कधीतरी तू ठेव स्वतःला माझ्या जागी

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 March, 2018 - 13:58

पूर्ण रात्रभर एक चांदणी होती जागी
आसपास रेंगाळत होता चन्द्र विरागी !

अर्ध्यावरती बोट सोडले प्रत्येकाने
आश्रयास माझ्या आला एकांत अभागी

उठता-बसता इथे-तिथे काष्ठी-पाषाणी
एक चेहरा खुणवत असतो जागोजागी

अतातरी तू वाग स्वतःच्या मनासारखे
मनासारखे जर त्याच्या अवघे जग वागी

अखंड होतो तेव्हा जो तो निरखत होता
तुकडे झाल्यावर जो तो टाळाया लागी

झिजून गेल्या कातळास हे विचारले मी
काय मिळवले शेवटास तू बनून त्यागी ?

तुझे देवपण तुझी थोरवी मान्य मला, पण...
कधीतरी तू ठेव स्वतःला माझ्या जागी

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!