पक्वान्न आवडते तुझे की फक्त तोंडीलावणे ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 March, 2018 - 14:21

हातामधे उरते 'प्रिया' आकार बदलत राहणे
साकार करते जन्म तर, हे अनुभवांचे लाटणे

घोकून-घोकुन एकदाचे पाठही केले तुला
पण नेमक्या अर्थासकट राहून गेले वाचणे

ज्याही दिशेला मान वळवू त्या दिशेला पाहते
अत्यंत गोंडस भासते शेतातले बुजगावणे

प्रत्येक वेळेला खरेतर झाड होते व्हायचे
प्रत्येक वेळेला तरी वाट्यास आले चालणे

उजवीकडे-डावीकडे ताटात नक्की मी कुठे
पक्वान्न आवडते तुझे की फक्त तोंडीलावणे ?

हा कोणत्या वळणावरी तू हात माझा सोडला ?
टप्प्यात नाही शिखर अन जमणार नाही थांबणे

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह. ताटातला पदार्थ डावीकडे वाढला अहे की उजवीकडे, याची हळुवारपणे घेतलेली दखल..जिवाला एकदम भावली.
मस्तच. तुमच्या गझला एकदम पक्वान्नासारख्या वाटतात. Happy

<<<
ह्या कोणत्या वळणावरी तू हात माझा सोडला ?
टप्पयात नाही शिखर अन चुकते कुठे हे चालणे >>>
इथे "टप्पयात नाही शिखर पण चुकते कुठे हे चालणे" हे अधिक शोभले असते, असे मला वाटले.