निरोप...

Submitted by अपूर्व जांभेकर on 30 March, 2018 - 16:20

सर्व मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार! मी अपूर्व जांभेकर. लेखन माझ्यासाठी तूर्तास तरी छंदासारखेच! तशी बरीच वर्षे लिहीत असलो तरी त्याचे वाचन आजवर फक्त कुटुंबीयांसमोर आणि काही जवळच्या मित्रांपुढेच केले आहे. झालेले लिखाण, सर्वांसमोर सादर करण्याचे प्रोत्साहन व संधी मला "मायबोली" ने दिली त्याबद्दल "मायबोली" व्यवस्थापनाचे मनापासून आभार!
सदर लघु-कथा स्वातंत्र्य-पूर्व काळातील असल्याने, थोडेसे लेखन स्वातंत्र्य घेतलेले आहे. तरीही, लेखन व शुद्ध-लेखन या दोनही बाबी तमाम रसिक मायबोलीकरांनी मोठ्या मनाने सांभाळून घ्याव्यात हि प्रेमळ विनंती ! तुम्हा सर्वांच्या मन-मोकळ्या सूचनांच्या, प्रतिक्रियांच्या आणि प्रतिसादांच्या प्रतीक्षेत...

टीप : एखादा ब्रिटिश अधिकारी मराठी कसा बोलेल ह्याची कल्पना करून, ह्या कथेतील ब्रिटिश अधिकाऱ्याचे मराठी संवाद, वातावरण निर्मितीसाठी, मुद्दाम तसेच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

निरोप...

"त्या बांधकामास हुकूम बजावून आज बरोबर दोन आठवडे झाले! मीच लिहिला होता तो. पहा, हे पहा, १९ ऑक्टोबर १९४४ हुकूम ज्या दिवशी बजावला ती तारीख आणि २१ ऑक्टोबर हुकूम लागू होण्याची तारीख!" एक काळ्या बुश-कोटातील व्यक्ती समोर उभे असलेल्या माणसाला समजावून सांगत होती. ती व्यक्ती साधारण वयाच्या साठीची असावी.

"Would you please excuse me for my interruption?" साधारण सहा फूट किंवा थोडीशी जास्तच उंची असणारी एक व्यक्ती तिथे आली. लक्ख गोरी, काहीसे हिरव्या रंगाची झाक असलेले डोळे, ओठांवर भुर्र्या रंगाच्या जाड मिश्या, देहयष्टी अंगात असलेल्या कोटावरून कळत नसली तरी पिळदारच असावी आणि बोलण्यात व हालचालींमधला रुबाब! "चिपलूनकर बोलतात ते बारोबर आहे... टुमचा नाकीच काहीतरी गोंदल जालेला आहे….You do check once again!” आता आलेल्या व्यक्तीने मघासच्या माणसाला समज दिली. Good morning Mr. Chiplunkar, myself Perry, Lord Perry! Forgive me, Lord is just my name. I had heard that if I would see anyone here so well before the actual timing, that will be you... & I am so glad to meet you on the -very first day of my duty here!"

लॉर्ड पेरी! मुंबई हाय-कोर्टातील एक मान्यवर जज्. काही कारणास्तव त्यांची बदली पुण्यातील कोर्टात झाली होती. पेरी साहेबांचे हे उद्गार ऐकून चिपळूणकर खुर्चीवरून एकदम ताडकन उठले, त्यांनी पेरी साहेबांना अभिवादन केलं. "Thank you for your compliment sir, but what I really feel is, justice should be punctual!"

दामोदर बळवंत चिपळूणकर! कोर्टातील एक सरकारी कारकून. कोर्टात त्यांची हजेरी, हि कोर्टाच्या किल्ली अगोदरच पाच मिनिटे असायची. डोक्यावर पगडी, बुश कोटाच्या आतून बंडी व कमरेला चापून-चोपून नेसलेलं धोतर... नियमितपणा आणि वक्तशीरपणा हे काही त्यांच्यातले गुण नव्हते, तर तो त्यांचा स्वभावच होता. लालट-गोरे, घरे डोळे, टिळकांसारख्या जाड मिश्या व चेहऱ्यावर लक्ख तेज! अशी मूर्ती हातात लांब काळी छत्री घेऊन जेंव्हा घराबाहेर पडायची तेंव्हा त्यांचा रुबाब... काही निराळाच... स्वच्छ सूर्यप्रकाशात हिऱ्याला धरावं तसा!

