श्रीदेवी ... अर्ध्यावरच डाव सोडून गेली :(

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 February, 2018 - 03:49

श्रीदेवी आता राहिली नाही. हार्ट अटेक आला आणि त्यातच गेली. बातमी एव्हाना सर्वांना समजली असेल. पण कित्येकांना अजूनही हे पचले नसेल. व्हॉटसपवर ज्यांनी पाहिले त्यांचा खातरजमा केल्याशिवाय विश्वासही बसला नसेल. 54 वर्षे वय हे तसेही जाण्याचे नसले तरी ती 54 ची होती हेच मुळात पचवणे अवघड होते. आताही तिचा चेहरा डोळ्यासमोर येत ऐन तारुण्यात एखादा तारा निखळलाय असेच वाटतेय. कारण आजही श्रीदेवी म्हटले की चालबाज आठवतो, सद्मा म्हटले की श्रीदेवी आठवते. खुदा गवाहमध्ये अमिताभच्या ईतकीच लक्षात राहते, रूप की राणी चोरोंका राजा सारख्या टुक्कार चित्रपटातही जाणवते.. जिला लहानपणी मिस्टर ईण्डिया पाहिल्यानंतर आम्ही मिस ईंडिया म्हणायचो.. कमालीचा स्क्रीन प्रेजेन्स आणि त्याला ताकदीच्या अभिनय आणि सौंदर्याची जोड. बॉलीवूडची रुढार्थाने पहिली फिमेल सुपरस्टार - श्रीदेवी .. आता कुठे तिची सेकंड इनिंग सुरू झाली होती. ईंग्लिश विंग्लिश आणि मॉम सारख्या चित्रपटातून तोच चेहरा, तीच एनर्जी आजही दिसू लागली होती.. आणि अचानकच गेली.. म्हणूनच अगदी अर्ध्यावरच डाव सोडल्यासारखे वाटतेय.. चटका लाऊन गेली...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीदेवी ही तिच्या आणि आताच्या काळातील एक उत्तम अभिनेत्री होती.चित्रपटातील आपल्या विलक्षण अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवणे,पडद्यावरील सहज वावर यामुळे तिचा अभिनय हृदयाला भिडायचा. प्रत्येक भूमिकेच्या विविध छटा तिच्या अभियात दिसायच्या.अशा अष्टपैलू व्यक्तीमत्वाकडून या क्षेत्रात नवीन पदार्पण करणारे यांना अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.आयुष्यभर त्या स्टारडम जगल्या.

आज व्हॉटसपवर बरेच चांगल्यावाईट आचरट सुसह्या पोस्ट वाचल्या...
त्यातील एक आवडलेली पोस्ट --

५४ हे काय जायचे वय आहे?

मी काही श्रीदेवीचा कट्टर चाहता नाही. कधीच नव्हतो. तिच्या सत्तर एक हिंदी चित्रपटांपैकी मी फार तर फार सात वा आठ चित्रपट बघितले असतील.

१९८४ च्या थोडे आधी वा त्याच सुमारास दक्षिणी चित्रपटांच्या हिंदी रिमेकचे युग सुरू झाले होते. ठेक्यातली गाणी, बालीश विनोद आणि डोक्याला ताप न देणारी कथा. कादरखानने बालीश विनोद असलेले चटपटीत संवाद लिहायचे, त्याने आणि शक्ती कपूरने पडद्यावर आचरटपणा करायचा, इंदिवरने गाणे लिहायचे आणि बप्पी लहरीने ठेक्यात ऊडती चाल द्यायची. त्या गाण्यांचे आयुष्य फार थोडे असायचे, पण जेवढे असायचे, तेवढे थाटात जगायचे!
कॉलेजमध्ये 'हिम्मतवाला'ची चर्चा सुरु होती. गावातल्या रिक्षावाल्यांच्या कृपेने त्यातली सगळी गाणी दिवसरात्र कानावर पडतं होतीच. कँटीनमध्ये हिम्मतवाला'ला जायचे ठरू लागले. मला काही जावेसे वाटत नव्हते.
'मला यार, तो जितेंद्र सहनचं होत नाही!' मी प्रामाणिकपणे सांगून टाकले. घरून महिन्याला इनमीन विस रुपये खर्चायला मिळायचे, त्यातले ७ रुपये जितेंद्रवर खर्चायला जीव धजतं नव्हता.

