महाशिवरात्र एक उत्सवाचा दिवस

Submitted by कृष्णा on 14 February, 2018 - 04:32

महाशिवरात्र एक उत्सवाचा दिवस आणि आमचा गांव!!

आमच्या गावी महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे एक मोठ्ठा उत्सवाचा आणि उत्साहाचा दिवस असे. लहाणपणी एकतर उपवासाचे पदार्थ खाण्याची चंगळ आणि गावचे दैवत अगस्ती ऋषींच्या आश्रमाजवळची यात्रा! गावात दोन भव्य शिवमंदिरे आहेत एक सिद्धेश्वर जे हेमाडपंथी उत्खननात सापडलेले तर दुसरे पेशवेकालीन गंगाधरेश्वर. पहाटेच स्नान वैगेरे करुन आधी महादेवांचे दर्शन मग घरी येऊन फराळ वैगेरे मनसोक्त करून अगस्तीच्या यात्रेला जायचे आणि दिवसभर तिथे धमाल..
अमृतवाहिनी प्रवरेच्या तिरी उत्तरेला अगस्तींचा आश्रम तर दक्षिणेला श्री सिद्धेश्वराचे मंदीर. नदीत उतरून नदी ओलांडायची आश्रमात जायला कारण तो जवळचा मार्ग होता पुलावरून गेलो तर किलोमिटरभर जास्त चालावे लागे.
पुर्वी हा आश्रम म्हणजे एक जुन्या पद्धतीचे लाकडी वर मातीचे बांधकाम असलेले मंदीर होते आता काँक्रीटचे झालेय पण पुर्वीचे अगदी लख्ख डोळ्यासमोर आठवतेय! आजूबाजूला टेकड्या मधून खळखळणारा शुध्द पाण्याचा ओढा... ओढ्याच्या वर एक छोटासा धबधबा होता तेथुन देखिल बारमाही पाणी वहायचे.. आजूबाजूला चिंच, बोरे, आंबे यांची दाट झाडी हे सगळे ह्या अगस्ती आश्रमचे वैशिष्ट्य.

यात्रा अगदी सगळी कडे असते तशी.. आजूबाजूच्या जिल्ह्यातील अगदी नासिक, नगर, ठाणे, पुणे आदी जिल्ह्यातुन लोक येतात.. विविध रंगीबेरंगी दुकाने, मिठाया, खेळणी, खेळ, ह्यांनी यात्रा फुलुन जाते.. कुस्तीचा फड हे इथल्या यात्रेचे प्रमुख आकर्षण. मग अगदी १ रुपायाची पिपाणी, दोन रुपयाची बासरी. ते रबर बांधलेले हातात खेळवायचे फुगे. असले अनेक प्रकार काय घेऊ आणि काय नको असे व्हायचे तेंव्हा.. खिश्यात ५-१० रुपये घेऊन गेलो तरी सगळ्या यात्रेची धमाल मज्जा लुटली जायची..

अगस्ती ऋषी हे आद्य कृषक.. ह्या आद्य शेतकर्‍याचे वास्तव्य आमच्या गावी नदीच्या सानिध्यात होते उत्तरे कडून दक्षिणेत येताना त्यांनी इथे वास्तव्य केले अशी कथा सांगितले जाते.. प्रभु रामचंद्र वनवासात पंचवटी येथे असताना अगस्तींच्या दर्शनाकरता ह्या आश्रमी आलेले. .. इथे छानसे असे एक राम मंदीर देखिल आहे.
प्रवरामाई आमची करर्पूरगंधा आहे.. असे म्हणतात कि तिला हा गंध कर्पूरगंधा सीतामाईने ह्या नदीत स्नान केल्याने प्राप्त झाला.. तर संत ज्ञानेश्वर माऊली हिला अमृतवाहिनी म्हणतात..

