दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवा

Submitted by Pradipbhau on 27 February, 2018 - 01:10

दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवा
प्रदीप गजानन जोशी (जेष्ठ पत्रकार विटा)
आज कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. मराठी भाषा दिन म्हणून त्याचे आणखी वेगळे महत्व. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या म्हणून शासन दरबारी कागदोपत्री मागणी करणाऱ्यांचा दिवस. मराठी भाषा वाचवा म्हणून टाहो फोडणाऱ्याचा दिवस. प्रश्न असा आहे की मातृभाषा टिकावी म्हणून आपण एक घटक या नात्याने मनापासून प्रयत्न करतोय का?
देशात प्रमुख 22 भाषा आहेत. मराठी ही त्यापैकीच एक. महाराष्ट्र व गोव्याची ती अधिकृत राजभाषा. सुमारे नऊ कोटी लोक ही भाषा बोलतात तरीही मराठी टिकेल की नाही याची चिंता आम्हास पडते. पिकते तेथे विकत नाही असे म्हणतात. त्यामुळेच महाराष्ट्रात राहून देखील आम्हाला मराठीचे महत्व अद्याप कळलेले नाही. जागतिक भाषेच्या रेट्यासमोर मराठी भाषा वंचित होत चालली आहे. मराठी समृद्ध करून तिचे अस्तित्व अबाधित राखण्याचे आव्हान आज आपल्यासमोर आहे.
शासन पातळीवर काय प्रयत्न व्हायचे आहेत ते होऊ देत. एक सामान्य माणूस म्हणून आपण मराठी भाषेच्या समृद्धी व संवर्धनासाठी काय करू शकतो याचा विचार होण्याची गरज आहे. मराठी भाषा टिकविण्याचे काम बाहेरील कोणी व्यक्ती करू शकणार नाही. ते आपणच करण्याची गरज आहे.
त्यासाठी काही किमान गोष्टी आपण प्रत्येकाने कराव्यात. मोबाईल आज अत्यावश्यक बाब आहे. त्यावरून बोलताना हॅलो, गुड मौर्निंग, गुड नाईट अशा शब्दांचा वापर कटाक्षाने टाळावा. त्याऐवजी नमस्कार, शुभदिन, शुभसकाळ, शुभदुपार, शुभरात्र अशा शब्दांचा वापर करावा. भ्रमणध्वनी वरून लघूसंदेश पाठवताना मराठीचा वापर करावा. किमान एक तरी इमेल मराठीतून दिवसभरात पाठवावा. मराठी दिनदर्शिका वापरावी. इंग्रजी महिन्यापेक्षा मराठी महिन्यांचा वापर दैनंदिन जीवनात करावा.
हिंदी इंग्रजी प्रमाणे महिन्यातून एक तरी मराठी चित्रपट पहावा. त्यामुळे मराठी भाषेला चालना मिळेल. नाटकाच्या बाबतीत देखील तेच आहे. दूरदर्शनवर मालिका पाहताना मराठी मालिकांना प्राधान्य द्यावे. लेखनात जास्तीत जास्त मराठीचा वापर करावा. जाहिराती, फलक मराठीतच असावेत.
हल्ली वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते. अन्य भाषेप्रमाणे मराठीचे वाचन वाढवावे. कोणत्याही कंपनीतून फोन आल्यावर संबंधितांशी इंग्रजी किंवा हिंदीतून न बोलता त्यांना मराठीतून बोलण्याचा आग्रह धरावा. कोणत्याही शुभप्रसंगी मराठी भाषेसाठी योगदान होईल अशीच भेटवस्तू द्यावी.
आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत न घालता मराठी माध्यमातून शिक्षण देण्याची गरज आहे. त्यशिवाय त्यांच्या मनात मराठी भाषेबाबत आत्मीयता कशी निर्माण होणार. बोलताना अधून मधून इंग्रजी शब्द वापरणे टाळा.
आपण सही करताना मराठीतूनच करावी. महिन्याला किमान पंधरा नवीन मराठी शब्द आपल्या संग्रही जमा करावेत. या छोट्या छोट्या गोष्टी आपणास करता येण्यासारख्या आहेत. आपणच जर आपल्या वागण्यात बदल केला तर मराठीच्या अस्तित्वासाठी आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. आज मराठी दिनाच्या निमित्ताने सामान्य व्यक्ती म्हणून आपण एवढे जरी केले तरी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ते महान कार्य ठरणार आहे. चला तर मग. पुढच्या मराठी दिनाला बघा तुम्हाला कसा बदल दिसतो. जे काय करावयाचे आहे ते मी सोडून बाकीच्यांनी करावे ही वृत्ती आता झटकण्याची वेळ आली आहे.
प्रदीप जोशी विटा
मोबाईल.. 9881157709

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सहमत.
आपण माबोकर तसे करत आहोतच !

