एक कलाकार

Submitted by Vrushali Dehadray on 26 February, 2018 - 01:26

एक कलाकार

जवळजवळ चौदा तासांची शिफ्ट करून तो फ्लॅटवर पोचला तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. थकलेल्या शरीराने आणि सुन्न मनाने तो सोफ्यावर बसून राहिला. त्याचा रूम पार्टनर केव्हाच दिवा मालवून झोपला होता. इतके थकल्यावरही त्याला अंथरुणावर आडवे व्हावेसे वाटेना. तो स्वयंपाकघरात गेला खायला काही आहे का ते बघायला. आदल्या दिवशीचा ब्रेड आणि दूध तेवढेच फक्त दिसत होते. तेच त्याने पोटात ढकलले आणि परत सोफ्यावर येऊन बसला. ‘कसले वैफल्य आहे हे आणि का?’ तो स्वत:वरच चिडला. ‘आता का रागावतोय आपण आणि कोणावर? सोशल मेडियावरच्या प्रतिक्रियेला एवढे महत्व का देतोय आपण?’

तो एका नामांकित वाहिनीवरच्या एका मालिकेचा नायक. ही भूमिका मिळायच्या आधी गेले कित्येक वर्षे तो अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये तो छोट्या मोठ्या भूमिका करत होता कधीना कधी प्रमुख भूमिका मिळेल या आशेपायी. प्रत्येक वेळी नवीन मालिका चालू होते आहे कळले की ऑडिशन द्यायची, आपले फोटो घेऊन निर्मात्यांचे उंबरठे झिजवायचे. कॅमेरामन, सहाय्यक दिग्दर्शक अगदी मेकपदादाच्या दाढीला सुद्धा हात लावायचा आणि शेवटी काहीच हाती न लागल्याने निराश व्हायचे. मालिकेतल्या पंचवीस तीस एपिसोडच्या एखाद्या छोट्या कथाभागावर समाधान मानायचे. या सगळ्या नैराश्यजनक प्रवासात वय तर वाढत चालले होते. ज्या देखण्या चेहऱ्याच्या भांडवलावर तो या मोहमयी दुनियेत आला होता तो चेहरा पण वयाच्या खुणा तुरळकपणे दाखवायला लागला होत्या. तुरळक पांढरे केस, पोटाचा जाणवायला लागलेला आकार आणि वाढत चाललेले नैराश्य.

