दलिद्री

Submitted by अजय चव्हाण on 30 March, 2018 - 19:13

"ऐ दलिद्रि चल ना बे..क्या देख रहा है उधर.."

पाठी वळून झुम्याने आवाज दिला तसा दलिद्री भानावर आला अन मुकाटपणे मनात तेच विचार घेऊन सावकाश रेल्वेरूळावरून चालत राहीला..

"दलिद्री" बारा तेरा वर्षाचा,काळपट,वेडेवाकड्या चेहर्याचा मुलगा, त्या मुलाला हे नाव कुणी दिलं माहीत नाही पण त्याच्या जन्माच्यावेळी त्याची आई उजाला देवाघरी गेली शबानाअक्काने हंबरडा फोडून "ये पोट्या दलिद्री है...उने मरे पोटी को खाया रे ..अल्ला.." असं बोलून एकच कल्लोळ माजवला..तेव्हापासून न त्याचा बारसं झालं ना त्याला कुठली ओळख देण्यात आली..पोरग थोडं मोठ झाल्यावर त्याला "दलिद्रि" ह्याच नावाने लोक संबोधू लागली....

बापाचा म्हणजेच शेराचा उजाला गरोदर असल्यापासून पत्ता नव्हता..वस्तीत कुजबुज होत होती..कुणी म्हणे पाठीमागच्या वस्तीतल्या ईस्माईलने दारूवरून झालेल्या भांडणात खुन करून त्याची बाॅडी कळवा खाडीत फेकून दिली तर कुणी म्हणे त्याला पोलीसांनी जेलमध्ये टाकलाय...त्यातल्या त्यात त्याला जेलमध्ये टाकला असेल अशी वस्तीतल्या सार्या लोकांची धारणा होती कारण शेर्यासारख्या धिप्पाड आणि अट्टल गुन्हेगाराचा खुन करणे ही साधी बाब नव्हती आणि ईस्माईल फाट्याच्या ******* त इतका दम नव्हता .....

शबानाअक्का दलिद्रिला सारखं पाण्यात पाहायची त्यामुळे बिन आईबापाचं पोरं आपल्या कलेने वाढत होतं.. कळायला लागल्यापासून दलिद्री रेल्वेरूळावर प्लॅस्टीक वेचून भंगारात दयायचा आणि आलेल्या पैशातून त्याची गुजराण होत असे..

आजही तो आपला मित्र झुम्याबरोबर रेल्वेरूळावर प्लॅस्टीक गोळा करायला निघालेला ...रूळाच्या त्या पलीकडे दुसरी लोकल धावत होती..खचून भरलेल्या गर्दीत दारावर लटकलेली माणसं पाहण्यात दलिद्रीला एक वेगळीच मजा यायची किंबहुना हाच त्याचा छंद होता... तो बारकाईन सार्याचं निरक्षण करी..चकचकीत पॅन्ट शर्ट घातलेले,टापटीप बॅग घेतलेली फस्ट क्लासवाल्या लोकांच त्याला नेहमीच अप्रूप वाटे...त्याला सेक॔डक्लासमधली लोक कधीच आवडली नाही..काय म्हणे तर कशीतरी जीवनाच्या गाडीत ओढूनताणून चढलेली,काही लटकलेली, जीवन कसंतरी रेटायचं म्हणून जीवनाला लोंबकळलेली, गर्दीत जन्मलेली आणि गर्दीतच गुदमरलेली...
त्याला नेहमी वाटायचं आयुष्य हे फस्टक्लासतल्या लोकांसारखं असावं.. निवांत, शांत,सुटसुटीत,यायची घाई नाही जायची घाई नाही.. गुबगुबीत सीटवर आरामात बसून मनाच्या हेडफोनमधून जीवनाचं गाणं ऐकणारी..

असं वाटल्यावर तो स्वतःकडे पाही आणि विचार करी.. आपलं आयुष्य ना फस्टक्लास आहे ना सेकंडक्लास..आपल्या आयुष्याला क्लासच नाहीये..जीवनाच्या गाडीत आपण फक्त एक मालवाहू डब्यातलं निरपयोगी सामान आहोत..कळकटलेलं..मळकटलेलं..गंजलेलं आणि आभळंभर फाटलेलं...हमाल नियती कधी कसं फरफटत टाकून देईल हे ही सांगता येत नाही..कचर्यात,नाल्यात निरपद्रव उगवलेली व त्यातच कोमजलेली किंवा कुणीतरी उपटून फेकलेली खारफुटी आहे आपलं आयुष्य..