'पागल आहे का रे तू? जितेंद्रला बघायला कोण जातेय? एकदा ती हिरॉईन बघ! फिदा होशील! काटा आहे एकदम काटा!' आमच्यातला एकजणं दोनदा तो चित्रपट बघून आला होता!
काटा हा शब्द तेव्हा भरात होता. 'टंच' या शब्दाचे कॉलेजीकरण.

आम्ही गेलो.
हिच्या एंट्रीलाच टाळ्या! गाणे सुरू झाले की पडद्यावर नाणे-फेक! कॅमेरा एका विशिष्ट कोनात आला की शिट्ट्या! काही अतिउत्साहींचे सगळ्या चित्रपटगृहाला ऐकू जातील, 'क्या माल है, रे' असे अभिप्रायसुद्धां!
मला काही तो सारा 'पिटातला' प्रकार आवडला नाही. खुद्द श्रीदेवीसाठी 'काटा' सारखा सडपातळ शब्दही आवडला नाही!
'काटा' कसली, चांगलीच 'पुष्ट' होती ती!
ऐन तारुण्यात होतो, पण जीव अजूनही मागच्या पिढीतील साधना, वहिदामध्ये अटकलेला होता. अधुनमधून रेखा कुठेतरी घायाळ करायची, कधी मौसमी चटर्जी ह्रदयात साखरेचा पाक ओतून जायची.
हि श्रीदेवी नामक नवी पोरगी पिटातल्या प्रेक्षकांसाठीच आहे आणि हि अशीच राहणार, हि अटकळ पक्की होती. अशा अभिनेत्रींचे पडद्यावरील आयुष्य खुप थोडे असते. देहसौंदर्याच्या जोरावर जे प्रेक्षक आकर्षित होतात, ते टिकत नाहीत. त्यांना नवनवे आकर्षण थोड्याच काळात सापडत असते. या चित्रपटांच्या दुनियेत दररोज नवनवीन भर पडत असते. आंबटशोकीन प्रेक्षक महिनाभर अगोदरचे आकर्षण तत्काळ विसरून जातात. हि नवी हिरॉईन अशीच काळाच्या ओघात लुप्त होईल, असेच वाटले.
मग बघितला, तो 'सदमा'.
खोटं कशाला सांगू, बघितला तो कमल हसनसाठी! आणि तोच आवडला, श्रीदेवी एवढी काय आवडली नाही. जरा ओव्हरऍक्टिंग केल्यासारखीच वाटली. अशा प्रकारच्या भुमिकेत वाहवत जाणे साहजिकच असते. चांगला अभिनय, वाईट अभिनय हे समजण्याएवढी प्रगल्भता त्या वयात नव्हती, पण आवडली नाही, हे निश्चित!
एक आवडले, की 'पिटा'तल्या शिट्ट्या हे हिचे इप्सित नव्हते. पोरगी हुशार होती. इथे बस्तान बसवायला आली होती.
माझ्या 'रेटिंग' मध्ये श्रीदेवी 'एक 'पादान ऊपर गयी'.
मग अचानक, न ठरवता कधीतरी 'जाग ऊठा इन्सान' नामक चित्रपट पाहिला. अशा काही चित्रपटात आपण काम केले होते, हे खुद्द ती सुद्धा विसरून गेली असेल! इथे मात्र ती आवडली!
'तोहफा तोहफा' करत नाचणाऱ्या 'ललिता' पेक्षा संयत अभिनय करणारी हि 'संध्या' खूप वेगळी होती! कुठेतरी तिला दिप्ती नवलच्या जवळपास नेऊन ठेवले.