अभिनयाची आवड त्याला लहानपणापासूनच होती. शाळा कॉलेजचे स्नेहसम्मेलन त्याच्या कार्यक्रमांशिवाय कधी पार पडले नाही. त्याच्या या गुणाला घरातून नेहमी प्रोत्साहनच मिळाले. कारण त्याचे वडीलही एक हौशी नाटय अभिनेते होते. त्यांच्यासारख्या काही हौशी कलाकारांनी एकत्र येऊन नाशिकमध्ये एक नाटयसंस्था स्थापन केली होती. आपापला नोकरीधंदा सांभाळून ते नाट्यकलेची माफक सेवा करत होते. अभिनयाबरोबर आणखीही काही त्याच्याकडे होते ते म्हणजे गाता गळा. लहानपणी त्याच्यातला हा गुण लक्षात आल्यावर वडिलांनी त्याला गाण्याचे पद्धतशीर शिक्षण द्यायला सुरुवात केली. तो मात्र फारसा त्यात रमला नाही. वडलांच्या आग्रहाखातर बरीच वर्षे गाणे शिकत राहिला तरी नादसूरमयी दुनियेपेक्षा तो रंगवलेल्या चेहर्यांच्या दुनियेत जास्त रमायचा. आणि शेवटी तो क्षण आला, आयुष्यात पुढे काय करायचे याचा निर्णय घेण्याचा. वडील अजूनही म्हणत होते की त्याने गाण्यात पुढे जावे. त्याच्या गुरुंनाही वाटत होते की त्याने योग्य मेहनत घेतल्यास तिथे त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. पण त्याने मात्र सुरांची संगत सोडून चेहऱ्यावरच्या रंगांची कास धरली. नादलयीच्या दुनियेतून तो कॅमेरा, लाईट्स, अॅक्शनच्या दुनियेत आला.
मायानगरीत प्रवेश करताना त्याने मोठी स्वप्ने उराशी बाळगली होती. चित्रपट, नाटक, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मानाचे पुरस्कार आणि बरेच काही. आणि चित्रपटाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी एक भूमिका, जसे दो बिघा जमीन म्हटले की बलराज सहानी, सामना म्हटला की श्रीराम लागू निळू फुले, उंबरठामधील स्मिता आणि ...... पण आज सहा सात वर्षांनंतरही तो या स्वप्नांच्या जवळपासही नव्हता. नाही म्हणायला कमी मालिकांमधे महत्वाच्या भूमिकेतून महत्वाच्या भूमिका आणि मग एका मालिकेत लीड रोल इथपर्यंत प्रगती मात्र झाली होती. खरे तर हनुमानाच्या शेपटीगत लांबणाऱ्या तर्कशून्य मालिकांमध्ये काम करणे हे त्याचे ध्येय कधीच नव्हते. मात्र मुंबईत आल्यावर पोटापाण्यासाठी काहीना काही करणे आवश्यकच होते. घरून पैसे मागवणे त्याला कमीपाणाचे वाटत होते. म्हणून चांगले काम मिळेपर्यंत मालिकांमध्ये छोटे मोठे काम करायचे त्याने ठरवले. तशी कामे त्याला मिळतही गेली. पण त्यातून त्याची छोट्या पडद्यावरचा कलाकार ही ओळख बनत गेली. त्याला भीती वाटत होती की एकदा का आपल्यावर छोट्या पडद्यावरचा कलाकार हा शिक्का बसला की चित्रपटात नायकाचे काम मिळणार नाही. पण मिळेल ते काम करण्यावाचून गत्यंतर नव्हते. मोठ्या पडद्याचे दार त्याला उघडलेच नाही. इकडे छोटीमोठी कामे करताकरता त्याला एकदम जॅकपॉट लागला. एका नामवंत वाहिनीवरच्या नवीन मालिकेमध्ये त्याला नायकाची भूमिका मिळाले. ती भूमिका स्वीकारताना मन कुठेतरी टोचणी देत होते. जर मालिका चालली तर दोन वर्षे तरी अजिबात डोके वर काढायला मिळणार नाही. दुसरे काही करण्याचा विचारही मनात आणता येणार नाही. पण अनिश्चित भविष्यावर नजर ठेऊन हातात आलेली सुवर्ण संधी घालवणे म्हणजे मृगजळाच्या मागे लागण्यासारखे होते. शेवटी हेच आपल्या नशिबात आहे असे मानून त्याने ती भूमिका जीव ओतून करायची ठरवली. एपिसोड मागून एपिसोड करता करता अडीचशेचा टप्पा कधी गाठला गेला ते कळलेच नाही.

आता त्याला पण या कामाची झिंग चढायला लागली. रस्त्याने जाताना लोक ओळखून बोलायला यायला लागले. एखाद्या हॉटेलात थांबल्यावर कोणीतरी त्याच्याबरोबर सेल्फी घ्यायची विनंती करायला लागले. मधून मधून काम आवडले सांगणाऱ्या मेल्स यायला लागल्या. हे सगळे त्याला आवडायला लागला होते. आपण इथे कशासाठी आलो होतो हे तो विसरायला लागला. एखाद्या अभिनय प्रशिक्षण शिबिरात जाऊन तो हक्काने अभिनय कसा करावा यावर व्याख्यान ठोकून येऊ लागला.

