मी गणेश चतुर्थीसाठी गावी गेलो होतो. गणपतीचे पाच दिवस कसे संपले काही कळलेच नाही. पाचव्या दिवशी विसर्जनच्यावेळी नदीवर मला एक व्यक्ती दिसली. ती आमच्या गावातील होती एवढे नक्की. पण त्यांना कुठे तरी पाहीले होते, तेच आठवत नव्हते. ते बऱ्याच वर्षानी गावी आले होते. बऱ्याच वेळानंतर विचार केल्यावर मला आठवले, ते साळगांवकर काका होते. वीरप्पनसारख्या वाढलेल्या दाढीमिश्यांमुळे ते माझ्या लक्षात राहीले होते.
मी तेव्हा सातवीत असेन. नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आणि पहील्याच दिवशी साफसफाई करावी लागते म्हणून बऱ्याच जणांनी दांडी मारलेली. शाळेत साफसफाई चालू असताना एक मुलगी आपल्या वडीलांसोबत शाळेच्या गेटमधून आत येताना दिसली. त्यामुलीसोबतचे वडील म्हणजे साळगांवकार काका होते. दाढीमिश्या असलेला एक धिप्पाड माणूस आणि त्यांच्या सोबत आलेली ती चुणचुणीत मुलगी मला त्या दिवशीही लख्ख आठवली.
अजुनही गणेश विसर्जनासाठी मु्र्ती येत होत्या. एक एक करून सगळ्या मुर्ती रांगेत मांडल्या जात होत्या. त्यानंतरची तयारी करण्यात गणेशभक्त मग्न होते. आरती व्हायला वेळ होता. मी साळगांवकरकाकांकडे सरकलो. साहजिकच त्यांनी मला ओळखले नाही. माझ्या चेहऱ्यात बराच फरक पडला होता.
" मी सागर, चिमुचा सातवीतला मित्र. तुम्ही चिमूचे वडील ना?" माझ्या या प्रश्नाने ते चमकले.
आम्ही चिन्मयीला चिमू बोलायचो
"हो" ते हळू आवाजात म्हणाले आणि माझा चेहरा निरखू लागले.
"तुम्ही चिमूला घेवून आपल्या गावातल्या शाळेत आला होता, मला चांगले आठवतय. त्यानंतर काही दिवसानी चिमूला शाळेतून कायमचे घेवून निघून गेलात ते परत आलातच नाहीत"
"त्यांनतर तीन वर्षानी गावी मी आलो होतो" "तेव्हाही मी तुम्हाला चिमूबद्दल विचारले. पण तुम्ही काही न बोलता निघून गेलात. मी तेव्हा दहावीत असेन. मी लहान असल्यामुळे तुम्ही माझा प्रश्न तेवढा गांभीर्याने घेतला नाही"
"असे काही नाही, कदाचित मी त्यावेळी घाईत असेन"
"निदान आज तरी मला सांगा चिमू कुठे असते? कशी आहे ती?"
"ती छान आहे" ते कसेबसे बोलले. पण का कोणास ठाऊक त्यांनी घाईघाईत दिलेले उत्तर मला पटले नाही. ते चेहरा लपवत तिथून निघाले.
इतक्यात आरती सुरू झाली. आरती चालू असताना पहील्यांदा माझं लक्ष आरतीमध्ये नव्हते.
मनात कुठेतरी भुतकाळातल्या आठवणी येवू लागल्या. चिमुसोबतच्या शाळेतल्या आठवणीने माझं लक्ष विचलीत होऊ लागले.