कॉलेजच्या शेवटच्या परीक्षेनंतर रात्री आम्ही २५ ते ३० जणांनी मिळून 'राम अवतार' नावाचा तद्दन भिकार चित्रपट पाहिला. मित्रांसोबत एकत्र जाणे, हे महत्त्वाचे होते, चित्रपट कुठला हे महत्त्वाचे नव्हते.
थिएटरात गेलो, तेव्हा कळले की यात श्रीदेवी आहे. चला, बरे झाले!
अरे पण सनी देवल हिरो आहे, जाऊ द्या, घेऊ चालवून त्याला!
चित्रपट काहीच आठवत नाही, पण त्यातले 'ऊंगली मे अंगुठी, अंगुठी मे नगीना' या गाण्यावरच्या श्रीदेवीच्या अदा अजून आठवतात! ते डोळे मोठे करणे, मान हळूच हलवणे, तो भिवयांचा विभ्रम आणि ते लाडिक हसणे!
आणि बाई अधिकृतरित्या काळजात घुसल्या!
एव्हाना, ती खरोखरच 'काटा' झाली होती.
मग लम्हे झाला, खुदा-गवाह झाला, चालबाझ झाला, आणि महत्त्वाचे म्हणजे 'चांदणी' झाला!
तिचे ते ऋषी कपूरला 'शोना शोना' असे संबोधने, 'तेरे मेरे होठों पे' मधला नाजूक पदन्यास, 'मेरे हांथो मे नौ नौ चुडियाँ है' मधला अवखळपणा, सारे सारेचं आवडून गेले.
प्रेमात पडायचे वय होते. त्या. वयात गाढवीणसुद्धा सुंदर दिसते, इथे तर चक्क देवी होती!
आता श्रीदेवीने थाटात आत येऊन वहिदा, साधना, रेखा, मौसमीच्या बरोबरीने जागा पटकावली!
तिचे आता सगळेच आवडू लागले. तिचे गायलेले गाणेसुद्धा आवडले!
यानंतर असाच कधीतरी 'लाडला' पाहिला. त्यातली ती करारी 'शीतल जेटली' पटली. प्रत्यक्ष जीवनातही ही अशीच 'प्रॅक्टिकल' असावी, असे ऊगाचंच वाटून गेले.नवऱ्याची अगोदरचं प्रेयसी आहे, हे माहिती असुनही, सुड म्हणून लग्न करणारी आणि नंतर खरोखरच त्याच्या प्रेमात पडणारी. वेगवेगळ्या छटांची हि भुमिका ती अक्षरशः जगली.

कालांतराने नोकरीमध्ये गुंगून गेलो आणि अचानक एक दिवस तिच्या लग्नाची बातमी आली. अगदीच धक्का वगैरे नाही बसला, पण इतर करोडो समवयस्कांसारखी बारीक कळ मात्र निश्चितच आली!

काही वर्षांपूर्वी 'श्रीदेवी पुनरागमन' करणार, असे वाचले. हा काय मुर्खपणा करतेय ही? आत्तापर्यंत किती जणींनी हा प्रयोग केला आणि रसिकांच्या ह्रदयातले होते नव्हते, ते स्थान गमावून बसल्या. मुमताज, झिनत, रती अशा कितीतरी.

'इंग्लिश विंग्लिश' आला आणि गेला. मी नाही पाहिला. पाहायची इच्छाच नव्हती. तिच्या सुगंधीत आठवणी कुठेतरी खोल एका कुपीत जपून ठेवल्या होत्या. दहा पंधरा वर्षांनंतरच्या तिच्या दर्शनाने त्या कुपीला कुठेतरी तडा गेला असता.
काय सांगावे, नुसत्या तड्याऐवजी कुपीच फुटली असती आणि आत जखमा झाल्या असत्या.
मी ते सगळेच टाळले.
असाच एकदा टिव्हीवर मिनीटाला दोन या वेगाने चॅनल्स बदलतं बसलो होतो. एका ठिकाणी, 'इंग्लिश विंग्लिश' नुकताच चालू झाला होता. समोर साक्षात श्रीदेवी! रिमोटवरचे बोटचं जड पडले. चॅनल बदलणेच अवघड झाले!
जाहिरातींना सुद्धा न ऊठता पुर्ण चित्रपट पाहिला!
अभिनयाच्या एका ऊच्च पातळीवर हि बाई पोहोचली होती, आम्हाला मान वर करून तिच्याकडे बघावे लागतं होते. 'हिम्मतवाला'तल्या तोकड्या चड्डिपासून 'इंग्लिश विंग्लिश' मधल्या अंगभर पदरातल्या साडीपर्यंतचा पर्यंतचा प्रवास थक्क करणारा होता!
हिची हि दुसरी इनिंग' नक्कीच भारी भरणार. बच्चनसाठी त्याच्या वयाच्या हिशेबाने भुमिका लिहिल्या जातात, तशा हिच्यासाठी लिहिल्या जातील! हिंदी चित्रपटसृष्टीत ही नवा पायंडा पाडणार!
हि तर अभिनेत्रींमधली सौरभ गांगूली! तो त्याच्या पुनरागमना नंतर भरीला आला आणि अत्युच्च पातळीवर पोहोचला...

