माझा मनोविकार

Submitted by अननस on 22 March, 2018 - 22:07

मानसिक आरोग्याशी निगडीत हा लेख माझ्या अन्दाजा प्रमाणे स्वमग्नतेमध्ये मोडणार नाही. परंतू याहून जास्त योग्य सदर या लेखा साठी मला सापडले नाही.

अनेकदा माझ्या कपाळामध्ये आणि डोक्यामध्ये मुंग्या आल्या सारखे वाटत असे, एकदम ओढल्या सारखे वाटत असे. त्या नंतर सगळे लक्ष नैसर्गिक पणे तेथे ओढले जात असे आणि मग काही क्षण सुखाचा अनुभव येत असे. पण त्या नंतर मात्र अनेक तास, कधी कधी पूर्ण दिवस काही सकारात्म, निर्णयात्म विचार करता येत नसे. दिवस भर बहुसंख्य वेळ असंबध्द विचार येत असत ज्यावर माझा काही ताबा नसे. कोणत्याही गोष्टीवर अवधान देणे अशक्य होत असे. कधी मधेच परिस्थीतीचा किंवा मनातल्या विचारांचा विपर्यस्त अर्थ मनामध्ये येऊन अनियंत्रित हास्यामध्ये मी जात असे किंवा काहिही चांगले होणार नाही अशा विचारांनी नैराश्यामध्ये जात असे. सहसा वस्तूनिष्ठ परिस्थीती ची समज निर्माण होत नसे.

पहिले काही दिवस मी वाचन, व्यायाम, योगासने, ध्यान इत्यादी उपाय करून पाहिले. त्याने काही प्रमाणात सकारात्म फरक दिसला. पण त्या नंतर फारसा फरक पडे जाणवे नासा झाला. मला माझ्या कार्यक्षेत्रातील जबाबदार्या मानसिक स्थीती मुळे नीट पूर्ण करता येत नसत. मला काही व्यक्तींनी हे योगिक स्थीतीचे लक्षण असल्याचे सांगितले. परंतू मला हे निदान अशास्त्रीय वाटते. काही प्रमाणात मानसशास्त्राचा अभ्यास केला तेव्हा अस कळले की "कोणत्याही मानसिक स्थीती मुळे आपल्या क्रिया नीट पार पाडता येत नसतील तर तो मनोविकार म्हणून मानला जातो". Perfection is a mark of spirituality हे वाक्य पण ऐकले होते त्यामुळे हा अध्यात्मिक अनुभवाचा किंवा योगिक अनुभवाचा भाग आहे हे पटण्यासारखे नव्हते. माझा अनुभव प्रात्प परिस्थीती मधल्या माझ्या जबाबदार्या, गरजा आणि कर्तव्य पार पाडणे अशक्य करणारा होता त्यामुळे मी मानसशास्त्राच्या मनोविकाराच्य व्याख्येला धरून मानसोपचार तज्ञांची मदत घेतली.

मानसोपचार तज्ञांनी मला यावर काही औषधे दिली. ती मी काही दिवस घेत असे. त्याने काही प्रमाणात वरील सांगितलेल्या विकाराची लक्षणे कमी झाली. पण काही दिवसांनी मी औषधे घेऊन जास्त नैराश्यामध्ये जाऊ लागलो तसेच त्या औषधांना तत्काळ दिसणारा नसला तरीही फार काळ घेतल्यास जाणावणारे इतर हानीकारक परिणाम असल्याने मी ती आषधे घेणे बंद केले. मला पण विकाराचे निश्चीत निदान झाले नव्हते. थोड्या अजून वाचना नंतर, ज्याला मानसोपचार तज्ञ ' बायपोलर डिस ऑर्डर' म्हणतात त्या सद्रूष्य लक्षणे असल्याचे लक्षात आले.
अजून थोड्या विचार, वाचनानंतर आणि वैयक्तीक अनुभवातून असे समजले कि मेंदूच्या पुढचा आणि वरचा भाग तसेच बाजूचा भाग (फ्रॉन्टल लोब आणि टेम्पोरल लोब) यामधल्या रक्ताभिसरणाच्या अनियमीतते मुळे अशा प्रकारची लक्षणे जाणवू शकतात.

वाचन, व्यायाम, योगासने, ध्यानात सांगितलेले विचार नियमन, डोक्याला मसाज आणि गरज पडल्यास औषधे यामुळे मानसिक स्थीती खूपच सुधारली. बहुसंख्य कर्तव्ये आणि जबाबदार्या नीट पार पाडता येत आहेत तसे एक प्रत्येक गोष्टीची वस्तूनिष्ठ समज करून घेणे याची काही प्रमाणात सवय पण झाली. अजूनही क्वचित प्रसंगी वर सांगितलेली लक्षणे जाणवतात.

मनोविकार आणि त्यातून बाहेर येणे यावर फारसे लिहिले बोलले जात नाही. अशा संदर्भात इतरांची काही अनुभव असतील तर अवश्य लिहावे!.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आपण या आजारातुन बाहेर पडत आहात हे वाचुन बरे वाटले. निरामय जीवनासाठी व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!