गेली पस्तीस वर्षे दामोदर चिपळूणकर सरकारी कारकून म्हणून काम करत होते. उदरनिर्वाहाची अजून चांगली सोय झाली नसती असा नाही. त्याकाळचा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला माणूस म्हणजे... पण चिपळूणकरांनी स्वतःच उपाधींबरोबर कधी व्याधी वाढू दिल्या नाहीत. रोज सकाळी पाच वाजता उठून, घाटावर अंघोळ करून, देव-पूजा उरकून, व्यायाम करून, वर्तमानसह-चहापानाचा कार्यक्रम संपवून स्वारी कचेरीत निघायची. तीही चालत. कामकाजाची वेळ दुपारी तीन वाजे पर्यंत असायची. त्यानंतर कोर्टातील ग्रंथालयात कुठल्या-नकुठल्या धार्मिक ग्रंथांवर काथ्या-कूट करण्यात संध्याकाळ कशी व्हायची हे कळायचंच नाही. घरी परतल्यावर थोडा (म्हणजे सक्तीने अर्धा कप व साखर वर्ज!) चहा घेऊन वेग-वेगळ्या मराठी तसच कधी इंग्रजी साहित्याचं अवलोकन आणि साधारण आठच्या सुमारास जेवून बरोबर नऊ वाजता शुभ रजनी...
दुर्दैवाने चिपळूणकरांना अपत्य नव्हत. राहून-राहून हे दुःख त्यांना कुठेतरी आत खोलवर छळतच असे. पण त्यांनी स्वतःला एकटेपणाच्या चौकटीत, कठोरतेच्या आणि शिस्तीच्या भिंतींमध्ये बंदिस्त करून घेतलं होत. आणि, आपल्याला अपत्य नाही हे दुःख आपल्या पत्नीला तेवढच, किंबहुना त्याहूनही जास्त असू शकतं ह्या परिस्थितीशी त्यांनी फार स्वारस्य कधी दाखवलं नाही. लग्नात पत्नीच नाव घेतलं आणि तेंव्हाच बहुदा शेवटचं...आता संवाद, "मंडळी" असे, कसे-बसे सुरु होऊन वस्तूनामावर त्यांची समाप्ती होत असे. चिपळूणकरांच्या इतक्या कठोर स्वभावामुळेच नातेवाईक त्यांच्या कधी जवळ आले नाहीत व त्यांचा मित्र-परिवारहि कधी जमला नाही. चिपळूणकरांचं मन त्यांना कुठेतरी तेंव्हा खायला लागलं जेंव्हा त्यांनी सेवा-निवृत्ती घेतली. त्यांचा तो एकलकोंडेपणा व अबोलपणा आता मात्र चांगलाच बोलायला लागला होता.

