भटकंती -१०

Submitted by इन्ना on 24 March, 2018 - 15:33

भटकंती -१०

भटकेपणा बर्‍याच प्रकाराचा असतो . प्रत्य़क्ष पायपीट हा मनापासून आवडणारा प्रकार असला तरी मनात ल्या आठवणींबरोबर केलेली भटकंती त्याहून मनाजवळची अन हृद्य !
अश्या बर्‍याच जागा आहेत जिथे फक्त मनातच जाता येतं . माझ लहान पणीच घर .वर्तमानात जिथे आता एक अपार्ट्मेंट उभ आहे. तोक्यामधल एक सुंदर तळ , त्यात पानगळीच्या सुंदर रंगांच प्रतिबंब पहाता पहाता मला मनाचा तळ दिसला होता. लहानपणीचे आजोळचे घर, लहानपणीची ची पर्वती ! आठवणीतली सफर. smile

हे भटकण म्हणजे फक्त ती निव्वळ जागा नसून , जागा , माणस , आवाज , खादाडी , गंध ह्या सगळ्याच्या आठवणींच मस्त मिश्रण असत! अश्या आठवणीतल्या जागा परत पहायचा योग आला तर ते एकाच वेळी दुखरं अन तरीही हवस फिलिंग असत!

अमदावाद , अशीच एक मनातली जागा.

१९९३ फेब्रुवारी , टपरीवर चहा पिताना गप्पा झाल्या ट्रेनिंग ला अम्दाबाद ला जायच , बोलीभाषेत अम्दाबादच! आर्किटेक्चर्च्या चौथ्या वर्षाला एक टर्म कोण्या आर्किटेक्ट च्या ऑफिसात काम करून ,हवेत गेलेल्या कलाकाराना जमिनीवर आणायचा, हा युनिवर्सिटीचा स्तुत्य उपक्रम आहे! तर 'औकातीच्या बाहेर गमजा मारणे' हा आमचा आवडता टाईम पास चहाबरोबर नेहेमीप्रमाणे चर्चेला होता. स्वतःवर अत्यंत खूष असणे , जगात काहीच अशक्या नाही ,अन हे सुंदर जग आता आपलीच वाट पहातय , की ये अन मला पादाक्रान्त कर , अश्या बाळ्बोध गोड गैरसमजूतीनी ओतप्रोत भरलेल , उबदार घरट्यात सुखरूप बसून , उंच उडायची स्वप्न पहाणारे मस्त रंगित वय अन दिवस होते ते. जायच तर जगात भारी आर्किटेक्ट कडेच हे ही नक्की होत ( आपापलच ! daydreaming ) मी अन रुपालीनी लिस्ट केली अन सरळ पत्र पाठवून दिली . तेव्हा मेल पाठवणे वगैरे जमाना यायचा होता. माहितीचा स्त्रोत छापिल पुस्तके अन माणसे हा असायचा. दोन आठवडे उत्तर आल नाही म्हटल्यावर प्रत्यक्ष जाउन येउ अस ठरवल . आता प्रवास करायचा म्हटल्यावर घरी सांगणे , विचारणे प्रकार आला. अहिंसा एक्स्प्रेस तेव्हा मंगळ्वारी अन शुक्रवारी धावायची पुणे , अहमदाबाद. जायच नक्की केल तो सोमवार म्हणून शुक्रवारी जायच ठरल. पुणे स्टेशन ला जाउन तिकीटं काढली . अन कॉलेजात कर्मधर्म संयोगानी भेटलेल्या एका प्रोफेसरांनी सुचवल म्हणून त्यांनीच दिलेली रेकमंडेशन लेटर्स न्यायच ठरवल. तिथे शिकत असलेले सिनियर्स एखादा दिवस रहायला देतील अशी कल्पना होती नैतर लांबच्या नातेवाइकांचा पत्ता होता. ( आज विचार करताना मला माझ्या पोकळ आत्मविश्वासापेक्षा , आईच्या धारिष्ट्याच नवल अन कौतुक वाटत) .तिथे जाताना केलेल्या कामाच बाड ( पोर्ट्फोलिओ ) बरोबर घेतला होता. एव्हाना टर्म संपत आली होती पण शेवट्पर्यंत काम चालू हा बाणा असल्यानी अपूर्ण शिट्स होती. मी अन रूपालीनी ती चक्क ट्रेन्मधे रंगवून पूर्ण केली होती. आजूबाजूच्या प्रवाश्याना करमणूक ! कालूपूर स्टेशनावर पाठीवर सॅक अन काखोटीला पोर्ट्फोलीओच बंडल अश्या आम्ही उतरलो , अन तिथे आमच्या अमदावाद इरा सुरवात झाली . smile

