रोजगार (सत्य घटनेवर आधारीत)

Submitted by स्वार on 4 March, 2018 - 10:38

वर्षामागून वर्ष सरलं तरीही पाऊस पडण्याचं काही चिन्ह दिसेना. शिवारे ओस पडली होती. तहानलेल्या जमिनी पाण्यासाठी पेटल्या होत्या. पाखरे पाण्याच्या शोधात दूर दूर भराऱ्या मारीत होती. लोकं तीन चार मैल पिण्याच्या पाण्यासाठी भटकत होती. गावोगावी दुष्काळाचं साम्राज्य पसरलं होतं. दुष्काळाच्या तडाख्याने माणसांची मनं कोलमडली होती. जवळ असलेल्या थोड्याफार अन्न धान्यावर कसातरी आपला जीव जगवीत होती. आता त्यांच्या जवळचे अन्न धान्य ही संपुष्टात येत होते. त्यांना कुठंही काम मिळत नव्हतं. तो भयाण दुष्काळ साऱ्या सजीवांचं अस्तित्त्व चिरडून टाकण्यासाठी सज्ज झाला होता.

दिवस पावला पावलाने पुढे जात होता. लोकं मनाने खचत होती. आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. ज्येष्ठाचा महिना धूळ उडवीत निघून गेला. भविष्याचा अंधार त्यांच्यासमोर आपलं काळं रूप साकार करु लागला. आषाढात पश्चिमेच्या डोंगरावर ढग आकार घेऊ लागले. लोक पावसाची आतुरतेने वाट पाहू लागले. पश्चिमेकडून वाहणारे वारे ढगांना अंगावरती घेऊन दूर जाऊ लागले. आषाढ महिनाही ऊन्हात पडलेल्या थेंबासारखा आटून गेला. श्रावणातल्या सरींचे रंग भूमीवरी विखुरलेच नाहीत. पाऊस कुठेतरी लुप्त झाला. लोकांना काळजीनं घेरलं. त्यांची मनं हिरमुसली. कोरड्या पाषाणासारखं त्यांचं काळीज झालं होतं.

तीन महिन्यांच्या अवधी नंतर सरकारने 'रोजगार हमी योजना' सुरू केली. कामावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोज दोन रुपये,दोन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार या वार्तेने त्यांची मनं आनंदित झाली. त्यांच्या मनगटात बळ गोळा होऊ लागलं. बारा हत्तीचं बळ त्यांच्या देहात एकवटू लागलं. त्यांच्या चेहऱ्यावरची निराशेची धूळ उडाली. काळजात आशेची पालवी उमलू लागली.

दिवस उगवला. पूर्वेच्या क्षितीजावर सूर्य आज अनोखं चैतन्य घेऊन आला होता. पाखरांची किलबिल झाडांतून दरवळत होती. ओसाड शिवाराला नवं तेज आलं होतं. उदास रानांना हर्ष झाला होता. रोजगार हमीचा आज पहिला दिवस होतां जो तो कामाला जाण्याची तयारी करू लागला. अडगळीच्या खोलीत, घरांच्या कोपऱ्यात पडलेली खोरी, टिकाव, कुदळ, घमेली खूप दिवसांचा गंज झटकून तयार झाली. ती हत्यारंच त्या लोकांचं जगण्याचं साधन होती.

ढोकळ्या डोंगराच्या पायथ्याला एक सडक तयार करण्याचं काम निघालं होतं. सर्व लोक कामावरती आपली हत्यारं घेऊन जमली. एका पुढाऱ्याच्या हातून कामाचा नारळ फुटला. दहा पंधरा लोकांची एक एक टोळी तयार करून त्यांच्यातलाच एक जण मुकादम केला. आपल्या टोळीतल्या लोकांची दररोज हजेरी घेऊन ती एका आठवड्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे द्यायची हे त्याचं मुख्य काम होतं.

