प्रश्न जर पडला तिला, काढा निकाली

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 March, 2018 - 08:04

एक चिंता रात्रभर करते हमाली
षंढ निर्णय उपटतो नुसती दलाली

वाटते नापास मी होणार यंदा
नेमकी उत्तीर्ण होते त्याच साली

उथळ असताना तिने गोंगाट केला
गाठली खोली नदीने, शांत झाली !

रिंगणाबाहेर तू निर्धास्त वावर
आखले वर्तूळ माझ्या भोवताली

ज्या घरी चिटपाखराला वाव नव्हता
त्या घरी सर्रास चुकचुकतात पाली

उत्तरे देणे तिने अनिवार्य ठरवा
प्रश्न जर पडला तिला, काढा निकाली

राहिले नाही कुणीही भरवश्याचे
हो 'प्रिया' निर्धास्त मृत्यूच्या हवाली

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर!
मला प्रश्न पडलाय... कसं सुचत हे सगळं?