Submitted by निशिकांत on 25 March, 2018 - 23:45
चाहुल हल्ली लागत नाही
पायामधले पैंजण आता वाजत नाही
सख्यास माझ्या चाहुल हल्ली लागत नाही
एक जखम जी दिली सख्याने विचित्र इतकी!
खपली बसते वरून, हृदयी वाळत नाही
पूजा, अर्चा, फुले वाहता देव तुष्टतो
निर्माल्याला पण तो केंव्हा पावत नाही
जगून जीवन होरपळीचे, मृत्यू येता
सुटका झाली, अता चिताही पोळत नाही
नका न्याहळू क्षणोक्षणी मी कसा वागतो
ठेवत माझ्यावरती मीही पाळत नाही
"मागे बघुनी पुढे जायचे" कोण म्हणाले?
इतिहासाचे पान कधी मी चाळत नाही
जशी उसवली घट्ट वीण माझी माझ्याशी
भय कसलेही पैलतिराचे वाटत नाही
संसर्गाची खूप काळजी सदैव घेतो
म्हणून गझला इतरांच्या मी वाचत नाही
ध्यान असूद्या दुरावलेल्या आप्तेष्टांनो
स्पष्ट बोलतो, कधी अंतरी साचत नाही
नकोस तू "निशिकांत" घाबरू, मावळतीला
मनी रितेपण तरी उदासी मावत नाही
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह खुपच सुंदर
वाह खुपच सुंदर