"मंडळी, बघतायना?" चिपळूणकरांनी आतल्या खोलीतून आवाज दिला , कोणीतरी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला होता. "नमस्कार, मी पेरी, कोर्टामदे..." लॉर्ड पेरींनी दारातूनच चिपळूणकरांच्या पत्नींना अभिवादन केलं. "तुमच्या कचेरितून कोणी आलय वाटतं, जरा बघता का? " सावित्रीबाई चिपळूणकर म्हणाल्या, तसे दामोदरपंत माजघरात शिरले. "ओहो, पेरी साहेब! या ना, Please do come in" चिपळूणकरांनी हस्तांदोलन केलं आणि पेरी घराच्या आत आले. "मंडळी, चहा" सावित्रीबाई पदर सारखा करत स्वयंपाक घराकडे वळल्या. चिपळूणकरांना आयुष्यात सर्वात जास्त आदर कुणाचा असेल तर तो ह्या पेरिंचा! विनम्र स्वभाव आणि ब्रिटीश असूनही मराठीबद्दल असलेले त्यांचे प्रामाणिक प्रेम! "माला Please 'साहेब' म्हनु नका.. कारन,एकतर हे कोर्ट नाही, टूमंच गर आहे आनि आता तर अधिकृतपाने मी टूमचा साहेबही नाही.." पेरी मिश्किलपणे म्हणाले. "A boss is always a boss" चिपळूणकर हसले. "माज तुमच्याकडे थोडं काम होत..." पेरी म्हणाले. "बोला ना, काय मदत करू शकतो तुमची?" चिपळूणकर उत्तरले. "कूप दिवसांपासून, टिलकांनी लिहिलेले 'गीटा रहस्य' वाचण्याची इचछा होती, कोर्टात एक-डोगानी सांगितलं टुमच्याकडे मिलेल म्हनुन..." हे ऐकताच चिपळूणकर थोडेसे गंभीर झाले. एवढ्यात सावित्रीबाई चहा घेऊन आल्या. "आधी चहा घ्या." चिपळूणकर म्हणाले. दोन तीन मिनिटे तशीच गेली. नंतर, चहाचा एक घुटका घेऊन चिपळूणकर म्हणाले "Could you please tell me , what makes you read Geeta? That too, which has been written by an Indian freedom fighter while he was imprisoned?" चिपळूणकर आपल्या धार-दार कटाक्षाने पेरींकडे रोखून पाहत होते. आपली परीक्षा घेतली जात आहे, हे ओळखून, पेरी संयमितपणे उत्तरले, "गीटा न्यान वेश्वीक असून कुटल्याही एका दर्माला बांदील नाही...आनि प्रतिबेला स्थल, काल व वेक्तीच्याही मर्यादा नसतात." हे ऐकून चिपळूणकर हसले व माजघरातील असंख्य पुस्तकांनी भरलेल्या फडताळामधून गीतेची प्रत काढली आणि पेरींना देऊ केली. आता सेवानिवृत्त झाल्यावर कसे वाटत आहे वैगरे चौकशी करून, पेरी जायला निघाले. "मी पुढील आठवड्यात बुधवारी काही कामानिमित्त कोर्टात येणार आहे, तेंव्हाच हि प्रत मला परत दिलीत तरी चालेल" चिपळूणकरांना पेरिंची विनम्रता व मराठी भावली आणि पेरी चिपळूणकरांच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले. खरंतर ह्या गीतेचं निमित्त झालं आणि हे गीताच पुढे त्या दोघांमधील मैत्रीची कथा लिहू लागली.

चिपळूणकरांच्या एकटेपणाला जोडीदार मिळाला. त्यांच्या मौनाला जणू शब्द मिळाले ...ते हळू-हळू व्यक्त व्हायला लागले... आणि वयाच्या साठीतही त्यांच्या चेहेऱ्यावरच्या आवेशाला नवीन चैतन्य लाभलं...कितितरी विषयांचं ज्ञान बोलकं होत होतं... संगीतही त्याला अपवाद नव्हतं.
"पेरी, आज रात्रौ गंधर्वांचं गाणं आहे, येणार ना? "अर्थात! गंदर्वांचं गाएन आनि तेही तुमच्यासारख्या दर्दी वेक्तीसोबत! अशी सांधी पुना-पुना मीलाली तरी एकदाही चुकवू नए!" चिपळूणकरांमधली रसिकताहि खुलून येत होती... चक्क सावित्रीबाईंना सुद्धा त्यांच्यात -होत असलेला बदल जाणवला होता. आजू-बाजूच्या लोकांमध्ये तर पेरी-चिपळूणकरांची मैत्री हा एक चर्चेचा विषय बनली होती.

चिपळूणकरांच्या घरी आता दर रवीवारच्या -रविवारी चहाबरोबर न्याहारी साठी कधी साबुदाण्याची खिचडी, कधी उपीट, तर खास गोडाचा शिरा असे पदार्थ होऊ लागले. आधी केले जात नव्हते असे काही नाही, पण पेरींसोबत रंगलेल्या गप्पांमुळे पदार्थांची लज्जत आणखीनच वाढायची. चिपळूणकरांना हित-गुज करण्यासाठी, मनातलं बोलून दाखवण्यासाठी आपली व्यक्ती मिळाली होती. दामोदर बळवंत चिपळूणकरांना तो खजिना सापडला होता ज्याचा शोध त्यांचं मन त्यांच्याच नकळत गेली तीन ते चार दशकं घेत होतं. दामोदर बळवंत चिपळूणकरांना मित्र मिळाला होता.