हॅलो, गुड मौर्निंग, गुड नाईट अशा शब्दांचा वापर कटाक्षाने टाळावा. त्याऐवजी नमस्कार, शुभदिन, शुभसकाळ, शुभदुपार, शुभरात्र अशा शब्दांचा वापर करावा.
-- हे असले शब्द कोणत्या मराठीत असतात? आमच्या मराठी लोकांत नमस्कार, रामराम, जयभिम, जयमातादि, जयमल्हार, जयमहाराष्ट्र, जयभोले, असे देवांची नावे घेऊन संभाषण सुरु करण्याचे संस्कार आहेत. हे दिन सकाळ, दुपार रात्र शुभ असण्याची पाश्चिमात्यांची पद्धत आहे कारण तिकडे वातावरण तासातासाला बदलत असतं. कशाचं काही खरं नसतं म्हणून ते इतरांना शुभेच्छा देतात की तुमचा दिवस चांगला जावो, सकाळ, दुपार चांगली जावो.

मराठी मराठी चा जयघोष करणारे पुरते आतून इंग्रजाळलेले असतात, वरुन फक्त मराठी गिलावा करुन देशी असल्याचं सोंग मिरवतात... उद्या रेन रेन गो अवे ह्या गाण्याचेही मराठी भाषांतर करुन गायला लावतील.

मुंबईपुण्यातल्या इंग्रजाळलेल्या हुच्चभ्रू लोकांनाच मराठी वाचवायची खुमखुमी असते. मुंबई पुण्याच्या बाहेर प्रचंड मोठा महाराष्ट्र आहे. तो महाराष्ट्र मराठीतच बोलतो.

गुड मौर्निंग, गुड नाईट ह्यांचं भाषांतर करुन शुभसकाळ, शुभरात्र म्हणायची काय गरज आहे?
असं मराठीत खरंच बोलतात का?

,मला एक धन्य मेसेज आलाय आज इथे पोस्ट करते

स्वतःची *सही*सुद्धा मराठीत नसणाऱ्या, पण मराठीची उगीच तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस थोर थोर शुभेच्छा..
A B C D सहज म्हणू शकणाऱ्या, पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना कोपरापासून शुभेच्छा..
मॉलमध्ये गेल्यावर 'ये कितने का है ?' किंवा 'हाऊ मच इट कॉस्टस ?' असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा ...
आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा..
व्हाट्सऍप वर लिहिताना केवळ 'कंटाळा येतो म्हणून' विचित्र मिंग्लिश भाषा वापरणाऱ्या नेटकऱ्यांना धन्य धन्य शुभेच्छा..
फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणा-या किंवा टीसी ('काळजी घे' चे सूक्ष्म रूप), जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा...
टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर झुरळ पालींचा वर्षाव होईल असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय?..त्यांनाही आज शुभेच्छा..
सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यात, बँकेत किंवा ईतर स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना, 'मराठीचा किमान एका संधीसाठीही' वापर न करणा-या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा...
वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक - चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकाशी संबंध नसणाऱ्या, तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या, पण इंग्रजी स्पेलिंग तोंडपाठ करणाऱ्या बाळबोध जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा..
फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा...
मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा...
जीवावर येऊन मराठीत वाचत, बोलत, लिहित नसाल, तरच हा संदेश पुढे पाठवा अन्यथा वाचून सोडून दया, पण *केवळ औपचारिकता म्हणून किंवा लेखन आवडले म्हणून किंवा आपणही मराठीवर प्रेम करतो हे दाखवून देण्यासाठी, हा शुभेच्छा संदेश पुढे पाठवू नका..* तो अधिकार आपल्याला आहे का याचे आत्मचिंतन करून मगच पुढे पाठवा.
*आपण मराठीभाषेचा सिंहनाद करणार आहोत की पिपाणी वाजवणार आहोत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मराठी भाषिक आणि मराठी प्रेमी या नात्याने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मी केवळ शुभेच्छा देतोय..*
*मराठी भाषा ही केवळ वाचण्या बोलण्यापुरती नसून ती जगण्याची आसक्ती आहे ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणावा लागेल..*
मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !!

