पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ८. खूबसूरत (1980)

Submitted by स्वप्ना_राज on 15 February, 2018 - 07:57

तुमच्यापैकी किती जणांनी 'सुन सुन सुन दीदी, तेरे लिये एक रिश्ता आया है' हे गाणं ऐकलंय किंवा पाहिलंय? हात वर करा बघू. सगळ्यांनीच ऐकलंय? सही आहे! आता ज्यांनी 'खूबसूरत' पाहिलाय फक्त त्यांनीच हात वर ठेवा हं. ओक्के! एव्हढेच जण? हरकत नाही. मी पण कालपर्यंत पाहिला नव्हता. पण त्याचं काय आहे की नव्या वर्षात आवर्जून जुने चित्रपट पाहायचे असं ठरवलं आणि अजूनपर्यंत तरी तो पण टिकवलाय. मग काय ऐकणार का 'खूबसूरत' ची स्टोरी आज माझ्याकडून? अट एकच. स्टोरी आवडली तर चित्रपट नक्की बघायचा (आणि मला वि.पू. करायची!). काय म्हणता? आहे कबूल? लेट्स स्टार्ट.

चित्रपट सुरु होतो तेव्हा पाटी दिसते ती पूना सेन्ट्रल हॉस्पिटलची. अहो, हॉस्पिटल म्हटलं म्हणून घाबरून जाऊ नका असे. इथे आपला हिरो इंदर डॉक्टर आहे. इंटर्नशिप संपवून घरी चाललाय आज. आता रोज घरून हॉस्पिटलला यायला मिळणार आणि कँटीनच्या जेवणापासून सुट्टी मिळणार म्हणून खुश आहे स्वारी. आता बघू यात इंदरच्या घरी कोण कोण असतं ते. बाप रे! सुरज बरजात्याच्या चित्रपटातून असतं तसं मोठं संयुक्त कुटुंब आहे की. वडील द्वारकाप्रसाद बघावं तेव्हा बंगल्यातल्या बागेत खुडबुड करत बसलेले. आई निर्मलादेवी घरचं करून पुन्हा 'दुखीयारी महिला केंद्र' असं काहीतरी नाव असलेल्या संस्थेत कार्यरत. मोठा मुलगा सुंदर, त्याची बायको आणि मुलगी मुन्नी, त्यानंतरचा मुलगा चंदर - हा वकील आहे आणि त्याला 'यंदा कर्तव्य आहे'. त्यानंतरचा मुलगा इंदर म्हणजे आपला हिरो. आणि शेवटचा जगन. तसं तालेवार कुटुंब. पण निर्मलादेवीनी सगळ्यांना अगदी धाकात ठेवलंय. पूर्ण कुटुंब त्यांच्या शिस्तीच्या बडग्याखाली दबलेलं. अगदी सुरुवातीलाच सकाळच्या न्याहारीच्या वेळी त्या सगळ्यांना धारेवर धरताना दिसतात. जमिनीवर उठलेले चिखलाचे पाय बघून नवर्याला त्याचे चपलांसकट पाय त्यांच्यावर ठेवायला लावून ते त्याचेच आहेत हे त्या सिद्ध करतात. जगनवर आत बनियन का घातली नाहीस, केस का विंचरले नाहीस असा प्रश्नाचा भडिमार करतात. मोठ्याने ओरडून बोलायचं नाही, ८:३० च्या ठोक्याला नाश्त्याला हजर झालं नाही तर नाश्ता मिळणार नाही ह्या आणखी काही अटी. घरात कसं वागायचं ह्याचं काही मॅन्युअल आहे की काय अशी शंका यावी असलं शिस्तीचं घर.

ह्याउलट घर आहे अंजू-मंजूचं. वडील रामदयाल ह्यांनी बायकोचं निधन झाल्यावर दोन्ही मुलीना अगदी लाडाकोडात वाढवलेलं. पूर्ण घर, अगदी घरचा नोकर अशर्फीलाल सुध्दा, पद्यात बोलणारे. हं, पण खबरदार. ह्या शेरातला ‘काफिया' जमला नाही तर मात्र कोंबड्याचा आवाज काढून दाखवावा लागतो. मोठ्याने बोलणारं, पत्ते खेळणारं, खळखळून हसणारं आणि मोकळा श्वास घेणारं असं हे घर आहे.