लिस्ट प्रमाणे ६ आर्किटेक्ट्स कडे जाणार होतो , अन शेवटी बी. व्ही दोशी यांच्या 'संगाथ' या स्टुडिओला भेट ( इथे काय आपला पाड लागणार नाही , तेव्हा फक्त पंढरीला गेल्यावर विठूरायाला हाय म्हणायच इतक च ठरल होतं ) असा दिवसभराचा प्लॅन होता. माझ्या डोक्यात तेव्हा आर्किटेक्चरल जर्नॅलिझम वगैरे चालू होतं . यथावकाश मला अन रूपालीला ही एकेक आवताण मिळाल. दिवाळी नंतर रूजू व्हायच होतं . काम संपून भटका मोड ऑन झाला . अन पहिल ठिकाण सेप्ट ( स्कूल फॉर एन्व्हेरॉन्मेंटल प्लॅनिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी) , खुद्द दोशींनी प्लॅन केलेल अन स्थापिलेल बेस्ट आर्किटेक्चरल कॉलेज ! तिथे आमचे काही सिनियर्स शिकत होते. गेटापाशीच भेटले अन त्यांनी सुचवल आधी दोशींच ऑफिस पाहून या मग इथे जरा आम्हाला सब्मिशन ला मदत करा. मग काय निघालो . ते पोर्टफोलीओच बाड तिथेच ठेवायची बुद्धी सुचली नाही हे बर झाल . कारण संगाथ ( दोशींच ऑफिस) ला हातातली बाड पाहून आमची ही मुलाखत झाली . अन सिलेक्शन लिस्ट जाहिर होईपर्यंतबाहेत थांबायला सांगितल. दोशींकडे इंटर्व्यु देउन आलो यार !! हे पण मोठच पुण्य कमवल की! तेवढ्यात राधिकाबेन नी , (दोशिंची मुलगी ही पण आर्किटेक्ट आहे) सिलेक्ट झालेल्यांची लिस्ट वाचली . चक्क माझ नाव झळकल होतं त्यात. बातमी पचनी पडेपर्यंत आम्ही दोघी गेटाबाहेर . दोशीनी कार्बुसिए कडे काम केलय म्हणजे आपले आजोबा गुरुजी झाले की ते आता ! मी जवळपास ट्रान्स मधे ! विजय चारस्त्यावरच्या एका पब्लिक टेलिफोन वरून आईला फोन करून बातमी सांगितली अन अस्मादिकांचा रथ चारंगुळे वरून ग्लाइड झाला म्हणा , पुण्याला येइपर्यंत.

पुण्याला कॉलेजात येउन चालू सेमिस्टरची परिक्षा देणे वगैरे निव्वळ फॉर्मॅलिटी ! मी पोचले होते तिथे ऑलरेडी! ही जायची संधी मिळाली तेव्हाची युफोरिक परिस्थिती , अन त्यानंतर तिथे घालवलेले जवळ्जवळ ८ महिने !! कामाचा अनुभव मिळाला हा निव्वळ छोटासा भाग म्हणावा इतका डोंगर्भर जगायचा अनुभव , मिळालेल मैत्र , माझी धन्नो (एम ८०) घेउन केलेली भटकंती , केलेल्या प्रत्येक कृतीला मी अन मीच जबाबदार असणार आहे ही भलतीच जबाबदारीची जाणीव, चार रुपये तास असा मिळणारा पगार अन शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ केलीली एक्स्कर्शन्स! माझा , आजवरच्या आयुष्यातला सगळ्यात आवडता कालखंड!