ती शाळेत येताच सगळेजण तिच्याकडेच पाहू लागले होते. गोल चेहरा, हसताना छोट्या दातांची दिसणारी पाढरीशुभ्र दंतपंक्ती मला आजही आठवते आणि छोट्याश्या वेण्यामध्ये तिचा चेहरा कमालीचा गोड दिसत होता. तिला या अगोदर आम्ही कधीच पाहीली नव्हती. तिचे बाबा तिला मुख्याध्यापकांच्या ऑफीसमध्ये सोडून निघून गेले. आमची शाळा तशी खेडेगावातली. तिथे फारशा सोयी नव्हत्या. सातवी पर्यंतच्या शाळेत मुख्याध्यापक धरून ६ शिक्षक. दोन गावांच्या मध्यवर्ती असणाऱ्या या शाळेत पटसंख्या समाधानकारक होती. आमची साफसफाई चालू असताना ती आमच्याकडेच येताना दिसली आणि लगोलग कामालाही लागली. ती आमच्यात पहील्याच दिवशी मिसळली. तिचे नावही माहीत झाले. तिला चिमू या नावाने हाक मारलेली जास्त आवडायची. आमच्या पाच जणांच्या गटात चिमू सहावी झाली. ती खुप मनमोकळ्या स्वभावाची होती. अभ्यासात हुशार. वर्गात दंगा असेल तरी हिचा लक्ष अजिबात विचलित होत नव्हता. ती शाळेत रोज काहीना काही खायला घेवून यायची आणि ते आम्हा सर्वांच्यात वाटून खायची. तिचा स्वभाव सर्वांना हवाहवासा वाटायचा. लवकरच आमच्यात घट्ट मैत्री झाली. ती मुंबईत राहीली असल्यामुळे शुद्ध मराठीत बोलायची. आम्ही मालवणी बोललेले तिला सुरूवातीला समजत नव्हते. काही अडले की मला विचारायची. शिवाय शुद्व मराठी शब्द आम्हाला शिकवायची. तिला वाचनाची आवड खुप होती. अभ्यासाच्या पुस्तकाशिवाय एखाद दुसरे पुस्तक तिच्या दफ्तरात असायचे.
मला चांगले आठवते एकदा आमचे वनभोजन निघाले होते. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे माझं जाणं जवळ जवळ रद्द झालं होतं. ही गोष्ट चिमूला कळली तिने आपल्या बाबांकडून पैसे घेवून माझे पैसे भरले. त्या वनभोजन केलेली धमाल मी कधीही विसरू शकत नाही. मंग्या, पक्या , पवन्या , चिमू आणि स्वप्ना असा सहा जणांचा आमचा गट होता. चिमू आमच्यात सामील झाल्यामुळे त्यात अजुनच नवचैतन्य आले. तिने आम्हाला प्रत्येक क्षण जगायला शिकवला. अभ्यास अपूर्ण राहीला की दांडी मारणारे आम्ही नियमित वर्गात बसू लागलो. कसालकर गुरूजींना हा बदल दिसून आला. ते शाळेत चिमूच्या मदतीने ते छोटे छोटे उपक्रम राबवू लागले. लहान वयात देखील तिची परिपक्वता भारी होती. थोड्याच दिवसात ती सर्वांची लाडकी बनायला वेळ लागला नाही.
तो शनिवारचा दिवस होता. सकाळची शाळा होती. पक्या आणि चिमू त्यादिवशी शाळेत गैरहजर होते. आमच्या गटातील एक जरी कोणी शाळेत आला नाही की आम्हाला करमत नसायचे. कधीही गैरहजर न राहणारी चिमू आज का आली नसेल? माझ्या मनात हूरहूर लागून राहीली. शिवाय सतत बडबड करणारा पक्याही आला नव्हता. कसेतरी सर्व तास बसून आम्ही घरी जायला निघालो. मी जाताना चिमुच्या घरी जायचे ठरविले. इतक्यात मंग्याने नदीकडे जायचा बेत आखला. मी नाही म्हणत असून सुद्धा मला तो आडवाटेने घेवून जाऊ लागला. सोबत पवन्या आणि स्वप्ना होतीच. मला त्या वाटेने जायला भीती वाटायची. कारण नदीच्या एका बाजूला स्मशानभूमी होती. त्यादिवशी पण त्या सर्वांसोबत चालताना भीती वाटत होती. थोड्या वेळ चाललो असू आणि वाटेत एक भले मोठे सातीवन वृक्षाचे झाड होते तिथे आलो. ते झाड खुपच मोठे होते. त्यामुळे त्याच्या मागे चारजण आरामात लपून राहतील एवढी जागा होती. आम्ही त्या झाडाजवळ पोहोचल्याबरोबर त्या मागून चिमू आणि पक्या जोरात ओरडत बाहेर आले आणि त्यांच्यात मंग्या ,पवन्या आणि स्वप्ना पण सामील