द्वारकाप्रसादचा जिवलग मित्र उमाशंकर एक दिवस गप्पा मारायला त्यांच्याकडे येतो तेव्हा निर्मलादेवी चंदरसाठी योग्य मुलगी शोधायची विनंती त्यांना करतात. ते अंजूचं स्थळ सुचवतात. ‘नवर्यामुलाने मुलगी बघायला स्वत: जायचं नाही' ह्या निर्मलादेवींच्या शिरस्त्यानुसार इंदर, जगन, सुंदरची बायको आणि द्वारकाप्रसाद मुंबईला रामदयालच्या घरी जातात. अंजू पसंत पडते आणि लग्न होतं. लाडकी अंजू सासरी गेल्यावर इथे तिच्या माहेरी कोणालाच करमत नाही. विशेषत: धाकटी बहिण मंजू तर तिची फारच आठवण काढते. म्हणून मग वडील तिला काही दिवस अंजूकडे जाऊन यायचा सल्ला देतात. कोणालाही न कळवता मंजू एकदम तिच्या सासरी येऊन धडकते. आता एव्हढ्या शिस्तीच्या घरात ही अवखळ मुलगी आल्यावर गोंधळ उडणारच ना. त्यातून मंजू आणि इंदर दोघांची 'नोंकझोंक' अंजूच्या लग्नात झालेलीच असते. मंजू आल्यावर दोघं एकमेकांवर आणखी कुरघोडी करायचा यत्न करतात. पण ह्यात होतं काय की नकळत दोघे एकमेकांकडे आकर्षित होतात.

पण काही म्हणा......मंजूला हे शिस्तीच्या बडग्याखाली दबलेलं बहिणीचं सासर काही आवडत नाही. मग ती जगनला हाताशी धरून घरच्या एकेक सदस्याची आवड जाणून घ्यायला लागते. निर्मलादेवी संस्थेच्या मिटींग्जसाठी गेल्याची संधी साधून मग हे घर थोडंसं फुलायला लागतं. आणि तरी एक दिवस बेंड फुटतंच. घर अभंग राहावं, त्यातले लोक भरकटू नयेत म्हणून आपण लावलेली शिस्त घरच्या मंडळीना मात्र जाचक वाटते, पण हे आपल्याला सांगायची हिम्मत कोणी दाखवली नाही आणि बाहेरून आलेल्या मंजूला मात्र ते कळलं हे समजल्यावर निर्मलादेवी व्यथित होतात. ‘ज्याला जे पाहिजे ते तो आता करू शकतो. आपण काही बोलणार नाही' असा फतवा काढतात. घरच्यांना वाईट वाटतं. बिचारी मंजू तर फारच कानकोंडली होते. आता आपलं आणि इंदरचं लग्न होणं केवळ अशक्य आहे असंच तिला वाटतं.

पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं.....

बास, बास, बास. चित्रपट पाहिला नसेल तर ही तुमची लक्ष्मणरेषा बरं का. इथून पुढे एक अक्षरही वाचायचं नाही..........

हम्म. अजून वाचताय म्हणजे तुम्ही हा चित्रपट पाहिलेला असणार. मग सांगा बरं ह्यातली तुमची सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा कुठली? अर्थात भानुरेखा. म्हणजे आपली रेखा हो. आजकाल टीव्ही गाईड मध्ये बर्याच चित्रपटात तिचं नाव 'भानुरेखा गणेशन' असंच येतं. तर अवखळ, अल्लड, चेष्टेखोर पण मनाने निर्मळ अश्या मंजूची भूमिका तिच्याशिवाय आणखी कोण करू शकलं असतं? पत्त्यांच्या डावातलं चीटिंग असो, हातावरून भविष्य सांगता येतं असं खोटं सांगून घरच्या लोकांच्या आवडी जाणून घेणं असो, इंदरला त्याच्याच आईकडून ओरडा खायला लावणं असो, आपण नकळत का होईना पण निर्मलादेवींना दुखावलंय हे लक्षात आल्यावर त्यांची माफी मागणं असो किंवा आधी घेऊन ठेवलेल्या व्हिजीटसना जायचंय म्हणून पेशंट सिरीयस असतानाही न ठरवलेल्या व्हिजीटला यायला नकार देणाऱ्या डॉक्टरला खडे बोल सुनावणं असो - रेखा 'एकदम छा गयेली है बाप'. इंदरवर नितांत प्रेम करत असूनही 'आईने लग्नाला परवानगी दिली नाही तर मी बदली करून घेईन. मग आपण लग्न करू' असं म्हणणाऱ्या इंदरला 'असं करून मी त्यांना अजून दुखवू शकत नाही' असं सांगण्याइतकी समज आणि हिम्मत तिच्यात आहे.