आणि आज सकाळी हि बातमी आली!
आयुष्य क्षणभंगूर असते, पण इतके? असले छोटे आयुष्य 'आमच्या' श्रीच्या वाट्याला यावे?
५४ हे काय जायचे वय आहे का?
जन्माला आलोय, तर जावे लागणारचं हे तर त्रिकालाबाधीत सत्य आहे. कोण कधी जाईल (आणि काही महाभाग का जात नाहीत) हे काही सांगता येत नाही, पण ५४ हे काही जायचे वयं नाही!
बाई जाताना चटका लाऊन गेल्या.
छ्या! ५४ हे काय जायचे वय आहे का?

Fwded...

ऋन्मेषभाऊ हे तुमच्याकरिता खास महत्त्वाचं आहे. नक्की वाचा:-

https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1636886/roles-reje...

डर (१९९३)- यश चोप्रा यांचा श्रीदेवीने नाकारलेला आणखी एक सिनेमा म्हणजे 'डर'. मला शाहरुखची भूमिका दिल्यास मी हा सिनेमा स्वीकारेन असे श्रीदेवीने यश चोप्रा यांना सांगितले होते. मात्र त्यांनी तिला नकार दिला. नंतर एका मुलाखतीत आपला निर्णय योग्य असल्याचे यश चोप्रांनी सांगितले होते. मात्र या सिनेमातील 'टूट गयी..' या गाण्यात जुहीला श्रीदेवीच्या लोकप्रिय चांदनी सिनेमातील लूकसारखा लूक देण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्यांनी दिली होती.

श्री देवी अतिशय उत्तम अभिनेत्री होती. पण, सत्यमेव जयतेच्या 'बाल लैंगिक अत्याचाराबाबतच्या' भागात ती खास या दुर्दैवाशी झगडलेल्या मुलाशी खास बोलण्याकरीता आलेली. तेव्हा ती दोनच वाक्ये बोलली पण ते इतकं मनापासून आणि प्रांजळ होतं, त्यावरून ती उत्तम माणूस्देखिल असावी असे वाटते.
इंग्लिश विंग्लिश तर तिचाच नव्हे तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड थरेल इतका सर्वांगसुंदर चित्रपट. यात अक्षरश: किती तरी सिन्समध्ये ती कमाल करते. किती तरलपणे खुप कमी हालचालींतून आणि अतिशय लोभस भावमुद्रांतून तिने शशी साकारली आहे. मेलोड्रामाचा आश्रय न घेता. त्यातले तिचे दोन सिन्स तर फारच आठवतात, मुलीबरोबर रिक्शातून जात असताना मुलगी तीला जे बोलती त्यानंतर तिचा रडतानाचा अप्रतीम मुद्राभिनय आणि शेवटचे तिचे संपूर्ण भाषण. तिच्यात झालेली एम्पॉवरमेंट, स्वत्व जागे होणे, प्रेमाची झुळूक अंगावरून जातेय तेव्हा अलगदपणे तितून सुटणं हे दाखवणं इतर कुणाला शक्य झालं असतं असं वाटत नाही खरोखर.

तिच्या जाण्याच्या बातमीने खूप मोठा धक्का बसला आहे मला Sad

मी काही खूप मोठी फॅन वगैरे नव्हते पण तरीही सतत तोच विचार येतो आहे डोक्यात.

श्रीदेवीच्या आत्म्याला शांती लाभो. तिच्या कुटुंबियांना आणि फॅन्सना ह्या धक्क्यातून सावरण्यासाठी बळ मिळो. __/\__

अतिशय दुःखद घटना. ऋन्मेष या दुःखाच्या क्षणी तू अजिबात खचून आणि ढासळून जाऊ नको. सगळे मायबोलीकर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

खूप दुर्दैवी घटना Sad

आजच्या news report प्रमाणे मृत्युचे कारण अतिरिक्त मद्यपानामुळे बाथटबमधे बुडून accidental drowning असे सांगत आहेत. खरंच खूप unfortunate आहे हे.