भ्रमणध्वनी वरून लघूसंदेश पाठवताना मराठीचा वापर करावा. - नको, त्यात हगलो(हसत गडबडा लोळतो) वगैरे लघुरूपे होतील, त्या पेक्षा LoL बरे.
किमान एक तरी इमेल मराठीतून दिवसभरात पाठवावा. याने मराठी कशी वाढेल, हे कळले नाही,
पण ठीक आहे करण्यासारखे आहे

मराठी दिनदर्शिका वापरावी. इंग्रजी महिन्यापेक्षा मराठी महिन्यांचा वापर दैनंदिन जीवनात करावा.
मराठी महिने आले म्हणजे तारखेच्या ऐवजी तिथी वापरणे आले,ते व्यवहार्य नाही

हिंदी इंग्रजी प्रमाणे महिन्यातून एक तरी मराठी चित्रपट पहावा. त्यामुळे मराठी भाषेला चालना मिळेल. नाटकाच्या बाबतीत देखील तेच आहे. चांगली सूचना, दूरदर्शनवर मालिका पाहताना मराठी मालिकांना प्राधान्य द्यावे. कोणतीच मालिका पाहू नये,
हिंदी सुद्धा, वेळ वाचववा

लेखनात जास्तीत जास्त मराठीचा वापर करावा.मान्य, हे करतोच
जाहिराती, फलक मराठीतच असावेत. जाहिराती,
फलक मराठी वाढावी म्हणून लावत नाही, धंदा वाढवा म्हणून लावतो, गिऱ्हाईकला जी भाषा कळेल, त्या भाषेत फलक लावावे लागतील

कोणत्याही शुभप्रसंगी मराठी भाषेसाठी योगदान होईल अशीच भेटवस्तू द्यावी. उदाहरणार्थ??
आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत न घालता मराठी माध्यमातून शिक्षण देण्याची गरज आहे. त्यशिवाय त्यांच्या मनात मराठी भाषेबाबत आत्मीयता कशी निर्माण होणार. पूर्ण वेगळ्या बाफा चा विषय आहे हा,

>>जे काय करावयाचे आहे ते मी सोडून बाकीच्यांनी करावे ही वृत्ती आता झटकण्याची वेळ आली आहे.<<

जाउद्या हो, सभागृहात राज्यपालांच्या भाषणाचं भाषांतर मराठी ऐवजी गुजरातीत दिलं जात, पश्चिम रेल्वे स्थानकांची नांवं मराठी ऐवजी गुजराती मध्ये लिहिली जातात. इथे कुंपणंच शेत खातंय तर तुम्ही हे काय घेऊन बसलात? मांजरेकरांची इच्छा लवकरच पुर्ण होईल असं वाटतंय...

मुंबईत तर मराठी माणसे बोलण्याची सुरवातच हिंदी भाषेतुन करतांना हमखास आढळतात.अनेकांना टोकल्याशिवाय मी रहात नाही. सरळ सरळ विचारतो, " तुम्ही मराठी बोलु शकता ना ? मग हिंदीत कां बोलता?" त्यावर ' नाही, समोरच्याला मराठी नाही समजले तर ? " असा प्रतिप्रश्न मलाच विचारतात. अशा महाभागांना मी पुन्हा सांगतो , " अरे नाही समजले तर तसे त्याला सांगू देना ! ! त्याचा मख्ख चेहरा अगोदर बघून घ्यावा, मग म्हणावे, मराठी समजत नाही कां? मगच त्याला हिंदीत सांगावे. आपणच हिंदीत संभाषण सुरु केले तर मराठीत कोणी बोलायचे ? "

"हिंदी इंग्रजी प्रमाणे महिन्यातून एक तरी मराठी चित्रपट पहावा" - नाटक / सिनेमा हा मनोरंजनाचा आर्थिक व्यवहार आहे. नाटक / सिनेमा गर्दी खेचू शकणारा असेल तर तो खेचेल. उगाचच मराठी आहे म्हणून पदरमोड खर्च करून जाणं आणी त्याचा संबंध भाषा टिकण्याशी / संवर्धन होण्याशी लावण्यात काही अर्थ नाही.

