मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - गोष्ट तशी छोटी - २७ फेब्रुवारी २०१८

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58

गोष्ट तशी छोटी

कथा प्रकारातला हा प्रकार सर्वाना माहीत झालाय. अतिशय छोटी कथा काहीजण ह्याला सुक्ष्मकथा म्हणतात इंग्रजीमध्ये टेन वर्ड्स स्टोरी, हंड्रेड वर्ड्स स्टोरी अश्या नावांनी ओळखलं जातं.

नेहमीच्या कथाप्रकरापेक्षा ह्या कथाप्रकारचं स्वरूप वेगळं असतं. नेहमीच्या कथा ह्या सुरवात, गाभा, शेवट ह्या प्रकारात असतात पण ह्या प्रकारात वरवर पाहता कथा जरी वाटत असली तरी ते एखादं वाक्य असू शकेल, बातमी असेल, संवाद असतील, बोधकथा असेल किंवा अजून काही. मोजक्याच शब्दामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कथा लपलेल्या असतात. थोडा विचार केल्यास काही शब्दांमागे कथा समोर येईल. अश्याच शब्दांमागे लपलेल्या कथा तुम्हाला लिहायचीय.

खेळाचे नियम -

१) आम्ही एक शब्दसंच देऊ, त्यातले सगळे शब्द तुमच्या कथेत आले पाहीजेत.
२) कथेसाठी शब्दमर्यादा - कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त १०० शब्द
३) एक आयडी एकापेक्षा जास्त कथा लिहू शकतो.

शब्दसंच -
किनारा, डोंगर, आरसा,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माय मराठीस साष्टांग दंडवत!
(तद्वत इथल्या 'सारस्वत व शब्दप्रभूंन्ना'ही दंडवत! मायबोलीवर आल्यावर मला अजून कितीतरी शिकायचे रहिलेय ह्याची तीव्रतेने जाणिव होते. मी त्यामानाने स्वतःला यःकश्चित समजतो; नव्हे आहेच आणि म्हणून x,y असे नांव घ्यायचे असल्याने 'यक्ष'!
माझा लिहिण्याचा छोटास्सा प्रयत्न, थोडे ओढून ताणून आहे पण त्याबद्दल प्रथम क्षमा मागून मग सुरुवात करतो!)...

कथा...गोष्ट तशी छोटी

रायगडावरून आम्ही मित्रवर्ग एकेक पायरी मोजत, कष्टाने 'उतरतांन्ना' गडाखालून एक खेडवळ स्वरूपातील आज्जी काठी टेकवत पायर्‍या चढून वर येतांन्ना दिसली.

मी माझ्या एका मित्राला चिडवण्याकरता म्ह्टले "अरे तुझ्यापेक्षा ती आज्जी बरी- काठी टेकवत का होइना पण गड चढून येतेय...."

ती जवळ आल्यावर आम्हाला दुसरा धक्का बसला!! तिच्या पाठुंगळीला एक लहान मूल होतं....! मित्रवर्याने पॄच्छा केली...."काय म्हातारे....कुटं चाललीस एवढ्या उन्हाची?......अन पाठिवर काय हे वझं?"

आज्जी फटक्यात उत्तरली.....

"वझं कुटंय? माह्या नातू व्ह्यय थ्यो...."

आम्ही हसलो खरे ....

पण गाडितून परततांन्ना आरशाच्या किनार्‍यात दिसण्यार्‍या मागच्या डोंगर रांगा वेगळ्याच भासल्या...तिथे मी आयुष्याचा एक मोठा धडा शिकलो होतो.....त्या आज्जिकडून.....

चमकत्या सोनेरी वाळूचा किनारा होता. मागे पाचूने लगडलेला डोंगर होता. डोंगरावर राहणारे पक्षी उडाले की समुद्राच्या आरशात दिसत.

"याचा फोटो काढला पाहिजे..." सर्व्हेयर म्हणाला.

तिथल्या रिफायनरीच्या रिसेप्शनमध्ये आता तो फोटो भिंतभर आहे.

'मित्र'

भरकटत असताना नांगर टाकू देणारा किनारा,
संकटसमयी पाठीशी भक्कम पणे उभा डोंगर,
चुकतंय कुठे आणि काय ते दाखवणारा आरसा,
मित्र मित्र म्हणजे अजून काय वेगळा असतो!