ह्यानंतरची आवडत्या व्यक्तिरेखेची पोझिशन मात्र टाय आहे - अशोक कुमार आणि दीना पाठक. घरात शांती राहावी म्हणून बायकोची शिस्त खपवून घेणारा, तिची नजर चुकवून कडक पथ्यातून काही सुटका मिळते का ते पाहणारा, मंजूवर मुलीसारखं प्रेम करणारा, तिची बाजू घेऊन बायकोशी भांडणारा द्वारकाप्रसाद आपल्याला सासरा म्हणून मिळावा असंच कुठल्याही सुनेला वाटेल अशी ही भूमिका दादामुनीनी रंगवली आहे. निर्मला देवीची भूमिका नाही म्हटलं तरी थोडी निगेटिव्ह. पण त्यांचा 'हम करे सो कायदा' हा बाणा, आपली शिस्त घरच्यांना शिक्षा वाटते हे कळल्यावरचं त्यांचं दुखावलं जाणं, मंजूला माफ न करण्याचा आडमुठेपणा आणि तिची कळकळ ध्यानी आल्यावर आपली चूक कबूल करण्याइतका असलेला मनाचा मोठेपणा दीना पाठकने इतका छान व्यक्त केलाय की शिस्तीचा अतिरेक होतोय हे मान्य करूनही शिस्तीने वागणाऱ्या ह्या बाईचं आपल्याला कौतुकच वाटतं. तिची बाजूसुध्दा कुठेतरी पटते. वाढलेल्या वयाचा, पिकल्या केसांचा वारंवार दाखला देत आपलं म्हणणं तरुण पिढीवर लादणं हा ह्या देशातल्या सिनियर सिटीझन्सचा आवडता उद्योग असताना 'इस लडकीने मुझे हरा दिया' अशी प्रांजळ कबुली देणारी ही सासू कुठल्या सुनेला नको असेल?

राकेश रोशन मला फारसा आवडत नाही. त्याच्या विगमुळे तर तो नेहमीच आहे त्यापेक्षा जास्त वयस्कर असल्याचा भास होतो. पण ह्या चित्रपटात तो इंदर म्हणून - रेखाच्या मानाने थोडा मोठा वाटत असला तरी - शोभलाय. शशिकलेला साध्या-सरळ, कुठलंही कटकारस्थान न करणाऱ्या मोठ्या वहिनीच्या भूमिकेत पहाणं मला जरा जड गेलं. सारखं ती मंजूविरुध्द सासूचे कान फुंकते का काय अशी भीती वाटत होती Happy डेव्हिड (रामदयाळ), केश्तो मुकर्जी (नोकर अशर्फीलाल), ओम शिवपुरी (डॉक्टर) आणि रणजीत चौधरी (जगन) ह्यांनी अन्य भूमिका साकारल्या आहेत. इतकंच काय तर सुंदर-चंदर ऑफिसमध्ये ब्रिज खेळत असतानाच्या सीनमध्ये सिनेमाटोग्राफर जयवंत पाठारेही दिसतात.

