कधी कधी एखादी बातमी वाचून, बघून वा ऐकून मन अगदी सुन्न होते.
असेच काहीसे झाले काल.
हल्ली एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याने रोजच उशीर होतो. आणि त्या रिक्षाच्या अनुभवानंतर एकतर कॅब बुक करते वा बस पकडते, पण तीही फक्त रेल्वे स्टेशन पर्यंत. तर कालही रोजच्या सारखे ट्रेन पकडली. उशीर झाला होता. रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते तरीही ट्रेन बर्यापैकी भरलेली होती.
तर झाले असे की मी जिथे बसले होते तिथून मला एक बाई दिसली, दरवाज्यात टेकून बसली होती खाली. हातात एक छोटेसे बाळ होते. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे गार वारा सुटला होता. जिथे तो गारवा आम्हाला सहन होत नव्हता तिथे त्या छोट्या तान्ह्या बाळाची काय अवस्था, विचार न केलेले बरे, त्यात त्याला नीट गुंडाळलेही नव्हते. अन त्या बाईचे डोळेही पाणावले होते, नजर जणू शून्यात होती.
शेवटी न राहवून मी त्या बाईला आत येऊन बसायला सांगितले, तर तिने नकार दिला. बाळ खूपच तान्हे वाटले म्हणून तिला विचारले की किती दिवसांचे आहे तर तिने सांगितले की आजच सकाळी जन्मलेय.
बास, ते शब्द ऐकून अगदी सुन्न झाले मी.
एक दिवसाची ओली बाळंतीण, त्या तान्ह्या बाळाला घेऊन ट्रेन च्या दरवाज्यात झोम्बनारा वारा सहन करत बसली होती. तिची शून्यातील पाणावलेल्या डोळ्यांची नजर खूप काही सांगत होती. एव्हाना तिचे ते वाक्य ऐकून माझ्यासारखीच अवस्था बाजूच्या स्त्रियांचीही झाली होती.
मग दोघींनी समजावून तिला जबरदस्तीने आत घेतले, बसविले. बाळाला नुसतेच छोट्या पातळ कापडात गुंडाळलेले पाहून मी लगेच माझी शॉल काढून दिली तिला (मला रोजच्या प्रवासात शॉल सोबत घ्यायची सवय आहे). आधी तिने नकार दिला, पण नंतर बाळासाठी घेतली. अजून विचारपूस केल्यावर कळले की ती मानखुर्दच्या झोपडपट्टीत राहते. घरकाम करते. या आधी एक मुलगी आहे जी तिच्या आईकडे असते. ह्या वेळी तिच्या नवऱ्याने स्पष्ट सांगितले होते की जर मुलगी झाली तर आपला संबंध तुटला. सकाळी जेव्हा त्याला कळले की दुसरी सुद्धा मुलगीच झालीये त्याने त्या दोघींची कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला आणि तिला बाळासकट एकटीला सोडून गेला. हॉस्पिटल मध्ये राहायचे तर खर्चाचा प्रश्न होता. म्हणून ती बाळाला घेऊन आईकडे जायला निघाली होती. आईसुद्धा गरीबच आहे, पण काय करणार, दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही.
तिची हकीकत ऐकून मलाही रडू आवरत नव्हते. खरेतर विश्वास बसत नव्हता कि फक्त मुलगी जन्माला आली म्हणून कोणी आपले रक्ताचे नाते असे कसे तोडू शकतो. खूप सारे प्रश्न पडले होते , खूप राग येत होता.
आज जग कुठे पोहचलेय, तरी असे कित्येक आहेत ज्यांना अजूनही मुली नकोयेत. मला वाटते की इथे स्त्रियांच कमी पडतात, स्वतःला तुच्छ लेखून. आपण नवरा, भाऊ, वडिलांवर अवलंबून आहोत असे समजून. जिथे आपल्याला मान सन्मान नाही तिथे राहायचेच कशाला. फक्त एकट्या स्त्रीने तडजोड का करावी. संसार दोघांचा असतो ना मग मुलगा झाला तर त्याचा अन मुलगी झाली तर तिची असे का? फक्त समाज काय म्हणेल या कारणासाठी आयुष्यभर तडजोड का करायची.
