बॉलीवूडची 'चांदणी' निखळली!

Submitted by अँड. हरिदास on 25 February, 2018 - 10:19

111.jpg
बॉलीवूडची 'चांदणी' निखळली!

जीवनातलं अटळ वास्तव म्हणजे मृत्यू! देह धारण करणाऱ्या प्रत्येकाला या वास्तवाला कधी ना कधी सामोरं जावंच लागतं. मात्र, हे वास्तव स्वीकारताना मनात एक नीरव शांतता निर्माण होते. वयाच्या कोणत्याही टप्प्यात मृत्यू हा शब्द अंगाचा थरकाप उडवून देतो. 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा..'या गदिमांच्या ओळीप्रमाणे माणसाचे सर्व तर्क एकाजागी स्तंबीत होऊन जातात. मानला वेगळीच रुखरुख लागून जाते. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' या ओळींचा अर्थ आपसूकच डोळ्यासमोर तरळू लागतो. जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहेच; पण तो अवेळी आला की कुठलाही संवेदनशील माणूस काही क्षण हळहळल्याशिवाय राहत नाही. श्रीदेवीच्या मृत्यूची बातमीही अशीच हुरहूर लावणारी आहे. डोळे दिपवणारं यश, ऐश्‍वर्य आणि प्रसिद्धी यांच्या शिखरावर असताना नियतीने अकस्मातपणे घातलेला हा घाव मानला चटका लावून जातो.
श्रीदेवीने आपल्या अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य गाजवलं. वयाच्या चौथ्या वर्षी ‘जूली’ चित्रपटात बालकलाकार म्हणून सुरू झालेला श्रीदेवीचा प्रवास २०१७ मध्ये आलेल्या ‘मॉम’ पर्यंत अविरत सुरू होता. या प्रवासात त्यांनी अनेक चढउतार बघितले. अजरामर ठरतील अशा अनेक भूमिका साकार केल्या. सदमा, हिम्मतवाला, जस्टिस चौधरी, मवाली, कलाकार,तोहफा, नगिना, आग और शोला, कर्मा, सुहागन, औलाद, मिस्टर इंडिया, निगाहे, चांदनी, चालबाज, फरिश्ते, लम्हे, खुदा गवाह,रुप की रानी चोरों का राजा, गुमराह, चंद्रमुखी, लाडला, जुदाई, इंग्लिश विंग्लिश, मॉम अशा एकापेक्षा एक सरस सिनेमांनी रसिकांना वेड लावले होते. हिंदी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवल्यानंतर बोनी कपूर यांच्याशी विवाहबद्ध होत श्रीदेवीनी चित्रसृष्टीतील आपल्या कामाला विराम दिला. तब्ब्ल दहा ते बारा वर्षांनी आपली दुसरी इनिंग नुकतीच श्रीदेवीने सुरु केली होती. 'मॉम' हा त्यांच्या करिअरचा शेवटचा आणि 300वा सिनेमा ठरला. नैसर्गिक अभिनयाच्या जोरावरच ही अभिनेत्री यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचली. पण आज श्रीदेवी नावाचं पर्व संपलं आहे.. एका सुंदर कथेचा अंत झाला आहे..
सकाळी श्रीदेवीच्या निधनाची बातमी वाचली तेंव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं ते श्रीदेवीचं मराठमोळ रूप..गेल्यावर्षी ‘मॉम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवी चला हवा येऊ द्या च्या सेटवर आली होती. निळ्या रंगाची आणि भगवा काठ असलेली नववारी पद्धतीने नेसलेली साडी, हातात भरघच्च बांगड्या, गळ्यात हार, नाकात नथ, कानात झुमके आणि डोक्यावर चंद्रकोर..या श्रीदेवीच्या रूपाने अनेकांना वेड लावलं.. आज वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी हे सौंदर्य काळाच्या पडद्याआड गेलं आहे.. श्रीदेवीच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास बसत नसला, तरी हे वास्तव आपल्याला अपरिहार्यपणे स्वीकारावे लागणार आहे.. बॉलीवूड च्या या चांदणीला भावपूर्ण आदरांजली..!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्युलि सिनेमा १९७५ चा आहे आणि श्रीदेवी चा जन्म १९६३ चा आहे, ज्युली सिनेमात ती १२-१३ वर्षांची होती.
वयाच्या चौथ्या वर्षी ज्या तमिळ सिनेमात काम केले त्याचं नाव तुनैवन.

बाकि तिचं जाणं हे खरोखरी धक्कादायक आहे.
भावपुर्ण श्रद्धांजली.

नविन महिति

बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कार्डिएक अरेस्ट आल्यानंतर श्रीदेवी या बाथटबमध्ये पडल्या आणि बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टच्या हवाल्याने मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार, श्रीदेवी यांच्या शरीरात विषाचे अंश सापडलेले नाही.यामुळे श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेले संशयाचे वातावरण संपुष्टात आले आहे.