ह्याची देखिल एक अख्यायिका आहे.. देव दानव समुद्र मंथनात प्राप्त झालेले अमृत मिळवण्यासाठी राहू रूप पालटून आलेला.. आणि विष्णू मोहिनी रुपात अमृत वाटण्याचे काम करीत होते हाच तो राहुचा अरी जेथे उत्पन्न झाला आणि त्याने सुदर्शन चक्राने शिरच्छेद केला ते राहुरी . तर जे राहुचे शिर उडुन रतनगड जो गावाच्या पश्चिमेला आहे तिथे पडले.. गळ्यातुन ओघणारे अमृताचे थेंब ज्या पासून ऊगम पावली ती आमची अमृतवाहिनी प्रवरा. आणि मग हे मोहिनी स्वरुप जिथे स्थानपन्न झाले ते नेवासा गांव इथे मोहिनीराजाचे सुरेख मंदीर आहे.. ह्या नेवासा गावीच ज्ञानेश्वर माऊलीने अमृतानुभव घेऊन भावार्थदिपीका हा अत्यंत मधूर अश्या अमृताते पैजा जिंकी मराठी भाषेतील ग्रंथ लिहला..

थोडे वहावत गेलो लिहताना. पण माझ्या मातीची तिथल्या प्रवरामाईची आणि अगस्तीच्या त्या सुखद अश्या यात्रेची आठवण आज पाचसातशे मैलावर असताना उरी दाटून आली..

सिद्धेश्वर मंदिर

sidd3.jpg

मोहिनीराज मंदिर नेवासे

mohiniraj.jpg

ज्ञानेश्वर मंदिरातील खांब..

khamb.jpg

अगस्ती ऋषी मंदिरातील मुर्ती
Agasti1_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त् वर्णन क्रुश्नाजी
एक नंबरचा फोटोतील मंदिर आणि नरसिंहवाडी जवळील खिद्रापुर चे मंदिर यांच्यात बरेचसे साम्य् आहे.

सुंदर वर्णन! लहानपणच्या जत्रेची मजा औरच असते.
आमच्या गावाशेजारी देवखोल नावाचं गाव आहे. ( श्रीवर्धन तालुक्यात). तिथे कुसुमेश्वर हे शंकराचे स्थान आहे. मूळ स्थान खूप जुने आहे, पण आता बांधलेले मंदिर १०/१५ वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराची जागा वस्तीपासून लांब, चारही बाजूंना गर्द झाडी, एकांत अशी आहे. ( साधारणपणे शंकराचे मंदिर अशाच जागी असते ) . इतकं प्रसन्न वाटतं तिथे जाऊन!
तिथे महाशिवरात्रीच्या दिवशी उत्सव असतो. मोठ्या प्रमाणात नाही, पण कीर्तन तरी असतं/ असायचं आमच्या लहानपणी.
पावसाने खूप वाट पहायला लावली एखाद्या वर्षी, तर आजूबाजूच्या ५/६ गावांमधले गावकरी ठरवून एखाद्या सोमवारी या महादेवाला कोंडतात. Happy म्हणजे देवळाच्या बाजूला जी पुष्करणी आहे, त्यातलं पाणी हंड्या- कळशांनी उपसून गाभाऱ्यात ओततात आणि गाभारा भरतात. देवाला जाब विचारतात जणू Happy

वाह सुंदर लेख. अगदी माहीतीपूर्ण. फोटोपण सुरेख.

मुंबईहून श्रीरामपूरला जाताना अकोले मार्गे गेलो होतो, तेव्हा अगस्ती नावं सगळ्याला दिसली, तेव्हा लक्षात आलं अगस्ती ऋषीचं वास्तव्य पण देऊळ वगैरे बघितलं नाही. परत तिथे जाणे झालं नाही. तो भाग सर्वात सुपीक आहेना नगर जिल्ह्यात, निसर्गाचा वरदहस्त आहे.