काम सुरू होऊन दोन दिवस झाले होते. लखुतात्या आणि त्याची बायको हौसा ही गण्याच्या टोळीत काम करीत होते. सडक बनवण्याच्या कामाला वेग आला होता. एक दिवस काम करीत असताना गण्याचे आणि लखुतात्याचे कडाक्याचे भांडण झाले. दुसऱ्या दिवशी लखुतात्या व हौसा तुकाआबा च्या टोळीत सामील झाले. असेच तीन चार दिवस गेले.

एके दिवशी दुपारची वेळ होती. लोक न्याहारीला बसले होते. ऊन्हाचा चटका सोसत जमिनी निपचीत पडून होत्या. पाषाण विस्तवासारखे तापले होते. वारा डोंगरातल्या दऱ्याखोऱ्यातून हिंडत होता. मधूनच एखादं वादळ आपल्या असंख्य हातांनी माती विस्कटून धूळ उडवीत जात होते. ऊन्हच्या झळया रानोमाळ फिरत होत्या. तुकाआबा जेवण उरकून समोरच्या आंब्याच्या झाडाच्या गार सावलीत येऊन बसला. एक गार वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगावरून गेली. त्याल बरं वाटलं. त्याने समोरच्या डोंगराकडे पाहीले. ऊन्हाचा वणवा डोंगरावरती भडकला होता. आटलेल्या झऱ्यांच्या पाण्याचे व्रण डोंगरावरती ठिकठिकाणी दिसत होते. दुरून पाणी वाहत असल्याचा भास होई. तेवढ्यात आबाच्या कानावर आवाज आला. "आबा वो आबा " गण्याच्या आवाजाने आबा भानावर आला. "ये की रं गणा बस."आबा म्हणाला.
गण्या म्हणाला,"आबा झाली का न्याहारी?"
"व्हय झाली की. तुझी रं?"
"झाली."
" काय म्हणतूस"
"आबा येक इचारासचं होतं"
"इचार की मंग"
"तुमच्या टोळीत किती माणसं हायेत?"
"चौदा, का रं?"
" आणि त्यात कामाची किती हायेत?"
"आरं सगळीच काम करत्यात की रं."
"आबा आता तुम्हाला येक सांगू का?"
"काय रं?"
" तुमच्या टोळीतली दोन माणसं लय काम चुकार हाईत"
"कोण रं?"
"लखुतात्या आन् हौसाबाई"
"काय म्हणतूस लेका,ती तर चांगलं काम करत्यात."
"दोन चार दिवस आसंच ढोंग करत्यात. आन् पुढं कामंच करत न्हाईत."
"खरं व्हयं रं?"
"आबा सुरूवातीला ती माझ्याच टोळीत काम करीत होती."
"मग?"
" दोन चार दिवस काम केलं नी पुढं कामंच करनात मग दिली हाकलून त्यांना टोळीतून."
"आता रं काय करू म्हणतूस?"
"येळंव सावध व्हा म्हंजी झालं."
असे म्हणून गण्या तिथून निघून गेला. आबा विचारात पडला.

सूर्य आपल्या सोनेरी किरणांचे पंख मिटून मावळतीच्या काठावर उभा होता. पाखरांचे थवे घरट्याकडे वाहत होते. डोंगरदऱ्यात अंधार हळू हळू उतरत होता. सांज अंधारात बुडत चालली होती. लोकांच्या कामाची सुट्टी झाल्याने डोंगर पायथा गजबजला होता. जो तो आपली हत्यारं उचलून घराच्या ओढीनं निघाला होता. घरी निघालेल्या लखुतात्याला तुकाआबाने हाक मारली. आबांचा आवाज ऐकून लखुतात्याने तुकाआबाकडे पाहून विचारले,"काय वं आबा?" "हिकडं ये तुझ्याकडं थोडं काम व्हतं." तात्या आबांसमोर येऊन थांबला. व म्हणाला," काय वं आबा?" तुकाआबाने सभोवार पाहिले. लोकं थोडी लांब गेली होती. मग तुकाआबाने मुख्य विषयाला हात घातला व म्हणाला," काही लोकं तुमच्या नावानं ओरडत व्हती. की टोळीत थोड्या दिवसानंतर तुम्ही काम करत न्हाय म्हणून." "लोकं काय काय बी बोलत्यात आबा." लखुतात्या म्हणाला. "तसं न्हाय उद्या काम रखडलं तर वरचा साहेब मला वरडलं." आबाने सांगितले. तात्याने आबांना विचारले,"मग आम्ही काय करू म्हणता?" " उद्या पासून दुसरी टोळी बघा." असे म्हणून तुकाआबा निघून गेला.