झाली. सगळ्यांचा असा आरडाओरडा कळायच्या आत पक्याने माझे डोळे गच्च पकडले. त्यावर कोणीतरी रूमाल बांधला आणि मला हाताने धरून घेवून जाऊ लागले. एका ठिकाणी गेल्यावर माझ्या डोळ्यावरचा रूमाल काढण्यात आला. त्या बरोबर सगळ्यानी एक सुरात 'हँपी बर्थ टू यू, हँपी बर्थ डे टू यू , असे बोलायला सुरूवात केली आणि ते सुद्धा मी पहील्यांदा ऐकत होतो. झाडाच्या टेबलाच्या आकाराच्या बुंध्यावर एक केक ठेवला होता. केकच्या भोवताली फुलांनी छान सजविले होते. शिवाय रानातील विविध वनस्पतींचा वापर करून आजूबाजूला छान सजावट केली होती. आणि बर्थडे साठी उपस्थित असलेल्या सगळ्यांना खास मुकुट बनविले होते. मी खुपच भारावून गेलो होतो. काही बोलावे सुचत नव्हते. पक्या आणि चिमू शाळेत का आले नाही ते कळले. तो माझा साजरा होत असलेला पहीला वाढदिवस होता. केक न पाहीलेला मी केक दिसल्याबरोबर पुढे धावलो. जवळ जावून बघतो तर टोपातले अलगद काढून घेतलेले ते गोल खसखसे होते आणि ते माझे फेवरेट होते. सगळ्यांच्या प्रेमापुढे मी हरखून गेलो. खसखसे कापून माझा बर्थडे साजरा झाला. त्यानंतर पक्याने एक खास चटपटा पदार्थ बनवला होता. तो म्हणजे चिंचेची खिरमट. चिमूला खुप आवडायची खिरमट आणि पक्याला चिमू , त्यामुळे त्याने तिच्या आवडीची खिरमट आणली होती. पण हे चिमुला माहीत नव्हते. बाकीच्यानी पण थोडं थोडं खाऊ आणले होते. त्यावेळी आम्ही खुप धमाल केली होती. विशेष म्हणजे चिमूने माझी आवड ओळखून सर्व आयोजित केले होते. सगळ्यानी दिलेल्या या सरप्राईजवर मला काय बोलावे तेच कळत नव्हते. माझ्याकडे त्यांना द्यायला काही नव्हते. किंबहूना माझा बर्थडे त्या दिवशी होता हेच मला माहीत नव्हते. आतापर्यंत कधीच असं सेलेब्रेशन झाले नव्हते. या सगळ्याचे श्रेय चिमूलाच जात होते. तिनेच गुरूजींकडून माझ्या बर्थडेची तारीख मिळवून हे सगळे घडवून आणले. आमची ही धमाल चालू असताना तिथे चिमुचे वडील तिथे आले. त्यांना बघून चिमू सोडून आम्ही सर्व जण घाबरलो. हे पाहून ते हसत सुटले. त्यांच्या हसण्याचे कारण कळेना. नंतर कळले की ते ही चिमुसोबत सामील होते. ते खास आमचा फोटो काढण्यासाठी आले होते. मला चांगले आठवते मनासारखा फोटो येण्यासाठी त्यांनी आम्हाला कितीतरी वेळा रिटेक द्यायला लावला होता. मी हे सगळे जावून आईला सांगीतले. माझी आई खुप आनंदीत झाली. तिने त्या सर्वांना घरी जेवायला बोलविले. चिमूचे बाबा सोडून सगळे जण जेवायला आले होते.
आणि अचानक एके दिवशी चिमू शाळेत आली नाही. त्या दिवशी कोणाचा बर्थडेही नव्हता. त्या दिवशी चिमूचे बाबा मात्र मुख्याध्यापकांच्या ऑफीसमधून बाहेर पडताना दिसले. दुसऱ्या दिवशी कळले की ते सर्व मुंबईला निघून गेले.
आरतीच्या ताह्माणाच्या लागलेल्या चटक्याने मी भानावर आलो. आरती संपली होती. गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी मी माझ्या चुलत भावासोबत नदीत उतरलो. थोड्या वेळाने प्रसाद वाटप झाले. आम्ही घरी निघालो. या गडबडीत साळगांवकर काका निघून गेले होते. पण मीही कमी जिद्दी नव्हतो. त्यांच्या मागोमाग त्यांच्या घरी गेलो. मला घरी आलेले पाहून ते आश्चर्यचकीत झाले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. परत चिमुचा विषय निघाला तेव्हा त्यांनी माझ्या हातात एक व्हिजिटींग कार्ड दिले आणि मुंबईला आल्यावर मला भेट असे म्हणाले. मी काका काकींना नमस्कार करून माझ्या घरी निघून आलो.