ह्या असल्या आयुष्यात एकदातरी वसंत यावा खारफुटीच्या जागी मोगरा फुलावा आणि मोगर्याचा तो धुंद सुंगंध मनाच्या कपाटात साचवून आयुष्यभर तो घेत राहावा...आयुष्य हे जरी निरर्थक असलं तरी एक दिवसं का होईना आयुष्यातल्या त्या दिवसाला अर्थ असावा आता हा अर्थ नेमका कशामुळे येईल हे सांगता येत नाही पण त्यासाठी मनाच्या जंजाळात डोकावलं पाहीजे...अस्ताव्यस्त साचलेल्या कचर्यात चकाकणारा मोती गवसला पाहीजे आणि म्हणूनच दलिद्रि प्लॅस्टीक वेचता वेचता विचार करत होता...

विचार करता करता त्याला काहीतरी गवसलं आणि दुर कुठेतरी नजर टाकत तो उत्तरला..

"झुम्याऽऽ देख लेना येक दिन..ये भीड का आपुन हिस्सा बनेंगा..
आपुन फस्टक्लास में जायेंगा..नया पॅन्ट शर्ट और नयी बॅग लेकर आपुन व्ही.टी जायेंगा..टॅक्सीमें बैठकर पाॅश हाॅटेलमें खाना खायेंगा और फस्टक्लाससेही लौंटेंगा..आयेगा क्या मेरेसाथ?"

हे ऐकल्यावर झुम्याने त्याला टपली मारली आणि खो खो हसू लागला मनसोक्त हसून झाल्यावर त्याने त्याला जवळ घेतलं व म्हणाला..

"येक दिन जी के क्या करेगा चादरमोद..यहीच अपनी दुनिया..वापस इसमें तेरेको आना है"

झुम्या दलिद्रिपेक्षा थोडा मोठा होता आणि वास्तवाचं त्याला भान होतं..हे स्वप्न त्यानेही पाहील होतं.. आधीच तुटलेल्या आयुष्यात
तुटणारं स्वप्न नको होतं त्याला पण दलिद्री ऐकणार्यातला नव्हता.

"तेरेको आने के है तो आ...तु नही आया तो भी आपुन जायेंगा.."

दलिद्रीने ठरवलं आणि आता काहीही झालं तर तो पाठीमागे हटणार नव्हता...

संध्याकाळी आलेल्या नव्वद रूपयातले 50 रूपये त्याने शबानाअक्काला दिले चाळीस रूपयातून एक वडापाव खाऊन त्यातून उरलेले 30 रूपये हळूच त्याने शबानाअक्का झोपल्यावर गोणपाटात लपवले...

दलिद्रि रोज शक्य तितकी बचत करत होता दुपारीही तो एकच वडापाव खाई..झुम्याबरोबर रोज तो दोन वडापाव आणि चहा प्यायचा पण आजकाल तो एकच वडापाव खात होता गुरूवारी तो स्वामीच्या मठाबाहेर जेवायचा आणि शनीवारी कोपर्यावरच्या मारूतीच्या मंदीरात मिळणारी खिचडी खायचा..

ही गोष्ट झुम्याच्या नजरेतून सुटली नाही आणि झुम्याने त्याची शाळा घ्यायची ठरवलं...

एकेदिवशी असेच प्लॅस्टीक वेचता वेचता झुम्या म्हणाला..

"क्या बे दलिद्री..कितना पैसा जमा करेगा और एक दिनमेंही उडायेगा क्या? रूक तेरा प्लान शबानाबुढ्ढी को बताता हू.."

हे ऐकल्यानंतर दलिद्रीला आयुष्यात पहिंल्यादाच पश्चताप झाला.
आयतचं आपण माकडाच्या हाती कोलीत दिल्याचं फिलही त्याच्या मनात आलं पण आता काहीही झालं तरी ह्या दलिद्री आयुष्यातलं हे श्रीमंत स्वप्न तो उध्वस्त होऊ देणारं नव्हता..सांगितलं तर सांगू देत बुढ्ढीला..बुढ्ढी मारेगी भी तो कित्ता?

