रंगीला...

Submitted by यशू वर्तोस्की on 11 March, 2018 - 04:51

रंगीला ...

एखादा वाहत्या रस्त्याचा कोपरा. एक चहावाला , सॅडविचवाला , पानटपरी , समोर बसस्टॅण्ड , जवळच एक काॅलेज. काॅलेजच्या तरूणाईची गर्दी. हास्यविनोद , मस्करी , पार्श्वभुमीवर एफेम वर लागलेल्या सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर आजूबाजूला वावरणाऱ्या पर्यांसोबत चाललेलं हलकंफुलकं फ्लर्टिंग अशा गर्दीत राज रमलेला असतो. आजूबाजूला असलेल्या माहौलला साजेसे कपडे , सडपातळ बांधा. तोंडात तारूण्याची भाषा आणि सोबतीला असणारी रामशरण पानवाला , सँण्डविचवाला अण्णा पुजारी , चहावाला ऊमेश भट यांची साथ आणि मनमुराद दाद या भांडवलावर राज आपल्यापेक्षा दोनपिढ्या लहान असणार्‍या मुलांमधे वावरत असतो. बरेचदा आजूबाजूला पास होणारे लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पहात असतात. कधीतरी रामशरणच्याकडे येणारे लोक कुतूहल म्हणून त्याची चौकशी करतात. मग कधीतरी समोरासमोर ओळख होते. हातातल्या चमकदार लायटरने समोरच्या माणसाची सिगरेट लाइट करताना राजन आपली टिपिकल ओळख करून देतो.
" हाय ... आय एम राज .... नाम तो सुना होगा " शाहरूख खानचा तो अंदाज पाहून समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर नकळत हास्याची लकेर फुलते आणि यथावकाश तो ' राजन की दुनिया ' मधे सामिल होतो.

खरंतर राजेंद्र शिंत्रे या नावात कोणाला आकर्षित करावं असं काहीही नाही. साधारणतः पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी अलिबाग जवळच्या खेड्यातून राजू शहरातल्या नातेवाईकांच्या घरी शिकण्याकरता आला होता. त्याकाळी ज्या आस्थेने घरी ठेवलेल्या मुलाचं पालनपोषण होतं तेवढ्याच आस्थेने राजूचं होत होतं.गावची परिस्थिती फारशी बरी नव्हती त्यामुळे परतीचा मार्ग तसा बंदच होता. दिवसा अर्धवेळ शाळा , ऊरलेला दिवस नानांच्या दुकानात मेहनत रात्री अभ्यास आणि शेवटी गच्चीवर किंवा काॅमन गॅलरीत झोप हेच त्याचं जग होतं. पण एका अर्थाने ही परिस्थिती त्याच्या पथ्यावर पडली. ना त्याला शाळेच्या प्रगतीविषयी कधी ओरडा पडला ना त्याची कोणी कधी एका मर्यादेबाहेर काळजी केली. दुकानात रेडीओवर अविश्रांत चालू असलेली फिल्मी गाणी , सार्वजनिक ऊत्सवात रात्री ऊशीरा रस्त्यांवर पडद्यावर लागणारे सिनेमे यांच्या संगतीने त्याच्यावर रुपेरी पडद्यावर संस्कार घडतच गेले. नुसत्या डोळ्यांनीच नाही तर तो मेंदूनेपण रूपेरीपडद्यावर दिसणारी स्वप्नं पहात होता. सतत काहीतरी शिकत होता. हायस्कूलला जाइतो त्याच्या चालण्यात ग्रेस आली बोलण्यात आदब आणि एकंदर वावरण्यात स्टाईल आली. मराठीच नाही तर हिंदी इंग्लिश सिनेमाची देखील भाषा त्याला अवगत होती त्याचा वापर तो चपखलपणे आपल्या बोलण्यात करू लागला. हळूहळू मुलंच काय बरोबरच्या मुलीही त्याच्या हजरजबाबी बोलण्यावर फिदा होवू लागल्या. पण नानांच्या दुकान असणारा राजू एकदम वेगळा होता. त्याला त्रास नसला तरी एक न्यूनगंड मात्र यामुळे आला होता. त्याच्या शाळेतली आणि त्याच्या लोकप्रियतेवर मनोमन थोडं जळणारी मुलं त्याला मुलींसमोर' राजू हरकाम्या ' असं बोलवत तेंव्हा त्याचं मन खूप दुखावलं जायी. पण परिस्थिती समोर इलाज नव्हता. असं नाही की आजूबाजूला असलेल्या सुंदर वर्गभगिनींकडे तो आकर्षित झाला नव्हता पण न्युनगंडातून तो त्यांच्याकडे पाहू शकत नव्हता.
प्रेमात पडणं हा तर चंदेरी दुनियेने जगाला दिलेला गोड शाप आहे. हायस्कूल संपता संपता राजू प्रेमात पडला होता. पण शिवले गेलेले ओठ कधी उसवून बोलूच शकले नाहीत. आपल्याकडे पहात मैत्रिणींच्या गराड्यात तिचं खिदळणं पाहिल्यावर ते आपल्याकरताच असावं असा गैरसमज त्याने पहील्या दिवसापासून करून घेतला होता. आपल्या दारिद्र्याची आणि अंगावरच्या जुनाट युनिफॉर्मची त्याला लाज वाटू लागे.