तिच्या डोळ्यांच्या बिलोरी आरशात तो पहात राहिला विश्वासाने. शोधत राहिला आपल्या आयुष्याचा किनारा.
तिने न साहवून आपले डोळे अलगद मिटून घेतले अन त्याच्या डोंगराएवढया छातीवर डोके टेकले.
त्या धुंद क्षणात, आश्वासक मिठीत उमलली नव्या युगाची अनेकानेक स्वप्ने... जगरहाटी सुरूच राहिली.

डोंगर उतरून आले बघ तुझ्या भेटीला,
रुपेरी पुळणीवर (वाळूवर) अनवाणी पाऊले,
किनारा साथीला.

तुझं अथांग रूप दावी मनाला आरसा,
नको खुजेपणा,
विशाल हो असा.

(हे असं काव्य चालेल का कथा प्रकट करणारं) .

एक होती नदी. तिला दोन किनारे. एका किनाऱ्यावर डोंगर.
नदीचं विस्तीर्ण पात्र, जणू एक मोठ्ठा आरसा. पण डोगराला त्यात स्वतःची प्रतिमा दिसेचना. त्याला दिसे फक्त पलीकडची वनराई आणि वरच आकाश खालून वाकोल्या दागवी.
वाकून पाहता पाहता तो डोंगर तोल जाऊन नदीत कोसळला.
नदीचं पात्र गढुळलं , बदलल़, आक्रसलं.
आता नदी नाही, डोंगर नाही, आरसाही नाही.

(कोणीतरी यात रूपक भरायचा प्रयत्न करा Wink )

काल संध्याकाळी, नदीच्या किनार्‍यावर बसून, पाण्यात पाय सोडून पाण्याशी खेळत होते. पायांना रंगीबेरंगी मासे गुदगुल्या करते होते. पाण्यात तयार होणारे भोवरे , वेगळीच नक्षी तयार करत होते. पाण्याचा खळखळाट मन आनंदीत करत होता. मी भान विसरून त्या आनंदात रममाण झाले होते. माझं प्रतिबिंब पहाताना, आरशात पहात असल्याचा भास होत होता. मी तल्लीन झाले होते. आणि अचानक पतेर्‍याचा, घसघसघस आवाज झाला. समोरच्या डोंगरावरून एक रान डुक्कर पाणी प्यायला नदीवर आलं . मी तर दगडच झाले. तोंडातून शब्द फुटेना, जीभ आता ओढू लागली, हृदयाच्या ठोक्यांची गती, व आवाज वाढला. मी बेशुद्धच होणार, इतक्यात ते डुक्कर पाणी पिऊन परत डोंगरात गेले. व मी हळू हळू पूर्व स्थितीत आले.

किनार्या जवळ असणारा डोंगर समुद्राच्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब बघत होता..
जवळ असणार्या मुलीस म्हणाला " ताई, आरसा देतेस का? पाण्याच्या प्रतिबिंबात मी जरा जास्त ओबडधोबड दिसत आहे..!!

तिचे पाणीदार डोळे आरसा बनून माझ्या प्रतिसादाची वाट पाहत होते, माझ्याकडं डोंगराएवढे काळीज होते पण खिसा एवढा फाटला होता कि आता ढगांच्या रुपेरी किनारही रौद्र रुप धारण केलेल्या सागर किना-याएवढी भयानक वाटू लागली , शेवटी काळजावर दगड ठेवून म्हणालो - निघतो आता .

डोंगरांची आणि सागर किना-याचे सौंदर्य सेल्फीच्या आरसा घेवून कधीच दिसणार नाही, त्यासाठी त्यांच्याशी मनाने एकरुप व्हायला हवे.

आयुष्य जर एक अथांग समुद्र असेल तर त्या समुद्रात प्रत्येक जीवाला असतात असंख्य अपेक्षा. त्यासाठी चालू राहते दैनंदिन मंथन. पण कधीतरी त्याच्याही नकळत त्या अपेक्षांचा डोंगर वाढत जातो. त्या डोंगराचे ओझे वाहून थकलेल्या त्या जीवाला हवा असतो एक किनारा. परंतू असा किनारा त्यांनाच मिळतो ज्यांच्याकडे असतो स्वतःची ओळख जाणून घ्यायला स्वत्वाचा आरसा.