बघता बघता मालिकेचे पाचशे भाग झाले. सुरुवातीला सशक्त वाटणारे कथानक आता भरकटू लागले होते. टीआरपीच्या नादात अशक्य, अतर्क्य गोष्टी दाखवण्याचा आग्रह वाहिनीवाले धरू लागले. वाहिनी आणि दिग्दर्शकाच्या वादात, दिग्दर्शक मलिकेतून बाहेर पडला आणि सगळेच बदलायला लागले. आपली मालिकेतून गच्छंती होईल या भीतीने एखादी गोष्ट कितीही चुकीची वाटली तरी त्याबद्दल बोलायला कोणी धजेना. पहिला दिग्दर्शक गेल्याने संकलन, कंटीन्युटी या सगळ्याच बाबी घरंगळायला लागल्या होत्या. खर्च कमी करण्याच्या नादात अत्यावश्यक बाबींनाही कात्री लागू लागली. कथानकात तर कशाचा ताळमेळ कशाला नव्हता. वाहिनीच्या चालकांनी प्रेक्षकांची नस अचूक पकडली होती. नवरा बायकोमधल्या फुलत जाणाऱ्या एका नाजूक नात्यातले भावसंबंध दाखवणाऱ्या, एका कणखर नायकाचे दर्शन घडवणाऱ्या मालिकेचे रुपांतर भक्तीचा बाजार मांडणाऱ्या, देवाच्या नावावर अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या मालिकेत कधी झाले ते कळलेच नाहे.

प्रगाढ निद्रेतून जाग यावी असा आज तो खडबडून जागा झाला होता त्यांच्या मालिकेच्या फेसबुक पेजवर आलेल्या एका प्रतिक्रियेमुळे. खरे तर या प्रतिक्रियांना फारसे महत्व द्यायचे नसते हे तो आजवरच्या अनुभवांमुळे शिकला होता. कौतुकामुळे हुरळून जायचे नाही आणि टीकेमुळे दु:खी व्हायचे नाही. पण तरीही आज तो हलला होता. त्यात म्हटले होते की आता बास करा हा मूर्खपणा. तुम्हाला आम्ही इतके बुद्दू वाटलो का? आता तर आम्हीच काय तुमचे कलाकारही काम करायला कंटाळलेत. तुमच्या हिरोला आलेला कंटाळा तर त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात असतो. खरे तर त्याला ही बाब खूप दिवसांपासून जाणवत होती. पण स्वत:शी मान्य करायला सुद्धा त्याची तयारी नव्हती. मात्र त्याला आलेला कंटाळा पडद्याच्या पलीकडे जाउन प्रेक्षकांपर्यंत पोचत असेल असे त्यालाही वाटले नव्हते. या प्रतिक्रियेने त्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले होते. नेहमीप्रमाणे वाहिनीवाल्यांनी ही विरोधी प्रतिक्रिया पेजवरून लगेच काढून टाकली होती. पण त्याच्या मनातून ती कशी जाणार होती. खूप दिवसांनी तो अंतर्मुख होउन विचार करू लागला.
‘कशासाठी आलो होतो आपण इथे आणि काय करतो आहोत? एक कणा हरवलेली सत्वहीन भूमिका, जिला स्वत:चा असा काही आत्माच नाही. आता सुरुवातीसारखी काम करताना मजा येत नाहीये. कारण आपण काम करत असलेल्या पात्राचे व्यक्तिमत्वच हरवलय.’ प्रत्येक भूमिकेचा एक रंग असतो. मालिकेत तर तो जास्तच भडक असतो. मात्र या नवीन आलेल्या भक्तीभावाच्या लाटेने त्याची भूमिकाच रंगहीन करून टाकली होती. ‘सध्या प्रत्येक शूटच्या वेळी आपण तो रंग शोधायला धडपडतोय हे आपल्याला समजतेय. आणि चाहत्यांचे काय? आपण जेव्हा जीव ओतून एखादा प्रसंग करतो तेव्हा अपेक्षा असते ती आपला अभिनय वाखाणला जाण्याचे. मात्र घडतय काय? आपल्या दिसण्याचे आणि क्युट स्माईलचेच कौतुक होते.’