काॅलेजच्या दिवसात पण असंच काहीसं घडत राहीलं . गोरा वर्ण , घारे डोळे , हॅण्डसम चेहरा , सुंदर दंतपक्ती आणि मोहक हास्य ....मुलींना जरी तो आवडत असला तरी आश्रित राजेंद्र शिंत्रे या नावाला फ्युचर टेन्स दिसत नव्हता. प्रेमात पडायचं कार्य इथेही त्याने इमानऐतबारे सुरू ठेवले. पण त्याला आवडणारी प्रत्येक मुलगी त्याच्यापेक्षा सामान्य पण आर्थिक परिस्थिती बरी असणार्‍या मित्रांबरोबर जास्त रेंगाळत असे. त्याला मनोमन वाईट वाटे पण त्यामुलींचा राग मात्र येत नसे. रेडिओवर लागणार्‍या गांण्यांमधल्या दुःखी हिरोंच्या जागी स्वतःची कल्पना करत करत ती दर्दभरी गाणी ऐकत आपल्या मनावर उमटलेले ओरखडे तो गोंजारत बसे. नाही म्हणायला एक मुलगी काही महीने त्याच्या प्रेमात पडले होती. तो काळ राजूच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ होता. तिच्या जोडीने थेटरमधे चोरून ' कयामत से कयामत तक ' पहाताना हातात घट्ट धरलेला तीचा हात ही त्याच्या सुखाची परिसिमा होती. त्या दिवशी राजेंद्र शिंत्रेची कात टाकून ' राज ' चा जन्म झाला. तिने मारलेली राज अशी हाक अख्या काॅलेजच्या आवारात प्रसिद्ध झाली होती. पण लवकरच परिस्थितीच्या आगीत नात्यावरचा सोनेरी मुलामा ऊतरला आणि तीच दूर निघून गेली.
. त्यानंतर राजने अनेक प्रेमं केली पण जतवली मात्र नाहीत. आपण कसल्याही फाजील अपेक्षा दाखवल्या नाहीत तर फक्त मित्र म्हणून आपल्याला मुलींच्या गराड्यात रहाणं सहजसाध्य आहे हे त्याच्या हुषार मेंदूने अचूक हेरलं होतं. आणि पुढचं सर्व स्वप्नंवत होतं. काॅलेजच्या कँपसमधे राजची जादू सर्वदूर पसरली. कोणाला त्याचं चालणं आवडत असे तर कोणाला त्याची स्टाईल. कोणाला त्याच्या कविता आवडत असत तर कोणाला त्याचं गाणं , कोणाला त्याचं मॅच्युअर्ड बोलणं भावत असे तर कोणाला अत्यंत सुसंस्कृत वर्तन. जेम्स बाँड पासून ते अमिताभ बच्चन पर्यंत सर्वांच्या स्टाईल्समधून शिकत शिकत त्याने आपली एक स्वतंत्र स्टाईल तयार केली. विशेषतः मुलींशी बोलताना तर तो इतका परफेक्ट असे की अनेकजणीं विश्वासाने आपली रहस्य गुजगोष्टी त्याच्या कानात सोपवत असत.

काॅलेज संपलं. आपल्या आवडीला अनूसरून राज फिल्मी दुनियेत ऊमेदवारी करू लागला. एव्हाना काँप्युटरचं युग आलं होतं. गावाच्या प्राॅपर्टीचा हिस्सा विकून टाकून त्याने एक छोटं घर घेतलं एक काँप्युटर घेतला आणि टेक्निकल एडिटिंगचं काम तो करू लागला. सतत फिल्मी चंदेरी दुनियेत वावरून त्याला एटिकेटस् , फॅशन , व्होकॅब्लरी याचं भान आलं. पैसाही बरा मिळत होता. पण काॅलेजच्या दिवसात अंगवळणी पडलेली ' द बेस्ट फ्रेंडची ' झूल काही उतरवली गेली नाही. कधीतरी टिव्हीवर त्याचं दर्शन होत असे. सिनेमाच्या श्रेयनामावलीत नावही झळकत असे. वर्षामागून वर्ष गेली. बरोबरीचे मित्र मैत्रिणी लग्न करून लेकुरवाळे झाले तरी राज आपल्या तारूण्यातच अडकलेला होता. विशेष म्हणजे त्याचं दिसणंही याला साजेसं होतं. वयाच्या मानाने तो फारच तरूण दिसत असे. पण याचं श्रेय सकाळी लवकर उठून जाॅगींग , योगासनं. नियमित बॅलन्स डाएट , नवनवीन टेक्नॉलॉजीचा ऊपयोग करून स्वतःची घेतलेली काळजी. लेटेस्ट फॅशनचे कपडे या सगळ्याला होतं.