घरी , आधी माझे आईबाबा बहिणी मग नवरा ; बोलता बोलता डोळे चमकले की ,आता अमदावाद्च्या सुरस कथा अख्यान लागणार हे समजून घ्यायचे. smile त्यानंतर त्यापेक्षा मोठ जग पाहिल , व्यक्ति म्हणून आर्किटेक्ट म्हणून जबाबदार्‍यांचे विविध रोल निभावले . अन आता जवळपास २५ वर्षानी ,माझा लेक त्याच वळणावर उभा दिसला. घरट्याबाहेर चे स्वप्न घरट्यातून पहाणारा! एक अमदावाद ट्रीप झालीच पाहिजे अस वाटल. . आमच्या ढीग गप्पा होतात नेहेमी , अन (ऑल्मोस्ट) कूल मॉम आहेस असा किताब ही आहे खात्यावर पण, तेव्हाच्या इन्नाची स्टोरी सविस्तर सांगितलीच नव्हती कधी. मग एका विकेंडला ठरवून टाकली ट्रीप!

ट्रीप म्हणजे दोन समांतर ट्रॅक चालू होते मनात . पुणे एअरपोर्टला बोर्डिंग ची वाट पहाताना , जहांगिर हॉस्पिटल च्या समोर , जलाराम ट्रॅव्हल्स ची बस अन सॅक पाठीवर लावलेली एक मुलगी अन तिला सोडायला आलेल खान्दान आठवत होतं . आईनी फार सुचना दिलेल्या आठवत नाहीत, तिनी तोवर जाणता (माझ्या) अजाणाता शिकवलेल्या , रुजवलेल्या गोष्टींवर अन बहुतेक माझ्या वरही विश्वास असावा ! अह्मदाबाद ला तेव्हा मला जागा शोधेपर्यंत रहायला , एका ओळखिच्यांच्या मुलाच्या मित्राच्या आजोळी बोलून ठेवल होतं . लाल दरवाजा परिसरात त्या आजी रहायच्या . तिथे जाउन जागा शोधण हे मी आपापल करायच होतं . आज विमानानी सव्वा तासात पोचताना , तेव्हा सापूतार्‍यात बंद पडलेली बस आठवली . जंगलातले काजवे पण . मनातला साउंड ट्रॅक म्युट केलेला होता . अन लेकला सादर करायच आख्यान साबरमतीच्या काठावरच अस ठरवल होतं . उतरल्यावर रिक्षात बसून पहिल्यांदा सेप्ट ला गेलो. तिथल्या टपरीवर बन मस्का अने बे मसालाचाय हा सकाळचा ब्रेक फास्ट असायचा . अन तोच खायचा होता! . चहा अन बन्मस्क्याबरोबर केलेल्या चर्चा , घातलेले वाद , जुळलेली प्रकरण सगळ आठवल . तो टुटी फ्रुटीवाला बन तोही बचक्भर मस्का लावलेला खाल्ला अन अख्यानाच पहिल नमन सुरू केल. पार आमचे कारनामे , घर शोधतानाची गंमत ,रात्रंदिवस स्तुडिओत काम , फोटोग्राफी, पहिल्यांदा एकर्‍टीनी हॉटेलात जाउन खाल्लेला पराठा अन चक्क मी घरच्या आठव्णीनी गाळलेले डोळे , बहिणीना , आईला लिहिलेली पत्र, त्यांची पत्र , भरपूर भटकंती , तेव्हा अचानक कळलेली जबाबदारीची व्याख्या , हुसेन वगैरे मंडलींबरोबर काम करायची संधी . बरीच बडबड केली . लेक म्हणाला, तू इन्टरेस्टिंग होतीस यार इन्ना , कूल एक्दम . biggrin

संगाथ , आमच्या पंढरीची वारी ही करण क्रमप्राप्त होतं लेकाबरोबर. टाइम लाइन नावाच त्यांच्या आज्वरच्या कामाच प्रदर्शन तिथे एका नव्या दालनात लावलेल दिसल. मी ज्यावर तेव्हा काम केल ते दोन प्रोजेक्ट्स ही झ्ळकले दिसले त्यात. हुसेन दोशी गुफाच्या इनॉगरेशन च्या फोटो मधे ही मी सापडले . तिथले आमचे गप्पा मारायचे कोपरे , तेव्हा चे ड्राफ्टिंग बोर्ड्स अन मोजके ५-६ कॉम्प्युटर्स , लायब्ररी , मॉडेल मेकिंग रूम कालानुरूप बदललय . पण तिथे काम करायला अलेल्यांच स्पिरिट तेच तसच दिसल!