ओबड-धोबड दगडांचा डोंगर, त्याच्या पायथ्याशी सुंदर किनारा! सुंदर चित्र होते ते पण त्याकडे बघत तरी किती वेळ घालवणार?
सकाळी दहा वाजता भेटायची वेळ ठरली होती. आता दुपारचा एक वाजला तरीही त्यांचा नंबर आला नव्हता. रात्रभर प्रवास आणि आता लागलेली भूक त्यामुळे तिला कसेतरी वाटू लागले. ती उठून स्वच्छतागृहात गेली. तोंडावर थंड पाण्याचा हबका मारला. समोरच्या आरश्यात वार्धक्याच्या खूणा आज जरा जास्तच दिसत आहेत असे तिला वाटले. ती बाहेर आली तेव्हढ्यात त्यांचा नंबर आला.
ते दोघे दार ढकलून आत गेले आणि त्यांना तो दिसला. पण क्षणभरच. डोळ्यांतल्या पाण्यामुळे पुढचे काही दिसेना. ते पुसत त्यांनी त्याला मनभरून पाहीले आणि ते मागे वळले.

मला पृच्छा होते, या जुनाट आरशांमध्ये ठेवलं काय आहे? मी आतून कुत्सितपणे हसतो. तुम्हाला म्हणून सांगतो मी आरसा वाचू शकतो.

समजा तुम्ही एका डोंगराच्या माथ्यावर बसलेला आहात आणि दिसते आहे ते सर्व क्षणार्धात नोंदवू शकता. आरशाचे तेच तर काम आहे. आरसा ज्ञानसागरास अडवणारा काचेचा किनाराच जणू! त्यात पोहणे फक्त मलाच जमते.

हा आरसा मला इतके दिवस खोलवर डुंबू देत नव्हता. आज अखेर मी नोंदलेल्या शेवटच्या प्रतिबिंबापर्यंत पोचलो आहे. ही मानवाकृती तर नक्कीच नाही. धोका! माझा हात आरशात का घुसतोय? काचेच्या किनार्‍याची दलदल कधी झाली? रोखून बघणारे हे लाल डोळे, आत ओढणारे हे राकट हात आहेत तरी कोणाचे?

मायबोली नगरीच्या वेशीवर, डोंगराच्या पायथ्याशी आणि नदीच्या किनारी...
मराठी भाषादिनानिमित्त माबोकरांची शाळा भरली होती.
वे. ब. मास्तरांनी पहिलाच प्रश्न गुगली टाकला,

सत्तावीस फेब्रुवारीला (मराठी भाषा दिनाला),
एक मे ने (महाराष्ट्र दिनाने) भागले
तर बाकी काय??

माबो परीसरातले सारे भास्कराचार्य, रामानुजन आणि बिरबल, तेनालीरामन उत्तर शोधायला लागले.
पण कोणालाच हे गणित सुटेना, कोणालाच काही सुचेना..

सत्तावीस फेब्रुवारी काय.. एक मे काय.. त्यांचा भागाकार कसा काय.. आणि झालाच तर बाकी काय??

सर्वांनी चक्रावून गुडघे टेकले !

अश्यातच शाळेत नव्यानेच प्रवेश घेतलेल्या पोरसवद्या कोवळ्या मिशीच्या ऋन्मेषने हात वर केला, मी सांगू ??

आणि सारयांच्या नजरा तिथे वळल्या..

गालातल्या गालात हसत ऋन्मेष उत्तरला...

उत्तर आहे,

.
.

आरसा Happy

- 100

तो बराच वेळ अथांग पसरलेल्या समुद्राकडे पाहत
किनाऱ्याशी बसुन होता. आपले आयुष्यही असेच शांत असावे असे त्याला मनापसुन वाटत होते. ना अडचणींचे डोंगर असावेत. ना दु:खाचे खाचखळगे खरेतर त्याला समुद्राचा हेवा वाटत होता. आज आपणही या समुद्राशी एकरुप व्हायचे असे त्याने ठरवले. पण अचानक वातावरण बदलले. जोराचा वारा सुटला. थोड्यावेळापुर्वी शांत असणाऱ्या समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळु लागल्या. किनाऱ्यावरच्या कोलाहलाची त्याला अचानक जाणीव झाली. एक पोलीस सर्वांना किनाऱ्यापासुन दुर जाण्यास सांगत होता. तो ही उठला आणि आपल्या खऱ्या आयुष्याचा आरसा दाखवल्याबद्दल समुद्राचे आभार मानुन मुकेशची आवडती शीळ वाजवत घरचा रस्ता चालु लागला.