काळ कोणाकरता थांबत नाही. अजूनही राज आपल्या जून्या दिवसातच अडकून पडलेला आहे. हल्ली तो प्रेमात मात्र पडत नाही पण सुंदर तरूण तरूणींच्या गराड्यात मात्र असतो. सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी सहा ते नऊ आवर्जुन नाक्यावर ऊभा रहातो. तशी त्याची झोप कमी आहे. दुपारी दोन ते पाच आणि रात्री उशीरा पर्यंत तो घरातच असलेल्या स्टुडिओत आपलं काम करत असतो. भरवस्तीत त्याचं एक रो हाऊस आहे. सुंदर इंटेरियर केलेला हाॅल , लायब्ररी आहे. घरात अप्रतिम म्युझिक सिस्टीम आहे त्यावर सतत नवीन म्युझिक वाजत असतं. मोठा टिव्ही होम थिएटर आहे , बार आहे. भिंतीवर ' सेव्हन इयर्स इच , गाॅन वुईथ द विंड , सिटी लाईटस् अशा क्लासिक सिनेमांची पोस्टर्स फ्रेम करून लावलेली आहेत. लायब्ररीच्या भिंतीवर मार्सेल माॅर्सेची द लायन टेमर आणि चार्ली चॅप्लिनची द ग्रेट डिक्टेटर सिनेमातल्या फोटो फ्रेम्स आहेत . फक्त त्या घरात लग्नाचा अल्बम नाही.

वयाची पन्नाशी जवळ येवू लागली तरी राज अजूनही अविवाहित आहे. त्याच्या मित्रमैत्रींणींच्या लिस्टमध्ये वयाने पंचविशीतील मंडळींचा भरणा अधिक आहे त्यातले काही तर त्याच्या काॅलेजच्या दिवसातल्या मित्रमैत्रींणींची मुलं आहेत. पण राज त्यांचा ' बडी ' आहे. त्याच्या घरात बहुतेक विकेंडला पार्टी असते. तरूणाई त्या वास्तूत नवी जान ओतते. राजही त्यांच्या सहवासात तरूण होवून जातो. फेसबुक , ट्विटरवर राजला वय वर्षं वीस ते पन्नास वयोगटातील फॅन्सचं मोठं फाॅलोईंग आहे. अकाली म्हातारपण आलेले त्याचे समवयस्क मित्र कधी त्याला हसतात ,तर कधी त्याची चेष्टा करतात ,कधी त्याला समजुतीच्या दुनियादारीच्या अनुभवाच्या दोन गोष्टी सांगतात तर कधी त्याला टाळतात . पण एक जात सर्व त्याच्या ' फ्रीडम लाईफस्टाईल' बद्दल आसुया बाळगतात.

आताच एका सुंदर संध्याकाळी राज आपल्या तरूण मैत्रीणीशी गप्पा मारत रेस्टॉरंट मधे बसलेला होता. अचानक कानावर खळखळून हास्याचा स्वर पडला. ओळखीचा आवाज वाटला म्हणून त्याने मागच्या सिटवर वळून पाहिलं. कितीतरी वर्षे तो मागे गेला.
' अरे आज इतक्या वर्षांनीपण हिचा आवाज आपल्या कानांना ओळखीचा वाटतो नाही. तसंच हसणं तोच चेहरा तेच चमकदार डोळे .... तो पहातच राहीला. तिनेही त्याला पाहीलं असावं तिच्याही डोळ्यात ओळख दिसू लागली. क्षणभरच आजूबाजूचं जग स्तब्ध झालं. अचानक भान येवून सावरून तिने मान दुसरीकडे वळवली.

त्या रात्री राजच्या म्युझिक सिस्टीम मधून तीस वर्षांनी तलत मेहमुदचे सुर आक्रंदले. हातात व्हिस्कीचा ग्लास धरून राज कितीतरी वेळ गाॅन वुईथ द विंडचं पोस्टर पहात होता. सोसायटीच्या वाॅचमनने पहाटे ड्युटी जाॅईन करताना देखिल राजच्या घरातले लाईटस् ऑन असल्याची मनोमन नोंद केली.

साडेसहाच्या ठोक्याला ट्रॅकसूट घातलेला राज आपल्या शेड्युलनुसार जाॅगीग पार्कच्या दिशेने जात होता. पावलं शिस्तबद्ध पडत होती. पार्कच्या बाहेरच्या टपरीवर गाणं लागलेलं होतं. " ओ मेरे संगसंग लेले दुनियाके रंग .. हो जा रंगीला रे .. रंगरंग रंगीला रे ".

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users