ज्या वेळी तिचे कोडकौतुक व्हायला हवे, विशेष काळजी घ्यायला हवी, तिथे डोक्यावरचे छप्पर तर गेलेच होते सोबत ज्याने आयुष्यभर सुखदुःखात साथ द्यायला हवी त्या सो कॉल्ड नवऱ्याने सुद्धा सोडून दिले होते. त्यात घरची गरिबी अन शिक्षणही नाही.
खूप वाईट वाटत होते. कसेबसे समजावून तिला थोडे बिस्कीट खायला दिले. तेवढ्यात एक काकू ज्या हे सगळे ऐकत होत्या, त्यांनी मदतीचा हात पुढे केला, त्या एका एनजीओ साठी काम करतात. त्यांनी तिच्यासोबत तिच्या घरापर्यंत जायचे ठरवले. संस्थेतर्फे तिला जमेल ती मदत करून तिच्या नवऱ्याला समजवायचा प्रयत्न करू असे बोलल्या आणि आम्हा सगळ्यांना सुद्धा बरे वाटले.
पण तरी मनाची अजूनही घालमेल होतच आहे.
लवकर चांगली मदत आणि सपोर्ट
लवकर चांगली मदत आणि सपोर्ट मिळू दे तिला.
वाचून कसेसेच झाले.
वाचून कसेसेच झाले.
लवकर चांगली मदत आणि सपोर्ट मिळू दे तिला.>>+१
तिने स्वत खंबीर रहावे. !!
तिने स्वत खंबीर रहावे. !! परिस्थिती बदलेल. नवरा सोबत असला तरी, नसला तरी!
वाचून कसेसेच झाले >>>> हो,
वाचून कसेसेच झाले >>>> हो, सर्वच खुप भयंकर आहे.
अतिश्योक्ती वाटेल कदाचित, पण अजुनही त्या बाळाचा चेहरा दिसतोय मला. अजुनही खुप अस्वस्थ व्हायला होतेय की असे कसे कोणी करु शकतो???
फक्त एक मुल हवेय मग ते काहिही असो मुलगा वा मुलगी , पण फक्त एक बाळ असावे म्हणुन कितीतरी जण आसुसलेले असतात अन ज्यांना ते सुख मिळते ते असे वागतात.
Regular middle-class home's
Regular middle-class home's behaviour rules (!) Doesn't apply to this strata of society. Can't compare apples to oranges.
लवकर चांगली मदत आणि सपोर्ट
लवकर चांगली मदत आणि सपोर्ट मिळू दे तिला.>>>> +१.
अवांतर :तरुण असताना असेच स्टेशनवरून येताना एका भिकार्याने आपले बाळ समोरच्या फडक्यावर उघडे ठेवले होते.दुसर्या दिवशी स्वतः विणलेला स्वेटर घेऊन गेले आणि त्या बाळाजवळ ठेवला.त्या भिकार्याने पटकन उचललेला पाहिला.मला खूप मस्त वाटले.दुसर्या दिवशी येताना पहाते तो काय बाळ परत उघडेच.
दुसर्या दिवशी येताना पहाते
दुसर्या दिवशी येताना पहाते तो काय बाळ परत उघडेच. >>> असेच होत कारण त्यांच्यासाठी ती त्यांची रोजगारी असते, बरेचदा पळवलेली मुलेही असतात.
कांजुर स्टेशनच्या पुलाच्या पायर्यांवर एक बाई अशिच बसायची लहान मुलाला घेवुन. गर्दीच्या वेळी समजा शांत असेल बाळ तर मुद्दाम चिमटा काढुन रडवायची त्याला. बर्याच जणांनी ते पाहुन तिकडे पैसे देणे बंद केले होते पण कोणी तिला जाब विचारल्याचे आठवत नाही.
हो...पण हिची कथा खरी वाटतेय.
हो...पण हिची कथा खरी वाटतेय. फार वाईट वाटलं........"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी पान्हा नयनी पाणी..." हे शब्दशः आठवले.
त्या बाळाला, तिच्या ताईला व आईला अनेक शुभेच्छा!!