जे प्रेक्षक रिकामा वेळ घालवण्याचे साधन म्हणून टीव्हीवरच्या मालिका बघायला लागतात आणि नंतर त्यांना ती मालिका बघण्याचे व्यसन लागते. करणारे आणि बघणारे, दोघांना त्या मालिकेतला निरर्थकपणा कळत असतो पण दोघांनाही ती सोडवत नाही, आपापल्या अपरिहार्यतेतून. त्यामुळे जाणकार प्रेक्षक आणि परीक्षक यांच्यापासून आपण कोसो दूर रहातोय हे त्याला कळत होते पण ग्लॅमर आणि तथाकथित यशाच्या धुंदीने त्याच्या अंतर्मनाच्या टोचणीवर मखामली आच्छादन घातले होते. या प्रतिक्रियेने सगळे वास्तव खाडकन त्याच्या डोळ्यासमोर आले.
त्यातून टीआरपी नावाचे भूत सारखे मानगुटीवर बसलेलेच असते. तो जरा खाली आला की वाहिनीवाले मालिका बंद करतील या भीतीतून कोणतेही काम करावे लागते. अगदी बाष्कळ विनोद करणारऱ्या रिअॅलिटी शोमधे खोखो हसण्याचे नाटक करण्यापासून ते रविवारी हॅपी स्ट्रीटवर नाचायला जाण्यापर्यंत काहीही. या आणि अशा सगळ्या गोष्टी त्याला खूप दिवस एका सबकॉंशस पातळीवर जाणवत होत्या. पण इतक्या उघड्या नागड्या स्वरूपात आजच त्याच्यासमोर आल्या. अचानक त्याला त्याच्या कॉलेजच्या दिवसातील त्याचे पहिले नाटक दिग्दर्शित करणाऱ्या दिग्दर्शकाचे शब्द आठवले, ‘कला सादर करा, त्याचा बाजार मांडू नका. मग ती आपोआपच समोरच्याला भावेल.’ ते त्याचे अभिनयाच्या क्षेत्रातले पहिले गुरु. ते कोणी फार मोठे नाणावलेले दिग्दर्शक नव्हते पण जाता जाता सहजपणे आयुष्याला दिशा देण्याची ताकद असणारे विचार मांडून जात.

‘आपण आता काय करतोय? कला सादर करतोय का तिचा बाजार मांडून बसलोय? या दुष्ट चक्रातून बाहेर पडायलाच हवे.’ त्याचा वाहिनिबरोबरचा पहिला करार संपत आला होता. मागच्याच आठवड्यात तो वाढवण्याचे सूतोवाच निर्मात्याने केले होते. मालिकेचा टिआरपी चांगला होता. त्यामुळे तिचे एक हजार भाग तरी करायचे निर्मात्याच्या मनात होते. ‘अशावेळी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागावे का? नाशिकला सहजसाध्य असणाऱ्या काही गोष्टी सोडून आपण मनस्वीपणे या मायानगरीत उडी घेतली. तेव्हा कुठे पाय डगमगले? मग आता का एवढा विचार करायचा?
‘उद्याच निर्मात्याला कळवायचे की मला पुढचा करार करण्यात इंटरेस्ट नाही. फक्त मालिकेचा काहीतरी अर्थपूर्ण शेवट होईल एवढेच भाग मी आता करेन.’ हा निर्णय घेतल्यावर त्याला एकदम शांत वाटले. ‘पण मग उदरनिर्वाहाचे काय?’ खरे तर काही दिवसांपूर्वी एका नामवंत दिग्दर्शकाने त्याला एका भूमिकेसाठी विचारले होते. पण भूमिका खूप लहान आहे या कारणास्तव त्याने ती नाकारली होती. ‘त्याला उद्या फोन करूया.’ पुण्याला एका प्रायोगिक नाटकवाल्याने त्याला फोन केला होता. त्याने फारसा रस दाखवला नव्हता. विचार करायला लागल्यावर त्याला असे राहिलेले अनेक फोन, नावे आठवायला लागली. एकीकडे दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे शांतही वाटत होते तर दुसरीकडे वेगवेगळे पर्याय अजमावून बघण्याची उत्सुकताही दाटून आली होती. मागचे दोर कापून टाकल्याशिवाय नवीन मार्ग शोधण्याचा उत्साह येत नाही हेच खरे. अनिश्चित भविष्याच्या वाटेवर तो शांत मनाने उभा होता, सज्ज होता नवीन वाटा शोधायला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा आहे.
एकदम वास्तवदर्शी चित्रण या लाईफ चे, कोणालाही चूक बरोबर न ठरवता.