गाण्यांपैकी 'सुन सुन सुन दीदी' आवडीचं. शोलेत अमिताभ बसंतीच्या मौसीकडे धर्मेंद्रचं 'गुणवर्णन' करतो त्याची हे गाणं ऐकताना मला नेहमी आठवण होते. ‘पिया बावरी' थोडं शास्त्रीय बाजाचं त्यामुळे त्यावर काही भाष्य करण्यास अस्मादिक असमर्थ. ‘कायदा कायदा' थोडं बालिश वाटलं. पण रूढार्थाने बालवय नसतानाही 'दुधाचे झरे, झाडावर लागलेले लाडू आणि टॉफीज, तळ्यात पोहणारे पक्षी आणि आकाशात उडणारे मासे' वगैरे ऐकून मजा वाटते हेही खरंच. ‘सारे नियम तोड दो' लहानपणी (आणि कॉलेजात असतानासुध्दा) आईने सांगितलेली एखादी गोष्ट करायची नसली की म्हणायचं हमखास गाणं होतं. विशेषत: ‘इन्किलाब जिंदाबाद' ही ओळ ठासून म्हटली जात असे. Happy

ऋषिकेश मुकर्जीच्या निदान मी आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटांत तरी खाऊन-पिऊन सुखी असलेली कुटुंबंच पाहिली आहेत. वडिलांचं अकाली निधन झालंय, आईला औषधासाठी पैसे नाहीत, बहिणीने लग्न होत नाही म्हणून आत्महत्या केली, हिरो गरीब म्हणून हिरोईनच्या वडिलांनी लग्न लावून द्यायला नकार दिला वगैरे भानगड आणि तदनुषंगाने येणारी रडारड नाही म्हणून मी ह्या चित्रपटांवर जाम खुश आहे. सगळ्या व्यक्तिरेखा पु.लं.च्या केशर मडगावकरसारख्या पांढर्या व्हाईट्टपणाची कमाल मर्यादा करतात. पण आपली तक्रार नाही. सदानकदा लोकांचं वाटोळं करायचे बेत करणाऱ्या केकता कपूरछाप सिरीयल मधल्या पात्रांपेक्षा ह्या व्यक्तिरेखा परवडल्या. गुलजारचे क्रिस्प डायलॉग्ज इमर्जन्सी, सिगारेटसवरचा वैधानिक इशारा, ८० च्या दशकातलं राजकारण ह्यावरही टिप्पणी करतात. मंजूच्या घरच्यांचं पद्यात बोलणं अफलातून. तसेच चटपटे संवाद द्वारकाप्रसाद आणि निर्मलादेवी ह्यांच्यामधल्या जुगलबंदीत आहेत. उदा. उमाशंकर 'तुम दोनोको देखकर ऐसे लगता है जैसेकी शिव और पार्वती....राम और सीता'. ह्यावर द्वारकाप्रसाद लगेच 'जैसे गुलाब और कांटा' म्हणून उत्तरार्ध पुरा करतो. ‘सुंदर, चंदर आणि इंदर' नंतर जन्मलेल्या मुलाचं नाव 'जगन' असं वेगळं का ठेवलं ह्याचंही तो मजेदार कारण सांगतो. अश्या संवादांना तश्याच प्रसन्न प्रसंगांची जोड आहे. मंजू आणि इंदर ह्यांच्यातला 'प्यारका इजहार' सुध्दा एकदम फ्रेश पध्दतीने दाखवलाय. उमाशंकर चंदरच्या कुटुंबाला अंजूची आणि अंजूच्या वडिलांना चंदरच्या कुटुंबाची 'गारंटी मै देता हू' असं म्हणतो ते ऐकून मात्र 'गेले ते दिन गेले' असं म्हणावंसं वाटलं. Happy

अर्थात प्रत्येक हिंदी चित्रपटाप्रमाणे ह्यातही काही गोष्टींचा उलगडा होत नाही. उदा. अंजूला 'बघायला' येणार आहेत म्हटल्यावर भडकणारी फायर-ब्रँड मंजू चित्रपटाच्या शेवटी मात्र डोईवर पदर घेऊन सासर्‍याला 'अबसे आप मुझे गर्लफ्रेंड नही बहू कहके बुलाइये' असं म्हणते ते तिच्या स्वभावाशी पार विसंगत वाटतं. द्वारकाप्रसादवर इलाज करणारा डॉक्टर 'इंदर माझा जुनिअर आहे' असं म्हणतो ह्याचा अर्थ तो सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असतो मग तो प्रायव्हेट व्हिजीट कश्या करत असतो हे कोडं उलगडलं नाही. तसंच इंदर बाकी लोकांबरोबर इलाहाबादला जाणार नाही असं ठरलं असताना तो का जातो? कथानकाच्या सोयीसाठी का? बाय द वे, हृषीकेश मुकर्जीच्या सगळ्या चित्रपटात हे इलाहाबाद कनेक्शन आहे का? निदान 'चुपके चुपके' मध्ये तरी होतं. परिमल आणि सुलेखाची कुटुंबं इलाहाबादची दाखवलेत. अर्थात शेवट म्हणजे मंजूचं चिठ्ठी ठेवून जाणं, मग निर्मलादेवी आणि इंदरचं स्टेशनवर जाणं, तिथे मंजूचं अजून बसून असणं वगैरे थोडं disappointing वाटलं. तरी हिंदी चित्रपटात customary असलेली मॅरेथॉन पहावी लागली नाही हे बरं. निर्मलादेवीना उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत 'आप सब रोकनेकी कोशिश करेंगे इस लिये बिना बताये जा रही हू' असं मंजू का लिहिते तेही कळलं नाही. त्या अडवतील असं तिला वाटलं तर त्यांचा तिच्यावरचा राग गेलाय हे तिला माहित आहे. मग घर सोडून जायची गरजच नव्हती.