दुसर्याच दिवशी दलिद्री संध्याकाळी पोहचला तेव्हा शबानाबुढ्ढी हातात झाडू घेऊन दारात उभी..दारात येताच शबानाने बदडायला सुरूवात केली "बोल किधर है पैसा? किधर छुपाया बोल?"
झाडूच्या दांडक्याने पाठीवर वळ उठायला लागले होते पण दलिद्री काहीही एक न बोलता मार खात राहीला...पोट्टं काही बोलत नाही म्हणून शबानाअक्का आणखीनच खवळली..हातातला झाडू तसाच दुसरीकडे भिरकाऊन देत सरळ तिने त्याच्या गुप्तांगात हात घातला आणि शक्य तितक्या जोरात आवळू लागली...तिच्या ह्या कृतीने वेदनेची सणक त्याच्या डोक्यात गेली आणि वेदनेनी तो जमिनीवर पडून गडाबडा लोळायला लागला...त्याला असं वेदनेने लोळताना पाहून बुढ्ढीला आसूरी आनंद मिळत होता म्हणूनच ती आणखीन जोर लाऊन आवळू लागली...दलिद्रि हात पाय झाडू लागला वेदनेची सणक इतकी होती की, त्याला सहन करता येईनाशी झाली आणि त्याच आवेगात सारं बळ एकवटून त्याने जोराची एक लाथ तिच्या छातीवर मारली..बुढ्ढी धाड्कन जमिनीवर आडवी झाली तसा तो पटकन उठला बाजुलाच असलेला दगड उचलला आणि भराभर शक्य तितक्या जोर लावत तिच्या डोक्यात हाणू लागला..एक.. दोन.. तीन...चार... बुढ्ढी जोरात किंचाळली,बुढ्ढीच्या आवाजाने आजुबाजुची लोक धावत झोपडीकडे आली पण दलिद्रीला त्याचं भान नव्हत तो पाच.. सहा... सात... बुढ्ढीचा आवाज शांत होईपर्यंत मारतच राहीला..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिली आहे,
वातावरण निर्मिती जमली आहे,
पण फ्लॅट वाटते, चांगले आयुष्य जगायची त्याची असोशी, त्यासाठी त्याने केलेले प्लॅन अजून पुढे आले असते शेवटच्या घटनेमुळे झालेले नुकसान जास्त टोकदार झाले असते.

आत्ता गोष्ट तटकन थांबवल्यासारखी वाटतेय.

आवडली कथा..
लिहित राहा वरचेवर ..

झुम्याने शबाना आण्टीला दलिद्रिच्या पैश्याबद्दल लगेच का सांगितलं असेल कळलं नाही. त्याला दलिद्रीचा हेवा वाटत होता असे कथेवरून वाटत नाही. मग जास्त वय असल्याने समजूतदार पणा म्हणावे तर त्याने दलिद्रिलाच समजावून सांगायला हवे होते. काही तरी कमी वाटतय असं माझं मत.

झुम्याने शबाना आण्टीला दलिद्रिच्या पैश्याबद्दल लगेच का सांगितलं असेल कळलं नाही.>> दलिद्री नको त्या स्वप्नात वहात जाऊ नये म्हणून असेल कदाचित! पण ही बुढ्ढी इतकी खुनशी असेल असे त्याला वाटले ही नसेल.

काही लहान मुलांमध्ये असतो चुगलीचा किडा.. रुक तेरे मा को बताता हू.. आणि सांगून मोकळे होतात. मग अश्यांना नंतर धोपटायचे असते. मग त्याचा बदला घ्यायला ते पुढच्यावेळी पुन्हा चुगली करतात. त्या वयात या सर्वानंतरही मैत्री टिकून राहते..
हे माझ्या बालपणीचे अनुभव झाले. कथेतील मुलांचे आयुष्य वेगळे असले तरी चाईल्ड सायकॉलॉजी साधारण असते अशी..

बाप्रे Uhoh
कथानक आणि लेखनशैली आवडली.
रेड ड्रॅगन मधली आजी आणि नातू आठवले.

पण "ह्या असल्या आयुष्यात एकदातरी वसंत यावा खारफुटीच्या......." हा पॅरेग्राफ शब्दबंबाळ झालाय. बाकीच्या टोनशी जुळत नाही.

अ‍ॅमी सहमत.
वसंत खारफुटी अयुष्य वैगेरे त्या तशा परीस्थीतल्या मुलाच्या तोंडचे शब्द वाटत नाहीत.