अतिरिक्त मद्यपानामुळे बाथटबमधे बुडून
>>>>
मी सुद्धा आताच वाचली ही न्यूज. आणि तेच लिहायला या धाग्यावर आलेलो. मद्यपानामुळे कोणाचा मृत्यु झाल्यास मला जास्त हळहळ वाटते. आपले आयुष्य असे संपवणारयांचा रागही येतो. म्हणूनच मी मद्यपानाला नेहमी विरोध करतो. आम्ही काही बेवडे नाहीत वा आम्ही ओकेजनलीच पितो अश्या कारणांना दुर्घटना झाल्यावर काही अर्थ उरत नाही Sad

अतिरिक्त मद्यपानामुळे बाथटबमधे बुडून >> अतिरिक्त मद्यपान मी तरी कुठे वाचले नाही. Found traces of alcohol in her blood एवढेच वाचले आहे. लगेच अतिरिक्त मद्यपान वगैरे जरा फार फेच्ड वाटते आहे.

पहिले सांगत होते की कारडीअॅक अटॅक. ती बारीक होण्यासाठी जेे ड्रग घ्यायची त्याने म्हणे ह्दययाचे ठोके वाढतात. प्लॅस्टीक सर्जरीनेही म्हणे विपरीत परिणाम होतो. खरे खोटेे जाणकार आणि तिचे कुटुंबिय जाणोत.

शेम on इंडियन मीडिया... कायपण चालवलाय.. >> सिरियसली कायपण चाललंय whatsapp, फेसबुकवर...परवापासून लोकांना सांगूनसांगून दमले...आतातर विनोद यायला लागलेत Sad

अतिरिक्त मद्यपान मी तरी कुठे वाचले नाही. << खरे आहे.. पण पूर्ण झोपेत असलेल्या माणसाचा श्वास कोंडला तरी तो धडपडून उठतो.. तर नाकातोंडात पाणी गेले तरी ती उठून बसली नाही, त्यासाठी किती मद्यपान करावे लागले असेल? आणि टबाची उंची १ १/२ फूट असते, त्यात उठून बसले तरी नाक पाण्याबाहेर येईल नाही का?

तुम्ही कधी फुल्ल पिऊन टाइट झाल्याचा अनुभव घेतलेला दिसत नाही.गाढ झोपेच्या खूप पलीकडची लेवल असते.
ब्रेन इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या पलीकडे गेलेला असतो की पाणी जाताय आता उठा..हातपाय हलवा.

आणि टबाची उंची १ १/२ फूट असते, त्यात उठून बसले तरी नाक पाण्याबाहेर येईल नाही का? >> actually नाही, drawn in bathtub is very common. ४-६ इंच पाणी पुरेसे होते बुडवण्यासाठी. टब मधे डोके आपटल्यामूळे शुद्ध हरपणे हा अतिशय कॉमन प्रकार आहे.

तुम्ही कधी फुल्ल पिऊन टाइट झाल्याचा अनुभव घेतलेला दिसत नाही. <<< नाही हो... पण त्यासाठी 'अतिरिक्त' मद्यपान खरे ठरेल नाही का?
टब मधे डोके आपटल्यामूळे शुद्ध हरपणे <<<< बरोबर.. पण कुठे वाचले नाही..

च्रप्स आणि परदेसाई यांच्याशी सहमत.
बाथटबभर पाण्यात जीव गेला म्हणजे मद्यपान थोडेथोडके नसणार.
बोनी कपूरलाही दुबई पोलिसांनी क्लीनचीट दिली म्हणजे घातपातही नाही.
तसेच अतिरीक्त मद्यपान, तर प्रत्येकाचा कोटा वेगळा असतो.
जर पाय घसरून पडली, डोक्याला मार बसला, बेशुद्ध पडली असे झाले असेल तर कल्पना नाही. पण जर पडायला कारण मद्यपान असेल तर दोष मद्यपानाचाच.
ईथे गेलेल्या माणसाला बोल लावत नसून मद्यपानाला लावत आहे.
अवाण्तर - मिडीयात काय चालू आहे. न्यूज आणि रिएलिटी शो त्यातील आचरटपणामुळे बघतच नाही. आज व्हॉटसपवर बाथटब विकत घ्यायला लाईन लावणारया नवरयांचा जोक वाचला. हसावे की रडावे समजत नाही.

आगए मौत का तमाशा देखने झालय.
तिच्या कॉस्मॅट्*क सर्जरीपासून तिच्या डाएट आणि आता दारु किती प्यायली असेल या सगळ्याला जज करायला सज्ज , सगळे तिथे त्यावेळी हजर असल्यासारखा श्रीदेवीच्या मृत्युला डिसेक्ट करतायेत....डिस्गस्टींग !