जत्रेची मजा वेगळीच. परवा नवरा पण सासरच्या गावच्या कोकणातल्या महाशिवरात्र जत्रेची आठवण काढत होता. आमच्या गावात जवळच्या नाडण आणि वाडा (विमलेश्वर देव) गावातून पालखी येते देवाची आणि समुद्रस्नान पण असते. आमच्या फणसे गावचा रामेश्वर, वाड्याचा विमलेश्वर आणि नाडणचा देव, नाव माहीती नाही असे तीन एकत्र येतात. नाडण म्हणजे मनिमोहर यांचं गाव.

राहुरी, नेवासा श्रीरामपूरहून तासाभराच्या अंतरावर असल्यामुळे बरेचदा जायचो. मोहिनीराज मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर बघितलं आहे.

सिद्धेश्वर मंदिर फार सुरेख दिसतंय. ते बघितलं नाही मात्र.

धन्यवाद कावेरि, पंडीतजी, वावे, पीनी, कंसराज, अन्जू!

वावे, श्रीवर्धनचे हरीहरेश्वर ३-४ वेळा झाले पण श्रीवर्धनला नाही झाले जाणे. कोकणातील मंदीरे देखिल अशीच रम्य सगळी.
मुख्यतः शंकराच्या मंदीरात गारवा हा असतोच असे माझे निरिक्षण. कदाचित जाड दगडी बांधकामामुळे असेल पण अगदी रखरखत्या उन्हात देखिल तिथे थंड वाटते.. हा अनुभव मी आमच्या गावातील सिद्धेश्वर आणि आजोळच्या गोंदेश्वर मंदीरात बर्‍याच वेळा घेतलायं.

तो भाग सर्वात सुपीक आहेना नगर जिल्ह्यात, निसर्गाचा वरदहस्त आहे. >>>>

हो अगदी रम्य आणि सुपिक आमच्या गावाला तर सगळी कडे सह्याद्रीचे डोंगर, मध्ये प्रवरा, भंदारदरा, कळसूबाई, हरिश्चंद्रगड, पट्टाकिल्ला अशी अनेक पर्यटकांची आकर्षण स्थळे. समशेरपूर इथे देवीचे एक सुंदर पुरातन हेमाडपंथी मंदीर आहे.

कंसराज, एवढ्यात कधी गेला की नाही अगस्तीच्या यात्रेला? मला ७-८ वर्षे झाली असतील अकोल्याला यात्रेला जाऊन.

मस्त आहे वर्णन आणि फोटोही. या यात्रेबद्दल आणि अगस्ती ऋषींच्या मंदिराबद्दल काहीच माहिती नव्हती. ही जत्रा अशीच अजून सुरू असते का दरवर्षी? गाव कोणते ते ही समजले नाही. 'अकोले' का? सहज कुतूहल म्हणून प्रवरेचा मार्ग ट्रेस करत गेलो मॅप वर आणि तेथे एक सिद्धेश्वर मंदिर दिसले, व थोडे लांब उत्तरेला अगस्ती मंदिरही. नकाशावर पाहिले तर तेथून देवठाण सिन्नर रस्ता आहे त्याच्या उजवीकडे प्रवरेचा प्रवाह एकदम मोठा दिसतो.

कृष्णा छान माहिती दिलीस अन मंदिराचे फोटोहि Happy
कोकणातील मंदीरे देखिल अशीच रम्य सगळी>>> खरच कोणत्याहि मंदिरात जा इतकी शांतता असते ना.. छान अनुभुती असते ती! सगळं विसरतो आपण.

धन्यवाद कंसराज, फारएण्ड, मानव, भावना.

फारएण्ड तेच तेच बरोबर आहे ट्रेस केलेला मार्ग! ह्या प्रवरेच्या तिरीच हे दक्षिणेला मंदीर आहे... तसेच उत्तरेला लागूनच एक डोंगर आहे... त्याला सातारा डोंगर म्हणतात इथे खंडोबाचे छोटेसे मंदीर आहे छान!

आज महाशिवरात्री यात्रा अगस्तीला अमृतवाहिनी प्रवरेच्या तिरी... बरेच दिवसात यात्रेला जाता आले नाही!
बघुया आता केंव्हा योग येतो ते!

Agasti.jpg