"अरे, पेरी साहेब! आज सकाळी-सकाळी? यावं, यावं." चिपळूणकरांनी पेरींना दृढ आलिंगन दिलं. "बसा, बसा! आज सकाळी-सकाळी काय काम काढलत?" मंडळी छान आलं घालून चहा करा..." इकडच्या तिकडच्या गप्पा होईतोपर्यंत चहा आला. "आज थोडे अस्वस्थ दिसत आहात" चिपळूणकर म्हणाले "कारण...?" पेरींनी चहाचा मनसोक्त घुटका घेतला. "आहाहा! वाहिनी, टूमच्या हातचा चहा म्हंजे...अमृटटूल्य! पन… असा अमृटटूल्य चहा आज शेवटचा..." पेरींनी सहेतु चिपळूणकरांकडे पहिलं. चिपळूणकरांनी चमकून पेरींकडे पहिलं, सावित्रीबाई सुद्धा गोंधळल्या, " म्हणजे?" चिपळूणकर आश्चर्याने म्हणाले. "आज वर्तमानासह चहापान जाल नाहि वाटत दामोरदरपंत?" पेरींनी विचारलं. "नाही...आज..." चिपळूणकरांनी लागेचच दैनीक वृत्तपत्र हातात घेतलं आणि उभ्या-उभ्याच वाचायला लागले. ठळक बातमीवर त्यांच्या नजरा स्थिरावल्या. हळू-हळू ते खुर्चीत बसले, त्यांचा श्वास मंद गतीने चालू लागला. "सर्व स्वातंत्र् सेनानींच्या प्रयत्नांना एश आलं दामोदरपंत...Your country is getting independence!" दामोदरपंतांनी निर्विकार नजरेने पेरींकडे पहिले. अखिल भारत जेंव्हा स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आनंद साजरा करत होता, हा एकच भारतीय असा असावा, ज्याला व्यक्त कसं व्हावं हेच समजत नव्हतं... आणि त्यांची हि अगतिकता पेरींना सहज कळत होती.

चिपळूणकरांच्या चेहऱ्यावरचं तेज कुठेतरी लुप्त झालं, ते कुठल्याश्या भयंकर रोगाने आजारी आहेत असं वाटू लागलं. डोळ्यातील चमक हरवली, ते अत्यस्थ झाले. त्यांना ह्या सगळ्यातून पुन्हा बाहेर पडायचं होतं... तसं व्हायचं होतं, जसे ते मुळात नव्हतेच!

दुसरे दिवशी चिपळूणकर रेल्वे स्थानकावर गेले. रेल्वे उभीच होती. पेरी खिडकीजवळील सीटवर बसले होते. "टुमी आलात,दान्यावाद! फार-फार बर वाटलं..." काही क्षण तसेच गेले. "वाहिनींना सांगा ट्याचा हातचा चहा मी कधीच विसरू शकनार नाही... आनि हो, साबुदान्याची किचडी सुद्धा..." पेरी हसले पण चिपळूणकरांचा रडवेला चेहरा त्यांना दिसत होता. पेरींच्या डोळ्यातहि अश्रू जमा झाले आणि हे पाहून चिपळूणकरांनी इतक्या वेळ संभाळून ठेवलेली स्वतःच्या अश्रूंची ठेव सोडवली. त्याच्या गालांवर अश्रूंच्या धारा लागल्या. पेरींनी आत्मीयतेने चिपळूणकरांचे हात हातात घेतले, "तुमची कूप आठवन येईल दामोदरपंत, I will always remember you..." ह्यावर चिपळूणकरांनी फक्त एक हुंदका देऊन पेरींना प्रतिसाद दिला. इतक्यात, शिट्टी वाजली, इंजिनाने काळ्या धुराचा एक फवारा हवेत सोडला, हिरवा बावटा दाखवण्यात आला, कुक-फूस करत गाडीने एक गचका खाल्ला व गती घेतली... हातातून हात सुटले होते आणि दोन डोळ्यांमधील अश्रू, दोन डोळ्यातील अश्रूंचा निरोप घेत होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा..... भारीच जमलीय कथा! एक इंग्रज नि मराठमोळ्या माणसातली अपूर्व मैत्री खरंच मनाला भिडली! पेरींच्या तोंडच्या वाक्यांना तुम्ही इंग्रज बोलतात तसं लिहिल्यानं जिवंतपणा आलाय कथेत. मस्त कथा आहे..... पुलेशु!