पुढचे दोन दिवस लखुतात्याने व हौसाबाईंनी घरी बसून काढले. तिसऱ्या दिवशी सडकेचं काम पूर्ण झालं ही बातमी त्यांच्या कानावर आली. काही दिवसांनी पुन्हा बेलवाडी गावच्या पूर्वेला रोजगार हमी योजनेचं नाला तयार करण्याचं काम सुरू झालं.लखुतात्या आणि हौसाबाई आता यमुनाबाईच्या टोळीत आले. यमुनाबाईच त्या टोळीच्या मुकादम होत्या. त्या दिवशी नेहमीप्रमाणे हजेरी होऊन कामाला सुरूवात झाली. मातीची गच्च भरलेली घमेली बायका डोक्यावर घेऊन ती नाल्याची एका बाजूची दहा बारा फुट उंच असलेल्या मातीच्या बांधावर येऊन रिकामी करू लागली. हौसाही नेटानं काम करत होती. मातीची ती जड घमेली डोक्यावर उचलून नेत होती. काही वेळातच सूर्य डोक्यावर आला. मातीचं जड घमेलं घेऊन हौसा चालू लागली.हळू हळू ती नाल्याच्या बांधाजवळ येऊ लागली. तिच्या डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली. तरीही ती चालतच होती. ती नाल्याचा बांध चढू लागली, तसे तिचे पाय थरथरू लागले. अंगात कंप भरला. एक पाऊल तिने पुढे टाकले आणि,ती डोकीवरच्या घमेल्या बरोबर खाली कोसळली. ते घमेलं बाजूला उडालं. त्या घमेल्याच्या आवाजाने लोकं दचकली. व आवाजाच्या दिशेने पाहू लागली. यमुनेचंही तिकडे लक्ष गेलं. हौसा पडलेली पाहून ती हौसाकडे धावली. तीला हलवून उठवू लागली. पण हौसा ऊठली नाही. मग यमुनेने ओरडून कुणाला तरी पाणी आणण्यास सांगितले. एक जण धावत जाऊन पाणी घेऊन आला. ते पाणी तिने हौसाच्या मुखावर शिंपडले. तिने डोळे किलकिले करून पाहीले. तेंव्हा तिला आपल्या भोवती लोकांची बरीच गर्दी दिसली. यमुनेचा आणि त्यांच्या शेजारी असलेल्या लखुतात्यांचा चिंताग्रस्त चेहरा दिसला. तशी ती उठून बसली. मग यमुना लखुतात्याकडे पाहून म्हणाली," तुम्ही हौसाला घेऊन घरी जा. आणि तिची काळजी घ्या." दोघे घरी आले तेंव्हा त्यांचा मुलगा राम नुकताच कामावरुन काही दिवसांच्या सुट्टीला गावी आला होता. दोघेही घरात आले. त्यांची अवस्था पाहून रामने त्याबद्दल त्यांना विचारले. तेंव्हा तात्यांनी त्याला सगळी हकीगत सांगितली. हे ऐकून राम निर्धाराने त्यांना म्हणाला," आज पासून तुम्ही रोजगार हमीच्या कामावर जायचं नाही. माझी सुट्टी संपली की आपण तिघेही पुण्याला जाणार आहोत."

Group content visibility: 
Use group defaults

चांगले लिहिले आहे,पण शेवट एकदम तडकाफडकीने झाला असे वाटले. जरा विस्तारित करता आले असते, तर अजून बरे वाटले असते.
लिहीत रहा. पुढील लेखनाला शुभेच्छा.