दुसऱ्या दिवशी मी मुंबईला निघालो. काही दिवसानी एका शनिवारी साळगांवकरकाकांना फोन करून त्यांना भेटायला गेलो. पत्ता शोधता शोधता मी एका लायब्ररीकडे पोचलो. तिथे जावून विचारले तर मला दिलेला पत्ता हा याच लायब्ररीचा होता. मी आत गेलो तर समोरच साळगांवकर काका खुर्चीत बसले होते. त्यानी मला बसायला सांगीतले. ती एक छोटीशी लायब्ररी होती. बाजुला एक स्टडीरूम होता. तिथे पाच सहा मुलं अभ्यास करताना दिसत होती. बाकी पुर्ण लायब्ररी पुस्तकांनी भरली होती.
"हं, बोल सागर." त्यांच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता.
मी काहीच बोललो नाही.
"चल तुला चिमूला दाखवतो" असे बोलून ते मला लायब्ररी बाहेर घेवून जाऊ लागले.
मी खुप वर्षानी चिमूला पाहणार होतो. कशी दिसत असेल? ओळखेल का मला? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येऊ लागले. आम्ही दोघे बाहेर आल्यावर मला लायब्ररीच्या बाजूने वर बघायला सांगीतले. वर पाहील्यानंतर लायब्ररीचा बोर्ड पाहून मी चकीत झालो. लायब्ररीच्या 'ज्ञानामृत" या नावासोबत गावी चिमूसोबत साजरा केलेल्या बर्थडेचा आमचा ग्रुप फोटो तिथे होता.
" हा फोटो अजून आहे?" मी न राहवून विचारले.
" फोटो आहे पण फोटोमधली चिमू मात्र आपल्याला कधीच सोडून गेलीय."
" म्हणजे ? ती कुठे गेलीय?"
" तिने या जगाचा निरोप केव्हाच घेतलाय" हे ऐकताच माझ्या पायाखालची जमिन सरकायला लागली. काय बोलावे काही कळेना. काका मला आत घेवून गेले. मला पाणी प्यायला देवून मी सावध झाल्यावर म्हणाले,
"हो, ती या जगात नाहीय. पण तिच्या आठवणींमुळे मात्र ती या जगात नसल्याचे वाटत नाही. तिच्या इच्छेखातर मी ही लायब्ररी उभारली. बोर्डवर तुमचा ग्रुप फोटो प्रिंट करायची इच्छाही तिचीच. ती शेवटची घटका मोजत असताना तुम्हा सर्वांची खुप आठवण काढायची. मी तिची कशीबशी समजूत काढायचो. सारखे गावी जायचे घोष लावायची. माझ्या मनात असून पण ते करू शकत नव्हतो."
"काय झालं होतं तिला?" माझा कंठ दाटून आला.
"ती गावी असताना तिला हृदयविकाराचा सौम्य झटका आला, आमच्या ध्यानी मनी नसताना अचानक ती खाली कोसळली होती. तिथल्या डॉक्टरानी तिला मुंबईला घेवून जायला सांगीतले. मुख्याध्यापकांना भेटून आम्ही लगेच मुंबईला निघालो. तिथे गेल्यावर कळले की तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ताबोडतोब पैशांची जुळवाजुळव करून तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. त्यानंतर तिची तब्बेत सुधारू लागली. पण का कुणास ठाऊक ती आपल्या मनातल्या इच्छा बोलून दाखवू लागली. ज्या पुर्ण करण्यासारख्या होत्या त्या आम्ही पुर्णही केल्या. त्या इच्छेपैकीच तिचं लायब्ररी उभारण्याचे स्वप्न होतं. ते स्वप्न मात्र पुर्ण होताना तिला पाहता नाही आले. काही दिवसातच तिची पुन्हा प्रकृती ढासळली आणि काही कळायच्या आत तिचा नाजूक हात माझ्या हातात सैल पडला. लाड पुरवायच्या हातानी तिला मुठमाती द्यायची वेळ आमच्यावर आली." त्यांना पुढे काही बोलवेना. डोळ्यातून धारा वाहू लागल्या. नियतीपुढे हतबल झालेला बाप अजून काय करणार होता.