या आजाराबाबत इथे माहिती दिलीत हे चांगले केले जेणेकरुन कोणाला तरी ही माहिती उपयोगी पडेल.

आपण नक्की कोणती योगासने केलीत हे सांगाल का?

तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!
विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे का?
कोणतीही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. जर उपचारांनी फरक पडत नसेल तर डॉक्टर बदला मात्र ही औषधे स्वतःच्या विचाराने कधीही घेऊ नका ही कळकळीची विनंती!

कोणतीही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. जर उपचारांनी फरक पडत नसेल तर डॉक्टर बदला मात्र ही औषधे स्वतःच्या विचाराने कधीही घेऊ नका ही कळकळीची विनंती!>>>>> +१.

जिज्ञासा, देवकी हो.. तुमचे अभिप्राय खूप महत्वाचे आहेत. हो, सर्व औषधे मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने घेत होतो. फक्त बायपोलर डिस ऑर्डर हे निदान मला निश्चीतपणे कोणी सांगितले नाही आहे. लक्षणे वाचून अशी एक शक्यता असल्याचे वाटले.

अ‍ॅमी, तुम्ही दिलेल्या लिंक्स आवडल्या. विस्रुत माहीती आहे.

राहुल, मला निश्चीत कोणत्या आसनांचा परिणाम कसा झाला हे सांगता येणार नाही. कारण तेवढ्या नीट पणे प्रयोग आणि त्याची माहीती नाही संकलीत केली. पण सुर्य नमस्कार, अंतः कुंभक, काही प्रमाणात पाद हस्तासन, याचा सकारात्म परिणाम आठवतो. फक्त देवकी आणि जिज्ञासाने लिहिल्या प्रमाणे, मनःस्वास्थ्यासाठी योगासने निवडताना पण तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. माझ्या साठी योग्य गोष्ट सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.

माझ्या मित्राला नैराश्याचा त्रास आहे फार पूर्वीपासून आणि त्याचा डावा हात पण खूप थरथरतो. त्याला नैराश्यासाठी रोज अँटीडिप्रेसंट औषध घावे लागते. (ही औषधे फार अ‍ॅडिक्टिव आहेत, हे पण स्वतःच सांगतो.) काही वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोटपण झाला. पण आता तो व्यवस्थित आहे. त्याने केलेले उपायः रोज न चुकता कमीत कमी १ तास व्यायाम करतो, रनिंग करतो. मी पण कसा व्यायाम केला पाहिजे आणि माझ्यापेक्षा मोठा असूनही तो किती फिट आहे, हेपण सांगतो. बिझी राहण्यासाठी संध्याकाळी पार्टटाईम नोकरी पण करतो, मुख्य म्हणजे एकटेपणा वाटू नये म्हणून रोज माझ्याशी फोनवर गप्पा मारतो. ३ एक वर्षांपूर्वी त्याचे परत लग्न पण झाले. बायको चायनीज आहे. सुखाचा संसार चालू आहे, अजिबात भांडण होत नाही. कारण हा काय बोलतो ते तिला कळत नाही आणि ती काय बोलते ते ह्याला. गूगल टरान्सलेट वापरतात, बायको हळू हळू इंग्रजी शिकत आहे. फुटकळ काहीतरी स्टॉक ट्रेडिंग/डे ट्रेडिंग करतो आणि नेहमी मला त्याच्या नवीन नवीन स्ट्रेटेजी सांगत असतो. मध्येच काहीतरी बिझनेस करून भरपूर पैसे कसे कमवायचे, याचे प्लॅन बनवतो आणि माझा सल्ला विचारत बसतो. म्हणजे त्याला खरे तर काही अर्थ नसतो,पण मग रिसर्च कर अमक्यातमक्याचा असे सांगून मी त्याचे मन बिझी ठेवतो. सध्या तो रिसर्च करतोय की रिटायर कुठे व्ह्यायचे त्याचा. आत्तापर्यंत त्याने बरेच पर्याय तपासले आहेत. आता सध्या युट्यूब बघून कुकिंग शिकत आहे. हल्ली (म्हणजे गेल्या ४-५ वर्षात एकदाही पॅनिक अ‍ॅटॅक आलेला नाही त्याला.) स्वतःला गुंतवून ठेवणे आणि मित्राशी किंवा इतर कोणाशी तरी मनमोकळेपणे बोलणे फार महत्वाचे आहे, असा माझा इतक्या वर्षांच्या अनुभवावरचा निष्कर्ष आहे.

कल्याणी पगडी ह्यांचे पुस्तक मिळाल्यास वाचा.मला नाव आठवले की लिहिन.त्या स्वतः बायपोलर डिस ऑर्डरच्या पेशंट होत्या.नंतर त्यातून त्या सुधारल्या.
त्यांची जिद्द्,घरच्यांचे पाठबळ हे सर्व काही होते.पण बाई खूप त्रासातून गेली आहे.