बाकी ट्रीप मधे आमचे खादाडी अड्डे , खरेदीची ठिकाण , ड्राइव्ह इन थिएटर , आय आय एम , कोरियांनी डिझाइन केलेला गांधी आश्रम , सरखेज रोजा, अडालज ची स्टेप वेल दाखवणए कार्यक्रम झालाच . पण महत्वाचा प्रवास , मला वाटत , मी अहमदाबाद ला गेले तेव्हा माझी आई ज्या थांब्यावर उभी होती तिथवर , मी पोचणे , हा होता ! स्वतःच जग एक्सप्लोअर करायला, आपल बोट सोडून जाणारी पोरं ! अन स्वतःवर अन त्याहून जास्त पोरावर विश्वास असणारी आई . वन फुल सर्कल! भटकंती ! आठवणीतली!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप खूप सुंदर लिहिलंय! आर्किटेक्चरच्या जगाशी काहीच परिचय नसल्यामुळे बी. व्ही. दोशी, संगाथ वगैरे काहीच माहिती नव्हतं. कार्बुझिए म्हणजे चंदिगढ ज्यांनी प्लॅन केलं आहे ते आर्किटेक्ट ना?
तुमची जी पॅशन आहे, त्यातल्या महान व्यक्तीकडे काम करायला मिळणं, तेही कॉलेजच्या रंगीबेरंगी दिवसांमध्ये, हा अगदी भाग्ययोग.
मुलगा पण आर्किटेक्ट होतोय की कुठल्या वेगळ्या क्षेत्रात आहे? ' फुल सर्कल', खरंच!

लेख मस्तच आणि आवडत्या विषयावरचा. बी व्ही दोशींना Pritzker पुरस्कार मिळाला ना इतक्यातच? तुम्ही त्यांच्याकडे काम केलंय म्हणजे मस्तच. मी आर्कीटेक्ट नाही पण Elle decor ची नियमीत वाचक असल्यामुळे थोडी माहिती Wink आर्किटेक्चर ची NIT ला मिळालेली अडमिशन सोडल्याचे आजही वाईट वाटते. त्याची कसर मॅगझिनस वाचून आणि घरात प्रयोग करुन भरुन काढते.

सुरेख लिहिले आहे,
माझे बाबा COEP चे, मी पुण्याला ऍडमिशन घेतल्यावर ते पण असेच एक दिवस माझ्या बरोबर फिरले होते, पण तेव्हा मला मात्र हे का सगळीकडे माझ्या बरोबर येतायत असे झालेले.
कदाचित त्यांच्या मनात तुम्ही लिहिलेत तश्या भावना असतील Sad

समहाऊ तुमचे लिखाण जास्त वाचले नव्हते, आता शोधून वाचतो Happy

छान लिहिलंय...
आवडलं...
बरचसं रिलेट झालं आणि बाकीचं होईलही कदाचित...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
वावे- हो कार्बुसिये म्हणजे चंदिगड चे प्लानर! अन लेक इंजिनियर होतोय. आर्किटेक्ट नाही व्हायच त्याला , पण डिझाइन मधे काहीतरी चांगल करेल अस आपल मला वाटत. Happy
स्वदेशी, हो ह्या फिल्ड मधला नोबेल च्या तोडीचा समजला जाणाअरा पुरस्कार त्याना मिळाला ह्या वर्षीचा. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय! अन ह्या विषयाच शिक्षण नसल तरी हे फिल्ड डिझाइन अन त्याची फिलॉसॉफी कळण्याबद्द्ल आहे. वाचून तुम्ही समृध होतच आहात!
सिम्बा , एकदा ह्याबद्दल गप्पा मारा बाबांशी ! यु विल मेक हिज डे!! अन ,आधीच्या ९ भटकंत्या आहेत इथेच मायबोलीवर! ते लेख बरेचसे माझ्या भटकंती अनुभवावर अन आर्किटेक्चर बद्दल आहेत .
निरू , साधना , धन्यवाद!

नितांत सुंदर
Coming of (parental) age वर किती मस्त लिहिलं आहेस