श्रीदेवी सेलिब्रेटी होती. तिच्या मृत्युची सामान्य लोकांत चर्चा होणे स्वाभाविक आहे.
मगाशी सहज चॅनेल सर्फ करताना न्यूज चॅनेल आला. श्रीदेवीचे पार्थिव शहरात आले हीच न्यूज होती. तिचे नातलग आणि जवळचे गाडीतून शोकाकूल अवस्थेत उतरत होते. आणि पत्रकार त्यांचा बाईट घ्यायला धडपडत होते. त्या अवस्थेत त्यांना या सर्व प्रकाराला झेलावे लागत होते. सेलिब्रेटी असण्याची किंमत मोजावी लागते. भारतासारख्या देशात जास्त..

कलाकारांच्या खासगी जीवनात मिडीयाचा हस्तक्षेप इतका वाढला असल्याने दुःखाच्या वेळी देखील त्यांना स्वःचे असे चार क्षण मोकळे मिळत नाहीत हे दुर्दैव आहे.याला जर वेळीच आळा घातला नाही तर ही स्थिती अजूनच अवघड होईल.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे....
तुम्हाला तुमच्या घरी पत्र टाकायला येणार्‍या पोस्टमनचे नांव, त्याची पोरं , त्याचं शिक्षण काही माहीत आहे?
तुमच्या घरी पाणी येतं, त्याचे नळ टाकणार्‍या ईन्जिनियर बद्दल? दुधवाला, शाळेतले मास्तर, पेपरवाला? कुणाबद्दल तुम्ही खात्रीने सांगू शकाल?
पण क्षदेवी, तिचा नवरा य-कपूर, तिची मुले नातवंडे सगळं आम्हाला माहीत ... का?
आयुष्यभर ज्यानी सेवा दिली त्यांची माहिती नाही, पण २ तासाचे १०/२० चित्रपट केले , त्याने तुमची करमणूक झाली त्यांना भरभरून मात्र भरभरून प्रेम.
....
मग जेव्हा त्यांचे असे होते, तेव्हा त्यांच्यावर चर्चा झाली, तर्कवितर्क झाले, विनोद मारले गेले की मग का वाईट?
देनेवालेने (जनता) जितना (प्यार) दिया, वह उतनाही वापस लेता है.. (Law of conservation)

आजवर इतका आदर कुठल्याही सैनीकाच्या मृत्यूनंतर दिसला नाही .अर्थात काही अपवाद असतील.पण जितकं प्रसिद्धीच वलय चित्रपटातील कलाकारांना मिळत तितकं ज्याच्यामुळे देश अबाधित आहे अशा real life hero ना मिळालं तर बर वाटेल.

परदेसाई, चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण विनोद का? ते संवेदनशीलता दाखवत टाळता येतात. टाळता आले पाहिजेत. आजही झोपायच्या आधी सवयीने दिवसभराचे व्हॉटसप चेक केले. नुसते विनोदच नाही तर कविता, फंडे, फिलॉसॉफी नुसता खच पडला होता. दुर्घटनांबाबत प्रतिभेची हौस दाखवताना जरा मोह आवरायला हवा.

आयुष्यभर ज्यानी सेवा दिली त्यांची माहिती नाही, पण २ तासाचे १०/२० चित्रपट केले , त्याने तुमची करमणूक झाली त्यांना भरभरून मात्र भरभरून प्रेम.>>> कुठल्या सेलेब्रिटिने आडकाठि केलिये लोकाना ही माहिति तुमच्याकडे ठेवु नका म्हणून, लोक सेलेब्रिटिजला अवाजवी महत्व देतात ही लोकाची चुक आहे, सेलेब्रिटिची नाही.. त्याच्या पडद्यावरच्या इमेज वर हव तितक प्रेम करा पण त्यानाही वैयकित्क सुख-दुख आहेत याच भान लोकानी आणी मिडियाने ठेवण आवश्यक आहे.
कारण " गेलेला मनुष्या बरोबर त्याने केलेले बरे-वाइट कर्म पण सन्पतात तेव्हा त्यावर जोक्स करण हिणकस आहे " आपल्याकडे कुणी गेल की त्याविषयी वाइट बोलु नये अस म्हणतात ते यासाठीच!
बाकि तर्क-वितर्क , स्पेक्युलेशन होण स्वाभाविक आहे पण त्याला अवाजवी स्वरुप मिडियाने देणे अतिशय वाइट.

Pages