गेले काही महिने..!!

Submitted by ओवी... on 26 March, 2018 - 14:15

माझं नाव ओवी. मी या वर्षी नाशिकहून पुण्याला शिकायला गेले. पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयात ऍडमिशन घेतली.आणि आता माझा कॉलेजचं एक वर्ष पूर्ण झालंय. कसं होतं हे वर्ष? नवं शहर, नवी माणसं ! काय होणार कसं होणार असं सगळं मनात होतं. पुण्याला येण्या आधी जवळपास एक वर्षभर मी मनाची तयारी करत होते एकटं रहाण्यासाठी. अनेक शक्यतांची पडताळणी करत होते आणि त्यावर आधीच उपाय शोधून ठेवत होते. पण त्यातलं काहीच घडलं नाही. जे घडलं ते माझ्या साठी सम्पूर्ण नवीन होतं. आणि त्याला सामोरं जाण्यातच खरी मजा होती. किती वेडेपणाकरतो ना आपण गोष्टी आधीच predict करून ठेवायचा!
काय काय केलं मी या काही महिन्यात.? जे जे करणं मला जमलं ते सगळं केलं.मी ढोलपथकात गेले, गणपतीत रात्रभर फिरून पुण्याचे गणपती पहिले, मानाच्या गणपतींच्या मिरवणूका वाजवल्या, स्वतःसाठी किराणा खरेदी केला, औषधाच्या वेळा लक्षात ठेवून औषधं घेतली, रात्री अपरात्री हवं तेंव्हा गच्चीवर गेले, बाहेर फिरले, खूप नाटकं पहिली, कार्यक्रमाना गेले, स्वतःचे कपडे धुतले,स्वतःच्या पैश्यांच नियोजन करून ते पाळायला शिकले, रूम मेट्स सोबत जमवून घ्यायला शिकले, स्वतःसाठी भांडायला लागले, हसले रडले, उदास झाले, काहीही झालं कोणी असलं नसलं तरी स्वतःला सांभाळायला शिकले. तसं पाहिलं तर या सगळ्या गोष्टी खूप साध्या आहेत. घराबाहेर पडलेला प्रत्येकच व्यक्ती या करतच असतो. पण यातून प्रत्येकाला होणारी 'स्व' ची जाणीव मात्र वेगळी असते. ओळखायला लागतो जो तो स्वतःला. घरचे किंवा ओळखीचे सोडून खरं जग म्हणजे काय याची कल्पना हळू हळू यायला लागते. खूपशा ऐकलेल्या गोष्टी जेंव्हा आपल्या समोर आपल्या आयुष्यात यायला लागतात तेंव्हा आपल्यालाच हसू येतं. माहित असलेल्या गोष्टी जाणवायला लागतात, त्यांचे अर्थ खऱ्या अर्थाने समजायला लागतात!
आज मी घरी आलेय आणि या सगळ्याचा विचार करतेय. पुण्याला जायच्या आधीची मी आणि नंतरची मी यात नक्कीच काहीतरी बदल आहे. तो कोणापेक्षाही जास्त मला जाणवतोय आणि आवडतोसुद्धा आहे. हे पहिलं वर्ष मला चांगलं गेलं कारण कदाचित मी त्यातल्या वाईट गोष्टी शोधल्या नाहीत. आलेले problems मी सहज स्वीकारले. गोष्टींकडे जर सकारात्मकतेने पाहिलं तर त्या आपोआप सोप्या होतात हे जगजाहीर सत्य मी अनुभवलं आणि मगच स्वीकारलं. अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या या वर्षाच्या माझ्यासाठीच्या भेटी आहेत. ज्या फक्त माझ्यासाठी आहेत. एका पुस्तकात मी एक कल्पना वाचली होती. प्रत्येकाची स्वतःची अशी एक अलिबाबाची गुहा असते जी कधीच भरत नाही आणि ज्यात जो तो आपला आपला खजिना भरत असतो, अनुभवांचा खजिना! ज्याचा खजिना सगळ्यात जास्त तो अर्थात श्रीमंत ! कळत नकळत सूरू झालेला माझा हा श्रीमंत होण्याचा प्रवास I hope की कधीच संपणार नाही..!
- ओवी नि.स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ya vyakitktila mla plz ekda bhetaychay..... Plzz myboli team ya vyaktiparyant mazya subheccha pohcva... Khup saundarya ahe hyanchya bolnyat

छान लिहीलंय.
आयुष्यातला प्रत्येक माईलस्टोन माणसाच्या व्यक्तीमत्वात बदल घडवत राहतो.

हे होतेच Happy
हॉस्टेलवर एक वर्ष राहून आल्यावर येणारे फिलींग, आयुष्यात आणि व्यक्तीमत्वात झालेला आणि आपल्याला जाणवणारा बदल...

छान लिहीलंय.
आयुष्यातला प्रत्येक माईलस्टोन माणसाच्या व्यक्तीमत्वात बदल घडवत राहतो.>≥>> +1

Ya vyakitktila mla plz ekda bhetaychay..... Plzz myboli team ya vyaktiparyant mazya subheccha pohcva... Khup saundarya ahe hyanchya bolnyat

Submitted by प्रतिक नाईक
>>. Kon bhai?