छान लिहिलित Happy

पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळे इंग्रज लगेच परत गेले नाहीत. काही तर भारतातच सेटल झाले. त्या अनुषंगाने पेरीचे बॅकग्राउंड थोडे दाखवले असते तर चालले असते. असे मला वाटते

कथा खूप आवडली. लॉर्ड पेरी आनि चिपलुनकर मस्त जोडी! (शुध्द लेखनाच्या चुका मुद्दाम. तुमच्या पेरीच्या भाषेचा परिणाम.)

द्वादशांगुला, ऋन्मेऽऽष, आनंद, सस्मित, आभिषेक अरुण गोडबोले आणि प्रियाजी...सगळ्यांना मनापासून धन्यवाद! तुम्हाला कथा आवडल्यामुळे, आणिखीही कथा इथे सादर करण्याचा हुरूप मिळाला आहे.

विनिता.झक्कास, तुम्ही मांडलेली शक्यता सुद्धा बरोबर आहे. पण, कथा सुचली तेंव्हा "पेरींना तडकाफडकी इंग्लंड मध्ये परत येण्याचा आदेश येतो" अशीच कल्पना होती. आणि त्याच अनुषंगाने ह्या कथेचा शेवट झाला. अर्थात, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जर घडले तर कथेत पुढे काय घडते, याचा विचार करावा लागेल. नवा पैलू डोळ्यासमोर आणल्याबद्दल खूप आभार!

Sorry...typing mistake... actually it's... खुपच छान असं म्हणायचे होते...खरच चांगले लिहिले आहे..असेच लिहित रहा.

अपूर्व खूप सुंदर कथा... स्वातंत्र्यपूर्व काळातल्या कथा तशा कमी वाचल्यात मी ...त्यातही इंग्रज आणि भारतीय यांच्यातल्या मैत्रीच्या कमीच होत्या.... पण ही कथा मला फारच आवडली... चिपळूणकर आणि पेरी यांच्यातलं मैत्रीचं नातं खूप सुरेख शब्दात गुंफलय...अजून कथा वाचायला आवडेल मला....
मला माहित नाही मी कितपत बरोबर असेन पण इथे एक सुचवावसं वाटलं...याचा पुढचा एक भाग म्हणून ...स्वातंत्र्यानंतर पेरी सर पुन्हा त्यांच्या देशात परत गेले ...आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी त्या दोघांच्या मैत्रीपूर्ण नात्याची आठवण म्हणून चिपळूणकरांना एक पत्र लिहीलं.....कथेतल्या पात्रांचे मालक तुम्ही आहात त्यामुळे त्यांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही लिहू शकता..

अपूर्व खूप छान कथा शेवट चटका लावून गेला पण दोघांची मैत्री अजून फुलावली असती तर परिणामकारकता अजून वाढली असती पुलेशु

उमानु, बाप्पा, नँक्स आणि पुरंदरे शशांक - तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे.

आदिसिद्धी, "पेरींचे चिपळूणकरांना पत्र..." वाह, छान कल्पना आहे... पुढे-मागे, जर कथेचा उपसंहार सुचला (उपसंहारासाठी हि कथा फाs s s s sर छोटी आहे म्हणा :p :p :p), तर नक्कीच असे रंगवायचा प्रयत्न करेन. खूप-खूप धन्यवाद!

shamika, प्रतिसादाबद्दल वसूचनेबद्दल मनःपूर्वक आभार. पुढील कथांमध्ये सुधारणेचा नक्की प्रयत्न करेन.

अपुर्व अतिशय सुरेख कथा. छोटिशी, आणि फार फापट पसारा न मांडता लिहिलेली.
एका अस्सल कोकणस्थ माणसाची इंग्रजा बरोबरची दोस्ती सुरेख वर्णन केली आहे.
निरोप घेताना त्यांना वाईट वाटत असेल तितकंच मला ही वाचून वाटलं.
लेखन अतिशय परिणामकारक आहे कारण तिन्ही पात्रं डोळ्यासमोर आली कथा वाचताना.

पुलेशु!

छान लिहिली आहे कथा. मला उगाच असं वाटत राहिल की, इतका सुरेख भावबंध तोडून नाही जाणार पेरी..........