आमच्या घरी आम्ही मराठीतच बोलतो.
गाव कोकणात आहे, तिथेही मराठीतच बोलतो.
मुंबईत मात्र राष्ट्रभाषेला पर्याय नाही.

लेख धन्य आहे ! typical whatsapp फॉरवर्ड वाटतोय.

मराठी मालिकांना प्राधान्य द्यावे. >>
त्यांना म्हणावं आधी नीट मराठीत बोला , हिंदीच भाषांतर नको. हल्ली असलच काही ऐकायला मिळतं
तुझी काय मदत करू , अमुक गोष्ट माझ्या हृदयाच्या जवळ आहे , या गोष्टीचा विरोध झाला पाहिजे वगैरे.
तिडीक जाते असले मराठी ऐकताना, नीट विभक्ती का वापरत नाहीत ?

अहो पण बोलण्यात लिहिण्यात असे इंग्रजी उर्दू शब्द आले की आपण कसे आधुनिक झाल्यासारखे वाटते!
खुद्द मायबोलीवर मराठीत लिहायची बोंब - गझला, त्यांची हिंदी शीर्षके हे सगळे मायबोलीसाठी उघडलेल्या ठिकाणीच लिहीले पाहिजे का? दुसरीकडे लिहा ना कुठेतरी. पुण्या मुंबईत जाऊन तिथे लिहा, बोला. तिथे काही मराठी वगैरे बोलले तर मागासलेला, अशिक्षित, खेडवळ समजतात.
नि १० वर्षाखालील मुलांना तर मराठी समजतच नाही.

आमच्या घरात सगळे मराठीतच बोलतात.फक्त आजी आजोबा मालवणी भाषेत बोलतात गाव कोकणात असल्याने. दोन वर्षापूर्वी दहावीच्या सुट्टीत मी आणि माझ्या मैत्रीणींनी मिळून सोसायटीतल्या ज्या convent मधल्या मुलांना मराठी समजत नाही आणि नीट लिहीता येत नाही अशा मुलांचे वर्ग घेतले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला आणि त्या मुलांचे मराठीतले बरेच गुण वाढले.

वा, वा! नि इथे आम्ही तीस वर्षांपूर्वी इथे जन्मलेल्या नि इथे वाढलेल्या मुलांना मराठी शिकवायचे वर्ग काढले तर आम्हाला वाटले व्वा, काय पण आपण धन्य!
जसे गणित शिकवायला, सायन्स शिकवायला इथे परदेशातून लोक आणतात तसे आता अमेरिकेतून, कॅनडा मधून मराठी शिकवणार्‍या लोकांना बोलावून घ्या - कित्येक जण तर आजकाल बरेच दिवस भारतात रहातात. काही काही आमच्यासारखे तर एव्हढे बावळट आहेत की म्हंटले तर फुकटातहि शिकवतील.

अहो आम्ही पण फुकटातच वर्ग घेतले होते.सुट्टीचा वापर आणि शिकवण्याची हौस पूर्ण केली.
विज्ञान आणि गणिताच म्हणाल तर शाळेच्या उपक्रमा अंतर्गत आमच्या शाळेने ज्या दहा शाळा दत्तक घेतल्या होत्या तिथेही आम्ही शिकवले आहे.एकंदरीत आपण शाळेत असूनही आपल्यापेक्षा लहान मुलांना शिकवण हा खूप भारी अनुभव असतो जो आम्हाला दोन वर्षापूर्वी शाळेमुळे मिळाला.प्रत्येक गोष्टीची पैशात किंमत करण्यापेक्षा मनाला किती समाधान मिळेल यात केली तर ते स्वीकारायला सोप जात; अस माझी आजी म्हणते आणि ते मला पटण्यासाठी मी हा एक अनुभव घ्यायचा ठरवला.ते मला पटलसुद्धा.