असो. महाशिवरात्र होऊन गेली आहे. त्यामुळे रताळ्याचा काढला तेव्हढा कीस नको काढायला. थोडक्यात काय तर आमच्या घरात जोराने हसायला अजिबात हरकत नसल्याने जिथे हसू आलं तिथे मी 'खुलके' हसले. आणि थँक्स टू गुलझार अ‍ॅन्ड हृषीकेश मुकर्जी, ह्या चित्रपटाने तसे हसायचे क्षण भरभरून माझ्या झोळीत टाकले. एक प्रेक्षक म्हणून आपलं तरी दुसरं काय मागणं असतं, नाही का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>कारण जाडी, भदाडी , बटबटीत रेखा ह्या चित्रपतापासून स्लिम झाली आणि तिला मेक अपचा सेन्स आला आणि तिचे फाइन ट्युनिंग झाले आणि तिने जणू कातच टाकली. <<

ओ बाबा कामदेव, टाइमलाइन चूकलीय तुमची. तुम्ही म्हणताय ते सावन भादो, रामपुर का लक्ष्मण वगैरे ('७५ च्या आधी) ज्यात रेखा खाते-पिते घरकि लग रहि थी (सोबत टिपीकल साउदैडियन डोळ्याचा मेकप). खुबसूरतच्या आधी मि. नटवरलाल, सुहाग, मुकद्दर का सिकंदर वगैरे येऊन गेले आणि त्यात ती तुम्ही म्हणतांय तशी "भारदस्त" दिसली होती. तिच्यातला बदल बच्चन साहेबांच्या परिस स्पर्शाने झाला असं म्हणतात काहि जण पण तो एक वेगळा पुस्तकाचा विषय आहे... Happy

या चित्रपटात सगळ्यात बेस्ट काय असेल तर पिया बावरी हे गाणे.हे गाणे चित्रपटापेक्षा मोठे झालेय. जसे काला चष्मा झाले होते बार बार देखो पेक्षा मोठे.
रेखाला अल्लड मुलीची अकटिंग जमली नाहीय हे मात्र खरे.

या चित्रपटात सगळ्यात बेस्ट काय असेल तर पिया बावरी हे गाणे >> +११

राज यांनी लिहिल्याप्रमाणे शशिकला यांनीदेखिल या गाण्यामधे सुंदर नृत्य केले आहे

हुश्श्स! हिरोइण नको तेवढी म्हणजे खोटीखोटी बळंबळं वाटेल एवढी अवखळ, बालिश दाखवल्याने आगाउ वाटणारी मी एकटीच नाही हे बघुन बरं वाटलं मला.
माझं बरेचदा असं होतं.
कुणी कखुकग मधली काजोल कशी मस्त आहे ना म्हणावं आणि नेमकी तिच (पू पेक्षाही थोडी जास्तच) माझ्या डोक्यात गेलेली असते.
कुणाला जबवीमेट मधली करीना जाम आवडते आणि मला ती जरा ओव्हरच वाटलेली असते.
असां का होतं ते कळत नाही पण होतं खरं माझ्या बाबतीत.
लैच बै अवांतर. सॉरी स्वप्ना.

