तू दागिना बावनकशी

रीत उरफाटी जगाची ठेवते नावे किती !
जी उतू जावू न दे, म्हणते तिलाही सांडशी*

एकदा काढेन म्हणते वेळ थोडासा तरी
एकदा करणार आहे मीच माझी चौकशी

पाहते आहेस का, गत काय ही झाली तुझी ?
माय गेली मरुन आणिक ओळखेना मावशी

ढासळू देवू नको, विश्वास राहो जागता
ऐक, पोखरतात पाया संशयाच्या ह्या घुशी

मी परीक्षा एकही देणार नाही ह्यापुढे
जीवना स्वीकार कर ना रे जशी आहे तशी !

खुलवितो सौंदर्य माझे एक हा काळा मणी
गोठ बिलवर पाटल्या अन व्यर्थ सोन्याची ठुशी

* (सांडशी- स्वयंपाकघरातला चिमटा)

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा !