मागवा दारू पुन्हा

Submitted by बेफ़िकीर on 14 March, 2018 - 11:04

गझल - मागवा दारू पुन्हा
==========

व्हायच्या आधी जशा गप्पा, तशा मारू पुन्हा
मी जरा जाऊन येतो, मागवा दारू पुन्हा

वाहवा आली दलालासारखी ओठातुनी
हा कुणाचा वाचला मी शेर बाजारू पुन्हा

ती पुन्हा होईलही अस्पर्श बेटासारखी
भोवताली वाहणारे मोह झिडकारू पुन्हा

हीच ती निष्ठूरता की तीच ही आमंत्रणे
काय स्वीकारू पुन्हा मी काय नाकारू पुन्हा

पूर्तता वेळेअभावी व्हायची ज्याची सहज
वेळ झाला तर जरा ते स्वप्न साकारू पुन्हा

काजव्यांना गाजवूदे बेगडी तेजाळणे
अर्ज स्वीकारू दयेचा आणि अंधारू पुन्हा

का पुन्हा दुनियेत घुसमटण्यास ह्या आलास तू
'बेफिकिर' अपुल्या मनामध्येच उंडारू पुन्हा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीच ती निष्ठूरता की तीच ही आमंत्रणे
काय स्वीकारू पुन्हा मी काय नाकारू पुन्हा

पूर्तता वेळेअभावी व्हायची ज्याची सहज
वेळ झाला तर जरा ते स्वप्न साकारू पुन्हा >>>>> व्वा, क्या बात !!