भेटीचा क्षण जवळ आला तशी हुरहूर वाढत होती.उन्हाळ्यात पावसाची एक सर जितका आनंद देते तितका आनंद त्याच्या येण्याने झाला.डोंगरातल्या दरीसारख्या त्याच्या गालावरच्या खळ्यांनीच मला त्याच्या प्रेमात पाडल होत.त्याच्या निळ्या डोळ्यांच्या आरशातल माझं प्रतिबिंब मलाच मोहीनी घालत होत.आयुष्यभर ज्याची वाट पाहिली तो समुद्रकिनारी माझीच वाट पाहत होता.जिवंतपणी नाही तर निदान मृत्यूनंतरचा प्रवास तरी एकत्र करण्यासाठी.

आज खूप दिवसान्नी तिने मोकळा श्वास घेतला, डोन्गर-पायथ्याशी दवान्क्रुत झालेल्या हिरव्याकन्च गवतावर मनसोक्त लोळण घेतले. त्याच
ओलेत्या पायान्नी धावत जाऊन लाटेने किनार्यावर स्वतःची आठवण म्हणून मागे सोडलेले शन्ख- शिम्पले गोळा केले आणि
फ्रॉक च्या खिशामध्ये हात घातला, तोच नेहमीचा, काहीसा ओळखीचा वाटणारा आवाज आला,

"मीनू-ताय, उठा आता... आज पिलाष्टर काढायच हाय... हा घ्या आरसा, मी तुमचे केस आवरून देते..आता हितून फूध्ढ, ह्या कूबड्याच तुमचे पाय..."

किनारा बार, पनवेल. जेन्ट्स टॉयलेटमध्ये आरशाच्या मागे चिठ्ठी आहे. त्यात लिहिलेलं काम फत्ते करणं हा तुझ्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर हटवायचा एकच मार्ग आहे...

कोणी तरी तिला सांगितले होते की नदीच्या त्या किनार्या लगतच्या डोंगरापलिकडे एक देऊळ आहे. त्या देवळातल्या देवतेकडे सुखासमाधानाची किल्ली आहे.
मजल दरमजल करत ती पोहोचली त्या देवळात. तर मूर्तीच्या जागी एक लख्ख आरसा होता.

{किनारा बार, पनवेल. जेन्ट्स टॉयलेटमध्ये आरशाच्या मागे चिठ्ठी आहे. त्यात लिहिलेलं काम फत्ते करणं हा तुझ्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर हटवायचा एकच मार्ग आहे...}

"अर्थ माझा वेगळा" या थीमला इथे वापरलंय. किनारा/डोंगर यांचे नैसर्गिक रुढार्थ इथे नाहीयेत. अगदी आरसा पण प्रतिबिंब पाहण्यासाठी न वापरता दुसऱ्याच कामासाठी वापरला गेलाय.

छान!

पण उपक्रमाचे नाव 'गोष्ट तशी छोटी' ऐवजी वेगळे काहीतरी हवे होते. याच नावाचा एक विशेषांक मिपावर गेल्यावर्षी आलेला.

तोच नितांतसुंदर तलाव, तोच फुलांनी सजलेला किनारा, तेच आरशासारखं पाणी, आणि समोर तेच तुरळक बर्फ असलेले डोंगर. तिला सगळं आठवलं. याआधी इथे ती आली होती तेंव्हा एक सुंदर स्वप्न अलगद तिच्या मनात फुललं होतं. निसर्गाच्या कुशीत, फुलं, पानं, झरे, पक्षी, वारा, ह्यांच्या संगतीत आयुष्य घालवण्याचं स्वप्न. पण ते स्वप्नंच राहिलं. प्रगतीच्या दिशेनं चालत राहिलेली पावलं इथे कित्येक वर्षांत फिरकलीच नव्हती. निसर्ग, पक्षी, झरे ह्यांची जागा काचेची बिल्डिंग, लॅपटॉप, मीटींग्ज, घराचे हप्ते ह्यांनी बळकावली होती. समोरच्या त्या अप्रतिम सौंदर्याकडे निश्चयाने पाठ फिरवून ती निघाली.. पुन्हा इथेच येण्यासाठी - कायमचं.