छान लिहिलंय.
मलातर होसुमीयाघ मधला शेवटी शेवटी कंटाळलेला श्री च आठवला Happy

आवडली कथा.
सद्ध्या (सासुसासरे घरी असल्यामुळे) मराठी मालिका घरात चालू असतात त्यात जे काही चाललेलं असतं ते बघून ह्या कलाकारांना असलं रटाळ काम करायचा कंटाळा कसा येत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. ह्या मालिका म्हणजे जणू सरकारी नोकरी झाली आहे. रोज हजेरी लावायची, ठरवून दिलेलं काम जमेल तितपत करायचं आणि दोन चार वर्षांच्या पगाराची सोय करायची. कलाकार म्हणवणारे अनेक लोक ही नोकरी आता करतात. त्यांना 'फायनल प्रॉडक्ट' शी काहीही घेणं देणं नसतं असं वाटत नाही पण सगळ्यांनाच शेवटी 'पगार' महत्वाचा.. मग ते कसे अपवाद असतील! प्रत्येक मालिकेत स्वतःच्याच मुलाचा / मुलीचा / भावा- बहिणीचा संसार बुडवायचे प्रयत्न करणार्‍या एक किंवा दोन पाताळयंत्री बायका असल्याच पाहिजेत असा नियमच आहे जणू. प्रेक्षकांना एवढे मुर्ख का समजतात वाहिन्या देव जाणे.

मागचे दोर कापून टाकल्याशिवाय नवीन मार्ग शोधण्याचा उत्साह येत नाही हेच खरे. >>>> +786 अगदी खरे.

आवडली कथा ..

चौकट राजा.. पगार नोकरी.. +786

प्रॉब्लेम मालिकेत पाणी टाकून वाढवायला सुरुवात होते तेव्हा होतो. यात ज्याच्यात टॅलेंट आणि धमक असते त्याला कुठे थांबायचे आणि कुठे वळायचे हे कळतेच. कित्येक मालिकावीर तिथून पुढे जात चित्रपटात चमकले आहेतच..

काहीही हं श्री मधील श्री, आणि बायकोचा नवरा गुरुनाथ, हे मला कथा वाचताना आठवले नाहीत. कारण यांच्यात मुळातच मर्यादित टॅलेंट आहे. त्यांना हेच दुकान चांगले आहे. फक्त एक मालिका संपली कि दुसरी कधी सुरू होतेय आणि ती मिळायच्या आधी ही जपावी हेच त्यांच्या सोयीचे असते.

एखादा टॅलेंट आणि पोटेंशिअल असलेला जर मालिकेच्या दुष्टचक्रात अडकून सडला तर मात्र वाईट वाटेल. उदाहरणार्थ अमेय वाघ उद्या कुठल्या डेलीसोपमध्ये अडकून बसला तर अरेरे वाटेल..

असो.. धागा मालिकांच्या चर्चांचा नाही. कथेचा आहे. आणि ती छान जमलीय.

काहीही हं श्री मधील श्री, आणि बायकोचा नवरा गुरुनाथ, हे मला कथा वाचताना आठवले नाहीत. कारण यांच्यात मुळातच मर्यादित टॅलेंट आहे. >>. श्री बद्दल मी मर्यादित टॅलेंट साठी लिहिलं नाहीये. तर रटाळ सिरीयलीत तो शेवटी शेवटी कंटाळल्यासारखा वाटायचा असं लिहिलंय..

हो, ते असेल
आमच्याघरी ती शेवटपर्यंत बघितली गेली नाही. श्री च्या आधी आमच्या मांसाहेबच कंटाळल्या. त्यामुळे माझ्याही नशीबी ती बघायचा योग.. की भोग आला नाही.

खरे तर ही कथा लिहिताना कोणत्याही विशिष्ट मलिकेचा नायक डोळ्यसमोर नव्हता. पण एकंदरीत असे लक्षात आले की ५०० भागांनंतर कलाकार मंडळी कंटाळल्यासारखी वाटतात. त्यातून जो सच्चा कलाकार असेल तो गुदमरून जाईल. त्यातून ही कथा स्फुरली.