कुणाला जबवीमेट मधली करीना जाम आवडते आणि मला ती जरा ओव्हरच वाटलेली असते>>>>>>

मलाही ती आधी ज्यादाच वाटलेली.

शाहिदने तिला शोधून काढल्यानंतर ते दोघे जुन्या आठवणीत रमले असताना तो हॉटेल डिसेंट बद्दल सांगतो. आपण किती मूर्खपणा केला हे तिला तेव्हा कळते. स्वतःच्या मुर्खपणावर हसत असताना अचानक गंभीर होऊन इसलीये तो मेरे साथ ऐसा हुवा म्हणते. ती आगाऊ होती आता तीला समज आलीय हे या प्रसंगात लक्षात येते. त्यामुळे तिचा जुना आगाऊपणा खुपत नाही.

https://youtu.be/iXLpelbJJ-A

काही चित्रपटात हिएरोईनी शेवस्तपर्यंत आगाऊच राहतात आणि आगाऊपणा आपला हक्कच आहे समजतात. ते खुपते.

खूबसुरत मध्ये मला वाटते रेखा माफी मागते, आगाऊपणा केल्याबद्दल. आठवत नाही आता.

आगाउ नसतात त्या. अति अवखळ, अति बालिश अति भोळी भाळी दाखवतात. पण मला काही ते पटत रुचत नाही.
खरं वाटत नाही खरंतर.
शेवटी माफी मागितली वैगेरे त्या सिनेम्याच्या कथेची गरज. खरं तशी व्यक्तीरेखा ही सुध्धा सिनेमाची गरजच.
पण तरीही ती व्यक्तीरेखा खरी वाट्त नाही. माझ्या आजुबाजुला असलं कॅरेक्टर अजुन बघितलं नाही म्हणून असेल. Happy जौद्या झालं. Lol

खूबसूरत सिनेमाबद्दल थोडीशी मजेदार व दु:खद (?) आठवण. या चित्रपटात रेखाची दोन वेण्या घालायची स्टाईल ( वेण्या नेहेमीपेक्षा थोड्या वर बांधणे) कॉलेज व नववी दहावीच्या मुलींमध्ये जाम फेमस झाली होती. तशीच प्लॅस्टिक एक क्लिप बाजारात आली होती तिला "खूबसूरत क्लिप" असेच म्हणत. तीही जाम फेमस ! . आमच्या काकांनी नुकतेच जनरल स्टोअर दुकान ( खोके) टाकले होते. सुरुवातीला होलसेल मध्ये आणून ठेवेलेल्या क्लिप्स हातोहात संपल्या. मग त्यांनी धाडस करून मुंबईमधून मोठा लॉट आणला आणी हाय रे कर्मा ! ती फॅशन विरून गेली. नंतर तो लॉट माळ्यावर जाऊन पडला व दहा पंधरा वर्षे संपला नाही.

अशा अचानक प्रचंड फेमस होणार्‍या व तशाच अचानक नाहीशा होणार्‍या फॅशन हा वेगळ्याच लेखाचा विषय ( सॅटिन पट्टा साड्या, एक दुजे के लिये मध्या कमल हसन ला पाहून अति टाईट पँट्स ज्यातून तो मुलगा खांब फोडून नरसिंह बाहेर येतो तसा येइल काय अशी भिती वाटे, ई ई)

अति टाईट पँट्स ज्यातून तो मुलगा खांब फोडून नरसिंह बाहेर येतो तसा येइल काय अशी भिती वाटे>> Lol

लॉल Lol
आमच्या बालपणी मैंने प्यार कियामधला तो एकाच बाजूला गुलाबाची फुले असलेला पांढरा चुडीदार, आशिकी रिबिन होत्या.
तरुणपणी जानम समझा करो गाण्यातली क्लिप. ही टिकलीय अजूनही.

आशिकी रिबिन > + १
जानम समझा करो गाण्यातली क्लिप कुठली?

एक चांदनी पंजाबी ड्रेस पण होता.पांढरा आणि निळा.भाग्यश्री चा पोलका डॉट स्कर्ट ब्लाउज तर सगळ्यांकडे असायचा.आमच्या श्रीमंत मित्रांकडे लाडला मधली अनिल कपूर ची कॅप पण होती.

Pages