क्षणभर सारचं शांत झाले होते. थोड्यावेळाने ते शांत झाले. मी ही सावरलो होतो. त्यांनी लाकडी कपाटातून चिमूच्या काही वस्तू बाहेर काढून मला पाहायला दिल्या ज्या त्यांनी जीवापलीकडे जपून ठेवल्या होत्या. त्यात पुस्तकेच जास्त होती. काही भेटवस्तूही होत्या. एका मळलेल्या पुस्तकात मला काहीतरी बाहेर आलेले दिसले त्याने माझं लक्ष वेधून घेतले. मी ते पुस्तक उघडून पाहतो तर तिथे मोरपीस होतं. ते मोरपीस मी तिला दिलं होतं. मी पिसाच्या देठाला बांधलेला सोनेरी धागाच सांगत ते होता. त्या पिसाखाली एक सुकलेले आपट्याचे पानही होतं. आपट्याचे पान खोलल्याबरोबर आत पेनाने काहीतरी लिहीलेले दिसले. ते शब्द वाचून मी माझ्या मनात तंबोऱ्याची तार तुटल्यावर जशा झीनझीन्या येतात तसं झालं. तिथे लिहीलेल्या दोन छोट्या पंक्तीत बराच अर्थ सामावला होता. "तु दिलेल्या मोरपीसाचा अर्थ मी मला हवा तसा घेऊ का? आपल्या या नात्याला प्रेमाचे नाव देऊ का?"
मी ते मोरपीस आणि वेळीच न उलगडलेले आपट्याचे पानं हळूच माझ्याकडे ठेवून घेतले, हे काकानी पाहीले. त्यांनी स्मितहास्य करत त्याला संमतीही दिली.
समाप्त...
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
---------------------------------------------------
( टिप :- ही कथा कल्पनिक असुन कोणत्याही व्यक्तीगत जीवनाशी काहीही संबध नाही. )
लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
९००४६०२७६८
खुप छान नितीन नात्यांची गुंफण
खुप छान नितीन नात्यांची गुंफण..
सुन्दर
सुन्दर
सुंदर लेख!
सुंदर लेख!
मगाशीच "तिकडे" वाचला.
अप्रतिम
अप्रतिम
सुरेख! काल्पनीक कथा असली तरी
सुरेख! काल्पनीक कथा असली तरी छान वाटली, आणी गोष्टीतल्या चिमुबद्दल वाईट वाटले.
सुंदर..
सुंदर..
सुंदर!!!
सुंदर!!!
छान
छान
Chhan
Chhan
खूप सुंदर लिहिले आहे.
खूप सुंदर लिहिले आहे.
खूप सुंदर! तुमच्यात मोठा लेखक
खूप सुंदर! तुमच्यात मोठा लेखक होण्याचे पोटेन्शियल आहे. त्यासाठी खूप शुभेच्छा!
सुंदर कथा. पण खसखसे म्हणजे
सुंदर कथा. पण खसखसे म्हणजे काय?
छान
छान
खुपचं सुंदर... तुम्ही खुप छान
खुपचं सुंदर... तुम्ही खुप छान लिहिता नितीन
अतिशय सुरेख लिहिले आहे.
अतिशय सुरेख लिहिले आहे.
अतिशय सुरेख लिहिले आहे. +१११
अतिशय सुरेख लिहिले आहे. +१११
khaskhase म्हणजे???
सर्व वाचकांचे मनापासून आभार
सर्व वाचकांचे मनापासून आभार
खसखसे म्हणजे काकडी आणि गुळ घालून केलेला पदार्थ.
खूप सुन्दर कथा !!
खूप सुन्दर कथा !!
>>खूप सुन्दर कथा !!<< +१
>>खूप सुन्दर कथा !!<< +१
>>खसखसे म्हणजे काकडी आणि गुळ घालून केलेला पदार्थ.<<
आमच्या गावाकडे त्याला धोंडस(?) म्हणतात; आणि ती काकडी (तवस?) बर्यापैकि मोठी असते...
Khup Chan lihilay. Surekha
Khup Chan lihilay. Surekha natte .
कथा आवडली!
कथा आवडली!
Excellent story
खूप सुंदर कथा. कथेचा अंत खूप दुःखद.
खुप सुंदर कथा आवडली.
खुप सुंदर कथा आवडली.
सुंदर कथा
सुंदर कथा
खुपचं सुंदर... तुम्ही खुप छान
खुपचं सुंदर... तुम्ही खुप छान लिहिता नितीन
खुप छान लेख, वाचताना शाळेतील
खुप छान लेख, वाचताना शाळेतील आठवणी जाग्या झाल्या.
मस्त आहे वाचली कथा आवडली
मस्त आहे वाचली कथा आवडली
खुप सुंदर कथा
खुप सुंदर कथा